सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन : (केंद्रीय जल आणि विद्युत् अनुसंधान शाला CWPRS ). विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जलसिंचन व जलनिःसारण या क्षेत्रांतील प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी थोड्या प्रमाणावर प्रयोगशाळेत अनुसंधान (बारकाईने केलेले संशोधन) करण्याची गरज आहे, असे तेव्हाच्या ब्रिटिश सरकारच्या लक्षात आले होते. म्हणून बाँबे प्रेसिडेन्सीच्या ( मुंबई इलाख्याच्या) पाटबंधारे विभागातर्फे विशेषतः कालवे व वाहितमल (सांडपाणी) यांच्या शास्त्रीय अभ्यासासाठी पुण्याजवळ हडपसर येथे १९१६ मध्ये एक प्रयोगशाळा स्थापन झाली. त्यावेळी या प्रयोगशाळेस ‘विशेष पाटबंधारे अनुसंधान विभाग, मुंबई सार्वजनिक बांधकाम खाते’ असे नाव होते. ही सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन या संशोधन केंद्राची मूळ संस्था आहे. ‘विशेष सिंचन घटक संस्था’ म्हणून हिची स्थापना झाली. तेव्हा प्रचलित असलेल्या पाटबंधारे पध्दतीमध्ये आधुनिक प्रकारच्या सुधारणा करून शेतीचे उत्पादन वाढविणे व नागरी पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे, हा या संस्थेच्या स्थापनेमागील हेतू होता. जलसंपदा प्रकल्पांच्या विकासाबरोबर या संस्थेच्या कामाचा व्याप चांगलाच वाढला व संस्थेला विस्तारासाठी अधिक मोठ्या जागेची गरज निर्माण झाली. त्यामुळे सन १९२५ मध्ये ही संस्था हडपसर येथून हलवून पुण्यापासून १६ किमी. अंतरावर खडकवासला धरणाजवळ नेण्यात आली व संस्थेचे ‘भारतीय जलअभ्यास प्रायोगिक संस्था ’ असे नामकरण करण्यात आले. जलप्रवाहांच्या (यात पूरही येतात) विविध अवस्थांचा या संस्थेने पध्दतशीर अभ्यास केला. संस्थेच्या कार्याची व्यापक उपयुक्तता लक्षात घेऊन भारताच्या केंद्रीय शासनाने ही संस्था १९३६ मध्ये आपल्या आधिपत्याखाली आणली व या संस्थेचे नाव ‘ केंद्रीय पाटबंधारे व जलगतिक प्रायोगिक संस्था ’ असे केले. भारत स्वतंत्र झाल्यावर या संस्थेत संपूर्ण भारतातील जलसंपदेचा सर्व अंगांनी व एकत्रितपणे विकास करण्याच्या कामाला महत्त्व देण्यात आले. या अनुषंगाने या संस्थेत विविध प्रकारचे संशोधन विभाग निर्माण करण्यात आले. अशा प्रकारे ही संस्था जलीय संशोधनाचे राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट केंद्र बनले. स्वातंत्र्योत्तर काळात या संस्थेचे नाव ‘ केंद्रीय जल आणि विद्युत् अनुसंधान शाला’ (CWPRS) असे करण्यात आले. येथे जलस्थापत्याशी निगडित क्षेत्रांमधील मूलभूत स्वरूपाचे आणि अनुप्रयुक्त संशोधन होते. नदी व समुद्रकिनारे यांच्या पर्यावरणाशी निगडित असलेले जलस्रोतविषयक व्यापक प्रश्न सोडविण्यासाठी गुंतागुंतीच्या भौतिकीय व गणितीय प्रतिकृतींची तंत्रे वापरण्याच्या बाबतीत ही संस्था आघाडीवर आहे. १९७१ सालापासून ही संस्था युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया अँड पॅसिफिक (ESCAP) या आयोगाची प्रादेशिक प्रयोगशाळा म्हणून देखील काम करते. संस्थेने अनेक प्रकल्पांना आपली सेवा पुरविली आहे. तसेच विशेषेकरून मध्य-पूर्व आफ्रिका, आग्नेय आशिया या प्रदेशांतील अनेक विकसनशील देशांनाही सेवा पुरवून या संस्थेने मदत केली आहे. २००९ सालाच्या मध्यापर्यंत २१ देशांना या संस्थेने मदत केली आहे. अशा रीतीने जलीय संशोधनाच्या समग्र क्षेत्रात या संस्थेला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली आहे.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर जलसंपदेचा नियोजनपूर्वक विकास करण्यास सुरुवात झाल्यावर जल व ऊर्जा या नैसर्गिक साधनसंपत्तीचा विकास आणि जलवाहतूक या क्षेत्रांमधील प्रकल्पांच्या संशोधन व विकासविषयक गरजांची परिपूर्ती करणारी ही प्रमुख मध्यवर्ती संस्था बनली आहे. जलसंपदा विषयक केंद्रीय विभागाचा भाग असलेली ही संस्था जलस्थापत्य व संबंधित संशोधन क्षेत्रांतील जगामधील एक आघाडीवर असलेली संघटना आहे. नदीच्या प्रवाहाला वळण लावणे व पूर नियंत्रण, जलीय बांधकामे, बांधकामाचे साहित्य, बंदरे, किनारा संरक्षण, पाया अभियांत्रिकी, पंप व जल टरबाइने, जहाजांची जलगतिकी, पुलांचा जलीय अभिकल्प (आराखडा), पर्यावरणीय अध्ययन, पार्थिव विज्ञाने आणि जल-अंतर्ग्रहण शीतलीकरण यांविषयीच्या भौतिकीय व गणितीय प्रतिकृती तयार करून त्यांच्या अभ्यासाद्वारे ही संस्था विशेषीकृत प्रकारच्या सेवा पुरविते. जलसंपदा, जलविद्युत ऊर्जा, समुद्रकिनारे व बंदर अभियांत्रिकीसह जलवाहतूक यांवरील प्रकल्पांशी निगडित असलेल्या प्रश्नांवरील आर्थिक दृष्टीने परवडणारे, जलीय दृष्ट्या भक्कम असे उपाय वॉटर अँड पॉवर कन्स्ल्टन्सी सर्व्हिसेस (WAPCOS) ही संस्था सुचविते. तसेच इतर शैक्षणिक व संशोधन संस्थांना सहकार्य करते. भारत सरकारचे आर्थिक पाठबळ असल्याने ही संस्था जलीय संशोधनात होत असलेल्या जलद प्रगतीबरोबर राहू शकते. यासाठी संस्थेतील सुविधा व तज्ञता अद्ययावत ठेवण्याचे प्रयत्न सतत चालू असतात.
सिंचन, जलविद्युत् ऊर्जा आणि जलवाहतूक यांच्याशी निगडित असलेल्या विविध प्रकल्पांना व्यापक विकास व संशोधन यांबाबतीत ही संस्था पाठबळ वा मदत पुरविते. याकरिता विवक्षित संशोधन अभ्यास हाती घेऊन त्यांना आवश्यक त्या मूलभूत संशोधनाद्वारे उत्तेजनही सदर संस्था देते. ही संस्था भारताच्या केंद्रीय शासनाला आपल्या क्षेत्रातील सल्लागारी सेवा देते. जलीय संशोधनातील व्यवसायबंधूंना संशोधनकार्यात ही संस्था सहकार्य करते आणि तेथील संशोधकांना प्रशिक्षणही देते. नळातून वाहणाऱ्या द्रव, वायू किंवा बाष्प याचा दाब, प्रवाह त्वरा व प्रवाहमान (विसर्जन त्वरा) मोजणारे प्रवाहमापक, द्रायूच्या (वायू वा द्रवाच्या) प्रवाहाचे मापन करणारी जल टरबाइन प्रकारची प्रयुक्ती म्हणजे विविध प्रकारचे प्रवाहमापक, विद्युत् प्रवाहाचे परिमाण मोजणारे अँपिअरमापक यांसारख्या उपकरणांच्या इयत्तीकरण किंवा अंशन परीक्षणाचे (मापनाद्वारे किंवा प्रमाणभूत उपकरणाबरोबर तुलना करून मापकावरील प्रत्येक वाचनाचे अचूक मूल्य निश्चित करण्याच्या क्रियेचे) कामही या संस्थेत केले जाते. स्वातंत्र्योत्तर काळात या संस्थेत दहा संशोधन विभाग निर्माण करण्यात आले असून त्यांची माहिती थोडक्यात पुढे दिली आहे:
(१) जलविज्ञान व जलसंपत्ती (जल उपलब्धता) विश्लेषण : या विभागात जलसंपत्ती प्रतिकृती, उपयुक्त जलसंपत्तीचे अध्ययन, संभाव्य पुराचा अंदाज व पूर्वसूचना, गुणात्मक दर्जानुसार पाण्याचे विश्लेषण आणि मोठ्या जलप्रकल्पांचा अभ्यास ही कामे करतात.
(२) नदी अभियांत्रिकी : या विभागात पूर नियंत्रण, जलीय विश्लेषण, नदीचे आद्य स्वरूप व प्रतिकृतीचा सर्वांगीण अभ्यास, नदीचे आकारविज्ञान व तदनुषंगिक अभ्यास, नदीतील वाहतूक, नदीतून होणारा नागरी व शेतीसाठीचा पाणीपुरवठा, नदी व बंधारा यांतील गाळाचा निचरा किंवा उपसा, औष्णिक विद्युत् निर्मिती केंद्रातील उष्ण पाण्याचे पुनराभिसरण आणि नद्यांवरील पूल, सांडवे, बंधारे वगैरेंचा अभ्यास या विषयांवर संशोधन होते. उदा., आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीसंबंधी भौगोलिक प्रतिकृतीद्वारे अध्ययन आणि बिहारमधील कोसी नदीवरील रस्ते आणि रेल्वे पुलासंबंधी प्रतिकृतींद्वारे अध्ययन.
(३) जलाशय व संलग्न संरचना : या विभागात सांडवे व ऊष्मीय उत्सर्जन प्रणाली, ऊर्जाग्रहण, पाणी दूर नेणारा परिवाह (पाट) प्रणाली, बंद नळीमधील जलाघाताचे विश्लेषण व उपाय आणि जलद्वारांचे विविध प्रकार यांचा संशोधनपर अभ्यास करतात. उदा., चिल्का सरोवरातील प्रवाहामध्ये सुधारणा करण्याकरिता भौगोलिक प्रतिकृतीद्वारे अध्ययन.
(४) समुद्रतटीय व अपतटीय अभियांत्रिकी : या विभागात समुद्रतटीय संरचनेचा अभ्यास, बंदरे व गोदी यांची स्थाननिश्चिती आणि बंदरामधील भरती-ओहोटी, बंदरालगतच्या किनाऱ्याची धूप व धूपप्रतिबंधक उपाय यांचे अध्ययन व संशोधन करतात. उदा., कोचीन बंदरासंबंधी गेल्या चाळीस वर्षांमध्ये चाळीसहून अधिक विषयांवर विशेष अध्ययन.
(५) जहाज जलगतिकी : या विभागात जहाजाच्या निर्मितीसाठी त्याचा आकार निश्चित करण्याच्या दृष्टीने परीक्षण करणे व उपाय योजणे, जहाजाची वजन वाहून नेण्याची क्षमता ठरविणे, जहाजाचे एंजिन व परिचालक यांचे निर्मितिपूर्व परीक्षण, वरील अध्ययनासाठी लागणारा जलाशय व विद्युत् वाहन यांची तरतूद आहे. तसेच नदीप्रवाहातील गतिमापकाचे प्रमाणीकरण या बाबींविषयीचे अध्ययन व संशोधनही या विभागात करतात.
(६) जलीय यंत्रसामग्री : या विभागात बंद नलिकेतील किंवा नळीतील जलप्रवाहाचा अभ्यास आणि जल टरबाइन व पंप यांच्या अंतर्ग्रहण प्रकारच्या प्रणालींचे परीक्षण व जलालेखाचे अध्ययन या गोष्टी करतात.
(७) पाया आणि संरचना/बांधकामे : या विभागात मोठ्या बांधकामाचा पाया व तदनुषंगिक प्रश्नांचा अभ्यास, पायाचा पाषाणयामिकीविषयक अभ्यास, मोठ्या प्रकल्पांच्या जागेवर जाऊन केलेला अभ्यास व त्याचे प्रतिकृतीद्वारे विश्लेषण आणि काँक्रीट व दगडी सामग्रीचे परीक्षण या प्रकारचे संशोधन करतात. सीडब्ल्यूपीआरएस या केंद्राने खडक उत्खननाच्या नियंत्रित स्फोटांसंबंधी १५० हून अधिक प्रकल्पांचे संशोधन केले.
(८) पार्थिव विज्ञाने : या विभागात भूभौतिकीय विश्लेषण, भूकंपविज्ञान व तदनुषंगिक परिणाम तसेच जलविज्ञान, जलभूविज्ञान आणि भू-अंतर्गत हालचाली व त्याचे होणारे परिणाम यांचे अध्ययन व संशोधन करतात. उदा., गणितीय प्रतिकृतीद्वारे कोयना धरणाच्या भूकंप प्रतिसादांचे विश्लेषण.
(९) द्रवीय उपकरणयोजना : या विभागात इतर सर्व विभागांसाठी लागणारी माहिती आणि त्यांचे प्रतिरूपक स्थितीतील प्रचलांचे निरीक्षण व मापनांची नोंद याबाबतीत अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरून मदत करणे, अत्याधुनिक महासंगणक प्रणाली आणि अत्यंत दुर्गम भागातील मापने तेथे प्रत्यक्ष न जाता रडार प्रणालीद्वारे करण्यासाठी अभियांत्रिकीतील प्रशिक्षण घेतलेला खास वेगळा कर्मचारी वर्ग यांच्यामार्फत संशोधन केले जाते. तसेच या विभागातच धरणे, कालवे, बंदरे, जलाशय इत्यादींमधील जलपातळी, जलगती, जलदाब, तापमान, लाटांची उंची व पाण्यातील लवणांचे प्रमाण यांचे अचूक मापन आणि विश्लेषण केले जाते.
(१०) संशोधनाशी संबंधित इतर पायाभूत सुविधा : या विभागात अभियांत्रिकीय, वैज्ञानिक व तदनुषंगिक विषयांतील पन्नास हजारांहून अधिक ग्रंथ, तसेच वैज्ञानिक अहवाल असलेले समृद्ध ग्रंथालय, शिवाय शंभराहून अधिक वैज्ञानिक व तंत्रविद्याविषयक नियतकालिके आहेत. संस्थेबाहेरच्या अभ्यासकांबरोबर येथील निवडक वैज्ञानिक माहितीची देवाणघेवाण करणे यांसारख्या संशोधनाशी निगडित सुविधा उपलब्ध आहेत. यांशिवाय जमीन, पाणी, वीज, यंत्रशाळा, साधनसामग्री व मनुष्यबळ यांसारख्या पायाभूत सुविधा या विभागात आहेत.
सीडब्ल्यूपीआरएस या संस्थेने पुढील अनेक देशांना तंत्रविद्येच्या बाबतीत सहकार्य केले आहे. अफगाणिस्तानातील खानाबाद बंधारा व सलमा जलविद्युत् प्रकल्प यांच्यासाठी संस्थेने त्यांच्या जलीय प्रतिकृतींचा अभ्यास केला. इंडोनेशियामध्ये वेलीय (भरती-ओहोटीच्या) पट्ट्यातील देशांतर्गत मत्स्यसंवर्धनाचा विकास केला आहे. इथिओपियाला जलसंपदा व्यवस्थापन आणि मृदेचे स्थिरीकरण याबाबतींत सल्ला दिला आहे. इराकमधील बगदाद शहरात जलीय प्रयोगशाळा संस्थेने उभारून दिली. बेख्मे धरणासाठी सांडव्याचा प्रतिकृतीद्वारे अभ्यास केला. बाकुरमान व कलिलकान या धरणांच्या सांडव्यांच्या प्रतिकृतींची निर्मिती व सांडव्याची उभारणी संस्थेने केली आहे. तसेच त्यासाठी साधनसामग्रीही पुरविली आहे. इराणमधील तेहरान येथील वॉटर रिसोर्स रिसर्च इन्स्टिट्यूट (जलसंपदा संशोधन संस्था) या संस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी सल्ला दिला तसेच गरजेनुरूप साधनसामग्री पुरविली. ईजिप्तमध्ये जलीय प्रयोगशाळा उभारली आणि तेथील कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण दिले. कंबोडियामधील टॉनलेसॅप नदीला येणाऱ्या पुराच्या नियमनाचे उपाय योजले आहेत.
झँबियातील इतेझितेझी जलाशयाच्या प्रकल्पासाठी भूकंपीय संनिरीक्षण करून अभ्यास केला. टोगो व बेनिन येथील समुद्रकिनाऱ्याची झीज रोखण्याचे संरक्षक उपाय सुचविले आहेत. थायलंडमधील पाट्टानी जलविद्युत् प्रकल्पासाठी जल टरबाइन प्रतिकृतीचे विशेष कराराद्वारे परीक्षण केले आहे. नेपाळमधील त्रिसुली येथील शक्तिपरिवाहकातील गाळ अलग करण्याच्या दृष्टीने संस्थेने प्रतिकृतीद्वारे अभ्यास केला आणि सप्तकोसी व सुनकोसी प्रकल्पांसाठी संस्थेने भूकंपवैज्ञानिक अभ्यास केला. फिलिपीन्समधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आणि तेथील तांत्रिक अहवालांचे परीक्षण केले. बांगला देशातील डाक्का येथील रिव्हर रिसर्च इन्स्टिट्यूटमधील ( नदी संशोधन संस्थेतील) कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. भूतानमधील चूखा व ताला प्रकल्पांसाठी जलीय प्रतिकृतींद्वारे अभ्यास करून ताला, वांग चू , पुनात्सांगचू व संकोश प्रकल्पांचे भूकंपीय संनिरीक्षण व अध्ययन केले.
मलेशियातील तेनॉम पांगी प्रकल्पासाठी जल टरबाइन प्रतिकृतीचे विशेष कराराद्वारे परीक्षण केले आणि क्लांग व पासिर गुदांग या औष्णिक विद्युत् निर्मिती केंद्रांसाठी ऊष्मीय पुनराभिसरणाचा अभ्यास केला. मोझँबीकमधील मॅसिंजर धरण प्रकल्पासाठी गळतीचे विश्लेषण व विस्थापितांचे पुनर्वसन यांचा अभ्यास केला. म्यानमारमधील चार बंदरे सिंचन जलाद्वारे पूर्वीच्या जागी नेण्यासाठी जलीय प्रतिकृती वापरून अभ्यास केला. तसेच सेदावगी धरणामधील सांडव्याचा जलीय प्रतिकृती वापरून अभ्यास केला. लिबियातील त्रिपोली (पश्चिम) विद्युत् निर्मिती केंद्रासाठी तेथील क्षेत्रीय माहिती गोळा करून ऊष्मीय पुनराभिसरणाचा अभ्यास केला. व्हिएटनामासाठी प्रकल्पांच्या दस्तऐवजांचा मसुदा तयार करण्यासाठी सल्ला दिला. तसेच तेथील जलीय संशोधनाचा विकास केला आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. श्रीलंकेत या संस्थेने जलीय प्रयोगशाळेची उभारणी केली. सिंगापूर बंदराचा विकास व पुनरुद्धार ही कामे संस्थेने केली आहेत. यांवरून या संस्थेच्या कार्याचा आवाका आणि व्याप यांची कल्पना येते.
आदमणे, ना. भा. लेले, व. शं.
“