एडमंटन : कॅनडाच्या ॲल्बर्टा प्रांताची राजधानी. लोकसंख्या (उपनगरासह) ४,९५,७०२ (१९७१). सस्कॅचेवन नदीच्या उत्तर तीरावर एडमंटन वसले असून स्टॅथकोना उपनगर नदीच्या दक्षिण तीरावर आहे. एकोणिसाव्या शतकात हडसन बे या फर कंपनीने स्थापलेले हे ठाणे. सस्कॅचेवन व मॅकेंझी नदीखोऱ्यांचा समृद्ध प्रदेश, प्रेअरीचा गवताळ प्रदेश, अलास्का रस्त्यावरील महत्त्वाचे नाके आणि ॲल्बर्टामधील कोळशाच्या व खनिज तेलाच्या खाणी यांमुळे एडमंटनची भरभराट झाली. हे कॅनडातील चौथ्या क्रमांकाचे शहर असून व्यापार, उद्योग, शिक्षण, संस्कृती आदींचे केंद्र बनले आहे. ॲल्बर्टा विद्यापीठ, कृत्रिम तारामंडळ, कलासंग्रहालय, प्राणिसंग्रहालय व कॅनडातील एकमेव इस्लामी मशीद येथे आहे.
ओक, द. ह.