एंके, योहान फ्रांट्स : (२३ सप्टेंबर १७९१–२६ ऑगस्ट १८६५). जर्मन ज्योतिर्विद. त्यांचा जन्म हँबर्ग येथे झाला. गौस या प्रसिद्ध शास्त्रज्ञांपाशी त्यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला. १८१६ मध्ये झेबर्ग वेधशाळेत दुय्यम अधिकारी, १८२२ मध्ये प्रमुख आणि १८२५ मध्ये बर्लिन वेधशाळेचे प्रमुख अशी त्यांची बढती होत गेली.
धूमकेतूंसंबंधीचे त्यांचे संशोधन मौलिक आहे. १७८६, १७९५, १८०५ व १८१८ मध्ये दिसलेले धूमकेतू एकच असल्याचे त्यांनी सिद्ध केले. त्याचा भ्रमणमार्ग त्यांनी निश्चित केला आणि त्याचा आवर्तकाल (एका आवर्तनास लागणारा काल) ३ वर्षे ११५ दिवस असल्याचे १८१९ मध्ये निश्चित केले. हा धूमकेतू सर्वांत कमी आवर्तकालाचा आहे. यालाच एंके धूमकेतू म्हणतात. हा धूमकेतू फक्त दुर्बिणीतूनच दिसतो. १८२८ मध्ये त्यांना लंडनच्या रॉयल सोसायटीचे रॉयल पदक मिळाले. शनीचे सर्वांत बाहेरचे अ कडे एकसंधी नसून त्यामध्ये बारीकशी अंधकारमय फट आहे, असा शोध त्यांनी १८३७ मध्ये लावला. ती ‘एंके फट’ (डिव्हिजन) म्हणून ओळखळी जाते. मोठ्या दुर्बिणीशिवाय ही दिसत नाही. १७६१ व १७६९ या वर्षी झालेल्या शुक्राच्या सूर्यबिंबावरील अधिक्रमणासंबंधीच्या (सरकण्याच्या) टिपणांवरून त्यांनी सूर्याची दृक्च्युती (पार्श्वभूमीवरील आभासमय सरकणे) ८·५७ विकला असल्याचे सिद्ध केले. १८६४ मध्ये निवृत्त झाल्यावर श्पांडाऊ येथे त्यांचा अंत झाला. सी. ब्रुन्स यांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे.
काजरेकर, स. ग.