शैक्षणिक मानसशास्त्र : मानवी विकास, प्रेरणा, अध्ययन-अध्यापन, मूल्यमापन आणि त्या संदर्भात होणाऱ्या आंतरलक्रियां- संबंधी केलेले मानसशास्त्राचे व मानसशास्त्रीय पद्धतींचे उपयोजन. उपयोजित मानसशास्त्राची एक महत्त्वाची शाखा. या शाखेत शैक्षणिक अध्ययन-अध्यापनाच्या क्षेत्रात अधिक सुधारणा घडवून आणण्यासाठी संशोधन करण्यात येते. व्यक्तीच्या सुप्तगुणांचा पर्याप्त विकास होऊन ती सक्षम होण्यासाठी ज्या ज्या गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे असते, त्या त्या सर्व गोष्टींचा शैक्षणिक मानसशास्त्रात विशेषत्वाने अभ्यास केला जातो.

शैक्षणिक मानसशास्त्राच्या प्रगतीचा ऐतिहासिक आढावा घेतल्यानंतर ग्लोव्हर व रोनिंग या मानसशास्त्रज्ञांनी १९८७ साली त्याची व्याप्ती स्पष्ट केली. त्यांच्या मतानुसार या शास्त्रामध्ये मानवी विकास, व्यक्तिभेद, अध्ययन, प्रेरण, मापन या सर्वांचा समावेश होतो. हे शास्त्र सिद्धांत व प्रदत्तांपासून मिळालेले संशोधनांचे निष्कर्ष या दोहोंवर अवलंबून असते. या दृष्टीने पाहता शैक्षणिक मानसशास्त्रात अध्ययनप्रकियेच्या बाबतीत सुप्त उपयोजन फार मोठे आहे. व्यक्तीचा सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट सक्षमता व व्यक्तिमत्त्व यांच्या विकासाशी व ज्ञानसंवर्धनाशी निगडित आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक मानसशास्त्रातील सिद्धांतांचे व संशोधनाचे उपयोजन औपचारिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षण, मुक्त शिक्षण, प्रौढशिक्षण, अपंगांचे शिक्षण, व्यवसाय शिक्षण, दूरशिक्षण यांसारख्या सर्व प्रकारांतून करण्यात येते.

शिक्षण म्हणजे सामाजिक वास्तवाचे भान, असा अर्थ घेतल्यास शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे शैक्षणिक संस्थांचा, अभ्यासकमांचा, अध्ययनपद्धतींचा साकल्याने केलेला संशोधनात्मक अभ्यास, असे म्हणता येईल. फलनिष्पत्तीच्या दृष्टीने शिक्षणाचा विचार केल्यास, शिक्षण घेण्यास पात्र असलेले व शिक्षण पूर्ण केलेले यांचा विशेष अभ्यास शैक्षणिक मानसशास्त्र करते. व्यक्तीला व समूहाला पभावित करणारे वर्तन, असा शिक्षणाचा अर्थ घेतल्यास शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे शिक्षणविषयक परिस्थितीच्या संदर्भातील मानसशास्त्रीय घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र, असे म्हणता येईल. या संदर्भात विविध मानसशास्त्रीय तंत्रे व पद्धती विकसित केल्या जातात.

साधारणपणे विसाव्या शतकारंभी शैक्षणिक मानसशास्त्राला स्वतंत्र शास्त्रशाखेचा दर्जा प्राप्त झाला. अभ्यासक्रमात समाविष्ट केलेली शैक्षणिक मानसशास्त्राची पहिली पाठ्यपुस्तके १८७९ (अलेक्झांडर बेन) व १८८४ (जेम्स सली) मधील आहेत. स्विस समाजसुधारक ⇨ योहान हाइन्रिक पेस्टालोत्सी याच्या विचारांचा शैक्षणिक मानसशास्त्रावर बराच प्रभाव पडला. त्याच सुमारास हॉल, एबिंगहाऊस, गॉल्टन इत्यादींनी केलेल्या संशोधनाने शैक्षणिक मानसशास्त्रास चालना मिळाली. १९०५ साली बीने-सीमोन बुद्घिमापन चाचणीने शैक्षणिक मानसशास्त्रात नवे पर्व सुरू झाले. गॉडर्ड (१९०८), टर्मन (१९१६) यांचे त्यासंबंधीचे कार्य विशेष महत्त्वाचे ठरले. पहिला शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ म्हणून ⇨ एडवर्ड थॉर्नडाइक यांना जगभर मान्यता मिळाली. त्यांनी केलेले प्राण्यांच्या बुद्घिमत्तेवरील संशोधन व अनुबंधवादासंबंधीचे नवे सिद्धांत सर्वमान्य झाले.

विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत अध्ययन, शीण वा थकवा, अध्ययनवक इत्यादींसंबंधी बरेच संशोधन झाले. झां प्याजे, थॉर्नडाइक, वायगोटस्काई यांसारख्या संशोधकांच्या अभ्यासातून विकासात्मक

मानसशास्त्र, बालमानसशास्त्र यांचा परिचय झाला. दोन महायुद्धांच्या दरम्यान मनोविश्लेषण समष्टिवाद व मनोमापन या विषयांतील अभ्यासांनी शैक्षणिक मानसशास्त्र समृद्घ केले. दुसऱ्या महायुद्धानंतर अध्ययन- अध्यापनाविषयी विविध सिद्धांत व तत्त्वे पुढे आली. प्रायोगिक मानसशास्त्राच्या अचूक पद्धती, प्रदत्तांचे नेमके विश्लेषण, शास्त्रीय पद्धतीने केलेले निरीक्षण, यांतील प्रगतीमुळे शैक्षणिक मानसशास्त्र अधिक समृद्घ झाले. प्रगत देशांतील अनेक विदयापीठांतून व महाविदयालयांतून एक स्वतंत्र विषय म्हणून तसेच स्वतंत्र शैक्षणिक विभाग म्हणून शैक्षणिक मानसशास्त्रास स्थान लाभले. अशा विभागांमध्ये शैक्षणिक मानसशास्त्राच्या अंतर्गत विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. तसेच संशोधनासाठी व उपयोजनासाठी बालमानसशास्त्र, शालेय मानसशास्त्र, मार्गदर्शन व उपयोजन, मनोमापन यांसारखे अनेक पर्याय उपलब्ध असतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील अनेक विदयापीठांत वाचनासारख्या विषयावर अद्ययावत उपकरणांच्या आधारे सुसज्ज प्रयोगशाळेत विशेष संशोधन करण्यात येते. शिक्षक प्रशिक्षणातही शैक्षणिक मानसशास्त्राचा अंतर्भाव आहे.

साधारणपणे एकोणिसाव्या शतकापर्यंत या शास्त्रासंबंधी सैद्धांतिक व वर्णनात्मक पुस्तके प्रसिद्घ झाली. पुढे प्रगत संशोधनामुळे प्रत्यक्ष शास्त्रीय चाचण्या, त्यांचे निष्कर्ष, अध्ययनासंबंधीचे विविध बारकावे, यांवर भर देणारी पुस्तके निर्माण होऊ लागली. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत विदयार्थी हा केंद्रस्थानी मानून केलेला बालमानसशास्त्र व वाढत्या वयाच्या मुलांच्या मनोवृत्तींचा, विकासाचा, क्षमतांचा व अध्ययन पद्धतींचा अभ्यास यांवर भर देण्यात आला. प्राणिमानसशास्त्र, मनोविकृतिशास्त्र यांच्या साहाय्याने नव्या संकल्पना उपलब्ध झाल्या. बालकांमध्ये अंगभूत नकारात्मक वृत्ती असतात, असे पूर्वीचे सिद्धांत चुकीचे ठरले. तसेच आनुवंशिकता महत्त्वाची की परिस्थिती, यांवर खूपच चर्चा झाली. मानवी विकासात दोहोंची भूमिका महत्त्वाची आहे, असा निष्कर्ष मान्य झाला. शास्त्रशुद्घ विश्लेषणामुळे या दोन्ही घटकांच्या अंतर्गत असणाऱ्या अनेक बाबी उजेडात येऊन त्यांच्यातील आंतरकियेची गुंतागुंत लक्षात आली. व्यक्तिविशिष्टता व व्यक्तिभेद यांना महत्त्व प्राप्त झाले. अध्ययनाच्या बाबतीत मनासारख्या कल्पित गोष्टी मागे पडून मेंदूचा विचार होऊ लागला. शरीर व मेंदूचे कार्य यांचा परस्परसंबंध व व्यक्तीचे वर्तन यांचा साकल्याने विचार होऊ लागला. अध्यापनही अध्यापक केंद्रित न राहता विदयार्थी केंद्रित बनले. पूर्वी अध्यापनासंबंधीचे सर्व निर्णय अध्यापक स्वतःच घेई पण आता विदयार्थ्यांची क्षमता, अभिक्षमता, कल, अध्ययनक्षमता, वय यांनुसार शिकवावे असा दृष्टिकोन प्रभावी ठरला. निदर्शित अध्ययनाची कल्पना अधिक मान्यता पावत आहे. अध्ययनासाठी पोषक उपयुक्त अशी वातावरणनिर्मिती करणे, तसेच अध्ययनाला साहाय्य करणे म्हणजे अध्यापन, अशी विचारसरणी आता रूढ झाली आहे. अध्यापकाचे व्यक्तिमत्त्व व अध्यापनाची कौशल्ये यांसंबंधी संशोधन होऊ लागले. जे. एम्. कॅटेल या मानसशास्त्रज्ञाने १९३१ मध्ये केलेल्या संशोधनातून अध्यापकाचे व्यक्तिमत्त्व व कार्य यांसंबंधी एक व्यापक विचार स्पष्ट झाला. अध्ययन-अध्यापनाबाबत विदयार्थ्यांची व शिक्षकांची सर्वेक्षणे करण्यात आली व त्यांतील निष्कर्ष मार्गदर्शक ठरले.

अध्ययनाच्या परिणामकारकतेचे मापन करण्यासाठीही संशोधन सुरू झाले. बुद्घिमापनाची संकल्पना पुढे आली, पण लवकरच तिच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. चारित्र्याची कल्पनाही व्यक्तिमत्त्वाच्या कल्पनेपेक्षा वेगळी असल्याचे दिसून आले. मूल्यशिक्षणाचा विचार पुढे आला. मनोविकृतीच्या दृष्टिकोनातून व्यक्तिमत्त्वाचा विशेष विचार होऊ लागला. व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीतील परिस्थितीचा घटकही अभ्यासनीय ठरला.


शैक्षणिक मानसशास्त्रातील सैद्धांतिक विकासही वेगाने होत राहिला. परंपरागत शिस्तीच्या संकल्पना व सिद्धांत बदलू लागले. थॉर्नडाइक यांनी उद्दीपक व प्रतिकिया यांच्यातील संबंध दृढ करणे, म्हणजेच अध्ययन असा सिद्धांत मांडला. बी. एफ्. स्कीनर यांनी अध्यापन म्हणजे वर्तन बदलण्यासाठी आवश्यक अशी उपाययोजना, असे मत मांडले (१९५७). त्यामुळे शिक्षणप्रकियेसंबंधीचे शास्त्र हे उपयोजित शास्त्र बनले. वेल्थी फिशर यांच्या मतानुसार शिक्षणाच्या मानसिक अंगांचा विचार करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय. पुढे वर्तनवाद व समष्टिवाद यांचा शैक्षणिक मानसशास्त्रावर प्रभाव वाढला. गॅग्ने यांच्या मतानुसार (१९६७) अध्ययन विविध प्रकारांमध्ये घडते. त्यांचा परस्परसंबंध व त्यांचे परस्परावलंबन विशिष्ट प्रकारच्या उतरंडीतून स्पष्ट करता येते. १९५४ मध्ये ए. एच्. मॅस्लो यांनी तर १९६७ च्या सुमारास मक्लेलंड व अटकिन्सन यांनी प्रेरणा व यश यांच्यातील परस्परसंबंधाचे महत्त्व स्पष्ट केले. यशाची आशा, अपयशाची भीती, शिकण्याची इच्छा, निंदा-स्तुती इत्यादींचा अध्ययनावर होणारा परिणाम स्पष्ट झाला. अध्यापनाची सर्वसामान्य तत्त्वे अध्यापनाच्या विविध पद्धतींचे विश्लेषण, शिक्षकाची महत्त्वपूर्ण भूमिका, यांचा विशेष विचार होऊ लागला. अलीकडच्या काळात शिक्षकाच्या विशिष्ट वर्तनप्रकारांचा व अध्यापनाच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अध्ययनावर कसा परिणाम होतो, याविषयी संशोधन होऊ लागले. तसेच अध्ययनविषयक प्रेरणेवर प्रभाव पाडणारे विविध घटक, अध्यापनपद्धतीमुळे अध्ययनात निर्माण होणारी गोडी, अध्यापनातील तंत्रज्ञान यांवर अधिक भर देण्यात आला. व्यक्तिभेदाच्या तत्त्वाबरोबरच व्यक्तिकेंद्रित विचारसरणी पुढे आली. शैक्षणिक व व्यावसायिक सल्ला व मार्गदर्शनाची अतिशय महत्त्वपूर्ण संकल्पना रूजली. बॅकमन व सेकॉर्ड (१९६८) यांनी सामाजिक संदर्भ व परिस्थितीबाबतची भूमिकाअग्रक्रमाने मांडली. बर्नस्टीन यांनी सामाजिक व सांस्कृतिक घटकांमध्ये कित्येक प्रेरणांचे मूळ असते हे दाखवून दिले. विदयार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत कौटुंबिक वातावरणाचा घटक महत्त्वाचा असतो, हे अलीकडील संशोधनातून स्पष्ट झाले.

शैक्षणिक मानसशास्त्र ही विकसनशील शास्त्रशाखा आहे. म्हणून आज ती परिपूर्णावस्थेत आहे, असे नाही. तसेच या शास्त्रात सैद्धांतिक भूमिकांच्या संदर्भात वादाचे मुद्देही बरेच आहेत. तथापि मानसशास्त्राचे शैक्षणिक उपयोजन अत्यंत उपयुक्त आहे. हे उपयोजित शास्त्र असल्याने त्यातील अनेक महत्त्वाच्या विषयांवरील मूलभूत संशोधन मर्यादित झालेले आढळते. शैक्षणिक मानसशास्त्राच्या उपयुक्ततेबाबत तसेच उपयोजन होण्याबाबत समाजात अधिक जागृती होण्याची गरज आहे. भारतासारख्या देशात शैक्षणिक मानसशास्त्राच्या काही मूलभूत संकल्पना यशस्वी रीत्या राबवल्या जातात, हे पुरेसे नाही. विदयापीठातील शिक्षकांना शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्यास अनिवार्य नाही. त्याचप्रमाणे शैक्षणिक मानसशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांत विदयार्थ्यांच्या जीवनातील अधिक उदाहरणे व सर्वेक्षणे अपेक्षित आहेत. केवळ सिद्धांतांचे संकलन उपयुक्त ठरत नाही, तर उपयोजनांचे प्रकार व प्रयोग यांवर भर देणे योग्य ठरेल.

संदर्भ : 1. Elliott, S. N. Kratochwill, T. R. Cook, J. L. Travers, J. K. Educational Psychology : Effective Teaching, Effective Learning, Boston, 2000.

2. Gage N. L. Berliner, D. C. Educational Psychology, Boston, 1984.

वाडकर, अलका