शेर-ए-काश्मीर कृषिविज्ञान व तंत्रविदया विदयापीठ : जम्मू व काश्मीर राज्यातील एक विदयापीठ. स्थापना १९८२. जम्मू व काश्मीर राज्याचे राज्यपाल हे विदयापीठाचे कुलपती, तर राज्याचे मुख्यमंत्री प्र-कुलगुरू असतात. जम्मू व काश्मीर राज्य विधानमंडळाच्या ऑगस्ट १९८२ च्या अधिनियमान्वये या विदयापीठाची स्थापना झाली असून संपूर्ण राज्य हे याचे अधिकारक्षेत्र आहे. याचे उन्हाळी कार्यालय श्रीनगर येथे, तर हिवाळी कार्यालय जम्मू येथे असते.

 

विद्यापीठाचे कामकाज १९८३-८४ मध्ये याचे मुख्य केंद्र असलेल्या श्रीनगर येथे सुरू झाले. त्यावेळी या विदयापीठाची संपूर्ण राज्यभर २५ केंद्रे होती. १९९९ मध्ये विदयापीठाचे शेर-ए-काश्मीर युनिव्हर्सिटी ऑफ ॲगिकल्चरल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी ऑफ काश्मीर असे नामकरण करण्यात आले. विदयापीठापुढे अनेक समस्या असल्या तरी, एकविसाव्या शतकाला सामोरे जाण्याच्या दृष्टीने चांगल्या तज्ज्ञ व्यक्ती व पुरेसे आर्थिक सहकार्य यांच्या आधारे प्रगतीचे प्रयत्न चालू आहेत.

वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्य,भाजीपाला,फळे व इतर अन्न संसाधनांना वाढणारी मागणी, मध्यम उत्पन्न गटातील लोकांचे सुधारलेले जीवनमान इ. गोष्टींचा विचार करून धान्य व इतर कृषिउत्पादनांमध्ये गुणात्मक व संख्यात्मक वाढ घडवून आणण्याचे प्रयत्न हे विदयापीठ करीत आहे. याच्या स्थापनेच्या वेळी पूर्वीच्या प्रादेशिक सुविधा या विदयापीठाकडे हस्तांतरित करण्यात आल्या परंतु त्या बऱ्याच अपुऱ्या आहेत. कारण सुरूवातीला केवळ जम्मू व काश्मीर राज्याच्या विकास विभागासाठी संशोधन करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. अध्यापन, संशोधन व विकास कार्याची नवी आव्हाने पेलण्याच्या दृष्टीने विदयापीठाच्या या सुविधांत वाढ करणे गरजेचे आहे. विदयापीठाच्या शालिमार परिसरात प्रयोगशाळा, वर्गखोल्या व गंथालय यांच्या नव्याने उभारलेल्या इमारती आहेत. राष्ट्रीय कृषिसंशोधन प्रकल्पांतर्गत विविध कृषि-हवामान विभागातील केंद्रांमध्ये नवीन सुविधा निर्माण करून जुन्या सुविधांत सुधारणा करण्यात आल्या आहेत. समशीतोष्ण कटिबंधीय विभागातील खुडवाणी, पहलगाम, बलपोरा, के. डी. फार्म, वडुरा, मानसबल आणि थंड शुष्क प्रदेशातील कारगिल व लेह ही या विदयापीठाची केंद्रे आहेत. पशुविकारविज्ञान व पशुसंवर्धन विभाग, शुहामा कृषिविभाग, वडुरा आणि इतर प्रादेशिक केंद्रे व उपकेंद्रे या विदयापीठाच्या कक्षेत येतात. राजौरी, भाडेरवाह, राया, धिनसार, सांबा, आर्. एस्. पुरा, चाथा ही या विदयापीठाची प्रादेशिक केंद्रे आहेत.

 

बी.एस्‌सी., एम्.एस्‌सी. (कृषि), बी.व्ही.एस्‌सी. अँड एएच्., एमव्ही. एस्‌सी.,पीएच्.डी.इ.अभ्यास क्रमांचे अध्यापन विदयापीठात केले जाते.विदया-पीठाच्या कृषिविदया शाखांतर्गत येणारे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत : कृषिअभियांत्रिकी, कृषिवनविज्ञान, कृषिविज्ञान, अर्थशास्त्र व संख्याशास्त्र, कीटकविज्ञान, विस्तार शिक्षण, पुष्पोत्पादन, वनस्पतिप्रजनन व आनुवंशिकी, वनस्पतिरोगविज्ञान, मृदाशास्त्र व कृषिरसायनशास्त्र, रेशीम उदयोग इत्यादी. पशुविकारविज्ञान व पशुसंवर्धन विभागात येणाऱ्या विदयाशाखा याप्रमाणे : पशुविकार जीव-रसायनशास्त्र, निदानीय वैदयक व न्यायशास्त्र, रोग-परिस्थितिविज्ञान व प्रतिबंधक वैदयक, सूक्ष्मजीवशास्त्र व प्रतिरक्षा-विज्ञान, पशुविकार शारीरक्रियाविज्ञान, सार्वजनिक आरोग्य व आरोग्यविज्ञान, पशुविकार शस्त्रक्रिया व क्ष-किरणविज्ञान, पशुप्रजनन व आनुवंशिकी, पशुधन उत्पादन व व्यवस्थापन, पशुविकार परजीवीविज्ञान, पशुविकार औषधिक्रियाविज्ञान व विषचिकित्साविज्ञान इत्यादी.

चौधरी, वसंत