एथॅनॉल अमाइने : अमोनियातील हायड्रोजन अणू CH2CH2OH या कार्बनी गटाने प्रतिष्ठापिल्यास (एक अणू वा अणुगट काढून तेथे दुसरा अणू व अणुगट घातल्यास) मिळणार्या कार्बन संयुगांना एथॅनॉल अमाइने म्हणतात. ही संयुगे अमोनियाचे अनुजात (एका संयुगापासून बनलेली दुसरी संयुगे) होत. मोनोएथॅनॉल अमाइन, (NH2C2H4OH), डायएथॅनॉल अमाइन [NH (C2H4OH)2] व ट्रायएथॅनॉल अमाइन [N (C2H4OH)3] अशी तीन प्रकारची एथॅनॉल अमाइने आहेत. वुर्ट्झ यांनी प्रथम एथॅनॉल अमाइने तयार केली (१८६०). क्नोर यांनी ती भागश: ऊर्ध्वपातनाने (मूळ द्रवमिश्रणाचे वाफेत रूपांतर करून ती वाफ निरनिराळ्या घटक द्रवाच्या स्वरूपात थंड करून) वेगळी केली (१८९७). मोनो व डायएथॅनॉल अमाइने ही १९३१ मध्ये व ट्रायएथॅनॉल अमाइन १९२८ मध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यास सुरुवात झाली.
गुणधर्म : एथॅनॉल अमाइने ही सर्वसाधारण तापमानास वर्णहीन द्रव असून त्यांची घनता पाण्यापेक्षा थोडी जास्त आहे. पाणी व अल्कोहॉल यांच्यामध्ये सर्व प्रमाणात विद्राव्य (विरघळणारी), पण ईथरामध्ये अविद्राव्य. त्यांना अमोनियासारखा वास असून ती जलशोषक आहेत. कार्बन डाय-ऑक्साइडासारख्या अम्लीय वायूबरोबर त्यांच्या विक्रिया सहज होतात. त्यांचे गुणधर्म अल्कोहॉलांसारखे आहेत, पण औद्योगिक अल्कोहॉलांच्यापेक्षा त्यांचे क्वथनांक (उकळबिंदू) जास्त आहेत. यांच्या रेणूतील अमाइन भागामुळे अम्लाचे उदासिनीकरण (अम्लीय गुणधर्म नाहीसे करणे) होते. यामुळे त्यांचे बरेच व्यापारी उपयोग होऊ शकतात.
एथॅनॉल अमाइनांच्या रासायनिक विक्रिया बर्याच अंशी कार्बनी नायट्रोजन संयुगांच्या रासायनिक विक्रियांसारख्या आहेत. अम्लांबरोबर विक्रिया होऊन लवणे किंवा साबण, एस्टरे, ॲनहायड्राइडे व ॲसिल हॅलाइडे यांच्याबरोबर विक्रिया होऊन प्रतिष्ठापित अमाइडे आणि अल्किल हॅलाइडे, आल्डिहाइडे, कीटोने व कार्बन डाय सल्फाइड यांच्याबरोबर विक्रिया होऊन महत्त्वाचे अनुजात मिळतात.
मोनोएथॅनॉल अमाइन : NH2C2H4OH. वर्णहीन, श्यान (दाट) व तेलासारखा द्रव. हा प्रभावी क्षार (अल्कली) आहे. पाणी, अल्कोहॉल व क्लोरोफॉर्म यांमध्ये विद्राव्य, पण बेंझिनामध्ये अल्प प्रमाणात विद्राव्य. गोठणबिंदू १०·३° से., क्वथनांक १७१° से. ८०% तांत्रिक दर्जाचा द्रव बाजारात ड्रम, टाक्या, बाटल्या इत्यादींमधून पाठविला जातो.
डायएथॅनॉल अमाइन : NH(C2H4OH)2. वर्णहीन स्फटिक किंवा किंचित रंगीत व श्यान द्रव. पाणी व अल्कोहॉलांमध्ये सहज विद्राव्य. ईथरामध्ये अल्प प्रमाणात विद्राव्य, पण बेंझिनामध्ये अविद्राव्य. गोठणबिंदू २७·५° से., क्वथनांक २६९° से. ९०% तांत्रिक दर्जाचा द्रव (२% हून कमी मोनो- व ट्रायएथॅनॉल अमाइन असलेला) ड्रम, टाक्या, बाटल्या इत्यादींमधून बाजारात पाठविला जातो.
ट्रायएथॅनॉल अमाइन : N(C2H4OH)3. वर्णहीन किंवा फिक्कट पिवळ्या रंगाचा, तेलासारखा व जलशोषक द्रव. पाणी, अल्कोहॉल व क्लोरोफॉर्म यांमध्ये विद्राव्य पण ईथरामध्ये अल्प प्रमाणात विद्राव्य. गोठणबिंदू १७·९° से., क्वथनांक २६०° से. बाजारात ८०% व ९८% तांत्रिक दर्जाचे ट्रायएथॅनॉल अमाइन मिळते.
उत्पादन : एथिलीन ऑक्साइडाची अमोनियाबरोबर विक्रीया करून एथॅनॉल माइनांचे अव्यापारी उत्पादन करतात. ही विक्रिया ऊष्मादायी (उष्णता देणारी) असून १०·५–२१ किग्रॅ./सेंमी२. दाबावर व ५०–१००° से. तापमानाला करण्यात येते. २८–५०% सजल अमोनिया वापरल्यास, त्यातील पाण्यामुळे विक्रियेत बाहेर पडणारी उष्णता शोषली जाऊन तापमान आवश्यक तेवढे ठेवणे सोपे जाते.
अमोनिया व एथिलीन ऑक्साइड यांच्या प्रमाणांवर मोनो-, डाय- व ट्रायएथॅनॉल अमाइनांचे प्रमाण अवलंबून असते. अमोनिया जास्त वापरल्यास मोनोएथॅनॉल अमाइन तयार होते. विक्रिया पूर्ण झाल्यावर मिश्रण थंड करतात व एका टाकीत नेऊन अमोनिया त्यापासून वेगळा करतात. हा अमोनिया पाण्यात मिसळून परत वापरतात. टाकीच्या तळाशी असलेल्या विद्रावाच्या भागश: ऊर्ध्वपातनानेही तिन्ही एथॅनॉल अमाइने वेगळी करतात.
त्याचप्रमाणे हॅलोहायड्रिनाचा अमोनोनिरास करून (अमोनिया गट काढून टाकून), उत्प्रेरकाच्या (विक्रियेत भाग न घेता तिची गती वाढविणाऱ्या पदार्थाच्या) सान्निध्यात फॉर्माल्डिहाइड सायनोहायड्रिनाचे हायड्रोजनीकरण करून (हायड्रोजनाचा समावेश करून), नायट्रोअल्कोहॉलांचे उच्च तापमानात व दाबात उत्प्रेरकाच्या सान्निध्यात हायड्रोजनीकरण करून व विद्युत् विच्छेदी (विद्युत् प्रवाहाच्या साहाय्याने विघटन करण्याच्या) क्षपणानेही [→ क्षपण] त्यांचे उत्पादन करण्यात येते.
उपयोग : एथॅनॉल अमाइनांना फार औद्योगिक महत्त्व आहे. अनेक कार्बनी रसायनांच्या निर्मितीत किंवा प्रक्रियांत त्यांचा उपयोग केला जातो.
मोनोएथॅनॉल अमाइन व स्निग्धाम्ले यांच्यापासून बनणाऱ्या साबणामुळे पाण्यामधील खनिज तेले, मेणे व रेझिने यांचे पायस [एकमेकांत न मिसळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण, →पायस] बनते. ही पायसे कापडावरील प्रक्रियांमध्ये, धातू कापताना, धातूंवरील प्रक्रियांमध्ये व घरगुती उपयोगात मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. बऱ्याच औद्योगिक रसायनांच्या व औषधांच्या निर्मितीसाठी कच्चा माल म्हणून, अम्ल-वायू शोषक म्हणून, कापडावर अंतिम संस्कार करणाऱ्या पदार्थांच्या निर्मितीत व कृत्रिम निर्मलके (मलिनता काढून टाकणारे पदार्थ) व कीटकनाशक फवारे यांच्या निर्मितीत त्यांचा उपयोग करतात.
डायएथॅनॉल अमाइन सजल स्थितीत कार्बन डाय-ऑक्साइड व हायड्रोजन सल्फाइड शोषून घेते, म्हणून त्याचा उपयोग कार्बन डाय-ऑक्साइड अलग करणे, तसेच त्याच्या पुनर्प्राप्तीसाठी व संहतीसाठी (दिलेल्या घनफळातील प्रमाण वाढविण्यासाठी), कापडधंद्यात, मूत्र तंत्राच्या (संस्थेच्या) परीक्षेमध्ये स्वच्छ क्ष-किरण छायाचित्रे घेण्यासाठी आणि संश्लेषित (कृत्रिम) वेदनाशामक पदार्थांच्या निर्मितीसाठी केला जातो. मोटारीच्या प्रतिगोठण (गोठण्यास विरोध करणाऱ्या) विद्रावात गंजप्रतिरोधक म्हणून व उच्च तापमानावर चालणारी विमान एंजिने थंड करण्यासाठी ट्रायएथॅनॉल अमाइनाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. फरशा साफ करण्याच्या पॉलिशामध्ये व कापडधंद्यात त्याच्या पायसीकरण गुणधर्माचा उपयोग करून घेण्यात येतो. सौंदर्यप्रसाधने, कीटकनाशके, धातू कापण्यासाठी लागणारी तेले व खनिज तेल रसायने यांच्या निर्मितीत तसेच सिमेंट दळण्यासाठी साहाय्यक म्हणूनही त्याचा उपयोग करतात.
पुणतांबेकर, श्री. व्यं.
“