‘ॲडम’, १९३९

एप्स्टाइन, जेकब : (१० नोव्हेंबर १८८० – १९ ऑगस्ट १९५९). प्रख्यात इंग्लिश शिल्पकार. न्यूयॉर्क येथे जन्म. एप्स्टाइनचे कलाशिक्षण ‘आर्ट स्टुडंटस लीग’, न्यूयॉर्क व ‘एकोल द वोझार्त’, पॅरिस येथे झाले (१९०२). १९०५ पासून लंडन येथे स्थायिक. लंडन येथील ‘ब्रिटिश मेडिकल ॲसोसिएशन’च्या नव्या इमारतीसाठी घडविलेल्या अठरा मोठ्या आकृत्यांची कोरीव शिल्पमालिका ही त्याची पहिली महत्त्वपूर्ण निर्मिती होय (१९०७­­–०८ १९३७ मध्ये नामशेष).एप्स्टाइनच्या शिल्पकामाची पाषाणात खोदलेली भव्य शिल्पे व ब्राँझची व्यक्तिशिल्पे अशी स्थूल वर्गवारी करता येईल. त्याच्या पाषाणशिल्पांत सघनता, ठसठशीतपणा व आदिम शैलीविशेष यांचा प्रत्यय येतो तर त्याची व्यक्तिशिल्पे व्यक्तीच्या चेहऱ्यावरील जिवंत भावदर्शन व व्यक्तित्वनिदर्शक वैशिष्ट्ये यांमुळे लक्षणीय ठरतात. ईजिप्शियन स्फिंक्सच्या धर्तीवर खोदलेले ऑस्कर वाईल्डचे प्रचंड स्मारक शिल्प (१९१२), संगमरवरी व्हीनस मूर्ती (१९१७), मॅडोना अँड द चाइल्ड (१९२७), नाइटडे हे प्रतिमासमूह (१९२९), एके होमो (१९३३), ॲडम (१९३९), जेकब अँड द एंजल (१९४२), लाझारस (१९४९) इ. त्याची शिल्पे विख्यात आहेत. त्याच्या व्यक्तिशिल्पांमध्ये जोसेफ कॉनरॅड (१९२४), पॉल रॉबसन (१९२७), ॲल्बर्ट आइन्स्टाइन (१९३३), जॉर्ज बर्नार्ड शॉ (१९३४), विन्स्टन चर्चिल (१९४६), बर्ट्रंड रसेल (१९५३), टी. एस्. एलियट (१९५३) यांसारख्या प्रमुख पाश्चात्त्य व्यक्तींप्रमाणेच रवींद्रनाथ टागोर (१९२६) व पं. जवाहरलाल नेहरू (१९४९) या भारतीयांचाही अंतर्भाव होतो.

     एप्स्टाइनच्या शिल्पकलेवर घन वादाचा, तसेच आफ्रिकन-निग्रो मूर्तिशिल्पाचा प्रभाव दिसून येतो. उदा., द रॉक ड्रिल (१९१३), द मदर अँड चाइल्ड (१९१३) इत्यादी. वस्तूमधील मूलवास्तवाची कलात्मक निर्मिती साधण्याच्या उद्देशाने त्याने पुष्कळदा वस्तुविरूपण व अप्रतिरूपण केल्याचे दिसून येते. त्यामागील प्रेरणा दुर्लक्षिल्या जाऊन टीकाकारांनी त्याच्या शिल्पांवर आत्यंतिक विरूपणाचे, तर सर्वसामान्यांनी नग्नतेचे, कुरूपतेचे व पावित्र्यविडंबनाचे आरोप केले. अशा वाद ग्रस्त शिल्पाकृतींत त्याच्या प्रारंभीच्या कोरीव शिल्प मालिकेप्रमाणेच चिरंतन मातृत्वाचे प्रतीक असलेले संगमरवरी जेनेसिस शिल्प (१९३१), रीमा हे हडसन-स्मारकशिल्प (१९२५), ब्राँझची ख्रिस्तमूर्ती (१९२०) इत्यादींचा उल्लेख करता येईल. शिल्पाकृतीचा पृष्ठभाग माध्यमाच्या प्रकृतिगुणानुरूप ठेवणे, हे एप्स्टाइनचे वैशिष्ट्य होय. एप्स्टाइनने आर्नल्ड हॅस्केलसमवेत लिहिलेल्या द स्कल्प्टर स्पीक्स (१९३१) व आत्मचरित्रपर अशा लेट देअर बी स्कल्प्चर (१९४०, नवी आवृत्ती एप्स्टाइन : ॲन ऑटोबायॉग्रफी या नावे प्रकाशित, १९५५) या पुस्तकांमध्ये त्याचे शिल्पतंत्र व जीवनवृत्तांत यांची माहिती आढळते. १९५४ मध्ये त्यास सर हा किताब देण्यात आला. लंडन येथे त्याचे निधन झाले.

इनामदार, श्री. दे.