उळ्ळूर एस्. परमेश्वर अय्यर : (१८७७–१९४९). मलयाळम्मधील आधुनिक कवित्रयांपैकी एक. केरळवर्मांचे शिष्य म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तिरु-अनंतपुरम्जवळील उळ्ळूर येथे जन्म. लहानपणापासूनच त्यांनी संस्कृत, तमिळ व इंग्रजी भाषांचा सखोल अभ्यास केला. बी. ए., बी. एल्. परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी काम केले व निवृत्तीनंतर त्रावणकोर (सध्याच्या केरळ) विद्यापीठातील प्राच्यविद्या व ललित कला विद्याशाखांचे अधिष्ठाते म्हणून ते शेवटपर्यंत राहिले.
उळ्ळूर यांनी प्रथमपासूनच संस्कृतमध्ये कविता करण्यास सुरुवात केली. सुरुवातीस ते रूढ काव्यरचनातंत्राप्रमाणे रचना करीत होते. १९१५ मध्ये त्यांचे गुरू केरळवर्मा यांचे निधन झाल्यानंतर मात्र त्यांनी आपले रूढ काव्यरचनातंत्र सोडून दिले. संस्कृत छंदोरचनेचा त्याग करून त्यांनी खास मलयाळम् छंदांचा स्वीकार केला आणि त्यांचा सर्रास वापरही केला.
आपल्या गुरूच्या इच्छेनुसार त्यांनी उमाकेरळम् (१९१४) नावाचे महाकाव्य रचले. कॉलेजमध्ये असताना मलयाला–मनोरमा, भाषा–पोषिणी, रामानुजन् वगैरे नियतकालिकांतून आपल्या कविता प्रकाशित केल्या. ‘सुभद्राशतकम्’, ‘स्यमंतकम्’, ‘मणिप्रवालम्’ वगैरे त्यांच्या त्यावेळच्या प्रसिद्ध कविता होत. आपल्या तरुणपणी त्यांनी शेक्सपिअरच्या ट्वेल्फ्थ नाइटचे मलयाळम्मध्ये भाषांतर केले मयूर–संदेशम् या संदेशकाव्याचा इंग्रजी अनुवाद तसेच सुजातोद्वाहम्, चंपू, वंचीरागीति असे काव्यग्रंथही लिहिले. त्यांच्या आख्यानकाव्यांत वीरवैराग्यम्, हीरा, कबीरदास, वीर–माता वगैरे प्रसिद्ध आहेत. त्यांच्यातील तत्त्ववेत्ता या काव्यांत आढळतो. उळ्ळूर यांनी जी खंडकाव्ये लिहिली आहेत, त्यामध्ये भक्तिदीपिका, कर्णभूषणम् व पिंगला ही विशेष प्रसिद्ध आहेत.
उळ्ळूर यांची कविता सुरुवातीला शब्दजालात गुरफटलेली वाटते परंतु पुढे पुढे तीत काटेकोरपणा व अर्थसघनता आली. आयुष्याच्या अखेरीस त्यांनी मलयाळम् साहित्यावर केरळ साहित्य चरित्रम् (५ खंड, १९५३–५७) हा फार मोठा अधिकृत ग्रंथ लिहिला. मलयाळम् साहित्याचा संशोधनात्मक आणि प्रामाणिक असा हा इतिहासग्रंथ होय. प्रतिभासंपन्न कवी आणि प्रसिद्ध संशोधक म्हणून मलयाळम् साहित्यात उळ्ळूर यांचे स्थान फार वरचे मानले जाते.
नायर, एस्. के. (इं.) कापडी, सुलभा (म.)