आश्रमव्यवस्था : आश्रमव्यवस्था आणि ⇨ वर्णव्यवस्था ही हिंदुधर्माची दोन वैशिष्टये आहेत. हिंदूंची पारंपरिक समाजरचना म्हणजे वर्णाश्रमव्यवस्था असे म्हटले जाते. हिंदुधर्माला वर्णाश्रमधर्म असेही म्हटले जाते. वर्णव्यवस्थेत व्यक्तीची कर्तव्यकर्मे त्या व्यक्तीच्या वर्णाची द्योतक बनतात. आश्रमव्यवस्थेत वयानुसार व्यक्तीच्या आश्रमांची विभागणी होते व कर्तव्यकर्मे ठरतात.

धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ आणि देवऋण, ऋषिऋण व पितृऋण ही त्रिविध ऋणे यांचे आश्रमव्यवस्थेस अधिष्ठान आहे [→ ऋणत्रय]. मनुष्य हा देव, पूर्वज किंवा पितर आणि ऋषी यांचे ऋण घेऊन जन्माला येतो आणि त्याने योग्य कर्माने म्हणजे ब्रह्मचर्याने ऋषिऋण, यज्ञकर्माने देवऋण व प्रजोत्पादनाने पितृऋण फेडले पाहिजे, अशी आश्रमव्यवस्थेची भूमिका आहे. आश्रम म्हणजे विशिष्ट ऋणे फेडण्यास आवश्यक व योग्य अशी कर्तव्यकर्मपद्धती व ती पार पाडण्याकरिता ठरविलेली वयोवस्था किंवा जीवनातील टप्पा किंवा अशा विशिष्ट कर्तव्यकर्मापद्धतीचा अंगीकार करण्याचे वसतिस्थान. आश्रम चार आहेत : ब्रह्मचर्य, गार्हस्थ्य, वानप्रस्थ आणि संन्यास. हे चार आश्रम चारही वर्णांना सारख्याच रीतीने विहित नाहीत. आश्रमव्यवस्थेचा निर्देश प्रथम छांदोग्योपनिषदात केलेला दिसतो (२·२३·१). तेथे आश्रम हा शब्द मात्र आलेला नाही. धर्मरूपी वृक्षाचे तीन स्कंध म्हणजे खांद्या तेथे सांगितल्या आहेत. यज्ञ, अध्ययन व दान हा प्रथम स्कंध म्हणजे गृहस्थाश्रम. तम हा द्वितीय स्कंध म्हणजे वानप्रस्थाश्रम. आचार्यकुलात वास करणारा ब्रह्मचारी हा तृतीय स्कंध होय. प्रव्रज्या म्हणजे संन्यास बृहदारण्यकोपनिषदात प्रथम आढळतो. वेदकाळी अथवा बुद्धपूर्वकाळी ब्राह्मणांनीच क्रमाने चार आश्रम स्वीकारावेत, क्षत्रियांनी संन्यासाव्यतिरिक्त तीन आश्रमच स्वीकारावेत, वैश्याने पहिले दोन व शूद्राने केवळ गृहस्थाश्रमच स्वीकारावा असे निर्बंध नसावेत कारण बुद्धाने सर्व वर्णातील लोकांना मोठया प्रमाणात भिक्षुदीक्षा म्हणजे संन्यास दिलेला दिसतो. महाभारतातील शांतिपर्वात (अध्याय ६३) क्षत्रिय राजाला राजपुत्र गादीवर बसवल्यानंतर वानप्रस्थ व संन्यास घेण्याची अनुमती दर्शविली आहे व राजाची अनुमती असल्यास वैश्य व शूद्र यांनाही वृद्धापकाळी वानप्रस्थ व संन्यास घेण्याची अनुमती दिलेली आहे. मनुस्मृति व याज्ञवल्क्यस्मृती ह्यांच्या काळी वर्णानुक्रमाने आश्रमग्रहणावर कडक निर्बंध पडले असे मानावे लागते. याज्ञवल्क्याच्या मते ब्राह्मण चारही आश्रम पाळू शकतो, तर क्षत्रिय पहिले तीन, वैश्य हिले दोन व शूद्र केवळ गृहस्थाश्रमाचे पालन करू शकतो. स्त्रियांना फक्त गृहस्थाश्रमाचीच मुभा होती एवढेच नव्हे, तर त्यांच्यावर ठराविक वयानंतर गृहस्थाश्रमात जाण्याची सक्ती हाती, असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल. परंतु स्मृतिपूर्वकाळी स्त्रियांनीही ब्रह्मचर्य व वानप्रस्थ हे आश्रम स्वीकारण्याची पद्धती होती, असे एका धर्मसूत्रात म्हटले आहे. प्रत्येक व्यक्तीस हे आश्रम क्रमश: पाळावयाचे असतात. अपवादात्मक एखादी विरक्त व्यक्ती ब्रह्मचर्याश्रमानंतर सरळ संन्यासश्रमात जाऊ शकते. परंतु मोक्षप्राप्तीच्या ध्येयाकरिता आधी तीनही ऋणे फेडलीच पाहिजेत आणि ती ऋणे फक्त ठराविक आश्रमांत ठराविक पद्धतीनेच फेडली पाहिजेत, असा नियम असल्याने सामान्य माणसास चारही आश्रमांतून जाणे हे क्रमप्राप्त होते. त्याचप्रमाणे अंतिम ध्येय जरी मोक्ष असले, तरी धर्म, अर्थ आणि काम हे पुरुषार्थ साधण्याकरिता कर्तव्यकर्मे प्रत्येकास करावी लागतात आणि तीही आश्रमांच्या क्रमानेच. प्रत्येक आश्रमात प्रवेश करण्यापूर्वी व्यक्तीवर काही विशिष्ट संस्कार होणे आवश्यक असते. या संस्कारांनुसार व्यक्तीला समाजात विशिष्ट दर्जाही प्राप्त होतो.

उपनयन संस्कारानंतर ब्रह्मचर्याश्रमास सुरुवात हाेते. ⇨ उपनयन हे वर्णक्रमाने वयाच्या आठव्या, अकराव्या आणि बाराव्या वर्षी होणे योग्य मानले आहे. उपनयन झाल्याशिवाय त्रैवर्णिकांच्या समाजाचे पूर्ण सभासदत्व प्राप्त होत नाही. उपनयन होईपर्यंत व्यक्तीच्या सामाजीकरणाची जबाबदारी मूलत: कुटुंबसंस्थेकडे असते. नंतर ती गुरुकुलासारख्या संस्थेकडे जाते. ब्रह्मचारी हा विद्यार्थी असतो. त्याने वेदांचे पठण करून ऋषिऋणातून मुक्त व्हायवयाचे असते. गुरुगृही राहून गुरूची सेवा करणे व अध्ययन करणे ही त्याची कर्तव्ये असतात. या आश्रमस्थितीत ऐहिक सुखे भोगावयाची नसतात. कडक संयमाचे जीवन जगून पुढच्या आयुष्यातील कर्तव्ये पार पाडण्यास आवश्यक कणखरपणा व सामर्स्थ मिळवावयाचे असते. अर्थ व काम यांना ब्रह्मचर्याश्रमात स्थान नाही. विद्येबरोबरच ब्रह्मचाऱ्यास संयम, विवेक, सहनशीलता, विचारक्षमता इ. गुण आत्मसात करावयाचे असतात. साधारणत: बारा वर्षे या आश्रमस्थितीत राहून गुरुदक्षिणा देऊन मग गृहस्थाश्रमात प्रवेश होतो.

विवाह-संस्कारानंतरच गृहस्थाश्रमात प्रवेश मिळतो. या आश्रमाचा कालखंड सर्वात मोठा आहे. गृहस्थाश्रमात व्यक्तीला वैषयिक सुखांचा आनंद उपभोगता येतो. त्याचबरोबर कुटुंबाविषयीची व समाजाविषयीची कर्तव्ये पार पाडावयाची असतात. या आश्रमस्थितीत चार पुरुषार्थापैकी अर्थ व काम या पुरुषार्थांचे धर्मानुसार पालन करावयाचे असते. मातापित्यांची सेवा करावयाची व पितरांचे श्राद्ध करावयाचे असते, मुलास जन्म दिल्याने पितृऋण फेडले जाते व मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो. मुलास पिंडदान करण्याचा अधिकार असतो व पिंडदानाने पितरांचे आत्मे संतुष्ट होतात. इतर तीनही आश्रममस्थितींतील लोक अन्न, वस्त्र यांसारख्या आपल्या दैनिंदिन गरजांच्या पूर्तीसाठी गृहस्थाश्रमावर अवलंबून असतात. या दृष्टीने गृहस्थाश्रमातील सर्व कर्तव्ये पती व पत्नी या दोघांनी मिळून पाळावयाची असतात, ते असे : (१) ब्रह्मपितरांच्या वेदपठणाद्वारे पूर्वीच्या ऋषिमुनींची पूजा करणे. (२) पितृयज्ञ : पितरांच्या उद्देशाने पाण्याचे अर्व्य नित्य सोडून व नियमितपणे श्राद्ध करून पितरांची पूजा करणे. (३) देवयज्ञ : देवांना अग्नीत हवी देऊन देवतांची पूजा करणे (४) भूतयज्ञ : प्राणी, पक्षी आणि इतर जीवांना अन्न घालून सर्व जीवांची पूजा करणे (५) मनुष्ययज्ञ : अतिथींचे आदरातिथ्य करून मानवांची पूजा करणे.

साधारण पन्नाशीच्या पुढे, सर्व ऐहिक सुखांचा उपभोग घेतल्यावर संसाराची धुरा आपल्या मुलांवर सोपवून व्यक्तीला वानप्रस्थाश्रमात प्रवेश करावयाचा असतो. यात हळूहळू आपले मन व इंद्रिये ऐहिक सुखाविषयी निरिच्छ करावयाची असतात व आपले सर्व ध्यान मोक्षप्राप्तीच्या चिंतनात घालवयाचे असते. त्याकरिता पत्नीसमवेत तो वनात जातो. वानप्रस्थाश्रमात तप, उपवास, उपासना व विशिष्ट मांसरहित यज्ञ करावयाचे असतात त्यामुळे देवऋण फेडले जाते.

काही काळ वानप्रस्थात व्यतीत करून वैराग्य प्राप्त करावयाचे व जीवनाची आसक्ती संपूर्ण नष्ट झाल्यावर संन्यास घ्यावयाचा असतो. संन्यास घेतल्यावर व्यक्तीची समाजाशी असलेली सर्व बंधने तुटतात. व्यक्तीला जात, कुटुंब इ. काहीच राहत नाही व मोक्षाकरिता तिला परमात्म्याच्या चिंतनात मग्न व्हावयाचे असते.

हिंदू तत्त्वज्ञानात मोक्षप्राप्ती हे व्यक्तीचे सर्वोच्च ध्येय मानल्याने व्यक्तीबद्दलच विचार केला गेला व समाजाबद्दज जास्त आस्था दाखविली गेली नाही, असा आरोप हिंदू तत्त्वज्ञानावर केला जातो परंतु सर्वसाधारणत: प्रत्येक व्यक्ती चारही आश्रमांतून गेल्याशिवाय मोक्षप्राप्ती होत नाही हे ध्यानात घेतले, म्हणजे समाजाच्या गरजांचा, कर्तव्यांचा व नैसर्गिक प्रवृत्तींचा विचार हिंदू तत्त्ववेत्त्यांनी केलेला होता हे लक्षात येते. गृहस्थाश्रम हा सर्वांत महत्त्वाचा आश्रम व या आश्रमस्थितीत माणसाला सामाजिक कर्तव्ये पार पाडावयाची असतात. तसेच द्रव्यार्जन करून व विवाह करून आयुष्यातील सुख्ये भोगावयाची असतात. अशा रीतीने आश्रमव्यवस्थेत व्यक्ती व समाज या दोहांचा परस्परसंबंध साधून दोहोंच्या गरजा पूर्ण होतील अशी व्यवस्था आहे. आश्रमव्यवस्था ही वयाप्रमाणे निश्चित केलेली असल्यामुळे, वयोभेदामुळे नव्याजुन्या पिढीत कलह होण्याची शक्यताही टाळण्यात आली आहे.

वर वर्णिलेली आश्रमव्यवस्था हा एक आदर्श आहे. प्रत्यक्षात संन्यासाश्रमात फारच कमी लोक प्रवेश करीत असत. इतर आश्रमसुद्धा प्राचीन काळापासून ब्राह्मणवर्णीय लोकच जास्त प्रमाणात पाळत असावेत, असे वाटते. आश्रमव्यवस्थेतील शिक्षण, उद्योग आणि निवृत्ती ह्या मूलभत कल्पना आजच्या जीवनपद्धतीतही उतरविता येण्यासारख्या आहेत.

संदर्भ : (1) Basham, A. L. The Wondoer that was India, New York, 1954.

         (2) Kane, P. H. History of Dharmasastra, Vo. II Part 1, Poona, 1941.

         (3) Prabhu, P.H. Hindu Social Organization, Bombay, 1954.

जोशी, लक्ष्मणशास्त्री मुटाटकर, रामचंद्र