सेंट लुसीया : वेस्ट इंडीज द्वीपसमूहातील एक द्वीप देश. कॅरिबियन समुद्राच्या पूर्व भागात असलेल्या लेसर अँटिलीस द्वीपमालिकेतील विंडवर्ड द्वीपसमूहात यांचा समावेश आहे. विस्तार १३° ५३’ उ. व ६०° ५८’ प. लोकसंख्या १,७१,००० (२०१०). दक्षिण अमेरिका खंडाच्या मुख्य भूमीवरील व्हेनेझुएला देशाच्या उत्तरेस सु. ३८६ किमी.वर हे बेट आहे. सेंट लुसीयाचे स्थान मार्तीनीक बेटाच्या दक्षिणेस ३९ किमी., तर सेंट व्हिन्सेंटच्या उत्तरेस ३४ किमी.वर आहे. मार्तीनीक बेटापासून सेंट लुसीया खाडीमुळे तर सेंट व्हिन्सेंट बेटापासून सेंट व्हिन्सेंट सामुद्रधुनीमुळे हे बेट अलग झाले आहे. बेटाची उत्तर-दक्षिण लांबी सु. ४५ कि.मी., तर पूर्व-पश्चिम कमाल रुंदी २२·५ किमी. असून क्षेत्रफळ ६१६ चौ.किमी. आहे. विंडवर्ड द्वीपसमूहातील हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बेट आहे. बेटाला १५८ किमी. लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. बेटाच्या वायव्य किनाऱ्यावर वसलेले कॅस्त्री (लोक. ६५,६५६ — २०१०) हे राजधानीचे ठिकाण आहे.

भूवर्णन : सेंट लुसीया हे ज्वालामुखी क्रियेतून निर्माण झालेले बेट आहे. बराचसा भाग पर्वतीय असून काही भाग सपाट आहे. बेटाच्या नैर्ऋत्य भागातील मौंट सूफ्रीएअरजवळ क्वालिबाऊ ज्वालामुखी असून त्यावर गंधकयुक्त उकळत्या पाण्याचे अनेक झरे आहेत. या ज्वालामुखीचा अखेरचा उद्रेक इ. स. १७६६ मध्ये झालेला असून सातत्याने त्यामधून वाफ व वायू बाहेर पडत आहेत. क्वालिबाऊ हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून रस्त्याने तेथपर्यंत जाता येते. बेटावर उत्तर-दक्षिण पसरलेला वनाच्छादित पर्वतीय प्रदेश असून मौंट झीमी (उंची ९५९ मी.) हे देशातील सर्वोच्च शिखर या पर्वतात आहे. बेटाच्या नैर्ऋत्य किनारी भागात ग्रँड पीतोन (उंची ७९८ मी.) व पेती पीतोन (उंची ७५० मी.) ही वनाच्छादित जुळी शंक्वाकृती शिखरे असून त्यांभोवती लहान उपसागर आहे. बेटाच्या मध्यवर्ती उच्चभूमी प्रदेशातून अनेक लहानलहान नद्या सभोवतालच्या किनारी भागांकडे वाहत जातात. बेटावरील सखल भूमी व खोऱ्यांमधील जमीन सुपीक आहे.

हवामान : सेंट लुसीयाचे हवामान उष्ण कटिबंधीय सागरी प्रकारचे असून उंचीनुसार तापमान व पर्जन्यमानात तफावत आढळते. सरासरी तापमान २७° से. असून कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३१° से. व १९° से. असते. कमाल तापमान सप्टेंबरमध्ये तर किमान तापमान जानेवारीमध्ये आढळते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान किनारी भागात १३० सेंमी. तर अंतर्गत भागात ३८१ सेंमी. असते. इतर वेस्ट इंडीज बेटांच्या तुलनेत या बेटाची हरिकेन वादळापासून वारंवार हानी होत नाही.

भरपूर सूर्यप्रकाश व पर्जन्यवृष्टी आणि सुपीक मृदा यांमुळे येथे समृद्ध वनस्पतिजीवन आढळते. बेटाच्या अंतर्गत भागातील निर्गम उंचवट्याच्या प्रदेशात उष्ण कटिबंधीय दाट नैसर्गिक वर्षारण्ये आढळतात. कमी उंचीच्या प्रदेशातील अरण्ये तोडून ते क्षेत्र लागवडीखाली आणले आहे. शेतीच्या दृष्टीने नापीक बनलेल्या जमिनीवर दुय्यम वने वाढलेली आहेत. बेटाच्या उत्तरेकडील धूप झालेल्या जमिनीवर खुरट्या वनस्पतींचे प्रकार आढळतात. मध्यवर्ती उच्चभूमी प्रदेश म्हणजे विविध प्रकारच्या पक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. स्थानिक ॲगूटी, विविध कृंतक, मुंगूस, विविध प्रकारचे लहान साप हे प्राणी पुष्कळ आहेत. मोठे सस्तन प्राणी सहसा आढळत नाहीत. सभोवतालच्या सागरी प्रदेशात विविध प्रकारचे मासे आढळतात.

इतिहास व राजकीय स्थिती : आरावाक हे सेंट लुसीया बेटावरील मूळ रहिवासी होते. इ. स. सु. १३०० च्या दरम्यान दक्षिण अमेरिकेतून आलेल्या लढवय्या कॅरिब इंडियनांनी आरावाकांना येथून पिटाळून लावून बेटाचा ताबा घेतला. यूरोपीयांनी (बहुधा कोलंबसाने) १५०२ मध्ये या बेटाचा शोध लावला असावा असे मानले जाते परंतु याबाबत निश्चित पुरावा मिळत नाही. १३ डिसेंबर रोजी या बेटाचा शोध लागला असे समजून तो दिवस देशात सेंट लुसीया दिन म्हणून पाळला जातो. ब्रिटिशांनी इ. स. १६०५ व १६३८ मध्ये येथे वसाहत स्थापण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. येथे वसाहतीसाठी आलेल्या फ्रेंच व ब्रिटिश वसाहतकऱ्यांना कॅरिब लोकांनी कडवा प्रतिकार केला. सर्व वसाहतकऱ्यांना कॅरिबांनी मारून टाकल्याची वदंता आहे. १६३५ मध्ये फ्रेंचांनी या बेटावर संपूर्ण हक्क सांगून १६४२ मध्ये त्याचा ताबा फ्रेंच वेस्ट इंडियन कंपनीकडे दिला. १६५० मध्ये फ्रेंचांनी येथे वसाहतीची स्थापना केली. १६६० मध्ये त्यांनी कॅरिब लोकांशी एक करार केला. पॅरिस करारानुसार १८१४ मध्ये येथे ब्रिटिश सत्ता आली. तत्पूर्वी ब्रिटिश व फ्रेंच यांची आलटून पालटून १४ वेळा सत्तांतरे झाली. या दोन्ही सत्तांनी बेटावरील मळ्याच्या शेतीत काम करण्यासाठी आफ्रिकेतून गुलाम आणले. १९३४ मध्ये ब्रिटनने आपल्या साम्राज्यात गुलामांच्या व्यापारावर बंदी घातली. तेव्हा येथील १०,३२८ गुलाम पळून गेले. गुलामांच्या जागी काम करण्यासाठी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात करारावर ईस्ट इंडियन कामगार आणण्यात आले.


एकोणिसाव्या शतकात युद्धे, साथीच्या रोगांचा फैलाव व ऊस उत्पादनात झालेली घट यांचा येथील अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला. १९२४ पासून येथे प्रातिनिधिक शासन होते. दुसऱ्या महायुद्धकाळात या बेटावर लष्करी तळाची स्थापना करून व्हयर फॉरजवळ एक मोठा विमानतळ बांधण्यात आला. १९६७ मधील नव्या संविधानानुसार सेंट लुसीया हे अंतर्गत स्वयंशासन असलेले ग्रेट ब्रिटनचे सहयोगी राज्य बनले. संरक्षण व परराष्ट्रीय धोरणविषयक अधिकार मात्र ब्रिटनने स्वतःकडे ठेवले. २२ फेब्रुवारी १९७९ रोजी सहयोगी राज्याचा दर्जा संपुष्टात येऊन राष्ट्रकुलांतर्गत सेंट लुसीया हा स्वतंत्र देश अस्तित्वात आला.

स्वातंत्र्यानंतर सेंट लुसीया लेबर पार्टी व युनायटेड वर्कर्स पार्टी या दोन पक्षांच्या सत्तासंघर्षामुळे काही काळ येथे राजकीय अस्थिरता व नागरी अशांतता राहिली. १९७९ च्या संविधानानुसार सेंट लुसीयाने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला आहे. येथे संविधानात्मक राजसत्ताक शासनपद्धती आहे. ब्रिटिश राजा किंवा राणी हे देशाचे नामधारी प्रमुख असून त्यांनी नेमलेले गव्हर्नर जनरल हे त्यांचे प्रतिनिधित्व करतात. गव्हर्नर जनरलकडून पंतप्रधान, उपपंतप्रधान व इतर मंत्र्यांची नियुक्ती केली जाते. कार्यकारी अधिकार पंतप्रधान व मंत्रीमंडळाकडे असतात. संसद द्विसदनी असून तीत प्रतिनिधी गृहाचे (कनिष्ठ सभागृह) १७ तर सिनेटचे (वरिष्ठ सभागृह) ११ सदस्य असतात. प्रतिनिधी गृहाचे सदस्य सार्वत्रिक मतदान पद्धतीने निवडून दिले जातात. सिनेटच्या ११ सदस्यांपैकी ६ सदस्यांची पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार, ३ सदस्यांची विरोधी पक्षनेत्याच्या शिफारशीनुसार तर २ सदस्यांची स्वतःच्या अधिकारात गव्हर्नर जनरल नियुक्ती करतात. दोन्ही गृहांतील सदस्यांची मुदत ५ वर्षे असते. युनायटेड वर्कर्स पार्टी, सेंट लुसीया लेबर पार्टी व प्रोग्रेसिव्ह लेबर पार्टी हे येथील प्रमुख राजकीय पक्ष आहेत.

आर्थिक स्थिती : सेंट लुसीयाची अर्थव्यवस्था कृषी व पर्यटन व्यवसायांवर अवलंबून आहे. उद्योग व सेवा क्षेत्राचे महत्त्वही वाढत आहे. देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नापैकी ६·४% उत्पन्न कृषी, अरण्योद्योग, शिकार व मत्स्योद्योगापासून, १९·६% कारखानदारीतून व ७४% सेवा व्यवसायातून मिळाले (२००७). सुमारे १४,००० हे. क्षेत्र कायम लागवडीखाली होते (२००२). शेतांचे आकार लहान आहेत. केळी हे प्रमुख नगदी पीक असून एकूण निर्यातमूल्यापैकी निम्मा हिस्सा केळी निर्यातीपासून मिळतो. याशिवाय काकाओ, नारळ व उष्ण कटिबंधीय फळे या नगदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. भाकरीचे फळ (विलायती फणस), कसाव्हा, टोमॅटो, याम, आंबा, पपई ही उदरनिर्वाहाची पिके घेतली जातात. देशातील कृषी उत्पादने पुढीलप्रमाणे होती (उत्पादन ००० टनांत) : केळी १२०, आंबे २८, नारळ १४, याम ४, चकोतरा (ग्रेप फ्रूट) व पॉमलो ३ (२००३ अंदाज). देशात डुकरे १५,००० गुरे १२,००० मेंढ्या १२,००० शेळ्या १०,००० असे पशुधन होते (२००० अंदाज). देशाच्या एकूण भूक्षेत्राच्या २७ ·९% क्षेत्र अरण्यांखाली होते. एकूण मत्स्योत्पादन १,४०९ टन झाले (२००५).

विद्युत् उपकरणे, इलेक्ट्रॉनिकी वस्तूंची जुळणी, पुठ्ठ्यांची खोकी, कापड, मद्यनिर्मिती, तंबाखू उत्पादने, लिंबू व नारळावरील प्रक्रिया, खाद्यपदार्थ निर्मिती इ. उद्योग येथे चालतात. देशात औष्णिक वीजनिर्मिती केली जाते. भूऔष्णिक ऊर्जा उत्पादनास वाव असून सूफ्रीएअरजवळील गरम पाण्याच्या झऱ्यापासून ऊर्जानिर्मिती करण्याचे नियोजन आहे. विद्युत्‌शक्ती उत्पादन ३४६ द. ल. किवॉ. तास झाले होते (२००७). येथील कूल-द-साक उपसागर म्हणजे खनिज तेलशुद्धीकरण प्रक्रियेचे प्रमुख नौकांतरण केंद्र आहे. १९८० मध्ये आलेल्या विध्वंसक हरिकेन ॲलन वादळामुळे बेटावरील पायाभूत सुविधा आणि केळीच्या बागांची प्रचंड हानी झाली व पर्यटन व्यवसायही घटला. २००२ मध्ये आलेल्या उष्ण कटिबंधीय लिली वादळातही केळी पिकाचे फार मोठे नुकसान झाले होते. देशात बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे.

ईस्ट कॅरिबियन डॉलर हे येथील अधिकृत चलन आहे. सामान्यपणे अमेरिकी डॉलर हे चलनही स्वीकारले जाते. सेंट कीट्स व नेव्हिस येथील ईस्ट कॅरिबियन सेंट्रल बँक ही मध्यवर्ती बँकेची कार्ये करते. येथे तीन स्थानिक व तीन परकीय बँका आहेत.


सेंट लुसीयाचा व्यापार प्रतिकूल संतुलनाचा आहे. एकूण आयातमूल्य ४१८·१ द. ल. अमेरिकी डॉलर आणि निर्यातमूल्य ८२·७ द. ल. अमेरिकी डॉलर असे होते (२००५). खाद्यपदार्थ, इंधन, रसायने, यंत्रसामग्री, शुद्ध खनिज तेल यांची आयात तर केळी, बीर, कापड यांची निर्यात केली जाते. अ. सं. सं., त्रिनिदाद व टोबॅगो, ग्रेट ब्रिटन, जपान, बार्बेडोस, अँटिग्वा व बारबूडा यांच्याशी देशाचा व्यापार चालतो. या देशाला ३,१८,००० पर्यटकांनी भेट दिली व त्यापासून ३४५ द. ल. अमेरिकी डॉलर उत्पन्न मिळाले (२००५).

 देशात सु. १,२१० किमी. लांबीचे रस्ते असून त्यांपैकी १५० किमी. मुख्य व १५० किमी. दुय्यम रस्ते होते. तर प्रवासी मोटार गाड्यांची संख्या १३,१०० होती (२००२). येथे कॅस्त्री व व्हयर फॉर ही दोन प्रमुख बंदरे असून कॅस्त्री हे भूवेष्टित खोल सागरी बंदर आहे. व्हयर फॉरजवळ हेवानोरा आणि कॅस्त्रीजवळील व्हीझीए येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत.

लोक व समाजजीवन : देशातील बहुसंख्य लोक कृष्णवर्णीय आफ्रिकन गुलामांचे वंशज आहेत. ब्रिटिश व फ्रेंच वसाहतकऱ्यांनी सुरुवातीच्या काळात गुलामांना या बेटावर आणले. आफ्रिकन व यूरोपीय तसेच आशियाई व यूरोपीय यांच्या मिश्रणातून निर्माण झालेले लोकही येथे आढळतात. बेटावरील मूळ रहिवासी असलेल्या कॅरिब लोकांचे वंशज अल्पसंख्येने आहेत. गोऱ्या लोकांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश व फ्रेंचांचे वंशज आहेत. एकूण लोकसंख्येपैकी सु. ५०% कृष्णवर्णीय, ४४% मिश्र वंशीय, ३% दक्षिण आशियाई वांशिक गटातील व उर्वरित इतर वंशीय होते (२०००). येथील बहुसंख्य लोक रोमन कॅथलिक पंथाचे असून अल्प प्रमाणात प्रॉटेस्टंट पंथीय आहेत.

लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स. २६८·४ व्यक्ती होती (२०१०). एकूण लोकसंख्येत स्त्रियांचे प्रमाण सरासरी ५१% होते. ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण ७२·४% होते (२००५). इतर वेस्ट इंडीज बेटांच्या तुलनेत येथे बहिःप्रवसन कमी व जन्मदर जास्त आहे. इंग्रजी ही अधिकृत भाषा असली तरी सु. ८०% लोक फ्रेंच क्रिओल भाषा बोलतात.

दर हजारी जन्मदर १४, मृत्युमान ६·७ व बालमृत्युमान १३ होते (२००५). सरासरी आयुर्मान पुरुषांचे ७१·७ वर्षे आणि स्त्रियांचे ७५·५ वर्षे होते (२००७). वार्षिक लोकसंख्यावाढीचा दर १·१% होता (२०००- २००५). सेंट लुसीयामध्ये मातृसत्ताक कुटुंबपद्धती आहे. कुटुंबात विवाहाशिवाय स्त्रियांना मुले असणे किंवा घरातील स्त्री-पुरुषांना वेगवेगळ्या साथीदारांपासून झालेली अनेक मुले असणे ही येथे सामान्यतः आढळणारी बाब आहे. कुटुंबातील दोन प्रौढ स्त्री-पुरुष, मग ते विवाहित असोत किंवा नसोत, त्यांच्या घरातील सर्व मुलांचे ते जैविकदृष्ट्या आई-वडील असतीलच असे नसते. मुलांच्या पालनपोषणासाठी नातेवाईक मुलांच्या आईला मदत करतात.

शासनाकडून नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा पुरविल्या जातात. कॅस्त्री येथे मुख्य रुग्णालय असून व्हयर फॉर, सूफ्रीएअर आणि देनेरी येथे लहान रुग्णालये आहेत. देशात ३०५ खाटांची सोय असलेली ५ रुग्णालये, ३५ आरोग्य केंद्रे, ७० डॉक्टर, ७ दंतवैद्यक व ३०२ परिचारिका होत्या (२००२).


देशात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत आहे. देशातील ८१ प्राथमिक विद्यालयांत १,००० शिक्षक व २०, ००० विद्यार्थी आणि माध्यमिक विद्यालयांत १,००० शिक्षक व १६,००० विद्यार्थी होते (२००८-०९). वेस्ट इंडीज विद्यापीठाची शाखा कॅस्त्री येथे आहे. देशात साक्षरतेचे प्रमाण ९०·१% होते (२००३). आकाशवाणी, दूरदर्शन, दूरध्वनी, इ. संदेशवहन सुविधा येथे उपलब्ध आहेत. देशात दैनिक वृत्तपत्रे नाहीत. येथून प्रसिद्ध होणाऱ्या प्रमुख सहा वृत्तपत्रांपैकी (२००८) द व्हॉइस (प्रारंभ १८८५) हे त्रैमासिक द मिरर, द क्रुसेडर, वन कॅरिबियन  इ. साप्ताहिके प्रसिद्ध आहेत. सेंट लुसीयाचे कवी डेरेक वॉलकॉट यांना १९९२ मध्ये साहित्यासाठीचे नोबेल पारितोषिक मिळाले.

सेंट लुसीयाच्या संस्कृतीत आफ्रिकन, वेस्ट इंडीयन, फ्रेंच व ब्रिटिश संस्कृतींचे मिश्रण आढळत असले तरी आफ्रिकन चालीरीती व परंपरांशी अधिक जवळीक दिसते. कार्निव्हल, जॅझ हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. येथे लोकनृत्य विशेष लोकप्रिय आहे. डिसेंबरमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या शीडजहाज शर्यतींची (यॉटिंग) सुरुवात कानेरी बेटांपासून होऊन तिचा शेवट सेंट लुसीयामध्ये होतो. याशिवाय इतरही विविध जलक्रीडाप्रकार लोकप्रिय आहेत. नृत्यांमधील सहभाग, संगीत ऐकणे हे छंद जोपासले जातात. मोकळ्या हवेतील मनोरंजनाच्या विविध सुविधा येथे उपलब्ध आहेत. सर्व पुळणी सार्वजनिक असून परदेशी पर्यटकांबरोबरच स्थानिकही येथे पर्यटनासाठी येत असतात. आहारात प्रामुख्याने मासे, फळे, भाजीपाला यांचे प्रमाण अधिक असते. मद्यपानाचे प्रमाणही जास्त आहे. सेंट लुसीयन तुलनेने गरीब असून त्यांची घरे लहान असतात.

महत्त्वाची स्थळे : कॅस्त्री, सूफ्रीएअर व व्हयर फॉर ही प्रमुख नगरे आहेत. युनेस्कोने सूफ्रीएअर नगराजवळील पीतोन्स मॅनेजमेंट एरियाचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये केलेला आहे (२००४). बेटाच्या नैर्ऋत्य किनाऱ्यावरील, कटकाने एकमेकांशी जोडलेली, ग्रँड पीतोन व पेती पीतोन ही दोन जुळी ज्वालामुखी शिखरे पर्यटकांची आकर्षणे आहेत.

चौधरी, वसंत

सेंट लुसीया
राजधानी कॅस्त्री शहराचे दृश्य ग्रँड पीतोन व पेती पीतोन : जुळी ज्वालामुखी शिखरे.
ग्रँड आइलिट येथील क्रिकेट मैदान सुफ्रीएअर येथील प्रसिद्ध कॅथलिक चर्च