ऋतुजैविकी : हवामातील ऋतुकालिक बदल आणि इतर काही कारणे यांच्या अनुषंगाने निसर्गात ज्या काही पुनरावर्ती जैव घटना घडून येते असतात, त्यांच्या अभ्यासाला ऋतुजैविकी म्हणतात. ऋतुजैविकी ही वातावरणविज्ञानाची एक शाखा आहे.

 एखाद्या वनस्पतीची वाढ होत असताना तिच्या निरनिराळ्या अवस्था केव्हा दृष्टीस पडतात, तिला पाने किंवा फुले केव्हा येतात, स्थलांतर करणारे पक्षी एखाद्या ठिकाणी प्रथम केव्हा दिसून येतात व ते परत जाताना अखेरचे पक्षी कोणत्या दिवशी परत जातात, कोकिळेचे गाणे प्रथम केव्हा ऐकू येऊ लागते, काही प्राणी शीतसुप्तीत (हिवाळ्यातील निद्रावस्थेत) केव्हा जातात व शीतसुप्तीत असलेले केव्हा जागे होतात इ. निसर्गातील आवर्ती घटनांचे निरीक्षण करून त्यांची तारीखवार नोंद ठेवणे आणि त्यांचा पद्धतशीर अभ्यास करून हवामानविषयक महत्त्वाचे निष्कर्ष काढणे, हे या शास्त्राचे मुख्य काम आहे. घटनांच्या नोंदींचा अभ्यास करताना निरनिराळ्या प्रदेशांचे अक्षांश, रेखांश आणि उंची यांचा या नोंदींच्या दिवसांशी असणारा संबंधही विचारात घ्यावा लागतो. 

भारतात या शास्त्राचा अभ्यास अलीकडेच सुरू झालेला असून तो काही महत्त्वाची झाडे आणि पिके यांच्यापुरताच मर्यादित आहे.

 खांवेटे, नि. ना.