ऊर्बीनो : मध्य इटलीच्या पूर्व किनाऱ्यावरील निसर्गरम्य शहर. लोकसंख्या १६,७२० (१९६८). रोमन काळापासून झालेल्या शहराच्या आखणीचा प्रत्यय येथे येतो. बाराव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंत राज्य असलेल्या माँतेफेल्त्रो घराण्याच्या कारकीर्दीत ऊर्बिनोची खूप भरभराट झाली. यूरोपीय प्रबोधनकाळात झालेल्या कलाकृतींचे काही उत्कृष्ट नमुने येथे पहावयास मिळतात. सुप्रसिद्ध चित्रकार रॅफेएल याचे हे जन्मस्थळ. पंधराव्या शतकात बांधलेल्या राजवाड्यात सध्या रॅफेएल, तिशन, प्येरो देल्ला फ्रांचेस्का इत्यादींच्या कलाकृतींचा संग्रह करण्यात आला आहे. येथील विद्यापीठ (स्था. १५०६) प्रसिद्ध असून इटलीतील प्रवासी ऊर्बीनोस अवश्य भेट देतात.
ओक, द. ह.