सेन, अमर्त्य : (३ नोव्हेंबर १९३३). जागतिक कीर्तीचे मानवतावादी बुद्धिप्रामाण्यवादी भारतीय अर्थशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म कोलकाता येथे एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबात अमर्त्य सेनआशुतोष व अमिता या दांपत्यापोटी झाला. त्यांचे मातुल आजोबा क्षितिमोहन हे विश्वभारतीत संस्कृत व भारतीय संस्कृती हे विषय शिकवीत असत. वडील आशुतोष हे डाक्का विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. सेन यांनी डाक्का येथील सेंट ग्रेगरी स्कूलमध्ये सुरुवातीचे शिक्षण घेऊन पुढे विश्वभारतीत इंटरपर्यंतचे शिक्षण घेतले आणि कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी.ए. झाले (१९५३). नंतर ते इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेले. ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिजमधून त्यांनी बी.ए. (१९५५ अर्थशास्त्र) व एम्.ए. (१९५९) ह्या पदव्या आणि डॉक्टरेट प्राप्त केली. पुढे ते ट्रिनिटी कॉलेजमध्ये अधिछात्र होते (१९५८-६३). सुरुवातीस त्यांनी जादवपूर विद्यापीठ (१९५५-५८) व दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (१९६३-७१) येथे अध्यापन केले व नंतर इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (१९७१-७७) आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ (१९७७-८८) येथे अध्यापन केले. अर्थशास्त्राबरोबरच त्यांनी तत्त्वज्ञान विषयाचा अभ्यास केला. त्यांनी अमेरिकेतील हार्व्हर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र आणि तत्त्वज्ञान या विषयांचे अध्यापन केले (१९८८-९८). ‘मास्टर ऑफ ट्रिनिटी कॉलेज’ या पदावर त्यांची नियुक्ती झाली (१९९८-२००४). या पदावर काम करणारे ते पहिले भारतीय होत. त्यानंतर हार्व्हर्ड येथे लॅमाँट युनिव्हर्सिटीत ‘प्रोफेसर’ म्हणून त्यांनी काम केले.

अमर्त्य सेन यांचे कल्याणकारी अर्थशास्त्रातील मूलभूत समस्यांवरील पुढील योगदान अतिशय महत्त्वाचे आहे : (१) सामाजिक निवडीचा सिद्धांत, (२) दारिद्र्याचे निर्देशांक, (३) कल्याणाचे निर्देशांक आणि (४) दुष्काळाचे विश्लेषण.

अर्थशास्त्रीय धोरणांचे समाजाच्या हितावर काय परिणाम होतात, त्या धोरणांचे मूल्यमापन करणे हे कल्याणकारी अर्थशास्त्राचे उद्दिष्ट होय. त्यांनी कलेक्टिव्ह चॉइस अँड सोशल वेल्फेअर (१९७०) ह्या आपल्या ग्रंथात व्यक्तींचे हक्क, बहुसंख्याकांचे शासन आणि व्यक्तीच्या स्थितिगतीबाबतच्या माहितीची उपलब्धता ह्यांसारख्या प्रश्नांचा परामर्श घेतला आहे. ह्यांतून संशोधकांना अशा प्रश्नांचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली.

सेन यांनी समाजातील दारिद्याचे व कल्याणाचे निर्देशांक निश्चित केले. हे निर्देशांक पुढील दोन कारणांसाठी महत्त्वाचे ठरतात : देशातल्या वेगवेगळ्या समाजगटांत दारिद्याचे प्रमाण किती आहे त्याचे विभाजन कसे आहे त्यांत वेळोवेळी कसे आणि कोणते बदल झाले आहेत, याचा अभ्यास करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे देशातले दारिद्र्याचे प्रमाण आणि आर्थिक कल्याणाचे प्रमाण ह्यांच्या तुलनेसाठीही हे निर्देशांक महत्त्वाचे ठरतात. त्यांनी १९९० मध्ये देशांची क्रमवारी ठरविण्यासाठी तेथील लोकांचे आयुर्मान, शिक्षण व उत्पन्न यांवर आधारित ‘युनायटेड नेशन्स ह्यूमन इंडेक्स’ ही प्रणाली विकसित केली.

 सेन यांचा पॉव्हर्टी अँड फेमिन्स : ॲन एसे ऑन एन्टायटलमेंट अँड डीप्राइव्हेशन  हा ग्रंथ १९८१ मध्ये प्रसिद्ध झाला. दुष्काळ हा केवळ अन्नधान्याच्या तुटवड्यामुळेच होत नसून अन्नवाटपाच्या यंत्रणांमधील विषमतेमुळेही तो होऊ शकतो, असे प्रतिपादन त्यांनी केले. शहरांमधून निर्माण झालेली आर्थिक तेजी आणि त्यामुळे वाढलेल्या अन्नधान्याच्या किमती यांमुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होणे शक्य असते. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी दुष्काळ प्रत्यक्ष पाहिला होता. त्यात उपासमारीने लाखो लोक मरण पावले होते. वाढलेल्या किमतीत धान्य घेणे ज्यांना शक्य नव्हते, अशी माणसे – उदा., भूमिहीन मजूर- मृत्युमुखी पडली. माहितीच्या आधारे सेन यांनी असे दाखवून दिले होते की, बंगालमध्ये त्यावेळी धान्यसाठा पुरेसा होता तथापि साठेबाजीमुळे धान्य महाग झाले. परिणामतः सामान्य लोकांना ते खरेदी करणे अशक्यप्राय झाले. त्यामुळे लोकांची उपासमार झाली.

विकासाच्या संदर्भात सेन यांनी क्षमतेची संकल्पना विकसित केली. ‘इक्वॉलिटी ऑफ व्हॉट?’ ह्या त्यांच्या लेखात त्यांनी ती मांडली आहे. लोकांच्या क्षमता वाढायच्या असतील, तर त्यांचे हक्क अबाधित राहिले पाहिजेत आणि ते बजावण्याचे स्वातंत्र्य व योग्य त्या सोयीसुविधा त्यांना दिल्या गेल्या पाहिजेत. उदा., लोकांना मतदानाचा निव्वळ हक्क देऊन उपयोग नाही, त्यांना तो बजावण्याचे योग्य व चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. सेन यांनी न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्समध्ये ‘मोअर दॅन १०० मिल्यन विमेन आर मिसिंग’ असा एक लेख लिहिला होता (१९९०). त्यात त्यांनी विकसनशील देशांतील लिंगभेद, दुष्काळ, दारिद्र्य आणि विषमता ह्यांवर मूलगामी स्वरूपाची विश्लेषणात्मक चर्चा केली आहे. आर्थिक विकासाचा विचार करताना त्यांनी आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास ह्यांतील सूक्ष्म फरक स्पष्ट केला आहे.

सेन हे राजकीय स्वातंत्र्याचे कट्टर समर्थक आहेत. त्यांची अशी धारणा आहे की, आर्थिक वृद्धी प्राप्त करून घेण्यासाठी आर्थिक सुधारणांपूर्वी शिक्षण, सार्वजनिक आरोग्य ह्यांसारख्या क्षेत्रांत मूलभूत सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत.


सेन यांनी विपुल स्फुटलेखन व ग्रंथलेखन केले. त्यांच्या अन्य काही उल्लेखनीय ग्रंथांत रॅशनॅलिटी अँड फ्रीडम (२००२) आणि एड्स सूत्र : अन्‌टोल्ड स्टोरीज फ्रॉम इंडिया (भारतातील एड्सच्या संकटावरील निबंध) ह्यांचा समावेश होतो. त्यांच्या द ऑर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन (२००५) या ग्रंथात भारतीय संस्कृती, भारताची ओळख आणि इतिहास ह्या विषयांशी निगडित असे अनेक मार्मिक लेख समाविष्ट केलेले आहेत. सेन यांचा द आयडिया ऑफ जस्टिस  हा ग्रंथ २००९ मध्ये प्रसिद्ध झाला. कल्याणकारी अर्थशास्त्र आणि सामाजिक निवडीचा सिद्धांत ह्यांवर हा ग्रंथ आधारलेला असला, तरी त्यात त्यांचे तात्त्विक विवेचन आहे.

सेन यांनी अनेक सन्माननीय पदे भूषविली : इकॉनॉमिक सोसायटीचे अध्यक्ष (१९८४), द इंटरनॅशनल इकॉनॉमिक असोसिएशनचे अध्यक्ष (१९८६-८९), इंडियन इकॉनॉमिक असोसिएशनचे अध्यक्ष (१९८९) व अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनचे अध्यक्ष (१९९४). सेन यांनी कल्याणाच्या अर्थशास्त्राला नवा अर्थ, नवी दिशा दिली त्याला तात्त्विक-नैतिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्यांच्या कार्याचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन जगातील अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदव्या दिल्या. कल्याणकारी अर्थशास्त्र, सामाजिक निवडीचा सिद्धांत तसेच दारिद्र्याच्या प्रश्नावर केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला (१९९८). नंतर ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान त्यांना प्राप्त झाला (१९९९). त्याच वर्षी बांगला देशाने त्यांना आपल्या देशाचे सन्माननीय नागरिकत्व दिले. २०१२ मध्ये अमेरिकेने त्यांना नॅशनल ह्यूमॅनिटी मेडल देऊन सन्मानित केले. हा पुरस्कार पहिल्यांदाच बिगर अमेरिकन तज्ज्ञाला दिला गेला.

सध्या सेन हे चीनमधील बीजिंग विद्यापीठातील ‘सेंटर फॉर ह्यूमन अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट स्टडीज’चे संचालक आहेत. तसेच पंतप्रधानांच्या ‘ग्लोबल ॲडव्हाय्‌जरी काउन्सिल ऑफ ओव्हरसीज इंडियन्स’चे ते सदस्य आहेत. १९ जुलै २०१२ रोजी त्यांची नालंदा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली.

सेन यांचे एकूण तीन विवाह झाले. त्यांनी नवनीता देव या विद्याव्यासंगी लेखिकेबरोबर पहिला विवाह केला (१९६०). तिच्यापासून त्यांना अंतरा व नंदना या दोन कन्या झाल्या. ते लंडनला अध्यापनास गेल्यानंतर परस्परांच्या संमतीने विभक्त झाले (१९७५). त्यानंतर त्यांनी इव्हा कोलोर्नी या ज्यू महिलेबरोबर दुसरे लग्न केले (१९७८). तिच्यापासून त्यांना इंद्राणी ही कन्या व कबीर हा मुलगा झाला पण इव्हाचे कर्करोगाने निधन झाले (१९८५). त्यानंतर त्यांनी इमा जॉर्जिना रॉथ्सचाइल्ड या महिलेबरोबर तिसरा विवाह केला (१९९१).

संदर्भ : 1. Bhardwaj, Aparna Thakur, Anil Kumar, Amartya Sen &amp Human Development, Delhi, 2012.

           2. Dua Shyam, Luminous Life of Amartya Sen Illustrated Biography, Delhi, 2004.

           3. Humphries, Jane Agarwal, Bina Robeyns, Ingrid, Capabilities Freedom &amp Equality Amartya Sens Work From A Gender Prespective, Oxford, 2011.

           4. Kanbur, Ravi Basu, Kaushik, Arguments For A Better World: Essays in Honor of Amartya Sen, 2 Vols., Oxford, 2009.

           5. Ray, Biswanth Welfare Choise and Development Essays In Honour of Professor Amartya Sen, New Delhi, 2008.

           6. Saxena, Richa, Amartya Sen-A Biography, Delhi, 2011.

           7. Sen, Raj Kumar Sinha, Ajit Kumar, Economics of Amartya Sen, Delhi, 2003.

           8. Singh, Inderjeet Thakur, Anil Kumar, Economics of Amartya Sen, New Delhi, 2012.

           ९. इंगळे, व. न. नोबेल भूषण अमर्त्य सेन, औरंगाबाद, २०१०.

गेडाम, आनंद