एटना : यूरोपातील सर्वांत उंच जागृत ज्वालामुखी. पूर्व सिसिलीत कातेन्या शहराच्या वायव्येस २८ किमी. हा असून मुख्य विवराचा अंत:शंकू व तुटक्या शंकूचे बाह्य विवर असे याचे दोन भाग आहेत. एटना ३,२६२ मी. उंच असून बाह्य विवर २,७४४ मी. वर आहे. त्याच्या भोवती लहान लहान उद्रेकांमुळे सु. अडीचशे शंक्वाकार विवरे पडली आहेत. आग्‍नेय उतारावर सु. पाच किमी. रुंदीची खोल दरी निर्माण झाली असून तिच्या दोन्ही बाजूला ३०० ते १,२०० मी. उंच भिंतीसारखे कडे आहेत. वायव्येकडील उतारावर २,९३५ मी. उंचीवर एक भूकंपमापक वेधशाळा आहे.

एटनाच्या तळाचा घेर १४५ किमी. असून त्याच्या उत्तरेला ॲलकँटारा व दक्षिणेला आणि पश्चिमेला सिमेटो ह्या नद्या आहेत. एटनाच्या तळापासून शिखरापर्यंत वनस्पतींचे चार पट्टे आहेत. ५०० मी. पर्यंत लिंबे, अंजीर, ऑलिव्ह १,३०० मी. पर्यंत द्राक्षे, बदाम, सफरचंद, हेझल, पीअर इ. २,१०० मी. पर्यंत बर्च, चेस्टनट, पाईनची दाट बने आणि चौथ्या पट्ट्यात लाव्हा व राख असून वर्षातील कित्येक महिने ह्यावर बर्फ असते.

एटनावर चढाई करण्याचे प्रयत्न प्राचीन काळापासून झालेले आहेत. ग्रीक तत्त्वज्ञ एंपेडोक्लीझ (४९५–४३५ इ. स. पू.) हा एटनावर सफल चढाई करणारा पहिला गिर्यारोहक होय. रोमन सम्राट हेड्रीएनसनेही (इ. स. ७६–१३८) हा विक्रम केल्याची नोंद आहे. या पर्वतासंबंधी अनेक दंतकथाही आहेत.

एटनाचे आतापर्यंत सु. २६० वर उद्रेक झाले. इ. स. पू. पाचव्या व सहाव्या शतकातील उद्रेकांचा उल्लेख थ्यूसिडिडीझने केला आहे. ११६९ मधील उद्रेकांत सबंध कातेन्या प्रांत उद्ध्वस्त झाल्याची नोंद आहे. १९१०, १९२८, १९४७ व १९७१ हे चालू शतकातील उद्रेक प्रसिद्ध आहेत. (चित्रपत्र ७६).

ओक, द. ह.