शेष रघुनाथ : (सतरावे शतक). मराठीतील एक पंडित कवी. उपनाव शेष. रघुपति शेष, शेष राघव या नावांनीही त्यांचा उल्लेख आढळतो. कृष्णकौतुक ह्या त्यांच्या काव्यामुळे प्रसिद्घ. ह्या काव्याचे साक्षेपी संपादक वि. अं. कानोले ह्यांच्या मते हे रघुशेष पंडित यथार्थ-दीपिका कार ⇨ वामनपंडितां चे पुत्र. वामनपंडितांच्या घराण्याचे नावही शेष असे होते. कानोले ह्यांच्या मतानुसार हे शेष घराणे नांदेडचे तथापि अन्य एका मतानुसार हे शेष घराणे आंध प्रदेशातील आहे. ⇨महीपतीं च्या भक्तविजया तील उल्लेखावरून शेष रघुनाथ हे विद्वान पंडित असून त्यांचा व्यवसाय कीर्तनकाराचा होता, असे दिसते.

शेष रघुनाथ यांचे कृष्णकौतुक हे काव्य भागवता च्या दशमस्कंधातील ९० अध्यायांवर आधारलेले आहे. शकटभंग व तृणावर्तउद्धार येथपासून कृष्णकौतुका चा आरंभ होतो आणि प्रद्युम्नाच्या विवाहाजवळ हे काव्य संपते. ह्या काव्याच्या तीन हस्तलिखित प्रती नांदेड, औंध आणि नागपूर अशा तीन ठिकाणी उपलब्ध झाल्या. नांदेड आणि औंध येथील दोन प्रतींत ह्या काव्याचा आरंभ आणि त्याची अखेर उपलब्ध होत नाही. नागपूर येथील प्रतीत काही अधिक श्लोक मिळतात तथापि ह्या संपूर्ण काव्याची नेमकी श्लोकसंख्या किती होती, हे निश्चितपणे सांगता येत नाही. वि. अं. कानोले ह्यांनी संपादिलेले हे काव्य १९६५ मध्ये प्रसिद्घ झाले.

ह्या काव्यावर वामनपंडितांचा मोठा प्रभाव दिसतो. वृत्तांचे वैविध्य, अनुपास, यमकांचे प्राचुर्य, शृंगारिक वर्णने ह्या काव्यात येतात. रचनेत सफाई व प्रासादिकता दिसते. प्रसंगवर्णने वेधक आहेत. भागवता तील कथानक कृष्णकौतुका त आणताना शेष रघुनाथ यांचे एकंदर धोरण संक्षेपाचे असले, तरी बालकीडा, रासकीडा, कात्यायनीवत इ. ठिकाणी त्यांनी विस्तारही केला आहे तथापि वृत्तभंगासारखे दोषही ह्या काव्यात आहेत. प्रत्येक सर्गाच्या अखेरीस रघुनाथ शेष ही किंवा क्वचित ठिकाणी रघुपती शेष अशी नाममुद्रा येते.

कुलकर्णी, अ. र.