सेंट जॉर्जेस : वेस्ट इंडीज द्वीपसमूहातील विंडवर्ड बेटांपैकी ग्रेनेडाची राजधानी, औद्योगिक शहर व महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या ३३,७३४ (२०१२). हे ग्रेनेडा बेटाच्या नैर्ऋत्य किनाऱ्यावर, एका लहान द्वीपकल्पावर वसले आहे. फ्रेंचांनी १६५० मध्ये सांप्रत नगराच्या जवळच वसाहतीची स्थापना केली होती. १७०५ मध्ये सांप्रतच्या ठिकाणी ती हलविण्यात आली. १८८५ ते १९५८ पर्यंत येथे पूर्वीच्या ब्रिटिश विंडवर्ड बेटांची राजधानी होती. फेब्रुवारी १९७५ रोजी ग्रेनेडा स्वतंत्र झाल्यानंतर सेंट जॉर्जेस ही त्याची राजधानी झाली. कागद व कागदाच्या वस्तू तयार करणे, साखर व मद्यनिर्मिती हे येथील प्रमुख उद्योग आहेत. हे एक खोल व भूवेष्टित बंदर असून वेस्ट इंडीजमधील उत्तम बंदरांमध्ये याची गणना होते. येथून काकाओ, केळी, जायफळ, जायपत्री इ. मसाल्याच्या पदार्थांची निर्यात होते. शहराच्या पूर्वेस ११ किमी.वर ग्रँड एटांग हे निसर्गसुंदर सरोवर असून एक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. संस्कृती, ऐतिहासिक वास्तू व नैसर्गिक सौंदर्य यांचे जतन करून शहर विकसित होत आहे. येथील रोमन कॅथलिक, अँग्लिकन व प्रेस्बिटेरियन चर्च, फोर्ट जॉर्ज, ग्रँड ॲन्से पुळण, ग्रेनेडा राष्ट्रीय संग्रहालय ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत.

गाडे, ना. स.