एप्समाइट : (एप्सम सॉल्ट). खनिज. स्फटिक समचतुर्भुजी परंतु विरळाच आढळतात. सामान्यत: गुच्छाकार राशींच्या व तंतुमय रचना असलेल्या पापुद्र्यांच्या स्वरूपात आढळते. पाटन : (010) अत्युकृष्ट [→ पाटन ]. भंजन शंखाभ [→ खनिजविज्ञान]. कठिनता २–२·५ वि. गु.  १·७५. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. चमक काचेसारखी ते मातीसारखी. रंग व कस पांढरा. चव कडू व खारट. रा. सं. MgSO4.7H2O. कित्येक गुहांच्या पृष्ठांवर नैसर्गिक पाणी सुकून तयार झालेल्या लवणी लेपांत व ‘मिठाच्या डोंगरांतील’ लवणी निक्षेपांत आढळते. इंग्लंडमधील एप्सम या प्रदेशात प्रथम आढळले म्हणून एप्समाइट हे नाव दिले गेले.

केळकर, क. वा.