एंडर्स, जॉन फ्रँक्लिन : (१० फेब्रुवारी १८९७– ). अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. बालपक्षाघाताच्या (पोलिओच्या) विषाणूंचे (व्हायरसांचे)शरीराबाहेर संवर्धन करण्याच्या शोधासाठी सन १९५४ चे वैद्यकाचे नोबेल पारितोषिक एंडर्स, रॉबिन्स आणि वेलर यांच्यात विभागून देण्यातआले.
एंडर्स यांचा जन्म वेस्टहार्टफर्ड येथे झाला. पहिल्या महायुद्धातअमेरिकेच्या विमानदलात वैमानिक म्हणून काम केल्यानंतर काही दिवस ते जमिनीच्या खरेदी-विक्रीचा व्यवसायकरीतहो ते. पुढे १९१९ मध्ये त्यांनीयेल विद्यापीठाची बी. ए.पदवी मिळविली. नंतर हार्वर्ड विद्यापीठाची इंग्रजी विषयाची पदवी मिळवून ते जंतुशास्त्र व प्रतिरक्षा(रोगविरोध करण्याची शक्ती ) यांच्या अभ्यासाकडे वळले.१९३० मध्ये हार्वर्ड विद्यापीठाची पीएच. डी. ही पदवी संपादन करून तेथेच त्यांनी काही दिवस काम केले.१९४८ साली बोस्टन येथील बालरुग्णालयात संसर्गजन्य रोगांच्या संशोधनासाठी त्यांनी प्रयोगशाळा स्थापन केली. हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून १९५६ मध्ये त्यांची नेमणूक झाली.१९५३ मध्ये त्यांना नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे सभासद निवडण्यात आले.
एकोणिसाव्या शतकात रॉबर्ट कॉख यांनी जंतूंचे शरीराबाहेर संवर्धन करण्याची क्रिया शोधून काढली होती, परंतु विषाणूंचे संवर्धन करण्याच्या बाबतीत पुष्कळ अडचणी होत्या. कारण विषाणू हे फक्त जिवंत कोशिकांतच (पेशींतच) संवर्धित होऊ शकतात. प्राणिशरीरातील ऊतकांचे (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांचे) शरीराबाहेर संवर्धन करण्याची पद्धत आलेक्सिस कॅरेल यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीसच शोधून काढलेली होती. अशा संवर्धित ऊतकांतील कोशिकांमध्ये गालगुं डाच्या विषाणूंचे संवर्धन करण्यात एंडर्स यांना यश आले.
एंडर्स, रॉबिन्स आणि वेलर या तिघांनी १९४८ मध्ये बालपक्षाघाताच्या विषाणूंच्या अभ्यासाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. हे विषाणू भ्रूणाच्या तंत्रिका कोशिकांतच (मज्जातंतु-कोशिकांतच) संवर्धित होऊ शकतात, अशी त्यावेळी कल्पना हो ती. परंतु या तिघांनी मानवी भ्रूणाच्या अनेक ऊतकांत या विषाणूंचे संवर्धन करण्यात यश मिळविले, इतकेच नव्हे तर मुलांच्या आणि प्रौढांच्या ऊतकां तही असे संवर्धन होऊ शकते ही गोष्ट त्यांनी सिद्ध केली. फक्त अस्थी आणि उपास्थी (सांध्यातील हाडां च्या पृष्ठभागावर आदळणारे लवचिक व एक प्रकारचे संयोजी म्हणजे जोडणारे ऊतक) या ऊतकांत ते विषाणू वाढऊ शकत नाहीत, असे त्यांना दिसून आले.
विषाणुसंवर्धनामध्ये आणखी एक अडचण हाेती. ती म्हणजे संवर्धित विषाणू दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात घालून होणारी प्रतिक्रिया पाहिल्याशिवाय त्यांचे अस्तित्व आणि गुणन (संख्या वृद्धी) या गोष्टी समजणे शक्य नव्हते. एंडर्स व त्यांचे सहकारी यांनी असे दाखवून दिले की, विषाणूंचे शरीराबाहेर ऊतकांत संवर्धन केल्यास त्या ऊतकांतील कोशिकांचा अपकर्ष (ऱ्हास) होतो आणि त्या ऊतकां त अम्लोत्पत्ती होण्याचा वेग कमी पडतो. या दो न गोष्टींवरून विषाणूंच्या अस्तित्वाचा आणि गुणनाचा पुरावा मिळू शकतो. यापुढे जाऊन त्यांनी आणखी असेही दाखवून दिले की, विशिष्ट विषाणूविरुद्ध तयार केलेली लस संवर्ध कात मिसळली असता विषाणूंची वाढ खुंटते. या शोधामुळे विषाणु-प्रतिबंधक लस तयार करणे शक्य झाले असून गोवराच्या आणि बालपक्षाघाताच्या प्रतिबंधासाठी लसी तयार करून त्या आता वापरातही आलेल्या आहेत. एंडर्स यांना पसानो पारितोषिक (१९५३), कॅमरन पारितोषिक (१९६०), रिकेट्स पारितोषिक (१९६२), कॉख पदक (१९६३), अमेरिकेच्या अध्यक्षांचे फ्रीडम पदक (१९६३) व अनेक विद्यापीठांच्या सन्माननीय पदव्या हे बहुमान मिळालेले आहेत.
ढमढेरे, वा. रा.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..