सेंट पीटर्स चर्च :सेंट पीटर्स बॅसिलिका या नावानेही ओळखले जाणारे हे चर्च रोमच्या वायव्य भागातील⇨ व्हॅटिकन सिटी मध्ये आहे. ⇨ येशू ख्रिस्ताचा प्रमुख शिष्य व पहिला पोप सेंट पीटर याचे थडगे ( ‘क्रिप्ट’ म्हणजे गुहिका वा अधोवेदी) परंपरेने ज्या जागी मानले गेले, तिथे हे चर्च उभारले आहे. १९८९ पर्यंत हे जगातील सर्वांत मोठे चर्च मानले जात होते तथापि १९८९ मध्ये यामाऊसूक्रो, कोत दे आयव्हरी (आयव्हरी कोस्ट) येथे या चर्चपेक्षाही मोठ्या आकाराची नवी बॅसिलिका बांधण्यात आली.
सेंट पीटर्स चर्चची वास्तुरचना क्रॉसच्या आकाराची असून, त्यात सु. ५०,००० लोक सामावू शकतात. चर्चची लांबीची बाजू २१० मी. असून त्याची सर्वांत जास्त रुंद बाजू सु. १३५ मी. आहे. त्याचे एकूण क्षेत्र सु. १५,१०० चौ. मी. पेक्षा जास्त आहे. चर्चचे मध्यदालन (नेव्ह) सु. ४५ मी. उंच आहे. चर्चचा सर्वांत लक्षवेधक व उठावदार वास्तुघटक म्हणजे ⇨ मायकेलअँजेलो (१४७५-१५६४) याने संकल्पिलेला चर्चवरचा भव्य व प्रेक्षणीय घुमट होय. हा घुमट तळापासून सु. १२० मी. पेक्षा जास्त उंच असून त्याचा व्यास सु. ४२ मी. आहे. रोमन कॅथलिक पंथाचे हे प्रमुख मध्यवर्ती चर्च मानले जाते. १८७० पासून सेंट पीटर्स चर्चचा वापर पोपच्या बहुतेक धार्मिक विधींसाठी होत आला आहे.
विद्यमान चर्चवास्तूचे दर्शनी बाह्य आकर्षक रूप घडविण्यात तसेच अंतर्भागाची सजावट करण्यात ह्या चर्चचा एक प्रमुख वास्तुशिल्पज्ञ⇨ जोव्हान्नी लोरेंत्सो बेर्नीनी (१५९८-१६८०) ह्याचा वाटा मोठा आहे. चर्चचा प्रवेशमार्ग सु. १·५ किमी. लांबीचा असून तो टायबर नदीपात्रापासून सुरू होऊन ‘पिॲझा दी सान प्येअत्रो ’ (सेंट पीटर्स स्क्वेअर) येथे म्हणजे सेंट पीटर्स चर्चच्या चौकाशी मिळतो. पिॲझा म्हणजे चर्चच्या समोरची विस्तीर्ण मोकळी जागा वा चौक. पिॲझाच्या विरुद्ध बाजूंना अर्धवर्तुळाकार रचना असलेल्या दोन स्तंभावली (स्तंभांच्या रांगा) व दोन कारंजी योजिली आहेत. पिॲझाच्या मध्यभागी तांबूस एकसंध ग्रॅनाइटचा २६ मी. उंचीचा निमुळता, टोकदार ⇨ ऑबेलिस्क (शंकुस्तंभ) उभारलेला आहे. हा स्तंभ ईजिप्तमधून इ. स. सु. ३७ मध्ये रोम येथे आणण्यात आला व १५८६ मध्ये तो स्थलांतरित करून पिॲझामध्ये उभारण्यात आला. पिॲझाची रचना १६६७ मध्ये पूर्ण झाली. सेंट पीटर्स चर्चचा विस्तीर्ण अंतर्भाग प्रबोधनकालीन व बरोककालीन कलावंतांच्या उत्तमोत्तम चित्र-शिल्पाकृतींनी सजवण्यात आला आहे. त्यात अनेक उत्तमोत्तम शिल्पे, पुतळे, अलंकृत वेदी, शिल्पांकित थडगी यांचा समावेश आहे. (पहा : मराठी विश्वकोश : खंड १७, चित्रपत्र १७).
सेंट पीटर्स चर्चवास्तूला अनेक शतकांचा प्रदीर्घ इतिहास आहे. रोमन सम्राट कॉन्स्टंटीन द ग्रेट याच्या आदेशावरून चर्चचे बांधकाम इ. स. सु. ३२५ च्या सुमारास, सेंट पीटरचे थडगे मानले गेलेल्या जागी सुरू करण्यात आले व साधारण तीस वर्षांनी ते पूर्ण झाले. कॉन्स्टंटीन याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला, तो विधी साजरा करण्यासाठी हे चर्च उभारले. या चर्चची वास्तुरचना ही ‘बॅसिलिका’च्या (रोमनांची आयताकृती सभागृहवास्तू) आकाराची म्हणजे लंबचौरसाकार होती. सेंट पीटर्सच्या थडग्याला केंद्रस्थानी ठेवून ही ‘टी’ (T) आकाराची बॅसिलिका बांधण्यात आली. चर्चच्या सभामंडपातील मध्यदालन हे चर्चची पूर्ण लांबी व्यापलेल्या स्तंभांच्या चार रांगांनी दुतर्फा पाखांमध्ये विभागलेले होते. हे जुने चर्च ‘ओल्ड सेंट पीटर्स बॅसिलिका’ या नावाने ओळखले जाते. मध्ययुगात या चर्चला पवित्र धर्मस्थळ म्हणून माहात्म्य प्राप्त झाले व असंख्य ख्रिस्ती १४ भाविकांनी या चर्चच्या यात्रा केल्या. कालौघात या चर्चवास्तूची पडझड झाल्याने पाचवा पोप निकोलस याने १४५२ मध्ये जुन्या चर्चचा जीर्णोद्धार व विस्तारकार्य हाती घेतले. १५०६ पर्यंत हे जीर्णोद्धाराचे कार्य चालू होते. त्याच वर्षी, पोप दुसरा जूल्यस (कार. १५०३-१३) याने सेंट पीटर्स चर्चवास्तू संपूर्ण नव्याने उभारण्याचा निर्णय घेऊन जुन्या मूळ चर्चचे पूर्ण उच्चाटन केले. आधीच्या वास्तुरचनेतील फक्त थडगे व काही अंशभागच शिल्लक उरला. नव्या भव्य वास्तुउभारणीच्या कार्यासाठी त्याने दोनातो ब्रामांते (१४४४-१५१४) या तत्कालीन श्रेष्ठ वास्तुशिल्पज्ञाची नियुक्ती केली. ब्रामांतेने ‘ग्रीक क्रॉस’च्या (समान लांबी असलेल्या उभ्या व आडव्या चार पट्टयांची क्रॉसरचना) धर्तीवर चौरसाकार वास्तुयोजन केले. क्रॉसच्या आकाराचे दालन व त्याभोवती प्रार्थनामंदिराचे (चॅपेल) सुसंवादी आयोजन त्याने केले. भव्य अशा कमानींवर प्रचंड घुमट बसविण्याची योजनाही त्यात होती. १५०६ मध्ये त्याची पायाभरणी झाली. ही कल्पना जरी तिच्या मूळ योजनेनुरूप प्रत्यक्षात आली नाही, तरी त्या काळातील महत्त्वाकांक्षी निर्मितीचे ते एक लक्षणीय प्रतीक होते. दीर्घकाळ चाललेल्या या चर्चवास्तूच्या प्रकल्पावर-बांधकाम व अंतर्गत सजावटीवर-ब्रामांतेसह एकूण दहा वेगवेगळ्या वास्तुकारांनी काम केले. त्यांत रॅफेएल, मायकेलअँजेलो, जॉकोमो देल्ला पॉर्ता व कार्लो मादेर्नो ह्या विख्यात वास्तुशिल्पज्ञांचा महत्त्वाचा सहभाग होता. ब्रामांतेच्या मृत्युनंतर १५१४ मध्ये ⇨ रॅफेएल (१४८३-१५२०) या श्रेष्ठ इटालियन चित्रकारवास्तुविशारदाने हा वास्तुकल्प हाती घेतला. चर्चच्या मध्यदालनाची लांबी वाढविण्यासाठी त्याने मूळचा ग्रीक क्रॉसच्या आकाराचा वास्तुकल्प बदलून ‘लॅटिन क्रॉस’च्या ( उभ्या उंच पट्टीच्या मध्याच्या वर जोडलेल्या व त्याला छेदणाऱ्या आडव्या आखूड पट्टीच्या आकाराची क्रॉसरचना) धर्तीवर लंबचौरसाकार नवा आराखडा तयार केला. १५२७ मध्ये रोम शहरात लुटालूट झाल्याने चर्चचे बांधकाम दीर्घकाळ रेंगाळले. दरम्यान आंतॉन्यो दा सांगाल्लो, द यंगर (१४८३-१५४६) या फ्लॉरेन्सच्या वास्तुविशारदाने लॅटिन क्रॉस चर्चची भव्य लाकडी नमुनाकृती तयार केली. सांगाल्लोच्या जागी मायकेलअँजेलो याची १५४७ मध्ये चर्चचा प्रमुख वास्तुकार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याने ब्रामांतेचा मूळचा ग्रीक क्रॉसच्या आकाराचा चौरस रचनाकल्प स्वीकारला. मात्र ब्रामांतेच्या समप्रमाणित व स्थिर भासणाऱ्या घुमटरचनेत बदल करून, त्याऐवजी गतिमान, चैतन्यशीलतेचा प्रत्यय देणाऱ्या नव्या घुमटरचनेचा वास्तुकल्प केला. घुमटाच्या तळाशी त्याने ‘ड्रम’ (गोल रिंगण) बसवले. त्यामुळे घुमट वर उचलल्यासारखा व आकाशाकडे झेपावणारा भासतो. आधारतीरांशी खिळवलेल्या दुहेरी स्तंभांवर हा घुमट रचला आहे. घुमटाचा अंडाकृती उथळा भरभक्कम असून त्याच्या कोपऱ्यांत लहान आधार-घुमट योजिले आहेत. मुख्य घुमट द्विकवची असून त्यांपैकी अंतर्कवच अर्धगोलाकार व बाह्यकवच टोकदार आहे. या टोकदारपणामुळे संपूर्ण वास्तूच आकाशाकडे झेपावते आहे, असा भास होतो. कोणत्याही बाजूने पाहिले तरी एक सौंदर्यपूर्ण रचना दिसावी, अशा कौशल्याने त्याने सेंट पीटर्स चर्चचा रचनाकल्प केला. १५६४ मध्ये मायकेलअँजेलोचा मृत्यू झाला, तोपर्यंत यातले बरेचसे बांधकाम पूर्ण झाले होते. त्याच्या मृत्यूनंतर जॉकोमो देल्ला पॉर्ता (सु. १५४१-१६०२) या वास्तुकाराने घुमटाचे उर्वरित बांधकाम मायकेलअँजेलोच्या वास्तुकल्पानुरूप पूर्ण केले (१५८५-९०). सतराव्या शतकात पाचवा पोप पॉल (कार. १६०५-२१) याने ख्रिस्ती धर्मातील सार्वजनिक प्रार्थनाविधीच्या सोयीच्या दृष्टीने लॅटिन क्रॉसच्या लंबचौरस, आयताकृती वास्तुरचनेचा आग्रह धरला व कार्लो मादेर्नो (१५५६- १६२९) या इटालियन वास्तुकाराने त्यानुसार केलेला लॅटिन क्रॉसचा रचनाकल्प अंतिमतः मान्य करण्यात आला. सेंट पीटर्स चर्चची विद्यमान वास्तुरचना ह्याच आकारात आहे. मादेर्नोच्या रचनाकल्पानुसार १६१२ मध्ये चर्चच्या मध्यदालनाची लांबी पूर्वेच्या बाजूला वाढविण्यात आली. त्यानुसार चर्चवास्तूची एकूण लांबी ६३६ फुट (१९४ मी.) झाली. तसेच मादेर्नोने चर्चच्या भरभक्कम दर्शनी भागाचीही रचना मायकेलअँजेलोच्या मूळ आराखड्यात थोड्याफार सुधारणा करून पूर्ण केली. १६२९ मध्ये जोव्हान्नी लोरेंत्सो बेर्नीनी ह्या वास्तुशिल्पज्ञाची सेंट पीटर्स चर्चचा प्रमुख वास्तुविशारद म्हणून नियुक्ती करण्यात आली. बेर्नीनीने पोपच्या वेदीवरील ब्राँझमधील अलंकृत छत्र (बाल्दाकिनो ) शिल्पित केले (१६३०). देवगृहातील ‘ॲप्स’ ( चर्च-वास्तूच्या शेवटच्या भागात असलेला अर्धवर्तुळाकार कोनाडा. या ठिकाणी मुख्य वेदी असते.) आणि सेंट पीटरचे ब्राँझमधील सिंहासन (१६५६) त्याने शिल्पांकित केले. कॉन्स्टंटीनचा विरश्रीयुक्त अश्वारूढ पुतळा, पोप आठवा अर्बन व पोप सातवा अलेक्झांडर यांची त्याने शिल्पित केलेली थडगी ह्या त्याच्या सर्व शिल्पाकृतींनी सेंट पीटर्स चर्चच्या अंतर्भागाची शोभा वाढवली. सेंट पीटर्स चर्चच्या अंतर्भागातील इतर उल्लेखनीय शिल्पे म्हणजे सेंट पीटरचा मध्ययुगीन ब्राँझ पुतळा व मायकेलअँजेलोचे प्येता (१४९८) हे संगमरवरी शिल्प (पहा : मराठी विश्वकोश : खंड १७, चित्रपत्र ४०). बरोक शैलीतील चित्रांच्या कुट्टिम (मोझेइक) अलंकृत प्रतिकृतींनी वेदींचे सुशोभन केले आहे. पोप आठवा अर्बन याने १६२६ मध्ये चर्चवास्तूचे ईश्वरी सेवेसाठी विधिवत समर्पण केले मात्र नंतरच्या काळातही वास्तुरचनेत अन्य काही घटकांची भर पडत गेली.
इनामदार, श्री. दे.
“