उल्ब : सरीसृप (सरपटणारे प्राणी), पक्षी आणि स्तनी या वर्गातील सगळ्या प्राण्यांच्या भ्रूणाभोवती उत्पन्न होणार्‍या एका पातळ कोशिकामय कलेला (पेशीमय थराला) उल्ब हे नाव दिलेले आहे. या भ्रूणाबाह्य (भ्रूणाच्या बाहेर असलेल्या) कलेच्या उत्पत्तीमुळे भ्रूणाभोवती सगळ्या बाजूंनी बंद असलेली एक पिशवी अथवा कोश तयार होतो. हा कोश पाण्यासारख्या द्रवाने भरलेला असतो. उल्ब पृष्ठंवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या वरील तीन वर्गातच उत्पन्न होते असे नाही अपृष्ठवंशी कीटकांच्या विकासातही भ्रूणाभोवती ते उत्पन्न होते. पाण्यात राहणार्‍या पृष्ठवंशी प्राण्यांच्या भ्रूणाभोवती उल्ब उत्पन्न होत नसल्यामुळे मत्स्य आणि उभयचर यांच्या भ्रूणांना ‘अनुल्बी’ आणि ज्यांत ते असते त्या भ्रूणांना ‘उल्बी’ म्हणतात.

सरीसृप, पक्षी आणि काही स्तनी यांत उल्बाची उत्पत्ती आद्यकायास्तराच्या (बाह्य देहभित्तीच्या उत्पत्तीत मदत करणार्‍या पूर्वमध्येस्तराच्या बाहेरच्या स्तराच्या) विशिष्ट पद्धतीने उत्पन्न होणार्‍या घड्यांपासून होते. या स्तराच्या अग्र, पश्च (मागच्या) आणि पार्श्व (बाजूच्या) घड्या भ्रूणाभोवती वाढत जाऊन त्याच्या फक्त आतल्या कडेपासून खरे उल्ब तयार होते आणि बाहेरची कडा दुसऱ्या एका गर्भकलेच्या (गर्भाभोवती असणार्‍या कलेच्या) जरायूच्या (उल्बाच्या बाहेर असणार्‍या व त्याला वेढणार्‍या भ्रूणाच्या कलेच्या) उत्पत्तीत भाग घेते. इतर सस्तन प्राण्यांत (या माणसाचाही अंतर्भाव होतो) उल्बाची उत्पत्ती, ज्यात भ्रूणीय आणि भ्रूणबाह्य कोशिका वेगळ्या झालेल्या आहेत अशा कोशिकापुंजात घडून येणार्‍या कोटरनाच्या (कोशिकांचे समूह अलग झाल्यामुळे पोकळी म्हणजे गुहा उत्पन्न होण्याच्या) क्रियेपासून होते. ज्या कोशिकांपासून पुढे भ्रूणाचे शरीर तयार होते त्यांच्या वर हे कोटर उत्पन्न होते. अखेरीस नाभिरज्जू (नाळ) ज्या जागी वाढत असते त्या जागेपर्यंत भ्रूणाच्या सभोवार ते पसरते.

उल्ब चिवट आणि पारदर्शक असून त्यात वाहिका (रक्तवाहिन्या) किंवा तंत्रिका (मज्जातंतू) नसतात. ते कोशिकांच्या दोन स्तरांचे बनलेले असते आतला स्तर बाह्यत्वचा-उपकला हा असून त्यात कोशिकांची एकच ओळ असते भ्रूणाच्या शरीरावरील त्वचेचा बाह्य स्तर म्हणून असणार्‍या बाह्यत्वचा-उपकलेशी तो अखंड असतो. बाहेरचा स्तर, मध्यस्तरीय संयोजी (जोडणाऱ्या) आणि विशेषित अरेखित (अनैच्छिक) स्नायु-ऊतकाचा (ऊतक म्हणजे समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचा समूह) बनलेला असून तो भ्रूणाच्या मध्यस्तरीय जननस्तराशी अखंड असतो.

उल्ब आणि त्याच्या कोशातील द्रव पदार्थ यांचे मुख्य कार्य नाजूक भ्रूणाचे संरक्षण होय. भ्रूण उल्ब-द्रवात लटकत असल्यामुळे त्याचा आकार आणि अंगस्थिती बदलू शकते. त्याच्यावरचा बाह्य दाब सगळ्या बाजूंनी सारखा असतो. उल्बातील अरेखित स्नायुतंतूंच्या संकोचनाने उल्ब-द्रव संथपणे हलविला जाऊन भ्रूणाला हळूहळू झोके दिले जातात. यामुळे त्याचे वाढणारे निरनिराळे भाग एकमेकांना न चिकटता मोकळे राहतात आणि विकृत रचना उत्पन्न होत नाहीत.

पहा : भ्रूणविज्ञान.

संदर्भ : Patten, B. M. Foundations of Embryology, New York, 1958.

कर्वे, ज. नी.