शेळके, शांता : (१२ ऑक्टोबर १९२२६ जून २००२). ख्यातनाम मराठी लेखिका, कवयित्री, अनुवादक व गीतकार. संपूर्ण नाव शांता जनार्दन शेळके. जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे. पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातच सर परशुरामभाऊ महाविदयालयात पुढील शिक्षण घेतले. तेथे श्री. म. माटे, के. ना. वाटवे हे प्राध्यापक म्हणून त्यांना लाभले. याच सुमाराला प्रा. रा. श्री. जोग फर्ग्युसन महाविदयालयात आले. काव्यलेखनाबाबत त्यांचे त्यांना मार्गदर्शन व उत्तेजन मिळाले. एम्.ए.च्या परीक्षेत मराठी हा विषय घेऊन तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक त्यांनी मिळविले (१९४४). त्यानंतर मुंबई येथे अल्पकाळ आचार्य अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात नोकरी केली. पुढे नागपूर आणि मुंबई येथील महाविदयालयांतून मराठीचे अध्यापन केले. कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रे, बालसाहित्य, चित्रपटगीते, समीक्षा, आत्मकथन, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले तथापि कवयित्री आणि गीतकार म्हणून त्या विशेष प्रसिद्घ आहेत.
वर्षा (१९४७) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्या नंतर रूपसी (१९५६), तोच चंद्रमा … … (१९७३), गोंदण (१९७५), अनोळख (१९८६), जन्मजान्हवी (१९९०), पूर्वसंध्या (१९९६), इत्यर्थ (१९९९) इ. काव्यसंग्रह व गीतसंग्रह प्रसिद्घ झाले. त्यांनी विपुल बालकथा, बालगीतेही लिहिली (थुई थुई नाच मोरा, १९६१ टिप् टिप् चांदणी, १९६६ झोपेचा गाव, १९९०). गीतांचे इतरही अनेक प्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले. उदा., लावण्या, कोळीगीते. मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठीही त्यांनी गीतलेखन केले आहे. नादलयींचे नेमके भान जपणारी सुभग, प्रासादिक रचना हे त्यांच्या काव्यलेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. संतांचे अभंग व ओव्या, तसेच पारंपरिक स्त्रीगीते, लोकगीते इत्यादींचे संस्कार त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येतात.
मुक्ता आणि इतर गोष्टी (१९४४) हा त्यांचा पहिला कथासंग्रह स्वप्नतरंग (१९४५) ही त्यांची पहिली कादंबरी तर शब्दांच्या दुनियेत (१९५९) हा त्यांचा पहिला ललितलेखसंग्रह. त्यांनी उत्तम अनुवादही केले. त्यांत कालिदासाच्या मेघदूताचा त्यांनी केलेला अनुवाद (१९९४) अंतर्भूत होतो. ‘हायकू’ ह्या जपानी काव्यप्रकारातही त्यांना स्वारस्य निर्माण झाल्यामुळे त्यांनी ‘हायकू’ ह्या प्रकारातील काही कविता मराठीत आणल्या. ह्यांखेरीज काही इंग्रजी कादंबऱ्यांचे त्यांनी अनुवाद केले. अल्कॉट यांच्या लिट्ल विमेन ह्या कादंबरीचा त्यांनी चौघीजणी (१९६०) ह्या नावाने केलेल्या अनुवादाला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. गाजलेल्या विदेशी चित्रपटांच्या त्यांनी मराठीत निवेदिलेल्या कथांचेही संग्रह लोकप्रिय झाले. उदा., पश्चिमरंग (१९७१). वडीलधारी माणसे (१९८९) ह्या त्यांच्या पुस्तकात त्यांनी काही व्यक्तिचित्रे शब्द-बद्घ केली आहेत. धूळपाटी (१९८२) हे त्यांचे आत्मकथन. त्यांच्या प्रसन्न लेखनशैलीमुळे त्यांना फार मोठी लोकप्रियता प्राप्त झाली. काही पुस्तकांचे त्यांनी संपादनही केले आहे.
त्यांच्या दीर्घ लेखन-कारकीर्दीत मराठी साहित्यनिर्मिती व साहित्यविचार ह्यांत अनेक स्थित्यंतरे झाली आणि त्यांच्या अनुषंगाने वादविवादही झाले तथापि कोणत्याही पक्षाची वा पंथाची बाजू घेऊन त्यात न गुंतता आस्वादक आणि स्वागतशील वृत्तीने त्या ह्या सर्व स्थित्यंतरांना सामोऱ्या गेल्या. १९९६ मध्ये आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. ह्यांखेरीज फाय फाउंडेशन मंगेशकर प्रतिष्ठानचा ‘ वाक्विलास ’ यशवंतराव चव्हाण गदिमा सु. ल. गद्रे इ. अनेक पुरस्कार व मानसन्मान त्यांना लाभले. त्यांच्या चिमणचारा, कविता करणारा कावळा, गोंदण इ. गंथांसही महाराष्ट्र शासनाचे वाङ्मयीन पुरस्कार मिळाले.
पुणे येथे त्यांचे निधन झाले.
कुलकर्णी, गो. म.
“