शेर्डूकपेन : भारतातील एक आदिम जमात. या जमातीची वस्ती अरूणाचल प्रदेशात मुख्यत्वे कामेंग जिल्ह्यात आढळते. लोकसंख्या २,०९६ (१९८१). ही जमात थोंग आणि छाओ या दोन अंतर्विवाही अर्धकांत विभागलेली असून पुन्हा या अर्धकात स्कित्स, थोंगडॉक, लामा, थुंगॉन, रंगला, मोस्ने इ. अनेक बहिर्विवाही कुळी आहेत. थोंग व छाओ या अर्धकांत विवाहसंबंध निषिद्घ आहेत.
हे तिबेटी-मंगोलॉइड वंशाचे असून, तिबेटी-बह्मी भाषासमूहातील नगनॉक वा शेर्डूकपेन ही त्यांची बोलीभाषा आहे. गौरवर्णी, आकर्षक बांध्याचे, मध्यम उंचीचे हे आदिवासी आपल्या लोककथांतून आसामच्या राजवंशातील असल्याचे सांगतात. नागरी समाजाशी संपर्क आल्यामुळे ते हिंदी व असमिया या दोन्ही भाषा बोलतात.
यांची गावे प्रामुख्याने डोंगरउतारावर पाण्याच्या उपलब्धतेनुसार वसली आहेत. उतारावर जमिनीपासून मीटर-दीडमीटर उंचीवर लाकूड व चटयांच्या साह्याने ते दुमजली घरे बांधतात. खालच्या मजल्यात गुरे-बकऱ्या बांधतात. ते स्थलांतरित, सोपानशेती तसेच पावसाळी भातशेती करतात. काही स्त्री-पुरूष मोलमजुरी तसेच शिकार व मच्छीमारी करतात. स्त्रिया शेतकामाव्यतिरिक्त वेत आणि बांबू यांपासून भांडी, पेले, चटया, टोपल्या इ. गृहोपयोगी वस्तू बनवितात. त्यांच्या आहारामध्ये भात, बाजरी, मका यांबरोबरच याक, मेंढी, रानडुक्कर, हरिण, गवा यांचे ताजे व सुकलेले मांस असते मात्र थोंग कुळीतील आदिवासी हे डुकराचे तसेच पक्ष्यांचे मांस खात नाहीत. शेर्डूकपेन ‘ फाक ’ नावाची स्थानिक बीअर आणि ‘ अराक ’ नावाची दारू पितात. बुलू नावाची ग्रामपंचायत त्यांच्या खेड्याचे प्रशासन करते. तीत ज्येष्ठ व कनिष्ठ असे दोन सरपंच असून त्यांना थुण- बो म्हणतात व पंचायतीच्या सभासदांना थुमी म्हणतात.
या जमातीत पितृसत्ताक कुटुंबपद्धती असून बहिर्विवाहपद्धती प्रचलित आहे. आते-मामे भावंडांच्या विवाहास अगक्रम दिला जातो. दीर-भावजय (पतिनिधनानंतर) व मेहुणी (पत्नीच्या निधनानंतर)- विवाहही आढळतात. एकपत्नीकत्व रूढ असून क्वचित बहुभार्याविवाह आढळतात. यांची युवागृहे प्रसिद्घ असून वयात आलेली मुले-मुली तिथे रात्री एकत्र राहतात. यांतून लैंगिक संबंध होऊन प्रेमविवाह जुळतात. लग्नापूर्वी अपत्य झाल्यास संबंधित मुलीशी त्या मुलास विवाह करणे बंधनकारक आहे. व्यभिचाऱ्यास कडक शिक्षा दिली जाते.जेव्हा मुले-मुली आपसांत विवाह करण्यास तयार होतात, तेव्हा प्रतीक म्हणून ती आपल्या कमरपट्ट्यांची अदलाबदल करतात. जमातीत वधूमूल्य म्हणजे देज देण्याची प्रथा आहे. घटस्फोट क्वचित दिला जातो पण तो पत्नीने मागितल्यास तिला वधूमूल्य परत द्यावे लागते.
शेर्डूकपेन हे महायान बौद्घ पंथीय असून लामा हा त्यांचा प्रमुख धर्मगुरू होय. तोच लग्न लावतो, तसेच अंत्यविधीपर्यंतची सर्व कर्मकांडे करतो. स्थानिक पुरोहितास चिझे म्हणतात. गोंपा नामक चैत्यात तिबेटी शैलीच्या बुद्धाच्या मूर्ती असून स्थानिक लामा त्यांची व्यवस्था पाहतात. भुताखेतांवरही त्यांचा विश्वास आहे. लोसर, छाकुर, वांग, खिक्सावा आणि जोन्ख्लॉन हे त्यांचे प्रमुख उत्सव होत. यांपैकी छाकुर हा गंथपठणाचा, खिक्सावा हा भुताखेतांना संतुष्ट करणारा आणि जोन्ख्लॉन हा पर्जन्यराजाला प्रसन्न करण्याचा उत्सव आहे. हे लोक वेगवेगळे मुखवटे धारण करून नृत्य करतात. ‘ अजिलानू ’ हे त्यांचे लोकप्रिय नृत्य आहे मात्र या नृत्यात स्त्रिया क्वचितच सहभागी होतात.
या जमातीत मृताचे दहन करतात. मृत व्यक्ती अगदीच गरीब असेल, तर ती पुरतात. तिसऱ्या दिवशी पुरोहित मृतात्म्यास भात वगैरेंचा नैवेद्य दाखवितो. मृताशौच अनेक दिवस पाळतात. वर्षश्राद्धाला सर्व गावाला भोजन घालतात. त्यांच्या वस्त्यांतून स्वातंत्र्योत्तर काळात प्राथमिक-माध्यमिक विदयालये, आरोग्य केंद्रे स्थापन झाली आहेत. १९८१ च्या जनगणनेनुसार शेर्डूकपेन पुरूषांत २९.२२ टक्के साक्षरता होती.
संदर्भ : 1. Sharma, R. R. P. The Sherdukpen, Shillong, 1961.
2. Singh, K. S. The Scheduled Tribes, Bombay, 1994.
गायकवाड, कृ. म.
“