ऊस : (हिं. गन्ना, ऊख; गु. शेरडी; क. कब्बु; ते. चेरकू; त. करुंबू; सं इक्षू, गुडतृण; इं. शुगर-केन; लॅ. सॅकॅरम ऑफिसिनॅरम; कुलग्रॅमिनी). भारतात तसेच दक्षिण आशियातील इतर देशांत प्राचीन काळापासून लागवडीत असलेली ही सुपरिचित वनस्पती बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) गवताची एक जाती आहे[⟶ ग्रॅंमिनी; गवते].
हिचे मूलस्थान आग्नेय आशिया मानतात तथापि ब्रँडेस (१९५६) यांनी सर्व प्रकारची माहिती मिळवून न्यू गिनी हे उगमस्थान निश्चित केले आहे. तेथून इ. स. पू. सु. ८,००० वर्षांपूर्वी व नंतर या उसाच्या जातींचा प्रसार सॉलोमन बेटे, न्यू हेब्रिडीझ, न्यू कॅलिडोनिया इ. प्रदेशांत तसेच इ. स. पू. ६,००० वर्षांपूर्वीपासून इंडोनेशिया, फिलिपीन्स ते उत्तर भारतापर्यंत आणि शेवटी सु. इ. स. ६०० ते ११०० या काळात न्यू हेब्रिडीझच्या पूर्वेच्या द्वीपसमूहात व ओशिॲनियाच्या इतर भागात झाला असावा, असेही त्यांचे मत आहे. सु, अठराव्या शतकापर्यंतच्या काळात उसाचा प्रसार जवळजवळ जगभर झालेला आढळतो. मात्र ही जाती (सॅकॅरम ऑफिसिनॅरम) कोठेही जंगली अवस्थे आढळत नाही.अथर्ववेदात उसाचा उल्लेख आला असून तो काळ इ. स. पू. सु. ४,००० वर्षांपूर्वीचा असावा. भारतात इ. स. पू. ३२७ पासून ऊस हे महत्त्वाचे पीक असल्याचे आढळते. चौथ्या ते सहाव्या शतकांच्या दरम्यानच्या काळात बारतात साखर निर्मिती सुरू झालीही साखर खड्यांच्या स्वरूपात होती. इ. स. ६४१ मध्ये ऊस ईजिप्तमध्ये पोहोचला व नवव्या ते दहाव्या शतकांमधल्या काळात तेथे प्रथम शुद्ध केलेली साखर व्यापारी द्दष्ट्या निर्माण होऊ लागली.
समशीतोष्ण व उष्ण कटिबंधांतील बर्याच देशांत उसाची लागवड मुख्यातः साखरेकरिता केली जाते. अनेक मूळ जातींचा कृत्रिम संकर करून काढलेल्या नवीन प्रकारांची व वाणांची लागवड केली जाते. लागवडीसाठी सर्वसाधारणपणे तीन डोठे असलेल्या कांड्या (तुकडे) वापरतात. कांड्यांवरील डोळे अंकुरतात व त्यांतून प्राथमिक किंवा मूळ फुटवा वाढीस लागतो. या फुटव्याच्या प्रारंभीच्या कांड्या कमी लांबीच्या असतात. जसजसा ऊस वाढत जातो तसतशी पुढील कांड्यांची लांबी वाढत जाते व उसाच्या वाढीच्या अखेरच्या अवस्थेतील कांड्यांची लांबी परत कमीकमी होत जाते. आरंभीच्या मूळ किंवा प्राथमिक फुटव्यांना जे फुटवे येतात त्यांना द्वितीयक व द्वितीयकांना येणार्या फुटव्यांना तृतीयक फुटवे म्हणतात. अशा प्रकारे या फुटव्यांमुळे उसाचे बेट तयार होते. एकीकडे डोळ्यांची उगवण होत असतानाच बेणे-कांडीवरील मुळांच्या वलयातून मुळ्या फुटतात. या मुळ्या बारीक व भरपूर शाखायुक्त असतात. त्यानंतर नवीन फुटव्यांच्या कांड्यांवरील पेरांच्या मुळांच्या पट्ट्यातून ज्या मुळ्या फुटतात त्या बेमे-कांडीच्या मुळांपेक्षा अधिक जाड, मांसल व पांढुरक्या असतात. तसेच त्यांना शाखाही कमी फुटतात. पक्क उसाची उंची साधारणतः ३-४ मी. असते व त्याला २५ ते ४० कांड्या असतात. कांडीच्या वर व खाली पेरे असते. पेर्याच्या घडणीत खालच्या बाजूस मेणवलय, त्याच्या वर पर्णव्रण (पान पडून गेल्यानंतर रहामारा व्रण), नंतर मुळांचा पट्टा व त्यावर वृद्धिवलय असते. वृद्धिवलयाजवळ कांडे वाढते. मुळांच्या पट्ट्यात पर्णव्रणाजवळ तळभाग व वृद्धिवलयाजवळ अग्रभाग असलेला एक त्रिकोमाकृती किंवा लांबट गोलाकार डोळा असतो. डोळ्याच्या अग्रभागापासून कांडीवर एक खोबण दिसते. मुळांच्या पट्ट्यात मुळांच्या आदिम (आद्या) बारीक ग्रंथी असतात. अनूकूल वातावरणात या ग्रंथींतून मुळ्या फुटतात. संधिखोडावर लांब पण अरुंद, चिवट व सपाट पाने इतर गवतांप्रमाणे एकाआड एक असतात आवरक (खोडास वेढणारा पानाच्या तळाचा भाग) लांब, खोडास लपेटून रहाणारे व केसाळ जिव्हिकासुद्ध केसाळ फुलोरा टोकास लांब परिमंजरीप्रमाणे असून कणिशके बारीक, एकपुष्पी असतात फुले द्विलिंगी [→ ग्रॅमिनी] लघुतुषे दोन, केसरदले तीन असून कणिशकाच्या तळभागासभोवती शूक-मंडल (राठ केसासारख्या तंतूंचे मंडल) असते [→ फूल]. कृत्स्नफळ [→ फळ] आयत किंवा गोलसर असते. कित्येक नवीन वाणांत फुले येत नाहीत व काहींत फळे व बी नसते. ऊस व त्यापासून मिळणारे रस, काकवी, गूळ व साखर हे पदार्थ खाद्य असल्याने दिवसेंदिवस उसाची लागवड व साखर कारखानदारी वाढत आहे. उसाचे शेंडे (वाढे) जनावरांचे खाद्य म्हणून उपयोगात आणतात. त्यापासून व पाचटापासून चांगले कंपोस्ट खत तयार होते तसेच मूरघास तयार करण्यासाठीही वाढे वापरतात वस्तुंच्या बांधणी किंवा भरणीसाठीसुद्धा पाचट उपयोगी पडते. उसाच्या चिपाडांचा व चोथ्याचा जळणासाठी, कागद व तक्ते तयार करण्यासाठी, सेल्युलोज व सक्रियित (अधिक क्रियाशील बनविलेल्या) कार्बनाच्या निर्मितीसाठी तसेच गालन-पत्र (फिल्टर पेपर) व ‘स्ट्रॉ बोर्ड’तयार करण्यासाठी उपयोग करतात उसाच्या रसातील ज्या भागापासून साखरेचे स्फटिक साध्या प्रक्रियांनी करता येत नाहीत असा भाग (म्हणजे मोलॅसिस) ब्युटेनॉल, ॲलिटोन, सायट्रिक अम्ल, रासायनिक खते, मेण, मद्य (एथिल अल्कोहॉल), कृत्रिम रबर व धातुकरिता वापरावयाचे पॉलिश इ. तयार करण्यासाठीही वापरतात जनावरांचे अन्न, यीस्टचे अन्न म्हणून व तंबाखुच्या प्रक्रियेसाठीसुद्धा मोलॅसिसचा वापर होतो खारवट तसेच चोपण जमिनी सुधारण्यासाठी मळी (प्रेस मड किंवा फिल्टर मड) व मोलॅसिस यांचा उपयोग होतो [→ साखर]. उसाचा रस सारक, मूत्रल (लघवी साफ करणारा), शीत व वाजीकर (कामोत्तेजक) असतो.
ठोंबरे, म. वा.
स्थूलमानाने जगात सध्या लागवडीसाठी वापरण्यात येणारे जे उसाचे प्रकार आहेत ते सॅकॅरम वंशातील संकरज (संकराने तयार केलेले) आहेत. त्यांच्यापैकी दोन प्रकार गोड रसाचे आणि लागवड करण्यायोग्य आहेत दुसरे दोन प्रकार रसात गोडी नसलेले आणि तंतुमय भाग भरपूर असलेले आहेत. पहिल्या दोन प्रकारांपैकी एकामध्ये भरपूर गोड रस असतो. त्यास उष्ण प्रदेशीय ‘पौंडा’ उत्कृष्ट ऊस, म्हणतात. त्याला मराठीत ‘पुंड्या’ म्हणतात. तो दातांनी सोलून खाण्याइथका नरम असतो. त्याच्या सालीचा रंग तांबडा, पिवळा, जांभळा व हिरा असतो. दुसर्या प्रकारात तोकडे आणि बारीक रसात विशेष गोडी नसलेले ऊस असतात त्यांना देशी ऊस म्हणतात. भारतातील ⇨ कासे गवत हे उसाची रानटी जात आहे असे समजतात. कासे गवताहून जाड व मोठी असलेली रानटी उसाची जात मेलावीशियामध्ये सापडते. उष्ण प्रदेशांतील गोड रसाचा पुंड्या ऊस वनस्पतिशास्त्रज्ञांच्या मते पॉलिनेशिया व मेलानीशिया या द्वीपसमूहात निसर्गतःच उत्पन्न झाला असावा. या देशांतील रहिवासी लोक दर्यावर्दी असल्यामुळे ते सफरीवर जात त्यावेळी आपल्याबरेबर उसही घेऊन जात त्यामुळे त्यांनी भेट दिलेल्या देशांत उसाचा प्रसार झाला.
कोष्टक क्र. १. भारतातील प्रमुख राज्यांतील उसाचे उत्पादन (१९७०-७१)
राज्य | उत्पन्न (हजार टन) |
आंध्र प्रदेश | १०,५०८·३ |
उत्तर प्रदेश | ५५,६६३·८ |
तमिळनाडू | १०,४४३·४ |
पंजाब | ५,२७०·० |
बिहार | ६,४९३·९ |
महाराष्ट्र | १४,७७०·० |
हरियाणा | ६,९८०·० |
एकूण | १,१०,१२९·४ |
कोष्टक क्र. २. महाराष्ट्रातील उसाचे क्षेत्र (१९६७-६८).
जिल्हा | क्षेत्र (हेक्टर) |
अकोला | ३०० |
अमरावती | १०० |
अहमदनगर | ३४,९०० |
उस्मानाबाद | ६,००० |
औरंगाबाद | १२,५०० |
कुलाबा | — |
कोल्हापूर | ३२,४०० |
चांदा | — |
जळगाव | ६०० |
ठाणे | १०० |
धुळे | १,९०० |
नांदेड | ४,२०० |
नागपूर | १०० |
नाशिक | ८,१०० |
परभणी | २,४०० |
पुणे | १३,४०० |
बीड | २,६०० |
बुलढाणा | १,४०० |
बृहन्मुंबई | — |
भंडारा | २०० |
यवतमाळ | ४०० |
रत्नागिरी | २०० |
वर्धा | १०० |
सांगली | १३,६०० |
सातारा | ११,२०० |
सोलापूर | १०,५०० |
एकूण | १,५७,२०० |
उसाची लागवड आणि उसापासून गूण व साखर तयार करण्याची कला या दोन्ही गोष्टी भारतामधून चीन, अरेबिया वगैरे देशांत नेण्यात आल्प असाव्यात असे उपलब्ध पुराव्यवरून दिसून येते. सध्या जगात उसाची लागवड करमारे भारताशिवाय इतर प्रदेश म्हणजे चीन, चैवान (फोर्मोसा), जावा, फिलिपीन्स बेटे, हवाई बेटे, मेक्सिको, मध्य अमेरिका, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, चिली, पेरू, गियाना, ब्राझील, क्यूबा, जमेका, दक्षिण आफ्रिका, ईजिप्त मॉपिशस, क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया वगैरे होत.
वरील यादी वरून उसाची लागवड करणार्या भूटपट्ट्याची कल्पना येते. हे पीक जरी उष्ण किंवा उपोष्ण प्रदेशातील असले, तरी या पट्ट्याच्या पलीकडे ही त्याची लागवड केली जाते. पण या पट्ट्याबाहेरील प्रदेशातही लागवडीत बर्याच अडचणी येतात. आगाप पीक दहा महिन्यांत तयार होते तर मागास (उशीरा तयार होणार्या) पिकास १८ महिने लागतात. ही कालमर्यादाही स्थिर नसते. हवाई बेटांतील पिकाला १८, २० किंवा काही वेळा २४ महिनेही लागतात.
भारतात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व तमिळनाडू या राज्यांत उसाची लागवड विशेष होते (पहा : कोष्टक क्र. १). महाराष्ट्रातील अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, पुणे, सातारा व सोलापूर हे जिल्हे उसाच्या लागवडीच्या बाबतीत आघाडीवर आहेत (पहा : कोष्टक क्र. २).
हवामान : जास्त थंडी किंवा थंडीचा कडाका वगैरे आपत्ती न येता सुरुवातीचा कमीत कमी १० महिन्यांचा काळ वाढीसाठी सुरक्षित मिळावा असे हवामान उसासाठी योग्य ठरते. हे दीर्घ मुदतीचे, किमा, १० ते १२ महिने घेणारे पीक असल्याने आपल्या पाढीच्या विभिन्न अवस्थांमधून (उगवण, फुटवा, वाढ, फुलोरा व पक्वता) जाताना हवामानातील निपनिपाळ्या घटकांच्या (पाऊस, आर्द्रता, बाष्पीभवन, सुर्यप्रकाश, तापमान वगैरे) फेरफाराला तोंड द्यावे लागते, भरपूर प्रमाणात व लवकर उगवण होण्यासाठी वातावरणातील तापमान १०० से. पेक्षा कमी नसावे. फुटव्यांच्या अवस्थेमध्ये भरपूर सूर्यप्रकाश दीर्घकाळ असणे उपयुक्त असते. आर्द्रता मात्र कमी असावी लागते. ५० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता झाल्यास खोड किडीचा प्रादुर्भाव होतो. वाढीच्या अवस्थेत उसाला २५० ते ३५० से. च्यादरम्यान तापमान, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता व चांगला सूर्यप्रकाश उपयुक्त ठरतो. दुपारची आर्द्रता १५ टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. अशा वेळी कांड्या आखूड व लहान होतात व बाजूस फूट येते. काही वेळेस कांडी किडीचा प्रादुर्भाव होतो. फुलोऱ्याच्या अवस्थेत किमान तापमान जास्त असेल तर फुलोऱ्याची वाढ कमी होते. उसाचा तुरा बाहेर पडण्यासाठी उष्ण व दीर्घ रात्र अनुकूल असते याउलट थंड व लहान रात्र असल्यास फुलोरा दबतो. पक्वतेसाठी मात्र थंड हवा उत्तम ठरते. थंड, निरभ्र व कोरडे हवामान रसाटी प्रत सुधारण्यास उपयुक्त असते.
हवामानात वार्षिक पर्जन्यमान आणि पर्जन्य वर्षणाचा काळ यांचाही विचार केला पाहिजे. ६५ ते २५० सेंमी. वार्षिक पास पडणार्या प्रदेशात उसाची लागवड केली जाते. विशेष जास्त पावसाचा पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. जास्त पाऊस पडणाऱ्या प्रदेशात पिकातील पाणी काढण्याची व्यवस्था करावीच लागते. ६५ ते १०० सेंमी. पर्यंत वार्षिक पाऊस पडणाऱ्या व पाटाच्या पाण्याची सोय असलेल्या प्रदेशातील उसाचे उत्पन्न जास्त येते. हवामानाची अनुकूल परिस्थिती न मिळाल्यास उसाची शेती किफायतशीर होऊ शकत नाही. साहजिकच लागवडीखालील क्षेत्रवाढीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. याशिवाय आणखीही अशी काही कारणे आहेत की, ज्यांचा क्षेत्रवाढीवर अनुकूल वा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. उदा., उसाच्या पिकाला अनुकूल असे हवामान विशेषतः दक्षिण भारतात आहे. पण प्रत्यक्षात अनुकूल असे हवामान विशेषतः दक्षिण भारतात आहे. पण प्रत्यक्षात उसाचे क्षेत्र मात्र दक्षिण बारतापेक्षा उत्तर भारतात जास्त आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा वगैरे उत्तर भारतातील राज्यांत १९७०-७१ साली १८,७७,००० हेक्टर क्षेत्र होते तर आंध्र प्रदेश, तमिळनाडू वगैरे दक्षिण भारतातील राज्यांत ते ६,०६,००० हेक्टरच होते. हवामान तितकेसे अनुकूल नसतानाही उत्तर भारतात जास्त क्षेत्र असण्याचे कारण तेथे ऊस उत्पादनासाठी खर्च कमी येतो, कष्टही कमी पडतात. म्हणून प्रतिहेक्टर उत्पन्न कमी आले तरी खर्चही कमी असल्याने ऊसशेती किफायतशीर होते. दक्षिण भारतात उसाचे दर हेक्टरी उत्पन्न जास्त असते तसा खर्चही जास्त म्हणजे जवळजवळ दुप्पट असतो.
जमीन : विविध प्रकारच्या जमिनींत ऊस लावतात. वाळूमिश्रित गाळाच्या जमिनी योग्य समजल्या जातात. जमीन चांगल्या निचर्याची असली पाहिजे. भारी काळ्या जमिनी पिकाला होत नाही आणि उसाला पाणी जास्त द्यावे लागत असल्याने जमिनीतील क्षार पृष्ठभागावर येतात व अशा जमिनी खारवट बनून पिकासाठी निरुपयोगी होतात. पण अशा जमिनींत योग्य अंतरावर चर खणून पाणी निचरून शेताबाहेर काढून टाकण्याची व्यवस्था केल्यास जमीन न बिघडता पुष्कळ काळपर्यंत चंगले पीक देत राहते. अशी व्यव्था महाराष्ट्रातील असून अनेक वर्षे त्या जमीनींतून उसाची उत्तम पिके काढली जात आहेत. दगडगोटे व जाड वाळू असलेल्या जमिनी उसाला मानवत नाहीत अशा जमिनीत उसाची वाढ चांगली होत नाही आणि फूटही चांगली होत नाही. उसासाठी एक मीटर खोल आणि त्याखाली मुरमासारखा पाण्याचा चांगला निचरा होऊ देणार्या पदार्थाचा थर असलेली कसदार जमीन उत्तम समजतात.
मशागत : उसासाठी जमीन तयार करताना पहिल्याने ती भारी नांगराने दोनदा किंवा ट्रॅक्टराने एकदा, २५–३० सेंमी. खोल नांगरतात. जमीन उंच सखल असल्यास ती शक्य तितकी समपातळीत आणतात कारण या पिकाला वर्षभर पाणी द्यावयाचे असते व पामी फुकट जाऊन देण्याची खबरदारी द्यावयाची असते. नांगरटीमुळे जमिनीतील तण काढले जाऊन तासाच्या खोलीपर्यंतच्या जमिनीत हवा खेळती राहते, कीटकांची अंडी चिरडून उघडी पडून नाश पावतात आणि तासाच्या खोली इतकी जमीन मोकळी भसभूशीत झाल्यामुळे तिच्यात लागण केलेल्या उसाच्या मुळ्यांना आपला प्रसार आणि वाढ जोमाने करता येते. नांगरलेली जमीन काही दिवस उन्हाने तापली म्हणजे मैंद किंवा लोड या देशी औतांनी किंवा नॉर्वेजिअन कुळव या लोखंडी औताने ढेकळे फोडून कुळवाने माती बारीक आणि भुसभूशीत करतात. नंतर ती सपात करून १ ते १·२५ मी. अंतरावर सरीच्या नांगराने सऱ्या पाडतात. जमिनीच्या उताराप्रमाणे योग्य अंतरावर आडवे बांध घालतात आणि पाण्याचे पाट काढतात. अधिक उताराच्या जमिनीत समोच्च रेषेप्रमाणे (सारख्याच उंचीवरील बिंदू जोडणाऱ्या रेषेप्रमाणे) सऱ्या व पाट पाडणे श्रेयस्कर असते. लागणीपूर्वी सऱ्यांची डागडुजी करतात.
लागण : महाराष्ट्रात लागणीचे तीन हंगाम असतात : (१) सुरू लागण : पौष ते फाल्गुन (जानेवारी ते मार्च), (२) पर्व हंगामी लागण : आश्विन ते मार्गशीर्ष (ऑक्टोबर ते नोव्हेंबर) व (३) आडसाली लागण : ज्येष्ठ ते आषाढ (जुलै ते ऑगस्ट). तसे पाहिले तर कडक उन्हाळ्याचे व कडक थंडीचे दिवस सोडून इतर दिवसांत उसाची लागण करता येते. निश्चित केलेल्या हंगामात जितक्या लवकर लागण करावी त्याप्रमाणे उत्पन्न अधिक येते. स्थानिक परिस्थिती, हवामान, जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धा या सर्वांचा विचार करून लागणीचा हंगामा ठरवितात.
बेणे : तीन डोळे असलेल्या उसाच्या कांड्यांना (तुकड्यांना) बेणे म्हणतात. बेणे म्हणतात. बेण्याकरिता उसाची कांडी तयार करण्यासाठी ८-९ महिने वाढीचा अपक्व ऊस पसंत करतात. या पिकातील ज्यांच्यावरील डोळे वाळून गेलेले नसतील असे निरोगी ऊस निवडून घेतात. गाभ्यात रंगलेले अगर इतर रोग-किडींनी पछाडलेले रोगट ऊस बेण्यासाठी घेत नाहीत. निवडून घेतलेल्या उसावरील पाचट डोळ्यांना धक्का न लावता हळुवारपणे हाताने सोलून काढतात. नंतर त्यांचे धारदार कोयत्याने प्रत्येकी तीन तीन डोळे रहातील इतक्या लांबीचे तुकडे करतात. काही ठिकाणी बेण्यासाठी चांगले ऊस मिळावे म्हणून चांगल्या जमिनीवर विशेष मेहनत व मशागत करून व भरपूर खतपाणी घालून स्तंत्रपणे ऊसबेण्याचा मळा लावतात आणि त्यातील बेणे घेतात. असा बेणेमळा तयार करण्यासाठी उष्ण-जल-प्रक्रिया केलेल्या कांड्या बेणे म्हणून वापरतात. ही प्रक्रिया करण्यासाठी कांड्या ५०० से. तपमानाच्या पाण्यात दोन तास बुडवून ठेवतात.
बेणे-कांडी लागणीपूर्वी पाण्यात विरघळणाऱ्या पारायुक्त कवकनाशकाच्या विद्रावात बुडवून काढून लावणे चांगले, या कांड्यांवरील डोळे जून व कठीण झालेले आढळल्यास २०० लिटर पाण्यात अर्धा किग्रॅ. विरविलेल्या चुन्याच्या विद्रावात ती २४ तासांपर्यंत बुडवून नंतर लावतात. पिठ्या कीटकांचा उपद्रव टाळण्यासाठी बेणे माशांचे तेल व रोझीन यांच्यापासून तयार केलेल्या साबणाच्या एक टक्का विद्रावात बुडवून नंतर लावतात. दर हेक्टरला २५,००० ते ३०,००० बेणे लागते.
बेण्याची लागण दोन पद्धतींनी करतात-एक ओली व दुसरी कोरडी. हलक्या व मध्यम जमिनीत ओली आणि भारी तसेच चोपण जमिनीत कोरडी पद्धत वापरणे श्रेयस्कर असते. ओल्या पद्धतीत सर्यांमधून पाणी सोडून त्या गरगरीत भिजवतात. नंतर बेणे-कांडी डोळे दोन्ही बाजूंना राहतील अशा रीतीने जमिनीत ५ ते ७ सेंमी. इतकेच गाडली जाईल अशा बेताने पायाने दाबतात. कोरड्या पद्धतीत सरीतील माती उकरून तेथे बेणे लावतात, त्यावर हाताचे माती दाबतात व नंतर हळुवारपणे सरीत पाणी सोडतात.
खत : ऊस हे दीर्घ मुदतीचे व बाराही महिने ओलिताखाली असलेले पीक असल्याने जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी योग्य प्रमाणात भरखते देणे आवश्यक असते. उसाच्या मुळ्या व इतर अवयशेषांमुळे हेक्टरी १०–१५ टन सेंद्रिय पदार्थ जमिनीत रहातात, तरी सुद्धा शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी ५० गाड्या घालणे फायद्याचे ठरते. यांपैकी अर्धा भाग दुसऱ्या नांगरटीच्या आधी शेतात पसरून नांगरटीने जमिनीत मिसळून टाकतात. उरलेला अर्धा सरीमधून लागणीच्या वेळी देतात. उसाच्या पाचटापासून कंपोस्ट खत बनविता येते. हिरवळीचे खत करूनही सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरवले जातात. पाणबोदाड किंवा क्षारयुक्त जमिनीत तागाऐवजी धैंचाचे पीक घेतात. ही पिके फुलोऱ्यावर आल्याबरोबर नांगराने जमिनीत गाडतात [→ खते].
एक टन ऊस पिकविण्यासाठी साधारणपणे दीड ते दोन किग्रॅ. नायट्रोजन, अर्धा ते पाऊण किग्रॅ. फॉस्फोरिक अम्ल व तीन चे चार किग्रॅ. पोटॅश आवश्यक असते. यासाठी योग्य वेळी व योग्य प्रमाणात वरखते वापरतात. भारतातील जमिनीमध्ये नायट्रोजन अगदी कमी असतो. फॉस्फरसही बऱ्याच जमिनींतून कमी आढळतो परंतु पोटॅशाचे प्रमाण मात्र भरपूर असते. या घटकांची जमिनीतील उपलब्धता विचारात घेऊन वरखतांच्या मात्रा निश्चित केल्या गेल्या आहेत. फॉस्फेटामुळे उसाची उगवण चांगली होते, फुटवा चांगला येतो, मुळांची वाढ चांगली होते आणि ऊस लवकर पक्व होतो. पोटॅशामुळे रोग व कीड यांचा प्रतिकार करण्याची उसाची शक्ती वाढते व रसातील साखरेचे प्रमाण वाढण्यास मदत होते. नायट्रोजनामुळे पिकाची वाढ जोमदार होते व उसाचे वजन वाढते. विभिन्न प्रकारच्या उसाच्या पिकांना दिल्या जाणाऱ्या वरखताच्या हेक्टरी मात्रा कोष्टक क्र. ३ मध्ये दिल्या आहेत.
पूर्वी नायट्रोजन काही प्रमाणात पेंडीच्या रूपात देत असत, परंतु आता संशोधनावरून असे सिद्ध झाले आहे की, पेंड न वापरता सर्व नायट्रोजन रासायनिक खतांच्या कोणत्याही रूपाने दिला तरी उसाच्या उत्पादनावर अनिष्ट परिमाण होत नाही, पण खताच्या खर्चात मात्र पुष्कळ बचत होते.
पाणी : लागणीच्या वेळी उसाला पहिले पाणी देतात. दुसरे पाणी ४ दिवसांनी देतात. त्यानंतर दर १०–१५ दिवसांनी पाणी देतात. हलक्या जमिनीस ८-१० दिवसांनी पाणी द्यावे लागते. पिकाच्या गरचेपेक्षा जास्त पाणी दिल्यास पाण्याचा अपव्यय तर हातोच शिवाय जमीन बिघडून निकामी होण्याची शक्यता असते. लागणीनंतर पहिले सु. तीन महिने पिकाला पाणी कमी लागते. पिकाच्या वाढीबरोबर पाण्याची गरजही वाढते व ऊस पक्व होऊ लागला म्हणजे पाणी कमी लागते. म्हणून आरंभी व पक्वतेच्या वेळी पाण्याचे प्रमाण कमी करतात व दोन पाळ्यांमधील अंतर वाढवतात. पिकाला पाणी देतावा ते सावकाश जमिनीत जिरेल अशा रीतीने दिले पाहिजे. पाणी देताना नागमोडी सऱ्या, सरळ सऱ्या, समोच्च रेषेतील सऱ्या किंवा फवारा पद्धतीने देतात. एका वर्षात उसाला साधारणपणे ३७–३९ पाण्याच्या पाळ्या देतात. पावसाचे उपयुक्त पाणी धरून उसाला वर्षाला सु. ५९५–७२० हेक्टर-सेंमी. (९५–११५ एकर-इंच) पाणी पुरेसे होते.
आंतर मशागत : लागणीपासून ६-८ आठवड्यांत बेणे उगवून येते. तण मात्र त्याच्या आधीच उगवते. म्हणून ऊस लागणीनंतर ४-५ दिवसांनी दर हेक्टरला सु. १·७५ किग्रॅ. ‘२-४ डी’ या तणनाशकाचे १,१००–१,२०० लिटर पाण्यात मिश्रण करून फवारतात. यामुळे सु. ७० टक्के तणांचा बंदोबस्त होतो. पण या तणनाशकाचा प्रभाव साधारणपणे एक एक महिनाभरच टिकत असल्याने वरीलप्रमाणेच दुसरी फवारणी सु. २५ दिवसांनंतर पुन्हा करावी लागते. याप्रमाणे दोनदा फवारणी केल्यास ९o–९५ टक्के तण मरून जाते. हल्ली आणखी प्रभावी तणनाशकांचा शोध लागला असून त्यांपैकी डाययुरॉन, ॲट्रॅझीन, सिमॅझीन, मिथॉक्सि-मिथिल ॲसिटानिलाइड इ. उसाच्या उगवणीपूर्वी हेक्टरी २-५ किग्रॅ. १,१५० लिटर पाण्यात मिसळून फवारल्यास फवारा उसाच्या उगवणीनंतर फवारावयाच्या तणनाशकांमध्ये डायक्वॉट, पॅराक्वॉट, मोनोसोडियम-मिथेन-आर्सेनेट वगैरे तणनाशकांचा समावेश होतो पण मातीशी संपर्क आल्यानंतर त्यांचा प्रभाव रहात नाही. अशा प्रकारे रासायनिक तणनाशके फवारणे शक्य नसल्यास खुरपून तण काढून टाकतात. लागणीनंतर अडीच महिन्यांनी दातेरी कोळप्याने तगरणी करतात. नंतर आणखी एक ते दीड महिन्याने दुसरी तगरणी करतात. तगरणीचा पिकाच्या वाढीलर चांगला परिणाम होतो.
पीक ५-५।। महिन्यांचे झाल्यावर उसाची २-3 पेरी दिसू लागतात. त्यावेळी बांधणी करतात. हे बांधणी किंवा खांदणीचे काम मजुरांकडून कुदळीने करवून घेतात किंवा सरीच्या नांगराने करतात. सरीचा नांगर वापरून केलेली बांधणी कमी खर्चात व अधिक चांगली हाते.
कोष्टक क्र. ३. उसाला वरखत देण्याच्या वेळा व प्रमाण
वरखताचे प्रमाण (हेक्टरी किलोग्रॅममध्ये) | |||||
वरखत घालण्याची वेळ | वरखताचा प्रकार | आडसाली | पूर्वहंगामी | सुरू | खोडवा |
१. लागणीच्या वेळी | नायट्रोजन फॉस्फोरिक अम्ल
पोटॅश |
४०
११० १७० |
३५
११० १७० |
२५
११५ ११५ |
७५*
११५* ११५* |
२. ६–८ आठवड्यांनंतर | नायट्रोजन | १६० | १३५ | १०० | ७५ |
३. लागणीनंतर १२–१६ आठवड्यांनी | नायट्रोजन | ४० | ३५ | २५ | — |
४. बांधणीच्या वेळी | नायट्रोजन
फॉस्फरिक अम्ल |
१६०
६० |
१३५
६० |
१००
— |
१००
— |
एकूण | नायट्रोजन
फॉस्फोरिक अम्ल पोटॅश |
४००
१७० १७० |
३४०
१७० १७० |
२५०
११५ ११५ |
२५०
११५ ११५ |
*खोडवा राखल्यानंतर दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या पहिल्या पाळीबरोबर. |
तोडणी : बांधणी झाल्यानंतर उसाला पाणी देण्याशिवाय दुसरे काही मशागतीचे काम तोडणीपर्यंत नसते. ऊस लागणीपासून सुरू पीक १२ महिन्यांत, पूर्व हंगामी पीक १४-१६ महिन्यांत व आडसाली पीक १६–१८ महिन्यांत तयार होते. ऊस पक्व झाला म्हणजे त्याचा रंग पिवळसर होतो, वाढ खुंटते, काही जातींत फुलांचा तुरा निघतो, कांड्यांवरील डोळे फुगतात, कांड्यांचा धातूसारखा खणखणीत आवाज येतो, ऊस वाकविल्यास कांड्यांवर मोडतो, मोडलेल्या भागावर सूर्यप्रकाशात साखरेचे कण चमकताना दिसतात. आधुनिक शास्त्रीय पद्धतीनेही उसाची पक्वता तपासतात. त्यासाठी ‘ब्रिक्स शर्करामापक’ अगर ‘प्रणमनांकमापकाच्या’ [→ प्रणमनांकमापन] साहाय्याने रसाची परीक्षा करतात. तेव्हा रसामधील विरघळणार्या घन द्रव्याचे प्रमाण २० अंशांच्यावर आढळल्यास उस तोडणीस योग्य झाला असे समजतात व तोडणी सुरू करतात. पक्व झाल्यानंतर जर ऊस अधिक काळ शेतात उभा राहिला तर त्याच्या गुळाची किंवा साखरेची प्रत बिघडण्याची शक्यता वाढते तसेच उत्पन्नसुद्धा कमी येते. तोडणीपूर्वी १०–१५ दिवस पिकाला पाणी देत नाहीत. ऊस तीक्ष्ण धारेच्या पातळ पात्याच्या कोयत्याने जमिनीसपाट तोडतात. नंतर पाचट काढून व शेंडा (वाढे) कापून मोळ्या बांधतात व त्या गुर्हाळात अगर साखर कारखान्यात नेतात. तेथे यंत्राने उसाचा रस काढून त्यावर प्रक्रिया करून त्यापासून गूळ किंवा साखर बनवितात [→ गूळ; साखर].
जगातील बराचसा ऊस हातानेच तोडतात परंतु जेथे मजूर उपलब्ध नाहीत (उदा., हवाई बेटे) तेथे शेतात ऊस उभा असतानाच त्याची पाने जाळून टाकतात व यंत्राने तोडणी करतात. हवाई बेटे, अमेरिकेल्या संयुक्त संस्थानांतील लुइझियाना व फ्लॉरिडा हीराज्ये व ऑस्ट्रेलियातील काहीभाग येथे मोठ्या प्रमाणात यांत्रिक तोडणी करतात. यांत्रिक तोडणीत उसाबरोबर बराचसा कचरा व धूळ मिसळली जाते व त्यामुळे त्यावर पुढिल प्रक्रिया करण्यास अडचणी येतात.
शेतापासून कारखान्यापर्यंत ऊस नेण्याच्या पद्धती बहुतेक स्थानिक परिस्थितीनुसार वापरतात. बर्याचशा कारखान्यांच्याछोट्या रूळमार्गी गाड्या आहेत. तथापि मोटारीने ऊस वाहून नेण्याची पद्धती अधिकाधिक वापरात येत आहे. काही ठिकाणी शेतात तात्पुरते रूळमार्ग टाकतात तर काही ठिकाणी बैलगाड्यांतून किंवा जलवाहतुकीद्वारेही उसाची वाहतूक करतात.
खोडवा : एकदा लावलेल्या पिकापासून दोन-तीन पिके एकापुढे एक घेतात. बेणे लावून वाढविलेले पहिले पीक तयार झाल्यावर कापून घेतात. नंतर त्याचे बुडखे नांगरून न काढता तसेच राहू देतात. त्यांना वेळेवर खतपाणी घालून व आवश्यक ती मशागत करून त्यांचा फुटवा वाढवून पीक घेतात. अशा पिकाला खोडवा म्हणतात. या खोडव्याच्या तोडणीनंतर पुन्हा त्यापासून पीक घेतल्यास त्याला निडवा म्हणतात. कोल्हापूर भागात याप्रमाणे ३-४ पिके घेतात. इतरत्र सर्वसाधारणपणे फक्त खोडव्याचे एकच पीक घेतले जाते. चांगली मशागत केल्यास खोडव्याचे उत्पन्न सुरू लावगडीच्या उत्पन्नाइतके येते.
उत्पन्न : उसाचे हेक्टरी सरासरी उत्पन्न १०० ते १५० मे. टन इतके येते.
उसाच्या साखरेचे एकूण जागतिक उत्पादन १९७०-७१ साली सु. ४१० लक्ष टन होते. त्यात भारतातील उत्पादन ३७·४ लक्ष टन होते तर महाराष्ट्रात १o.५५ लक्ष टन साखर उत्पादन झाले. भारतात त्या वर्षी उसाखाली एकूण क्षेत्र २६·५८ लक्ष हेक्टर व उसाचे उत्पन्न १,२८७·६९ लक्ष टन होते, तर महाराष्ट्रात २·०५ लक्ष हेक्टर जमीन उसाखाली होती व उसाचे उत्पन्न १३९·३७ लक्ष टन झाले. भारतातून त्या साली ३·९५ लक्ष टन साखंरेची निर्यात करण्यात आली व त्यापासून ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे परकी चलन मिळाले.
दक्षिणदास, दि. ग.
उसाच्या जाती : दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्यात कोइमतूर येतील ऊस पैदास व संशोधन केंदाबर भारतातील निरनिराळ्या प्रदेशांतील जमीन व हवामानाला योग्य असे नवे-नवे उसाचे प्रकार, जाती किंवा वाण निर्माण करण्याचे कार्य बर्याच वर्षांपूर्वीपासून केले जात आहे. व्यंकटरमण यांनी गोड ऊस आणि कासे गवतासारखे जंगली ऊस यांच्यात संकर घडवून आणून निरनिराळ्या जास्त उत्पन्न देणाच्या जाती निर्माण केल्या. त्यांच्यामुळे देशातील ऊस-शेती तसेच गूळ व साखर धंद्यात क्रांती घडून आली. कोइमतूर येथे निर्माण करण्यात आलेल्या जातींना ‘को’ या आद्याक्षराने व संबंधित क्रमांकाने ओळखले जाते (उदा., को ७४०, को ४१९ वगैरे). कोइमतूर येथे निर्माण झालेल्या जातीच आतापर्यंत भारतातील सर्व राज्यांत ऊस-शेतीसाठी वापरल्या जात आहेत. बिहार, पंजाब, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांत व महाराष्ट्रातील पाडेगाव येथेही ऊस-जाती निर्मितीचे कार्य सुरू झाले आहे.
महाराष्ट्रात सध्या लागवडीसाठी पुरस्कारित अशा सहा जाती असून वाखाणण्याजोगी व आशादायक अशी आणखी एक जात आहे. या जातींची संक्षिप्त माहिती आहे :
(१) को ४१९ : १९३६ साली या जातीचा पुरस्कार करण्यात आला. थोड्याच कालावधीत तिने पुंड्या व पूर्वीच्या इतर जातींची जागा घेतली व त्या जाती जवळजवळ नामशेष झाल्या. पी. ओ. जे. २८७८ व को २९o या दोन जातींचा संकर करून ही जात कोइमतूर येथे निर्माण करण्यात आली. ही इतरांच्या मानाचे लवकर पक्व होते. या जातीची पाने रुंदीला मध्यम व देठावर कूस असलेली असून ऊस जाड व रंगाने हिरवा असतो. पाचट काढल्यास उसाचा रंग अंजिरी होतो. कांड्या एकमेकींशी किंचित कोन करतात. या जातीच्या खोडव्याचे उत्पन्नही बरे येते. निरनिराळ्या जमिनी व विभिन्न हवामानांत ही जात चांगली वाढते, प्रसंगी पाण्याचा थोडाफार ताणही सहन करू शकते. महाराष्ट्राच्या विदर्भ व मराठवाडा विभागांत अजूनही हीच मुख्य जात आहे. या जातीच्या गुळाची प्रतही चांगली असते.
(२) को ६७८ : १९५४ साली महाराष्ट्रात प्रसारासाठी पुरस्कृत करण्यात आलेली ही जात को ६०३ व को ३०१ यांचा संकर करून निर्माण करण्यात आली. या जातीची पाने हिरवी, रुंदीला मध्यम व देठावर किंचित कूस असते. कांड्या लांब तळाच्या २-३ कांड्यांवर भेगा असतात.डोळे इतर जातीच्या मानाचे भरदार व टपोरे असतात. उसाची जाडी मध्यम, लोळण्याची प्रवृत्ती, पक्वता फार काळ टिकून रहात नाही. खोडव्याचे उत्पन्न बरे, गूळ साधारण प्रतीचा असतो. हलक्या व खारवट जमिनीसाठी चांगली असते.
(३) को ७४० : १९५६ साली पुरस्कारित केलेल्या या जातीचा प्रसार महाराष्ट्रात विशेषतः दख्खन कालवा विभागात फारझपाट्याने झाला. को ४२१ व को ४४० आणि को ४६४ व को ४४० या दोन संकरित जातींचा पुन्हा संकर करून द्विसंकर पद्धतीने हीजात निर्माण करण्यात आली. या जातीची पाने उभट, मध्यम रुंदीची असतात. पोंगाच्या देठावर थोडीशी कूस असते. पान व देठ यांच्या सांध्यावर एका बाजूला मोठी कर्णिका (कानाच्या पाळीच्या आकाराचा भाग) असते. कांडी जाडीला व लांबीला मध्यम, एकमेकांस तिरकस जोडलेली असतात. इतर जातींच्या मानाने या जातीचे वाढे चांगले जुळून येते. ऊस लोळला तरी मोडत नाही, भेगाही पडत नाहीत. फुटवा जास्त व दीर्घ काळ येत राहतो. पक्वता उशिरा येते पण अधिक काळ टिकून राहते, म्हणून आडसाली लागणीसाठी उत्तम असते. डिसेंबरच्या मध्यावर या जातीतील साखरेचे प्रमाण कमाल पातळीवर असते व ते मार्चच्या मध्यापर्यंत टिकून राहते. इतर जातींच्या मानाने लागण उसाचे व खोडव्याचेही उत्पन्न जास्त येते.
(४) को ७९८ : प्रसारासाठी ही जातसुद्धा १९५६ मध्ये पुरस्कृत करण्यात आली. की ६o३ व को ४४९ यांचा संकर करून ही जात निर्माण करण्यात आली. या जातीची पाने रुंद व गडद हिरव्या रंगाची असून देठांवर कूस नसते. कांड्यांच्या सांध्यावर मेणाचा थर असतो. कांडी लांबट व फुगीर असते, तीवर भेगा पडत नाहीत. उसाचा रंग हिरवट पिवळा असतो. गूळ केल्यास चांगला असतो. पक्वतेनंतर तोडणी लांबल्यास उसाला दशी पडते. चोपण जमिनींसाठी व सुरू लागवडीसाठी पुरस्कृत. खोडव्यासाठी अयोग्य कारण खोडव्याचे उत्पन्न बरेच कमी येते. ही जात काणी व वेणी रोग प्रनिबंधक आहे.
(५) को ७७५ : १९५६ मध्ये पुरस्कृत केलेल्या ह्या जातीची निर्मिती पी. ओ. जे. २८७८ व को ३७१ या जातींचा संकर करून तयार करण्यात आली. उत्कृष्ट दर्जाचा गूळ देणारी ही जात आहे. या जातीची पाने खूप रुंद, जाड, गडद हिरव्या रंगाची व देठावर भरपूर कूस असलेली अशी असतात. पाचट कांड्यांना चिकटून राहते, त्यामुळे सहज काढता येत नाही. ऊस जाड व रंगाने पिवळसर हिरवा असतो. त्यावर भेगा नसतात. डोळे आकाराने मध्यम असतात. आडसाली पीक घेतल्यास ही जात अतिशय लोळते व मोडते. सुरू व पूर्वहंगामी लागणीस योग्यमध्यम निचर्याच्या जमिनीतही चांगली वाढते. को ७४० पेक्षा लवकर तयार होते साखरेचे प्रमाणही को ७४o पेक्षा जास्त असते. पक्वता आल्यावर तीन आठवडे साखरेचे प्रमाण टिकून राहते. त्यानंतर ऊस शेतात उभा राहिला तर साखरेचे प्रमाण लागते. गुळाची प्रत उत्कृष्ट, खोडव्याचे उत्पन्न बरे येते. ही जात काणी व वेणी रोग प्रनिबंधक पण गवती रोगास बळी पडणारी आहे.
(६) को ८५३ : १९६३ साली पुरस्कारित झालेली ही जात को ५o८ व को ६१७ यांच्या संकराने निर्माण केली गेली. पाने मध्यम रुंद, वरची काही पाने मध्ये रेषे जवळ दुमडलेली, देठ हिरव्या, कूस मुळीच नसलेला देठ आणि पोंगाच्या सांध्यावर एकाबाजूस टोकदार कर्णिका व दुसर्या बाजूस तंतुमय भाग. ऊस जाडीला मध्यम व पिवळसर हिरव्या रंगाचा असतो. पक्व उसात मध्यभागी पोकळी आढळते. खोडव्याचे उत्पन्न बरे येते.
(७) को ११६३ : ही आशादायक जात असून १९६८ साली प्रात्यक्षिकांसाठी हिची शिफारस करण्यात आलेली आहे. ही जात को ६o३ व को ४४९ यांच्या संकरापासून निर्माण झाली. या जातीत पाने वाकलेली, ऊस जाड व पांढरट, कांड्यावर भेगा, को ७७५ सारखाच उत्कृष्ट व अधिक टिकाऊ गूळ होतो. को ७७५ मधील काही दोष या जातीत नाहीत म्हणून को ७७५ ऐवजी या जातीचा पुरस्कार करण्यात येत आहे.
गोगटे, वा. चिं.
रोग : भारतात उसावर पडणाऱ्या रोगांत काणी, ऊस रंगणे, तांबेरा, पाइन ॲपल इ. कवकांमुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींमुळे), गवताळ वाढ व मोझाइक हे व्हायरसांमुळे व पानांवरील लाल रेषांचा रोग सूक्ष्म जंतूंमुळे होतात.
(१) काणी : हा रोग युस्टीलागो सिटॅमिनी कवकीमुळे हातो व तो मॉरिशस, मॅलॅगॅसी (मादागास्कर), केन्या, इंडोनेशिया, जावा, ब्राझील इ. प्रदेशांत आढळतो. महाराष्ट्रात आणि भारतात इतरत्र काणीचा प्रादुर्भाव आढळतो. उसाच्या शेंड्यामधून चाबकासारखा काळ्या रंगाचा पट्टा बाहेर पडतो, त्याच्याभोवती एक पातळ आवरण असते. त्याखाली काळ्या रंगाची भुकटी आढळते. ती म्हणजेच रोगाचे असंख्य बीजाणू (लाक्षणिक प्रजोत्पादक भाग) होत. लहानपणी पिकावर रोग पडल्यास त्याची उंची वाढत नाही. रोग-बीजाणू वाऱ्याने दुसऱ्या उसाच्या डोळ्यावर पडून आत शिरतात व त्याला रोग होतो. खोडव्यामध्ये त्याचे नुकसान होते. को ७७५ सारख्या रोगप्रतिकारक जाती लावतात. उपाय म्हणून काणीचा पट्टा कापडी पिशवीत कापून घेऊन नंतर जाळतात. रोग तीव्र असल्यास रोगट बेटच काढून टाकतात. रोगट पिकाचा खोडवा घेत नाहीत [→ काणी].
(२) ऊस रंगणे: हा रोग कोलेटॉट्रिकम फाल्केटम कवकामुळे होतो. तो हवाई बेटे, अमेरिका व तैवान या प्रदेशांत आढळतो. भारतातील उत्तरेकडील राज्यांत हारोग गंभीर समजला जातो. त्यामुळे उसाच्या पुष्कळ चांगल्या जाती नाभशेष झाल्या आहेत. महाराष्ट्रात या रोगाचे प्रमाण कमी आहे. रोगट उसाची पाने पिवळी पडतात. पीक निस्तेज होऊन वाळते. रोगट ऊस उभा चिरला तर त्याचा गाभा लाल दिसतो. त्यात विशिष्टप्रकारचे पांढरे चट्टी आढळतात. रोगट उसांना मद्यासारखा तीव्र नास येतो. रोगाचा प्रसार रोगट बेणे, रोग-बीजाणू, दवबिंदू, पाऊस व वारा यांद्वारा होतो. रोगामुळे साखरेचे प्रमाण घटते व उत्पन्न कमी येते, गुळाची प्रतही बिघडते. रोगट पिकांचे निर्मूलन करतात व रोगप्रतिकारक जातींचा वापर करतात आणि बेणे पारायुक्त कवकनाशकाच्या एक टक्काविद्रावात बुडवून लावतात.
(३) मर : हा रोग सिफॅलोस्पोरियम सॅकॅराय कवकामुळे हातो. तो अर्जेंटिना, कोलंबिया, मेक्सिको, त्रिनिदाद इ. भागांत आढळतो. भारतात तो प्रामुख्याने उत्तरेकडील राज्यांत आढळतो. महाराष्ट्रात अगदी तुरळक प्रमाणात आढळतो. रोगामुळे पाने पिवळी पडतात व ऊस वाळून पोकळ होतो. रोगट ऊस उभा चिरला तर त्याचा गाभा मळकट तांबड्या रंगाचा दिसतो, त्यात पांढरे चट्टेमात्र दिसत नाहीत. रोगट बेण्यामुळे रोगप्रसार होतो. रोगकारक कवक जमिनीत दीर्घ काळ जिवंत राहते. म्हणून संक्रामित जमिनीत लगेच उसाचे पीक घेत नाहीत. रोगामुळे उगवण कमी हाेते, उत्पन्न घटते. बेणे पारायुक्त कवकनाशकाच्या एक टक्का विद्रावात बुडवून लावतात, तसेच रोगप्रतिकारक जातींची लागवड करतात.
(४) तपकिरी ठिपका : हा रोग सर्कोस्पोरा लाँजिपस कवकामुळे होतो. तो ऑस्ट्रेलियाखेरीज इतर देशांत आढळतो. भारतातील बर्याच राज्यांत तो आढळतो. महाराष्ट्रात मात्र हा रोग सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यांत जुलै ते डिसेंबर महिन्यांत आढळतो. रोगामुळे प्रथम पोंगाच्या दोन्ही बाजूंवर लहान तांबूस ठिपके दिसतात. नंतर ते एकमेकांत मिसळून तपकिरी होतात. रोगाची तीव्रता वाढल्यास पाने गळून पडतात. महाराष्ट्रातील उसाच्या सर्व प्रचलित जातींवर हा रोग पडतो, पण त्यापासून फारसे नुकसान होत नाही.
(५) पिवळा ठिपका : हा रोग सर्कोस्पोरा कोपॅकी या कवकामुळे होतो. तो ऑस्ट्रेलिया, ब्राझील, क्यूबा, इंडोचायना व जावा या भागांत आढळतो. रोगात प्रथम पानांवर पिवळसर ठिपके दिसतात व पोषक हवामानात पानभर पसरतात. या रोगामुळे फारसे नुकसान होत नाही.
(६) देठ रंगणे: हा रोग स्क्लेरोशियम रोल्फसाय कवकामुळे होतो. हा महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो. पानांच्या देठावर लाल चट्टे पडतात व नंतर पान पिवळे पडून सुकते. रोगट देठांच्या आतील बाजूवर कवकाचे लहान वाटोळे आणि तांबूस रंगाचे जालकाश्म आढळतात. उपाय म्हणून रोगट देठाची पाने जाळतात. पारायुक्त कवकनाशकाच्या एक टक्का विद्रावात बेणे बुडवून लावतात. या रोगामुळे फारसे नुकसान होत नाही.
(७) तांबेरा: हा रोग पक्सिनिया कुहनाय व पक्सिनिया एरिआंथाय या दोन कवकांमुळे होतो. तो ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, चीन, जपान, जावा इ. प्रदेशांत आढळतो. भारतात व चीनमध्ये तो पक्सिनिया एरिआंथाय कवकामुळे होतो. भारतात तो सर्वत्र आढळतो या रोगात पानाच्या खालच्या बाजूवर लहान पिवळे ठिपके पडतात, ते नंतर तपकिरी होतात. त्यांत तपकिरी रंगाची भुकटी असते, तीच या रोगाचे बीजाणू होत. हे बीजाणू वार्याने निरोगी पानावर पडून रोग पसरतो. महाराष्ट्रात तांबेरा जुलै ते जानेवारी महिन्यांत आढळतो. को ४१९ व को ७४० या जाती तांबेरा-प्रतिकारक आहेत.
(८) पाइन ॲपल रोग: बेण्याच्या कांड्यांचा हा रोग सिराटोस्टोमेला पॅराडॉक्सा या कवकामुळे होतो. तो ऑस्ट्रेलिया, ब्राझील, पेरू, अमेरिका, जावा इ. प्रदेशांत आढळतो. भारतात तो फारसा आढळून येत नाही. रोग कांड्यांच्या कापलेल्या भागातून कांड्यांत प्रवेश करून तेथेच वाढतो. त्यामुळे कांड्यांचा आतला भाग प्रथम जांभळा होऊन नंतर काळा पडतो. रोगट भाग बिलबिलीत होऊन त्याला फसफसलेल्या अननसासारखा वास येतो, म्हणून या रोगाला ‘पाइन ॲपल (अननस) रोग’ म्हणतात. रोगाचे बाह्य लक्षण म्हणजे कांड्याच्या कापलेल्या भागावर रोगकारक कवकांची तंतुमय काळी वाढ दिसून येते. रोगामुळे उगवण कमी होते व उत्पन्न घटते. बेणे पारायुक्त कवकनाशकाच्या एक टक्का विद्रावात बुडवून लावतात.
(९) लाल रेषेचा रोग : हा रोग झँथोमोनस रूब्रीलिनिआन्स या सूक्ष्मजंतूमुळे होतो. ब्राझील, क्यूबा व अमेरिकेतील लुइझिॲना राज्यात आढळतो. भारतात काही राज्यांत तुरळक प्रमाणात आढळतो. रोगट पानांवर गर्द लाल रेषा दिसतात. या रेषांच्या बाजूंना सूक्ष्मजंतूंच्या स्रावाचे गोलाकार पांढुरके बिंदू दिसतात. पाणी किंवा वारा यांच्याद्वारे सूक्ष्मजंतू इतर पानांवर पडून रोगाचा प्रसार होतो. उपाय म्हणून रोगट पाने व शेंडे नष्ट करतात.
(१०) गवताळ वाढ : हा रोग व्हावरसामुळे होतो. महाराष्ट्रात तो प्रथम १९५५ साली दिसून आला. रोगट उसाचे बेट गवताच्या ठोंबासारखे दिसते. रोगट उसाच्या बुडख्यातून बरीच बारीक फूट निघते. पाने फिकट पिवळ्या रंगाची व रेषायुक्त दिसतात. वाढलेल्या उसावर रोग पडल्यास त्याची पाने पांढरी होतात व रोगट उसाच्या डोळ्यांतून अवेळी फूट निघते. खोडव्यात रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसतो. रोगामुळे उत्पन्नात पुष्कळ घट येते. रोगाचा प्रसार रोगट बेणे आणि मानाकिडीद्वारे व ऊस तोडण्याच्या कोयत्याद्वारे होतो. रोगट बेणे नष्ट करतात. निरोगी बेणे वापरतात. बेणे ५०० से. तपमानाच्या पाण्यात दोन तास बुडवून ठेवून लावतात.
(११) मोझाइक : हा रोग व्हावरसामुळे होतो. मॉरिशस व ब्रिटिश गिनी हे देश वगळून इतर सर्वत्र तो आढळतो. रोगट पानांवर पिवळसर ठिपके दिसतात. बेणे आणि माव्यामुळे रोगाचा प्रसार होतो. निरोगी बेणे वापरतात. तणांचा व माव्याचा नाश करतात.
(१२) शेंडा चुरगळणे : हा रोग महाराष्ट्रात को ४१९ व को ८५३ या जातींवर प्रामुख्याने आढळतो. रोगाचे कारण अद्याप अज्ञात आहे. रोगामुळे उसाच्या बेटात उसांची संख्या वाजवीपेक्षा जास्त आढळते. उसांच्या पेर्यांतून मुळ्या फुटतात, शेंड्याजवळची अरुंद पाने चुरगळलेली व एकमेकांत गुरफटलेली आढळतात. काही वेळा गुरफटलेल्या पानांची गाठ तयार होऊन उसाची वाढ खुंटते व उत्पन्न घटते.
(१३) केवडा रोग : हा त्रुटिजन्य रोग असून तो लोहाची उणीव असलेल्या जमिनीत आढळतो. या रोगात उसाची पाने पांढुरकी पडून त्याची वाढ खुंटते. उपाय म्हणून अर्धा ते एक टक्का हिराकसाचा (फेरस सल्फेटाचा) विद्राव पानांवर फवारतात.
(१४) सूत्रकृमी : या कृमींमुळे उसाच्या मुळ्यांवर गाठी येतात व नाढ खुंटते. उपाय म्हणून पिकाची फेरपालट करतात.
रूईकर, स. के.
कीड : उसाला किडींचा उपद्रव अगदी लागणीपासून तो तोडणीपर्यंत सर्व अवस्थांत होतो. सर्वसाधारणपणे पोखरणारी, कुरतडणारी व रस शोषून घेणारी अशा तीन प्रकारची कीड उसावर आढळते. पोखरणाऱ्या किडींत–खोड कीड, शेंडे कीड, कांडी कीड वगैरे कुरतडणार्या किडींत–मुळे कुरतडणारी कीड, वाळवी, हुमणी वगैरे आणि रस शोषणार्या किडींत तुडतुडे, मावा, पिठ्या किंवा चिकट्या, खवले कीड किंवा देवी कीड, पांढरी माशी वगैरेंचा समावेश होतो. उंदीर व कोल्हे उसाचे बरेच नुकसान करतात.
(१) खोड कीड : (कायलोट्रिआ इनफ्युस्काटेलस). पिकाच्या लहान अवस्थेत उसाची उगवण झाल्यापासूनच या किडीच्या उपसर्गाला प्रारंभ होतो. आडसाली उसात ऑगस्ट ते ऑक्टोबर व सुरू उसात मार्च ते मे या महिन्यांत या किडीचे प्रमाण जास्त दिसते. जास्त तपमान व कमी आर्द्रता या किडीला अनुकूल असते. ही कीड लहान उसाला जमिनीलगत भोक पाडून आत शिरते व आतला भाग खाते. त्यामुळे पोंगा अगर सुरळी वाळलेली दिसते. पोंगा ओढल्यास सहज उपसला जातो. अशा वाळलेल्या पोंग्यावरूनच या किडीचा उपद्रव चटकन ओळखता येतो. उपाय म्हणून उसाला लवकर तगरणी करतात. बाळ-बांधणीही करतात. पोंगा वाळलेले ऊस मुळालगत कापून टाकतात. नुसता पोंगा उपसून भागत नाही कारण पोंगा उपसला तरी अळी आत राहते. एंडिनाची फवारणी करतात.
(२) शेंडे कीड : (स्किर्पोफॅगा निवेला). उसाच्या कोणत्याही अवस्थेत या किडीचा उपद्रव होतो. किडीचे पतंग पांढर्या रंगाचे असतात. या किडीचा उपद्रव झालेल्या उसाच्या वरच्या पहिल्या व तिसर्या पानावर शिरेजवळ ओरखडा दिसतो. दुसर्या पानावर ओळीत लहान लहान छिद्रे दिसतात. उसाचा शेंडा मरतो. त्याची वाढ थांबते. त्यामुळे डोळ्यातून फूट निघते. वरच्या बाजूस अनेक फुटवे फुटल्यामुळे शेंड्याचा आकार पिसार्यासारखा दिसतो. उपाय म्हणून नियमितपणे किडीची अंडी नष्ट करतात. दूषित ऊस उपटून अळीसह नष्ट करतात.
(३) कांडी कीड : (प्रोकेरस इंडिकस). ह्या किडीचा उपद्रव आडसाली उसाला जानेवारीनंतर व सुरू उसाला मे महिन्यानंतर सुरू हाेतो. उसाच्या प्रथमावस्थेतील खोड कीडसुद्धा पुढे कांडी कीड म्हणून दिसते. कांडी किडीचा पतंग मध्यम आकाराचा असतो. अळी खोड किडीच्या अळीसारखीच असते. पण तिच्या अंगावर जांभळट पट्ट्यांऐवजी काळे ठिपके असतात. अंडी पानांच्या बेचक्यांत असतात. कोष उसातच होतो. अळी कांडीला भोक पाडून आत शिरते आणि गाभ्यावर आपली उपजीविका करते. तीन किंवा जास्त कांड्यांना कीड लागल्यास उसाचे उत्पन्न आणि प्रत दोन्हींवर विपरीत परिणाम होतो. कीड लागलेल्या उसाची मधली सुरळी वाळलेली दिसते. कांडीवर भोक पडलेले दिसते व त्या बाहेर किडीची विष्ठा जमा झालेली दिसते. कीड उसामध्ये असल्यामुळे कीटकनाशकांचा तितकासा उपयोग होत नाही. अंड्यांचे पुजंके व अळ्या गोळा करून नष्ट करतात. तण वगैरे काढून शेत स्वच्छ राखल्यास उयद्रव कमी होतो.
(४) मुळ्या कुरतडणारी अळी : (एम्मालोकेरा डेप्रेस्सेल्ला). ही कीड उसाच्या मुळ्यांमध्ये असते. पिंगट मातकट रंगाची मादी चपटी,खवलेयुक्त पांढरट अंडी पानांवर व खोडावर सुटी-सुटी घालते. त्यामुळे इतर किडींप्रमाणे अंड्यांचे पुजंके आढळत नाहीत. एक मादी ३५० पर्यंत अंडी घालते. पाच-सात दिवसात अंड्यातून अळी बाहेर पडते. ती पांढरट पिवळी असते. ती खोडावरून जमिनीकडे जाते आणि ४ ते ५ सेंमी. जमिनीखाली खोडात शिरून जमिनीतील उसाचा भाग व मुळ्या कुरतडते. ऊस वाळू लागतो. लहान उसात पोंगा वाळलेला दिसतो पण खोड-किडीच्या उसासारखा सहज उपसला जात नाही. ऊस उपटल्याशिवाय कीड दिसून येत नाही. उपाय म्हणून तोडणीच्या वेळी ऊस खोदून काढतात. तोडणीनंतर खोल नांगरट करून खोडक्या गोळा करून नष्ट करतात. रोगट पिकाचा खोडवा ठेवत नाहीत. पानांवर अंडी दिसू लागताच एंड्रिन फवारतात.
(५) हुमणी : (फायलोफॅगा रूगोसा). अंड्यांतून निघणार्या अळ्या उपद्रवकारक असतात. जून ते ऑक्टोबरपर्यंत या अळ्या ऊसपिकाचे नुकसान करतात. त्या उसाच्या मुळ्या कुरतडून खातात. नवीन लावलेले बेणे पोखरून त्यांतही कधीकधी राहतात. ऊस वाळू लागतो. या किडीचा उपद्रव शेतात सर्वत्र सारख्या प्रमाणात दिसत नाही. उपाय म्हणून खोल नांगरट करतात. लागणीपूर्वी १० टक्के बीएचसी, ५ टक्के क्लोरडेन किंवा आल्ड्रिन हेक्टरी ४० ते ५० किग्रॅ. प्रमाणे मातीत मिसळतात [→ हुमणी].
(६) वाळवी : वाळवीचे किडे पांढरे व नरम असतात. वाळवीमुळे नवीन लावलेल्या उसाच्या उगवणीवर परिणाम होतो तसेच मोठा ऊसही वाळवीमुळे वाळतो. लागण केलेले डोळे उगवत नाहीत तर मोठे ऊस वाळलेले दिसतात. उपाय म्हणून वाळवीच्या वारुळांचा नाश करतात. लागणीपूर्वी १० टक्के बीएचसी किंवा ५ टक्के क्लोरडेन, आल्ड्रिन किंवा हेप्टाक्लोर हेक्टरी ४० ते ५० किग्रॅ. प्रमाणे जमिनीत मिसळतात [→ वाळवी].
(७) उंदीर : (बँडीकोटा बेंगालेंसिस व नेसोकिआ इंडिका). उभ्या उसाला जमिनीलगत कुरतडल्यामुळे ऊस पडतात व वाळतात. पडलेला ऊस उंदीर मध्येच कुरतडून खातात. कुरतडलेल्या ठिकाणी बुरशी येते. उपाय म्हणून झिंक फॉस्फाइड २५ ग्रॅम, ५०० ग्रॅम कणकेत मिसळून गोळ्या करतात व त्या शेतातील उंदरांच्या बिळांत टाकतात.
(८) पायरिला : (पायरिला पर्प्युसिला).उसावरील महत्त्वाची कीड होय. किडीची अंडी पानाच्या मागील बाजूवर पुंजक्याने घातलेली असतात. त्यावर पांढर्या तंतूंचे आवरण असते. कीटकाची लहान पिले व मोठे तुडतुडे उसाच्या पानातील रस शोषून घेतात व एक प्रकारचा साखरेसारखा गोड पदार्थ अंगाबाहेर सोडतात. त्यामुळे पानावर काळसर बुरशी जमा होते. अशी पाने पिवळी पडतात व अर्धवट वाळलेली दिसतात. उसाची वाढ खुंटते. लहान पिकावर जास्त परिणाम होतो. जुलै-ऑगस्टमध्ये या किडीचा उपद्रव जास्त प्रमाणात दिसतो. उपाय म्हणून १० टक्के बीएचसी भुकटी फवारतात. ५० टक्के प्रवाही मॅलॅथिऑन किंवा २० टक्के प्रवाही एंड्रिन यांची हवाई फवारणी करतात. परोपजीवी (दुसर्यावर उपजीविका करणारे) कीटक टेट्रास्टिकस पायरिली किंवा कवक (मेटोर्हाइझिअम ॲनिसोप्लिई) यावरून पायरिलाचे नियंत्रण करतात [→ पायरिला].
(९) पांढरी माशी : (ॲल्युरोलोबस बॅरोडेन्सिस व निओमास्केलिआवर्गाय). ही कीड पानातील रस शोषून घेते. अळी व माशी दोन्ही पानातील रस शोषतात. पाने पिवळी पडून सुकतात. ही माशी एक प्रकारचा चिकट पदार्थही पानावर सोडते. त्यामुळे पानांची वाढ नीट होत नाही. उपाय म्हणून अंडी व कोष असलेली पाने काढून जाळतात. मॅलॅथिऑन फवारतात.
(१०) खवले कीड : (देवी कीड; मीलॅनॅस्पिस ग्लोमेरॅटा व केरोप्लॉस्टेस ॲक्टिनीफॉर्मिस). हलक्या मुरमाड जमिनीवरील पिकास या किडीचा जास्त उपद्रव होतो. प्रथमावस्थेत हाकीड वार्याच्या साहाय्याने उडून जाऊ शकते. खवले कीडयुक्त बेणे वापरले तर उगवण कमी होते. किडीची वाढ पाचटाच्या आत जास्त होते. किडीची अंडी खवल्याखालीच असतात. हे किडे लवकरच कांडीवर स्थिर होतात व रस शोषू लागतात आणि स्वतःभोवती चिकट आवरण तयार करतात. हे आवरण म्हणजेच आपल्याला दिसणारे पांढरे खवले होत. कांड्या वाळतात, उसाची वाढ खुंटते व ऊस मरतात. तोडणीच्या वेळी वाळलेल्या उसाचे प्रमाण जास्त भरते. किडीची वाढ पाचटाच्या आत होत असल्याने तोडणीच्या वेळीच ही कीड नजरेला येते. उपाय म्हणून दूषित बेणे वापरत नाहीत. दूषित पिकाची लवकर तोडणी करतात. खोडवा ठेवत नाहीत. तोडणीनंतर पाचट तेथेच जाळून टाकतात. डायमेथोएट फवारतात [→ खवले कीड].
(११) पिठ्या : (चिकट्या; सॅकॅरिकॉक्सस सॅकॅरी). कीड ही पाचटामध्ये वाढते. हीकीड चिकट पांढरा पदार्थ शरीराबाहेर सोडते व त्यामुळे तेथे डोंगळे, मुंग्या वगैरे जमा होतात. ही कीड लहान, लंबगोलाकार आणि पिंगट असते. ती स्वतःभोवती पांढऱ्या तंतूंचे आवरण तयार करते. तिने रस शोषल्यामुळे उसाची वाढ खुंटते. उपाय म्हणून पाचट जाळतात. मॅलॅथिऑन फवारतात.
पहा : गूळ; बीट; साखर.
दोरगे, सं. कृ.; गोगटे, बा. चिं.
संदर्भ : 1. Barnes, A. C. The Sugarcane, New York, 1964.
2. Hughes, C. G.; Abbott, E. V.; Wismers, C. A. Eds. Sugarcane Diseases of the World, 2 Vols., London, 1961-64.
3. Indian Central Sugarcane Committee – Handbook of Agriculture, New Delhi, 1966.
४. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, प्रगत ऊस बागायत, ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, १९७o.