ऋतुनिवृत्ति : प्राकृत (स्वाभाविक) मासिक ऋतुस्राव बंद होण्याच्या कालाला ऋतुनिवृत्ती असे म्हणतता. ऋतुप्राप्तीप्रमाणेच ऋतुनिवृत्ती हा स्त्रीच्या आयुष्यातील संक्रमण काल असतो. साधारणतः वयाच्या ४५ ते ५० व्या वर्षी मासिक पाळी बंद होते. क्वचित ही वयोमर्यादा चार-पाच वर्षे मागेपुढे होते. तरुण वयात तीव्र आजार, मनावर झालेला आघात, दीर्घकाळ स्तनपान अथवा अंडाशयातील काही विकारांमुळे मासिक पाळी काही काळ बंद पडते परंतु ती खरी ऋतुनिवृत्ती नव्हे. त्या अवस्थेला अनार्तव असे म्हणतात. उपचारानंतर पाळी पुन्हा सुरू होऊ शकते.
अंडाशयांच्या काही रोगांत अंडाशय काढून टाकावे लागले तर कृत्रिम ऋतुनिवृत्ती होते. साधारणपणे चाळिशी आली की अंडाशयांची कार्यक्षमता कमी होऊ लागते. पन्नाशीच्या सुमारास ती पूर्णपणे थांबते. ऋतुनिवृत्तीच्या सुरुवातीच्या तीन-चार वर्षांच्या काळात गर्भधारणा झाल्याची उदाहरणे आहेत कारण अंडाशयाची कार्यक्षमता कमी कमी होत असली, तरी त्या काळात क्वचित अधून मधून अंडमोचन (अंडाशयातून अंड बाहेर पडणे) होऊ शकते.
ऋतुनिवृत्तिकाल अनेक प्रकारे येतो : (१) काही स्त्रियांची पाळी एकदम बंद होते, (२) काहींमध्ये दोन पाळ्यांतील अंतर लांबत जाऊन एक-दोन वर्षांनी ती अजिबात बंद होते, (३) काहींत ती अनियमित होत जाऊन स्रावाचे प्रमाण कमी जास्त होत जाऊन तो बंद होतो तर (४) काही स्त्रियांमध्ये स्राव नऊ-दहा दिवसांपर्यंत होतो. मासिक पाळी चालू नसताना, संभोगानंतर अथवा एरव्हीही रक्तमिश्रित स्राव होतो. अशा वेळी तपासणी करून घेणे आवश्यक असते, कारण कर्करोगाची पूर्व लक्षणेही अशीच असतात.
ऋतुनिवृत्तिकालात अंडाशयात उत्पन्न होणारी प्रवर्तके (उत्तेजक स्राव, हॉर्मोने) कमी प्रमाणात उत्पन्न होतात त्यांच्यातील समतोल ढळतो, त्यामुळे योनिमार्गात आग होणे, कंड सुटणे, सर्व शरीरात वाफा आल्यासारखे वाटणे, घेरी येणे, घाम सुटणे, कानांत व डोक्यात आवाज होणे वगैरे लक्षणे उद्भवतात. मानसिक दुर्बलता वाटते. पचनाच्या तक्रारी सुरू होतात, पोटात वायू फिरतो, क्वचित पोट मोठे होते स्तनांतून त्याचवेळी चीक निघू लागतो त्यामुळे गर्भधारणा आहे असा भास होतो. गौण लैंगिक लक्षणे कमी होतात म्हणजे स्तनांतील दुग्धोत्पादक ग्रंथी अपकर्षित होऊन त्यांच्या जागी वसा साठून राहते. जांघेच्या भागावरील केस विरळ होतात. स्त्रियांची कामेच्छा मात्र कमी होत नाही.
चिकित्सा : अंडाशयात उत्पन्न होणारी प्रवर्तके योग्य मात्रेने दिल्यास लक्षणे कमी होतात.
पहा : ऋतुस्राव व ऋतुविकार.
क्षेत्रमाडे, सुमति
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..