एकायनोडर्माटा : केवळ समुद्रात राहणार्या आणि देहगुहा (मध्यस्तरापासून उत्पन्न झालेली व मध्यस्तराचे अस्तर असलेली शरीरातील पोकळी) असणार्या अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांचा हा एक संघ आहे. प्राणिसृष्टीतील हा एक महत्त्वाचा संघ असून त्यात तारामीन (ॲस्टरॉयडिया वर्ग), भंगुरतारा (ऑफियूरॉयडिया वर्ग), समुद्री अर्चिन (एकिनॉयडिया वर्ग), सागरी काकडी (होलोथूरॉयडिया वर्ग), पिच्छतारा (क्रिनॉयडिया वर्ग) इ. प्राण्यांचा समावेश होतो. यांच्या आकारात आणि आकारमानात पुष्कळच विविधता आढळून येते. बहुतेक सगळ्या प्राण्यांची सममिती अरीय (त्रिज्यीय) असते [→ प्राणिसममिति]. बहुतेकांत कॅल्शियम कार्बोनेटाचा अंत:कंकाल (शरीराच्या आतील सांगाडा) असून शरीरावर त्वचेने आच्छादित कंटक किंवा गुलिका (लहान गाठी) असतात. प्लवकांमध्ये (तरंगणार्या प्राण्यांमध्ये) आढळणार्या काही विशेषित जाती वगळल्या तर एकायनोडर्म प्राणी समुद्राच्या तळावर राहणारे आहेत. समुद्रकिनार्यावरील अंतरावेलीय (भरती आणि ओहोटी यांच्या मधील) प्रदेशापासून तो ३,६५० मीटरांपेक्षाही जास्त खोलीवर ते आढळतात. उथळ पाण्यात ते विपुल असतात. बहुतेक मुक्तजीवी (स्वतंत्र राहणारे) आहेत, पण त्यांच्या हालचाली मंद गतीने होतात पुष्कळदा तर हे प्राणी बराच वेळ एके जागी स्वस्थ पडलेले असतात. यांच्यापैकी भंगुरतारेच काय ते जलद गतीने हालचाली करणारे आहेत. काही एकायनोडर्म प्राणी संघचारी (समूहात राहणारे) आहेत पण त्यांचे केव्हाही निवह (वसाहती) नसतात. काही समुद्र-नलिनी (क्रिनॉयडिया) लांब देठाने समुद्राच्या तळाला कायमच्या चिकटलेल्या असतात. हे प्राणी विविध रंगांचे–काही तांबडे तर काही जांभळे, काही निळ्या किंवा आकाशी रंगाचे तर काही करड्या किंवा पिवळसर रंगाचे–असतात.
लक्षणे : अंत:कंकाल आणि जल-परिवहन तंत्र (नालांमधून पाण्यासारख्या द्रवपदार्थाचे शरीरात अभिसरण करणारी रचना अथवा व्यवस्था) ही एकायनोडर्माटा संघाची खास लक्षणे असली, तरी या संघाची अशी इतर आणखीही लक्षणे देता येण्यासारखी आहेत.
बहुतेक प्रौढ एकायनोडर्म प्राण्यांची सममिती अरीय असून निरनिराळ्या भागांची किंवा अंगांची व्यवस्था पंचतयी (पाच भागांची बनलेली) असते. डिंभ (अळीसारखी अवस्था) मात्र द्विपार्श्वसममित (सारखे दोन भाग पडणारे) असतात. शरीराचे खंडीभवन (भाग पडलेले) झालेले नसते. शरीराच्या ज्या पृष्ठावर मुख असते ते मुखीय पृष्ठ अथवा मुखपृष्ठ आणि याच्या विरूध्द बाजूला जे पृष्ठ असते ते अपमुखपृष्ठ होय. अपमुखपृष्ठावर असणार्या चकतीसारख्या मॅड्रेपोराइट (खोबणी व भोके असलेले कॅल्शियममय तकट) या संरचनेमुळे प्रौढाच्या अरीय सममितीला काहीसा बाध येतो. आद्यस्तर तीन असतात. शीर्ष नसते (एकिनॉयडिया या नोंदीतील समुद्री अर्चिनाच्या आंतररचनेची आकृती पहा).
शरीर पातळ बाह्यत्वचेने झाकलेले असते. हिच्या खाली मजबूत मध्यस्तरीय अंत:कंकालाचा स्तर असतो. अंत:कंकाल ठराविक नमुन्याच्या कॅल्शियमी चकत्यांचा किंवा तुकड्यांचा बनलेला असतो. शरीराच्या पृष्ठावर दिसणार्या कठीण गुलिका किंवा लांब कंटक कॅल्शियममय असून या चकत्यांपासून किंवा तुकड्यांपासूनच निघालेले असतात.
पाचक तंत्र (पचन संस्था) पूर्ण विकास पावलेले असून आहार नाल (अन्नमार्ग) साधा पण पूर्ण असतो. तो मुखापासून गुदद्वारापर्यंत पसरलेला असून सरळ किंवा कुंडलित (नागमोडी) असतो. गुदद्वार मुखपृष्ठावर किंवा अपमुखपृष्ठावर असते; काहींत ते नसते.
देहगुहा विस्तृत असून तिला पक्ष्माभिकामय (केसांसारख्या बारीक तंतूंनी युक्त असलेल्या) पर्युदराचे (पातळ पटलाचे) अस्तर असते. ती एका द्रव पदार्थाने भरलेली असून त्यात मुक्त अमीबीय कोशिका (पेशी) असतात. देहगुहा प्रामुख्याने पाचक तंत्र आणि जनन तंत्र यांनी व्यापिलेली असते. क्रिनॉइड प्राण्यांमध्ये ती संयोजी ऊतकाच्या (इतर ऊतकांना म्हणजे समान रचना व कार्य असणार्या कोशिका समूहांना जोडणार्या अथवा आधार देणार्या ऊतकाच्या) जाळ्याने व्यापिलेली असते. डिंभाच्या देहगुहेच्या एका भागापासून प्रौढाचे जलपरिवहन तंत्र उत्पन्न होते. हे तंत्र नलिकांचे बनलेले असून त्यात पाण्यासारखा द्रव पदार्थ असतो. या तंत्राच्या अरीय नलिकांच्या शाखा नालपादांना (बारीक नळीसारख्या पायांना) गेलेल्या असतात. नालपाद चलनाचे, अन्न गोळा करण्याचे, श्वसनाचे आणि ज्ञानेंद्रियांचे कार्य करतात.
रुधिर तंत्र अथवा रिक्तीका तंत्र (कोशिकांच्या मध्ये मोकळ्या जागा असलेले तंत्र) विकीर्ण (पसरलेले) व प्रर्हसित (लहान झालेले) असून देहगुहा-प्रणालीत (तंत्रात) असते. देहगुहेपासून बाहेर आलेले त्वचाक्लोम (त्वचेचे बनलेले कल्ले) आणि नालपाद यांच्या द्वारा श्वसनाचे कार्य होते. पण ऑफियूरॉयडिया आणि होलोथूरॉयडिया या वर्गांत ते कार्य अनुक्रमे स्यून (पिशवी) आणि श्वसन-वृक्ष (वृक्षांसारखी श्वसनेंद्रिये) यांच्या द्वारे होते. उत्सर्जनांगे (निरुपयोगी द्रव्य शरीराबाहेर टाकणारे अवयव) नसतात.
तंत्रिका तंत्रामध्ये (मज्जा संस्थेमध्ये) एक परिमुखतंत्रिकावलय (मुखाभोवती असणारे मज्जातंतूंचे कडे) आणि अरीय तंत्रिका यांचा समावेश होतो शरीरात तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर सामान्यत: प्रत्येकी एक याप्रमाणे तंत्रिकांचे जाळे असते. संवेदी (बाहेरच्या वस्तूंपासून होणारी उद्यीपने ग्रहण करणार्या) तंत्राचा विशेष विकास झालेला नसतो, परंतु स्पर्शेंद्रिये, रसायनग्राही (रासायनिक उद्दीपने ग्रहण करणारी) व प्रकाशग्राही अंगे, अंतिम (टोकावर असणारे) संस्पर्शक, नालपाद इ. ज्ञानेंद्रिये आढळतात.
लिंगे भिन्न असतात. क्वचित उभयलिंगता (नर आणि मादीची इंद्रिये एकाच व्यक्तीत असणे) आढळते. नर आणि मादी यांत बाह्यत: फरक नसतो. जनन-ग्रंथी मोठ्या असून बहुतेकांत अर-सममित असतात त्यांच्या वाहिन्या साध्या असतात. मादी आपली अंडी समुद्रात घालते आणि नराने समुद्रात सोडलेल्या रेतातील शुक्राणूंच्या योगाने त्यांचे पाण्यातच निषेचन (अंड्यांचा शुक्राणूंशी संयोग होणे) होते. निषेचित अंड्यांचा विकास समुद्रातच होतो आणि त्यांच्यापासून सूक्ष्म, पारदर्शक, पक्ष्माभिकायुक्त आणि मुक्तप्लवी (पोहणारे) डिंभ तयार होतात. यांच्या रूपांतरणाने प्रौढ प्राणी उत्पन्न होतात. एकायनोडर्म प्राण्यांच्या अंगी पुनरूत्पादनाची आश्चर्यकारक शक्ती असते त्यांच्या शरीराचा एखादा तुटलेला भाग पुन्हा उत्पन्न होतो.
एकायनोडर्माटा संघात सु. ४,०००–६,००० जिवंत जाती आणि सु. २०,००० जीवाश्म (अवशेषरूपी) जाती आहेत. हा संघ एल्युथेरोझोआ आणि पेल्मॅटोझोआ या दोन मोठ्या उपसंघांत विभागलेला आहे. एल्युथेरोझोआ या उपसंघात प्रौढ दशेत मोकळेपणाने हिंडणार्या सर्व प्राण्यांचा समावेश होतो आणि पेल्मॅटोझोआ उपसंघात हल्ली जिवंत असणार्या पिच्छतार्यांचा व वृंत (देठ) असणार्या प्राण्यांचा (क्रिनॉयडिया) आणि बहुसंख्य जीवाश्म-जातींचा अंतर्भाव होतो. एल्युथेरोझोआ या उपसंघाचे (१) ॲस्टरॉयडिया, (२) ऑफियूरॉयडिया, (३) एकिनॉयडिया आणि (४) होलोथूरॉयडिया असे चार वर्ग पाडलेले आहेत. या चारही वर्गांचे प्राणी हल्ली जिवंत आहेत. पेल्मॅटोझोआ या उपसंघाचे बरेच वर्ग पाडलेले आहेत पण त्यांपैकी फक्त एकाच वर्गात (क्रिनॉयडिया) जिवंत प्राणी समाविष्ट असून बाकीचे सगळे वर्ग जीवाश्मांचे आहेत. जीवाश्म वर्गांची आणि त्यांतील जीवाश्मांची माहिती पुढे ‘जीवाश्म’ या सदराखाली दिली आहे.
(१) ॲस्टरॉयडिया : या वर्गातील सर्व प्राणी मुक्तजीवी आहेत. त्यांचा आकार तार्यासारखा असतो शरीर सामान्यत: पाच भागांचे असते. बाहू केंद्र-बिंबापासून निघालेले असून त्यांची बुडे केंद्र-बिंबात मिसळून गेलेली असतात ते आखूड, मजबूत आणि लवचिक असून यांची संख्या ५–५० असते मुख, चरणार-प्रसीता (नळीसारखे बारीक पाय जिच्यात असतात ती खोबण) आणि नालपाद मुखपृष्ठावर (खालच्या पृष्ठावर) असतात नालपादांच्या टोकावर चूषक (शोषण करणारे इंद्रिय) असतो गुदद्वार आणि मॅड्रेपोराइट अपमुख-पृष्ठावर असतात शरीराच्या पृष्ठावर संदंशिका (चिमट्यासारख्या सूक्ष्म संरचना) असतात. या वर्गात सगळ्या तारामीनांचा समावेश होतो. ॲस्टेरिॲस हे या वर्गाचे उदाहरण होय [→ ॲस्टरॉयडिया].
(२) ऑफियूरॉयडिया : या वर्गातील प्राण्यांचा आकार तारामीनांच्या आकारासारखाच म्हणजे तार्यासारखा असतो. शरीर सामान्यत: पाच भागांचे असते; त्याच्या मध्यावर केंद्र-बिंब असून त्याच्यापासून पाच विकीर्ण बाहू निघालेले असतात; केंद्र-बिंब वाटोळे असून बाहूंची बुडे त्याच्यापासून स्पष्टपणे वेगळी असतात बाहू लांब, सडपातळ आणि अतिशय लवचीक असून काही जातींत शाखित असतात; त्यांचा उपयोग चलनाकरिता होतो; चरणार-प्रसीता नसतात, पण असल्याच तर त्या उघड्या नसून अस्थिकांनी (बारीक अस्थींनी) झाकलेल्या असतात; नालपाद संस्पर्शकांच्या स्वरूपाचे असून त्यांच्या टोकावर चूषक नसतो, त्यामुळे चलनाच्या कामी त्यांचा उपयोग होत नाही; मॅड्रेपोराइट केंद्र-बिंबाच्या मुखपृष्ठावर असतो; गुदद्वार आणि संदंशिका नसतात. या वर्गात सगळ्या भंगुरतार्यांचा समावेश होतो. ऑफियूरा, ऑफिओथ्रिक्स आणि ॲस्ट्रोफायटन ही या वर्गाची उदाहरणे होत [→ ऑफियूरॉडिया].
(३) एकिनॉयडिया : या वर्गातील प्राणी जवळजवळ वाटोळे किंवा अर्धगोल (समुद्र अर्चिन), जाड अंडाकृती गिरदीसारखे (हार्ट अर्चिन) किंवा बिंबाभ म्हणजे जाड तकटासारखे (केक अर्चिन) असतात. सगळे मुक्तजीवी असतात. बाहू नसतात; कंकालाचे (सांगाड्याचे) कॅल्शियमी तुकडे किंवा चकत्या एकमेकांशी घट्ट जोडून चोल (कठीण बाह्य आवरण) तयार होतो; शरीरावर हालविता येणारे लहानमोठे कंटक आणि संदंशिका असतात; चरणार-प्रसीता अस्थिकांनी झाकलेल्या असतात; जल-परिवहन तंत्र विशेष विकसित असते; टोकावर चूषक असलेले नालपाद असतात.
या वर्गाचे रेग्युलॅरिया आणि इर्रेग्युलॅरिया असे दोन उपवर्ग केलेले आहेत. ज्या प्राण्यांमध्ये अरीय सममिती स्पष्टपणे दिसून येते ते सगळे रेग्युलॅरिया उपवर्गात घातलेले आहेत आणि ज्यांची अरीय सममिती गौण द्विपार्श्व-सममितीमुळे अस्पष्ट झालेली असते अशा सगळ्या प्राण्यांचा इर्रेग्युलॅरिया उपवर्गात समावेश होतो. एकिनस व साल्मॅसिस (समुद्र अर्चिन), लोव्हेनिया व एकायनोकार्डियम (हार्ट अर्चिन) आणि एकिनॅरॅक्नियस व क्लायपीॲस्टर (केक अर्चिन) ही या वर्गाची काही उदाहरणे होत [→ एकिनॉयडिया].
(४) होलोथूरॉयडिया : या वर्गातले सगळे प्राणी मुक्तजीवी आहेत. शरीर मऊ व लांबोडके असते; बाहू नसतात; देहभित्ती जाड व चामट किंवा पातळ असते; कंकाल अवशेषी असून त्वचेत विखुरलेल्या कॅल्शियमी तकटांचा किंवा कंटिकांचा बनलेला असतो; काही रूपांत तर त्याचा पूर्ण अभाव असतो; शरीरावर कंटक नसतात; संदंशिका नसतात; अरीय सममिती अस्पष्ट असते; मुख शरीराच्या अग्र (पुढच्या) टोकावर आणि गुदद्वार पश्च (मागच्या) टोकावर असते; मुखाभोवती मोठ्या प्रतिकर्षी (आत ओढून घेता येणार्या) संस्पर्शकांचे (परिमुख-संस्पर्शक) एक वलय असते (हे संस्पर्शक परिवर्तित नालपाद असतात); चूषक असलेले नालपाद असतात; मॅड्रेपोराइट एकापेक्षा जास्त असून आंतरिक (शरीराच्या आत) असतात; बहुतेकांत श्वसनाकरिता देहगुहेत श्वसन-वृक्ष असून तो अवस्करात (ज्यात आतडे, युग्मक वाहिनी आणि मूत्र वाहिन्या उघडतात त्या शरीराच्या मागच्या टोकाकडे असणार्या समाईक कोष्ठात) उघडतो; या वर्गात सगळ्या सागरी काकड्यांचा समावेश होतो. होलोथूरिया आणि क्युक्युमॅरिया ही या वर्गाची उदाहरणे होत [→ होलोथूरॉयडिया].
(५) क्रिनॉयडिया : पेल्मॅटोझोआ उपसंघाचे जे अनेक वर्ग पाडलेले आहेत त्यांपैकी, जिवंत प्राण्यांचा ज्यात समावेश केलेला आहे असा क्रिनॉयडिया हा एकमेव वर्ग होय.
या वर्गात समुद्र-नलिनी आणि पिच्छतारे यांचा समावेश होतो. बाल्यावस्थेत किंवा सर्व आयुष्यभर, अपमुखपृष्ठाच्या मध्यापासून निघालेल्या वृंताने शरीर समुद्राच्या तळाला चिकटलेले असते; वृंत त्वचीय अस्थिकांचा बनलेला असतो; बुडापाशी दुभागलेले आणि पिच्छिका (बाहूच्या बाजूंवर निघालेल्या शाखा) असलेले पाच बाहू असतात; मुख आणि गुदद्वार वरच्या पृष्ठावर (मुख-पृष्ठावर) असतात; चरणार-प्रसीता पक्ष्माभिकायुक्त असून मुख-पृष्ठावर असतात नालपाद संस्पर्शकांच्या स्वरूपाचे असून अन्न गोळा करण्याकरिता त्यांचा उपयोग होतो; कंटक, संदंशिका आणि मॅड्रेपोराइट नसतात. पिच्छतारे परिपक्वता येताच वृंतापासून तुटून अलग होतात आणि आपले बाहू हालवून पोहतात. पेंटॅक्रायनस आणि अँटेडॉन ही या वर्गाची उदाहरणे होत.
सीलेंटेरेटांप्रमाणेच एकायनोडर्माटा अर-सममित असतात. शरीर बहुधा पंचारीय (पाच अरीय भाग असलेले), दंडगोलाकार किंवा वाटोळे असते. अर बहुधा पाच असून मुखापासून फाकलेले असतात. गुदद्वार असले तर बहुधा अपमुख-पृष्ठावर असते, पण क्रिनॉयडियात ते मुखाच्या बाजूला असते. आहार-नाल मुखापासून सरळ किंवा वळसे घेऊन गुदद्वारापर्यंत गेलेला असतो. शरीरातील इतर प्रत्येक तंत्रात एक वलय आणि अरावरून गेलेली एक नलिका किंवा रज्जू असते. वलय मुख आणि अपमुख-पृष्ठाचा मध्य यांतून गेलेल्या अक्षाभोवती असते. विविध तंत्रांच्या अरीय भागांचे अर बनलेले असतात. अरांच्यामधील क्षेत्रांना अंतरार म्हणतात. बहुतेक तंत्रे चरणार-पृष्ठाच्या खाली त्याला लागूनच असतात; नालपाद त्याच्यावरूनच पुढे आलेले असून त्यांचे अरीय पट्टे असतात; यांना चरणार-क्षेत्रे म्हणतात. ॲस्टरॉयडिया आणि क्रिनॉयडिया यांच्यात प्रत्येक चरणार-क्षेत्रावरील नालपाद एका चरणार-प्रसीतेच्या दोन्ही बाजूंना ओळीने असतात. या प्रसीतेच्या बुडाशी अरीय तंत्रिका-रज्जू (जाड तंत्रिका) असते. इतर वर्गांमध्ये चरणार-प्रसीता झाकलेली असल्यामुळे तंत्रिका-रज्जूवर अधितंत्रिक (अरीय तंत्रिकेच्या वर असणारा) नाल तयार होतो. ॲस्टरॉयडिया, ऑफियूरॉयडिया आणि क्रिनॉयडिया या वर्गांत अरांच्या दिशेने शरीर बाहूंच्या स्वरूपात लांब झालेले असते. वर्तुलाकृती एकिनॉयडिया आणि लांबट होलोथूरॉयडिया यांचे शरीर आटपसर असून चरणार-पृष्ठ बहुतेक सर्व शरीरावर पसरलेले असते आणि मुखाच्या विरूध्द टोकावर एक अगदी लहानसा भाग अपमुख-पृष्ठ म्हणून शिल्लक राहतो. सममिती केव्हाही परिपूर्ण नसते आणि एकिनॉयडियात व होलोथूरॉयडियात एक नवी आणि ठळक द्विपार्श्व-सममिती उत्पन्न होऊन तिचा कित्येक अंगांवर परिणाम होतो.
क्रिनॉयडिया त्यांच्या अपमुख-पृष्ठांच्या मध्यावरून निघालेल्या वृंताने समुद्राच्या तळाला चिकटलेले असतात. यांच्यापैकी काही प्रौढ दशा आल्यावर वृंतापासून तुटून अलग झाले तरी त्यांचे मुख कायमचे वरच्या बाजूलाच असते. हल्लीच्या जिवंत एकायनोडर्माटांचे इतर वर्ग मुक्तजीवी आहेत. ॲस्टरॉयडिया, ऑफियूरॉयडिया आणि एकिनॉयडिया यांत मुख खालच्या बाजूला असते. होलोथूरॉयडियांच्या लांबट शरीराची एक बाजू नेहमीच जमिनीवर टेकलेली असल्यामुळे त्यांचे मुख आडवे असते.
नालपाद : यांचे मूळ कार्य कदाचित संवेदी (उद्दीपन ग्रहण करण्याचे) असावे; पण ॲस्टरॉयडिया, एकिनॉयडिया आणि होलोथूरॉयडियात त्यांच्या टोकावर असलेल्या चूषकामुळे चालण्याकरिता त्यांचे अनुकूलन झालेले असते. प्राय: श्वसनाकरिता त्यांचा नेहमीच उपयोग होतो आणि एकिनॉयडियाच्या इर्रेग्युलॅरिया या उपवर्गात काहींचे या कार्याकरिता रूपांतर झालेले असते. भक्ष्य पकडण्याकरिताही काहींचे परिवर्तन होणे शक्य आहे. नालपादात असणार्या द्रवाचा दाब जास्त किंवा कमी करून ते बाहेर काढता येतात किंवा आत ओढून घेता येतात.
बाह्यत्वचा : ही बहुधा पक्ष्माभिकायुक्त असते पण क्रिनॉयडियात पक्ष्मामिका फक्त चरणार-प्रसीतांमध्येच असतात आणि ऑफियूरॉयडियात त्या नसतातच त्याचप्रमाणे बाह्यत्वचेत ग्रंथिकोशिका आणि संवेदी कोशिका असतात. संवेदी कोशिकांपासून तंतुक (बारीक तंतू) निघालेले असतात आणि ते उपकला (अस्तराप्रमाणे असणार्या समान कोशिकांच्या स्तरातील) कोशिकांच्या बुडाशी असलेल्या तंत्रिकाजालाला जोडलेले असतात. त्वचेतील लाक्षणिक अस्थिका विखुरलेल्या असतात व त्यांमुळे कातडी चामट झालेली असते किंवा त्या स्नायूंनी एकमेकींना जोडलेल्या असतात व त्यामुळे कंकाल बनतो किंवा त्या एकमेकींना घट्ट जोडलेल्या असतात व त्यामुळे कवच तयार होते. काहींच्यापासून बहुधा कंटक निघालेले असून त्यांच्यावरील बाह्यत्वचा लवकरच झिजून नाहीशी होते. संदंशिका दोन किंवा तीन पाकळ्यांचे चिमटे असून संरक्षण हे त्यांचे मुख्य कार्य असते त्या विविध प्रकारच्या असून फक्त ॲस्टरॉयडिया आणि एकिनॉयडियात असतात.
आहार-नाल : एकायनोडर्माटाच्या विविध वर्गांतील आहार-नालात बराच फरक असतो. ॲस्टरॉयडिया आणि ऑफियूरॉयडिया यांत तो सरळ उभा असतो आणि इतर वर्गांत त्याला वेटोळी पडलेली असतात. निरनिराळ्या प्रकारांत त्यांच्यापासून अनेक अंधवर्ध (लहान बंद नळ्या) निघालेले असतात. तारामीनांच्या थोड्या जातींत आणि ऑफियूरॉयडियात गुदद्वार नसते परंतु ज्या वर्गांत ते असते तेव्हा (होलोथूरॉयडिया वगळून) बहि:केंद्रक (मध्यभागी नसून बाजूला असणारे) असते.
देहगुहा : प्रौढ प्राण्यांच्या देहगुहेचे कित्येक स्पष्ट भाग असून त्यांची भिन्न तंत्रे बनलेली असतात : (१) परिआंतरांग गुहा : (आंतरेंद्रियांना वेढणारी गुहा). हिच्यात सर्व मुख्य आंतरांगे असतात. (२) परिरुधिर तंत्र : (रूधिराभिसरण तंत्र). यात मुखाभोवती असलेली वलयवाहिका आणि प्रत्येक बाहूच्या अरावरून गेलेली एकेक अरीय वाहिका यांचा समावेश होतो. ॲस्टरॉयडियात अरीय वाहिकेचे एका उभ्या पडद्याने अनुदैर्घ्य (लांबीला अनुसरून) विभाजन झालेले असते आणि या पडद्यात मुख्य रुधिरवाहिका असते. (३) अपमुख कोटर तंत्र : (गुहिका, खळगे यांचे बनलेले तंत्र). जनन-प्राक्ष (ज्यांच्यापासून जनन-ग्रंथी उत्पन्न होतात त्या प्राथमिक जनन-कोशिकांचे वलय) आणि जनन-ग्रंथी यांना या तंत्राने घेरलेले असते. (४) जल-परिवहन तंत्र : हे परिरुधिर तंत्राच्या वर असून त्यात मुखाभोवती असणारे वलय, मॅड्रेपोराइटातून बाहेर उघडणारा अश्मनाल (कॅल्शियमयुक्त कठीण भित्ती असलेला नाल) आणि प्रत्येक अरावरून गेलेली एक अरीय वाहिका यांचा समावेश होतो. अरीय वाहिकांपासून पार्श्वशाखा निघून नालपादांना गेलेल्या असतात. चालण्याच्या कामी उपयोगी पडणार्या नालपादांच्या बुडाशी तुंबिका (फुगवटे) असतात आणि त्यांच्या आकुंचनाने नालपाद लांब होऊन बाहेर येतात. (५) मॅड्रेपोरी आशय : ही एक लहान गुहिका (पोकळी) असून तिचे आकृतिक (रचना आणि आकार यांच्या दृष्टीने) महत्त्व आहे. (६) अक्षीय कोटर : ॲस्टरॉयडियात हे नजरेत न भरणारे, ऑफियूरॉयडियात व एकिनॉयडियात लहान, होलोथूरॉयडियात अतिशय लहान आणि क्रिनॉयडियात परिआंतरांग गुहेत विलीन झालेले असते. अंतरारांपैकी एकात असणार्या एका छिद्रातून अथवा छिद्रांच्या एका गटातून (मॅड्रेपोराइट) याचे बाहेरच्या बाजूशी दळणवळण असते. बहुतेक होलोथूरियन प्राण्यांमध्ये याचे देहगुहेशी दळणवळण असते.
ॲस्टेरॉयडिया आणि एकिनॉयडिया यांत अपमुख बाजूवर ठळक मॅड्रेपोराइट असतो व त्याला पुष्कळ छिद्रे असतात. ऑफियूरॉयडियात तो मुखाच्या बाजूवर असतो आणि त्याला एकच किंवा थोडी छिद्रे असतात. बहुतेक होलोथूरॉयडियांत तो देहभित्तीपासून अलग झालेला असून त्याला कित्येक छिद्रे असतात तो परिआंतरांग गुहेत अश्मनालाने लोंबत असतो यामुळे त्याचे बाहेरच्या बाजूशी दळणवळण नसून या गुहेशीच असते. या वर्गात पुष्कळ अश्म-नाल असू शकतात आणि प्रत्येकाच्या टोकावर छिद्रित आंतरिक मॅड्रेपोराइट असतो. क्रिनॉयडियात कित्येक अश्म-नाल असून टोकावरील एका छिद्राने प्रत्येक परिआंतरांग गुहेत उघडतो आणि परिआंतरांग गुहा कित्येक छिद्रांमधून बाहेर उघडते.
होलोथूरॉयडियाखेरीज बाकीच्या सगळ्या वर्गांत अक्षीय अंग नावाची एक विशिष्ट संरचना असते; ती संयोजी आणि रिक्तीका ऊतक (मधूनमधून मोकळ्या जागा असणारे ऊतक) आणि जननिक अल्पविकसापासून (जनन-विरोहापासून) म्हणजे जनन-प्राक्षाशी संबंध असणार्या अक्षीय अंगातील प्राथमिक जनन-कोशिकांच्या समूहापासून उत्पन्न झालेल्या कोशिकांची बनलेली असते. अक्षीय कोटराला लागूनच अक्षीय अंग असते. क्रिनॉयडियामध्ये ते शरीराच्या अक्षावरच असते. याच्या कार्याविषयी काही माहिती नाही.
उत्सर्जन : एकायनोडर्माटाच्या उत्सर्जनाविषयी फारच थोडी माहिती आहे. मलाच्या कणांनी भरलेल्या अमीबीय कोशिका क्लोम (कल्ल्यांच्या) भित्तींमधून बाहेर पडून त्यांच्या योगाने उत्सर्जन होते त्याचप्रमाणे श्वसनेंद्रियांच्या अथवा आंत्राच्या (आतड्याच्या) द्वारे ते होते. उत्सर्जनाकरिता खास अंगे नसतात.
श्वसन : वेगवेगळ्या संरचनांच्या द्वारे श्वसन होते. ॲस्टरॉयडिया आणि एकिनॉयडिया यांत नालपाद आणि क्लोम श्वसनाचे कार्य करतात तर ऑफियूरॉयडियात ‘जनन-स्यून’ (ज्यात जनन-ग्रंथी उघडतात अशा बाहेर उघडणार्या गुहिका) आणि होलोथूरॉयडियात श्वसन-वृक्ष ते कार्य करतात.
परिवहन तंत्र : एकायनोडर्माटाचे परिवहन तंत्र एका विशेष रिक्तीका-ऊतकाच्या पेडांच्या संहतीचे बनलेले असते या ऊतकात मधूनमधून एकमेकींशी संबंध असलेल्या आणि उपकलेचे अस्तर नसलेल्या जागा असतात. इतर काही प्राण्यांमध्ये आढळणार्या रुधिर-गुहिका तंत्रासारखेच हे तंत्र असते पण याचे स्वरूप आणि कार्यपद्धती भिन्न असतात. मुखाभोवती परिरुधिर-वलयाच्या आत किंवा त्याच्या लगेच वर रिक्तिका-ऊतकाचे एक वलय असते. या वलयापासून निघून, प्रत्येक अरामध्ये, अरीय परिरुधिर नालावरून गेलेला एक अरीय पेड अथवा वाहिका असते. या तंत्राचा दुसरा भाग अक्षीय अंगात असून त्याने मुख-वलय एका अपमुख-वलयाला जोडले जाते. हे अपमुख-वलय जनन-प्राक्षाबरोबरच असते आणि त्याच्यापासून जनन-ग्रंथींना पेड गेलेले असतात. एकिनॉयडिया आणि होलोथूरॉयडिया यांत दोन मोठ्या वाहिका उत्तर–आणि अधर-मुख-वलयापासून निघून आहार-नालाबरोबर पण विरूध्द बाजूंनी जातात. यांच्यापासून निघालेल्या शाखांचे जाळे आहार-नालावर पसरलेले असते. इतर वर्गांतील आहार-नालांवरही अशाच तर्हेचे शाखाजाल असते.
तंत्रिका तंत्र : तंत्रिका तंत्र काहीसे आदिम (आद्य) असते. त्यात मुख्यत: तंत्रिका-जालांचा आणि त्यांच्या एकीकरणाने बनलेल्या तंत्रिका-रज्जूंचा समावेश होतो. सामान्यत: अशी तीन जाळी असून ती शरीरात वेगवेगळ्या पातळीवर असतात. पहिले, मुख तंत्र मुखाच्या बाह्यत्वचेखाली असून ते मुख्यत: ग्रसिकेभोवती (घशाभोवती) असणारे एक वलय आणि त्याच्यापासून निघून प्रत्येक चरणार-क्षेत्रावरून त्याच्या टोकापर्यंत गेलेल्या तंत्रिका-रज्जूंचे बनलेले असते. जिवंत एकायनोडर्म प्राण्यांच्या सगळ्या वर्गांत (क्रिनॉयडियाखेरीज) मुख तंत्र हा तंत्रिका तंत्राचा मुख्य भाग असतो. क्रिनॉयडियातील प्रौढ प्राण्यांमध्ये या तंत्राचे महत्त्व काहीसे कमी झालेले आहे. खोल जागी असलेले अधस्तंभिका तंत्र (अरीय आणि अनुप्रस्थ प्रेरक तंत्रिकांचे तंत्र) आणि अपमुख तंत्र ही बाकीची दोन तंत्रे मुख तंत्राच्या नमुन्याचीच असतात, पण त्यांची फारशी वाढ झालेली नसते. होलोथूरॉयडियात अपमुख तंत्र आढळत नाही, पण क्रिनॉयडियात मात्र ते प्रमुख असते.
ज्ञानेंद्रिये : एकायनोडर्माटामध्ये फारच थोडी ज्ञानेंद्रिये असतात. शरीराची उपकला सर्वसाधारणपणे संवेदी असते. नालपादांमध्ये ही संवेदिता तीव्र असते. मुखाभोवती असणारे नालपाद आणि होलोथूरॉयडियातील संस्पर्शक गंधेंद्रियांचे कार्य करीत असावेत असा समज आहे. काही होलोथूरियन प्राण्यांच्या त्वचेत संतुलन-पुटी (शरीराचा तोल सांभाळणारे ज्ञानेंद्रिय) असतात. ॲस्टरॉयडियात बाहूंच्या टोकावर असलेल्या संवेदी अंतिम संस्पर्शकाच्या बुडाशी दृक्-बिंदू (डोळ्याचे कार्य करणार्या वर्णकाचा म्हणजे रंगद्रव्याचा ठिपका) असतो.
जनन : अगदी थोडे अपवाद सोडले तर एकायनोडर्माटात लिंगे भिन्न असतात. ऑफियूरॉयडिया आणि होलोथूरॉयडिया या वर्गांतील अगदी थोड्या जाती उभयलिंगी असतात. जननांगे अगदीच साधी असतात आणि त्यांची व्यवस्था अर-सममित असते. जनन तंत्रात (होलोथूरॉयडिया वगळून) जनन-विरोह, जनन-प्राक्ष (हे एक वलय असून जनन-विरोहाला जोडलेले असते), जनन-ग्रंथी आणि त्यांच्या वाहिन्या यांचा समावेश होतो. जनन-ग्रंथी अंतरारीय असून त्या कोशासारख्या किंवा नलिकेच्या स्वरूपाच्या आणि पुष्कळदा शाखित असतात. त्या जनन-प्राक्षाच्या शाखांवर असतात. क्रिनॉयडियात युग्मक (जनन-कोशिका) वाहिन्या नसतात. होलोथूरॉयडियात एकच जनन-ग्रंथी असून ती उत्तर अंतरारात असते; तिची वाहिनी पृष्ठआंत्रयोजनीत असते आणि तिच्यावर अवशेषी जनन-विरोह असतो. जनन-प्राक्ष नसतो.
प्रजोत्पादनाच्या काळात युग्मके जनन-ग्रंथींतून थेट समुद्राच्या पाण्यात सोडली जातात. अंड्यांचे निषेचन समुद्राच्या पाण्यातच होते. बहुतेकांत युग्मनजाचा (युग्मकांच्या संयोगाने उत्पन्न झालेल्या संरचनेचा) विकास समुद्राच्या पाण्यात होतो. अंड्यातून मुक्तप्लावी डिंभ बाहेर पडतो. ॲस्टरॉयडियाच्या डिंभाला बायपिनॅरिया म्हणतात; काही आठवड्यांनंतर याच्यापासून ब्रेकिओलॅरिया नावाचा दुसरा डिंभ तयार होतो. ऑफियूरॉयडिया व एकिनॉयडिया या वर्गांतील डिंभाला प्लूटियस म्हणतात आणि होलोथूरॉयडियात त्याला ऑरिक्युलेरिया हे नाव दिलेले आहे. क्रिनॉयडियाचा डिंभ पिंपाच्या आकाराचा असतो. या सर्व द्विपार्श्व-सममित डिंभांच्या रूपांतरणाने प्रौढ प्राणी तयार होतात.
या संघातील प्राण्यांच्या अंगी शरीराच्या तुटलेल्या भागांचे पुनरूत्पादन करण्याची असामान्य शक्ती असते. तारामीन, भंगुरतारा किंवा पिच्छतारा यांचा एखादा बाहू तुटला तर त्याच्या जागी नवीन बाहू उत्पन्न होतो. पुष्कळ होलोथूरियन प्राण्यांच्या अंगी ही शक्ती फार मोठ्या प्रमाणात असते. जरूर पडल्यास ते शरीरातील सर्व अंगे बाहेर काढून टाकतात आणि सु. २५ दिवसांत त्याच्या जागी नवी उत्पन्न करतात.
एकायनोडर्म प्राण्यांचे शरीर काटेरी असल्यामुळे भक्ष्य म्हणून त्यांचा फारसा उपयोग होत नाही. मात्र समुद्रातील प्राणी त्यांची अंडी खातात. चिनी लोक सागरी काकडीचा रस्सा करतात. समुद्रकिनार्यावर जेथे एकायनोडर्म प्राणी विपुल असतात तेथे त्यांच्यापासून खत तयार करतात. या प्राण्यांच्या अंड्यांचा जीवविज्ञान प्रयोगशालांतून प्रयोगांकरिता उपयोग करतात. कृत्रिम अनिषेकजननाचा (अलैंगिक रीतीने होणार्या जननाचा) शोध प्रथम समुद्री अर्चिनांच्या अंड्यांवरील प्रयोगावरूनच लागला.
ऑयस्टर हे तारामीनांचे एक आवडते खाद्य असल्यामुळे ते त्यांचा मोठ्या प्रमाणावर नाश करतात.
एकायनोडर्माटा हा फार प्राचीन प्राण्यांचा समूह असून त्याचा मागे कँब्रियन कल्पापर्यंत (सु. ६०–५१ कोटी वर्षांपूर्वीपर्यंत) माग काढता येतो. या प्राण्यांची जरी अरीय सममिती असली तरी ते द्विपार्श्व-सममित पूर्वजांपासून उत्पन्न झालेले असावेत, असे मानण्यास पुरेसा पुरावा मिळतो. यांचे डिंभ द्विपार्श्व-सममित असतात आणि प्रौढांची अरीय सममिती गौण असते (कारण भ्रूणाच्या विकासात ती बरीच उशीरा उत्पन्न होते). या वस्तुस्थितीवरून वरील गोष्ट जास्त स्पष्ट होते. खुद्द प्रौढ प्राण्यातसुध्दा वरवर दिसणार्या अरीय सममितीच्या खाली द्विपार्श्व-सममिती दडलेली असते. सगळ्या अपृष्ठवंशी प्राण्यांपैकी एकायनोडर्म प्राणी हेच रज्जुमान (पाठीचा कणा असलेल्या ) प्राण्यांचे जवळचे नातेवाईक आहेत. एकायनोडर्माटांचे डिंभ आणि बॅलॅनोग्लॉससाचा डिंभ यांत पुष्कळच साम्य आहे. या साम्याच्या पुराव्यावरून असे स्पष्ट दिसून येते की, एकायनोडर्म प्राणी आणि रज्जुमान प्राणी एकाच समान पूर्वजापासून उत्पन्न झालेले असले पाहिजेत.
गोखले, कुसुम
जीवाश्म : कॅल्शियमी पदार्थांचे पत्रे, काड्या किंवा बारीक तुकडे त्वचेत बसवून यांचा सांगाडा तयार झालेला असल्यामुळे त्यांच्या सांगाड्यांचे जीवाश्म होणे शक्य असते. पुष्कळशा एकायनोडर्माटांचे सांगाडे एखाद्या कवचासारखे किंवा डबीसारखे असतात व ते पत्रे, तुकडे इत्यादींसारखे सुटे घटक एकमेकांस घट्ट जोडून तयार झालेले असतात. अशांच्या संपूर्ण कंकालांचे जीवाश्म वारंवार मिळतात. पण कित्येक एकायनोडर्माटांचे कंकाल हे अनेक घटक म्हणजे तुकडे सैलसर जोडून तयार झालेले असतात. त्यांच्या कंकालांचा संपूर्ण जीवाश्म सामान्यत: होत नाही. त्यांचे घटक इतस्तत: विखुरले जातात व सामान्यत: नाश पावतात.
कंकालाचे घटक कॅल्शियम कार्बोनेटाचे बनलेले असतात. त्यांची रचना जाळीदार असते पण गुणधर्म कॅल्साइटासारखे असतात व प्रत्येक पत्रा, तुकडा किंवा काडी म्हणजे कॅल्साइटाचा बाह्य आकार नसलेला व जाळीदार असा एक स्फटिक असतो. मृत एकायनोडर्माटांचे देह गाळात पुरले गेल्यावर त्यांचे मऊ भाग अर्थात कुजून जातात व कंकालाच्या घटकांवर पाण्याची क्रिया होते व त्यांच्यातील छिद्रांत पाण्यात विरघळलेल्या स्थितीत असलेले कॅल्शियम कार्बोनेट साठविले जाऊन ती छिद्रे बुजविली जातात. कॅल्शियम कार्बोनेट साठविण्याची क्रिया ही मूळच्या घटकाच्या स्फटिकाची सुसंगत वाढ होईल अशा रीतीने घडून येते, त्यामुळे घटकाच्या मूळच्या स्फटिकांत भर पडते व त्याचे पाटन (भंग पावण्याची पातळी) अधिक ठळक होते. म्हणून एकायनोडर्माटांचे जीवाश्म किंवा त्यांचे तुकडे कॅल्साइटाच्या पाटनास अनुसरून फुटतात. मुरणार्या पाण्याच्या क्रियेने बरेचसे कॅल्साइट साठविले जाऊन व त्याच्या पाटनाचा विकास होऊन जीवाश्माच्या मूळच्या जैव संरचना पार नाहीशा होणे शक्य असते व अशी उदाहरणेही वारंवार आढळतात. मृत एकायनोडर्माटांची ताजी म्हणजे जीवाश्म न झालेली कवचे फुटली, तर भंग पावलेले पृष्ठ वेडेवाकडे व जीवाश्मांच्या भंग पावलेल्या पृष्ठाहून अगदी वेगळ्या प्रकारचे असते. कॅल्शियमी स्पंजांच्या जीवाश्मांचा अपवाद वगळला, तर कॅल्शियमी सांगाडे असणार्या इतर कोणत्याही प्राण्याच्या जीवाश्मांचे भंजन-पृष्ठ एकायनोडर्माटांच्या जीवाश्मांच्या भंजन-पृष्ठासारखे असत नाही. त्यांच्या तुटलेल्या भागाची संरचना तंतुमय वा पत्री असलेली आढळते.
एकायनोडर्माटांपैकी आज प्रमुख असणारे प्राणी म्हणजे एल्युथेरोझोआ गटातील प्राणी होत; पुराजीव महाकल्पात (२७.५–२४.५ कोटी वर्षांपर्यंतच्या कालात) ते गौण असत व पेल्मॅटोझोआ प्रमुख असत. पण त्या महाकल्पाच्या अखेरीस पेल्मटोझोआंचे बहुसंख्य वर्ग निर्वंश झाले. क्रिनॉयडिया उरले पण त्यांची संख्या व प्रकार उत्तरोत्तर कमी होत गेले. उलट एल्युथेरोझोआंचे बहुतेक वर्ग शिल्लक राहिले व उत्तरोत्तर त्यांचा उत्कर्ष होत गेला.
इतिहास : एकायनोडर्माटांचा संघ हा प्रदीर्घ इतिहास असणार्या प्राण्यांच्या संघांपैकी एक असून एकायनोडर्माटांच्या आजच्या सर्व वर्गांचे प्रातिनिधिक प्राणी पुराजीव महाकल्पातही कमीअधिक संख्येने असत. त्यांच्याशिवाय काही इतर वर्गही पूर्वीच्या, विशेषत: पुराजीवी महाकल्पाच्या काळात असत. त्या निर्वेश वर्गांचा समावेश करून तयार केलेली वर्गीकरणाची एक योजना व त्या योजनेतील प्रत्येक गटाचा आयु:कालावधीही पुढील पानावरील कोष्टकात दिला आहे. या कोष्टकात दिलेल्या गटांपैकी निर्वंश झालेल्या गटांचीच माहिती येथे व जिवंत गटांची माहिती त्या त्या गटाच्या स्वतंत्र नोंदीत दिलेली आहे.
एकायनोडर्माटा संघातील वर्ग व त्यांचा आयुःकालावधी | |||
वर्गाचे (गटाचे ) नाव | आयुःकालावधी | ||
उपसंघ पेल्मॅटोझोआ | |||
१. | इओक्रिनॉयडिया | – निर्वंश | मध्य-कँब्रियन ते ऑर्डोव्हिसियन |
२. | पॅराक्रिनॉयडिया | – निर्वंश | मध्य-ऑर्डोव्हिसियन |
३. | कार्पॉयडिया | – निर्वंश | मध्य-कँब्रियन ते पूर्व-डेव्होनियन |
४. | सिस्टीडिया | – निर्वंश | कँब्रियन ते पर्मियन |
५. | ब्लॅस्टॉयडिया | – निर्वंश | सिल्युरियन ते पर्मियन |
६. | एड्रिॲस्टरॉयडिया | – निर्वंश | पूर्व-कँब्रियन ते कारबॉनिफेरस |
७. | क्रिनॉयडिया उपसंघ एल्युथेरोझोआ | पूर्व-ऑर्डोव्हिसियन ते आतापर्यंत | |
८. | एकिनॉयडिया | ऑर्डोव्हिसियन ते आतापर्यत | |
९. | स्टेलेरॉयडिया | ||
ॲस्टरॉयडिया (गण) | ऑर्डोव्हिसियन ते आतापर्यंत | ||
ऑफियूरॉयडिया (गण) | ऑर्डोव्हिसियन ते आतापर्यंत | ||
सॉमॅस्टरॉयडिया (गण) | ऑर्डोव्हिसियन ते उत्तर-डेव्होनियन | ||
– निर्वंश |
इओक्रिनॉयडिया : यांचा प्रावरक (संरक्षण आवरण) गोलसर किंवा पेल्यासारखा किंवा पिशवीसारखा व अनेक पत्रे जुळून तयार झालेला असे. पत्र्यांची एकूण संख्या अल्प असे. मंडलाकार जुळविलेल्या पत्र्यांचे एकावर एक मजले होतील अशा रीतीने ते रचलेले असतात. पत्रे छिद्रहीन असतात. सर्वांत वरच्या मंडलाच्या पाचही पत्र्यांना प्रत्येकी एक द्विश्रेणी बाहुक (पत्र्यांच्या दुहेरी रांगांनी बनलेला लहान बाहू) जोडलेला असतो. काही गोत्रांचे बाहुक द्विशाखी असतात. बाहुकांची मडांणी स्थूल मानाने अरीय असते. बाहुकांच्या आतल्या पृष्ठांवर लहानलहान पत्र्यांनी झाकलेल्या अन्न-खोबणी (अन्न असलेला पाण्याचा प्रवाह मुखाकडे नेणार्या खोबणी) असतात. मुख असलेल्या भागाच्या विरुध्द टोकास खोड (देठासारखी रचना) असे. ते एकावर एक पत्रा रचून झालेल्या एकेरी चळतीचे असे. यांचे जीवाश्म क्वचित मध्य-कँब्रियन (सु. ५४ कोटी वर्षांपूर्वीच्या) व ऑर्डोव्हिसियन (सु. ४९ ते ४४ कोटी वर्षांपूर्वीच्या) कल्पांच्या खडकांत आढळलेले आहेत.
पॅराक्रिनॉयडिया : अनेक पत्रे जुळून यांचा प्रावरक बनलेला असतो. पत्र्यांचे आकारमान व आकार अगदी सारखे नसतात व त्यांच्यात छिद्र-संहती (छिद्रयुक्त रचना) असते. काही गोत्रांना एकश्रेणी म्हणजे पत्र्यांच्या एकेरी रांगेचे बाहुक व त्या बाहुकांना एकश्रेणी शाखा असतात. काही गोत्रांचे बाहुक सुटे नसून वळविले गेलेले व प्रावरकाच्या पृष्ठास चिकटून पसरलेले असतात. छिद्र-संहतियुक्त पत्र्यांच्या बाबतीत पॅराक्रिनॉयडियांचे सिस्टिडियांच्या पत्र्यांशी व एकश्रेणी बाहुकांच्या बाबतीत क्रिनॉयडियांच्या बाहूंशी साम्य असते. यांचे जीवाश्म फक्त मध्य-आर्डोव्हिसियन कालातील खडकांत आढळलेले आहेत.
कार्पॉयडिया : या वर्गात काही विलक्षण व विपथगामी (मार्ग सोडून गेलेले) अशा गतकालीन एकायनोडर्माटांचा समावेश केला जातो. कॅल्शियमी पत्रे जुळून तयार झालेला प्रावरक या प्राण्यांना असतो. प्रावरकाला खोड किंवा तत्सम भाग असतो व कित्येकांच्या प्रावरकाला बाहुक असतात. पण ही लक्षणे सोडली तर एकायनोडर्माटांची कोणतीच लक्षणे त्यांच्यात नसतात. प्रावरक सामान्यत: चापट असतो. कित्येक गोत्रांच्या प्रावरकाच्या पत्र्यांची जुळणी असममित असते. काहींची द्विपार्श्व-सममित असते व त्या सममितीचे प्रतल (पातळी) प्रावरकाच्या चपटेपणाच्या प्रतलाला लंब असते. काही प्रावरकांची एक चापट बाजू दुसरीच्या मानाने किंचित उत्तल असते व तिच्या पत्र्यांचे व दुसर्या बाजूंच्या पत्र्यांचे आकारमान व जुळणी ही भिन्न असतात. खोड निमुळते असून टोकाशी बारीक असते किंवा टोकाशी वेडेवाकडे तुटल्यासारखे असते. मुख व गुदद्वार ही खोडाच्या स्थानाच्या विरुद्ध बाजूच्या किनारीवर असतात किंवा त्यांपैकी एक किंवा ती दोन्ही बाजूच्या किनारीवर असतात. कित्येक गोत्रांच्या जीवाश्मांत मुख व गुदद्वार ही दोन्ही आढळली नाहीत. कित्येक गोत्रांना मुख नसतेच. मुखाऐवजी पृष्ठवंशी प्राण्यांच्या क्लोम-छिद्रांसारखी एक छिद्रांची रांग त्यांच्यात असते. सकृद्दर्शनी असे प्राणी रूंद व चापट शीर्ष असलेल्या व चिंचोळे शेपूट असलेल्या आदिम, कवचधारी माशांसारखे थेट दिसतात.
यांची कित्येक गोत्रे सागराच्या तळास चिकटून राहणारी व कदाचित तळालगतच्या भागात संचार करू शकणारी असावीत. त्यांचे जीवाश्म कमीच, पण मध्य-कँब्रियनपासून पूर्व-डेव्होनियनपर्यंतच्या (सु. ५४ ते ४० कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील खडकांत आढळतात. कार्पॉयडियाच्या शरीर क्रियांविषयी काहीच सांगता येत नाही. त्यांचा समावेश एकायनोडर्माटात केला जात असला तरी त्यांच्यात व आदिम पृष्ठवंशीय प्राण्यांत किंवा त्यांच्यात व मॅकॅएरिडियात काही साम्ये आहेत असे कित्येकांचे मत आहे.
सिस्टिडिया : या वर्गातील प्राण्यांचे शरीर गोलसर, लंबगोलसर किंवा अनियमित आकाराचे व यांचा प्रावरक अनेक पत्रे एकत्र चिकटविले जाऊन बनलेला असे. पत्र्यांचा आकार, त्यांच्या आकाराचा नियमितपणा व पत्र्यांची संख्या ही गोत्रपरत्वे निरनिराळी असतात. क्रिनॉयडिया किंवा ब्लॅस्टॉयडियांच्या मानाने सिस्टिडियांच्या प्रावरकाच्या पत्र्यांची संख्या बरीच अधिक असते व पत्र्यांचे आकार अनियमित असतात. मुखापासून निघून आर्याप्रमाणे गेलेल्या तीन, पाच किंवा तीनापेक्षा कमी अन्न-खोबणी असतात. खोबणींना फाटे फुटणे शक्य असते. खोबणींच्या शेवटांशी आखूडसे बाहुक बसविले असतात, बाहुक द्विश्रेणी असतात. त्यांच्या पृष्ठावर अन्न-खोबण असते व ती प्रावरकाच्या पृष्ठावरच्या लगतच्या अन्न-खोबणीशी सलग असते. अन्न-खोबणी व बाहुक यांच्या मांडणीत अरीय सममिती बहुधा नसते. क्वचित अस्पष्ट व क्वचित निश्चित पंचतयी अरीय सममिती असते. पुष्कळ पत्रे असलेल्या प्रावरकात सममिती जवळजवळ नसते. पत्रे जो जो कमी तो तो सममिती सामान्यत: उच्च असते. गुदद्वार व मॅड्रेपोर (मुख व गुद यांच्या मध्ये असलेले बारीक छिद्र) ही प्रावरकाच्या वरच्या भागात व अंतराचरणार-क्षेत्र (दोन चरणार-क्षेत्रांच्या मध्ये असणारे क्षेत्र) असलेल्या भागात असतात.
काही गोत्रांतील प्राण्यांना आखूड किंवा क्वचित लांब खोड असे, काहींना खोड नसे. काही एका स्थानी चिकटलेले तर काही संचारक्षम असत.
सिस्टिडियांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या प्रावरकाच्या पत्र्यातील छिद्रे होत. ही छिद्रे म्हणजे त्या पत्र्यातील नळ्या असत. त्या नळ्या पत्र्याच्या पृष्ठापासून सरळ किंवा तिरप्या दिशेने पत्र्यांच्या आत गेलेल्या असत. छिद्रांची संख्या व त्यांची रचना गोत्रपरत्वे निरनिराळी असे. त्यांपैकी एक प्रकार म्हणजे प्रावरक पत्र्याच्या पृष्ठावर बारीक खळ्या असत व प्रत्येक खळीत छिद्रांची एक जोडी असे. दुसरा एक जटिल प्रकार म्हणजे प्रावरकाच्या पृष्ठावर सूक्ष्म, समांतर खोबणी असणारे व शंकरपाळ्याच्या आकाराचे एक क्षेत्र असे व त्या खोबणी अंतर्भागातील नळ्यांशी जोडलेल्या असत. अशा शंकरपाळ्याचा अर्धा भाग एका व अर्धा भाग लगतच्या दुसर्या पत्र्यावर असे. कित्येक गोत्रांतील समचतुर्भुज क्षेत्रातल्या मध्याजवळच्या भागावर कॅल्शियमी पदार्थांचे पातळ पत्र्यासारखे झाकण असे. अशा प्रकारच्या छिद्रांच्या गटाला छिद्र-समचतुर्भुज म्हणतात.
सिस्टिडियांच्या पत्र्यातील छिद्र-संहतीकडून कोणते कार्य होत होते हे सांगता येत नाही. त्यांच्यामुळे शरीरातील द्रव व भोवतालच्या समुद्राचे पाणी यांचा संपर्क होऊन त्यांच्यातील वायूंची सरळ देवघेव होत असावी. चयापचयामुळे (शरीरात होणार्या रासायनिक-भौतिक घडामोडींमुळे) शरीरात निर्माण झालेल्या अपद्रव्यांचा (निरूपयोगी द्रव्यांचा) निरास होत असावा. ज्यांच्यात कॅल्शियमी पत्र्यांनी झाकलेले छिद्र-समचतुर्भुज असत त्या प्राण्यांत अशी प्रक्रिया घडून येणे अर्थात शक्य नव्हते.
सिस्टिडियांचे सर्वांत जुने जीवाश्म मध्य-कँब्रियन कल्पातले आहेत. उत्तर-आर्डोव्हिसियन कल्पात त्यांचा परमोत्कर्ष झाला. स्वीडनमधील ऑर्डोव्हिसियन कालीन सिस्टिड-चुनखडकात एकायनोस्फेराइट्स गोत्राचे विपुल जीवाश्म आढळलेले आहेत. डेव्होनियन कल्पात त्यांची थोडीच गोत्रे होती. त्या कल्पाच्या अखेरीस ते निर्वंश झाले.
ब्लॅस्टॉयडिया : यांचा कटोर (खोड व बाहुक सोडून राहिलेला शरीराचा वाडग्यासारखा भाग) गोलसर किंवा पेरूच्या किंवा कळीसारख्या आकाराचा व काही थोडे, सामान्यत: तेराच, पत्रे जुळून झालेला असतो. पत्र्यांची मांडणी नियमित व कटोराची सममिती चांगली किंवा उत्कृष्ट अरीय असते. बहुतेक गोत्रांच्या कटोराचा मुखाविरूध्द भाग तीन पत्र जुळून झालेल्या मंडलांचा असतो. या पत्र्यांना आधारक पत्रे म्हणतात. या मंडलाच्या वरचे मंडल पाच व सापेक्षत: बर्याच मोठ्या पत्र्यांचे बनलेले असते. त्या पत्र्यांना अरीय पत्रे म्हणतात. कटोराचा पुष्कळसा भाग याच पत्र्यांचा बनलेला असतो. एखादा पुठ्ठा त्याच्या वरच्या कडेकडून कापून, त्याचा खाली निमुळता असा तुकडा कापून टाकल्यावर त्याच्यात जसा साधारण नालाच्या आकाराचा काप होईल तसा काप प्रत्येक अरीय पत्र्यात असतो. अरीय पत्र्यांच्या वर एकांतरित (एकाआड एक) अशा लहानशा पाच पत्र्यांचे एक मंडल असते. त्या पत्र्यांना डेल्टॉइड पत्रे म्हणतात.
कटोराच्या वरच्या पृष्ठाच्या मध्याशी मुख असते व मुखाभोवती नियमित अंतरावर असलेल्या बारीक छिद्रांचे कडे असते. त्या छिद्रांना शिखरिका म्हणतात. कित्येक गोत्रांच्या (उदा., पेंट्रेमाइटांच्या) मुखाभोवती पाच शिखरिका असतात. त्यांच्यापैकी एकीचे छिद्र किंचित मोठे असते. त्याच्यात प्राण्याचे गुदही समाविष्ट असते अशी समजूत आहे. इतर काही गोत्रांच्या मुखाभोवती पाच शिखरिकांऐवजी शिखरिकांच्या पाच जोड्या असतात व गुदाचे छिद्र वेगळे व कटोराच्या वरच्या पृष्ठावरच असते.
शिखरिकांच्या बाहेर असलेल्या भागापासून निघून खाली मुखाविरूध्द दिशेने अरीय कापात गेलेली पाच क्षेत्रे असतात. त्यांना चरणार-क्षेत्रे म्हणतात. या प्राण्यांच्या शरीरात अरीय जलवाहिन्या असल्याचा पुरावा नाही व त्यांची चरणार-क्षेत्रे एकिनॉयडियांच्या चरणार-क्षेत्रांशी समजात होती की नाही हे निश्चित सांगता येत नाही. पेंट्रेमाइट्स हे ब्लॅस्टॉयडियांच्या गोत्रांपैकी एक प्रमुख गोत्र होते. त्याच्या चरणार-क्षेत्रांच्या पुढील वर्णनावरून ब्लॅस्टॉयडियांच्या चरणार-क्षेत्रांच्या व त्यांच्याशी संलग्न अशा इतर अवयवांच्या स्वरूपांची कल्पना येईल. पेंट्रेमाइटांच्या चरणार-क्षेत्रांच्या मधोमध भाल्याच्या पात्याच्या आकाराचा एक पत्रा असतो. त्याला भाला-पत्रा म्हणतात. प्रत्येक भाला-पत्रा हा अनेक बारीक पत्र्यांच्या दोन रांगा जुळून तयार झालेला असतो. त्याच्या मध्यातून त्याच्या लांबीस अनुसरून जाणारी एक बारीक अन्न-खोबण असते व तिला तिच्या उजव्या व डाव्या बाजूकडून येणार्या बारीकशा, तिरप्या खोबणी जोडलेल्या असतात. अन्न असलेल्या पाण्याचा प्रवाह मुखाकडे नेणे हे अर्थात अन्न खोबणीचे कार्य असते. भाला-पत्र्यांच्या दोन्ही बाजूंच्या बाहेर व अरीय पत्र्यांच्या आत, बारीक पत्र्यांची एक एकेरी रांग असते. तिच्यातील पत्र्यांना पार्श्वीय पत्रे म्हणतात. पार्श्वीय पत्र्यांच्या प्रत्येक रांगेच्या बाहेरच्या कडेजवळ छिद्रांची एक रांग असते. त्या छिद्रांना सीमा छिद्रे म्हणतात. ती छिद्रे एकमेकांस चिकटून असलेल्या दोन पार्श्वीय पत्र्यांच्या मधे मोकळी जागा राहून उद्भवलेली असतात. प्रत्येक पार्श्वीय पत्र्यावर एकेक पक्षसम बाहुक बसविलेला असे. पण असे बाहुक सामान्यत: नष्ट झालेले असतात. अतिशय सुरक्षित राहिलेल्या जीवाश्मातील पार्श्वीय पत्र्यावर मात्र बाहुक असलेले आढळतात.
बाजाच्या पेटीच्या भात्याला जशा घड्या असतात तशा घड्या असलेला पातळ कॅल्शियमी पत्र्याचा एक लांबट अवयव पेंट्रेमाइटांच्या कटोराच्या आत व चरणार-क्षेत्रांच्या प्रत्येक कडेखाली असतो. त्याला जलशिखर म्हणतात. त्याच्या घड्यांची लांबी चरणार-क्षेत्राच्या कडेस अनुसरून असते. जलशिखरातील पोकळीचा सीमा छिद्रांशी व शिखरिकांशी सलग संबंध असतो. सीमा छिद्रांच्या द्वारे पाणी जलशिखरांत शिरत असावे व शिखरिकांवाटे बाहेर पडत असावे अशी समजूत आहे. जलशिखराच्या घड्यांची संख्या व जटिलता ह्या गोत्रपरत्वे व जातीपरत्वे कमीअधिक असतात, पण काही आदिम गोत्रे सोडली तर सर्वांना जलशिखरे असत.
ब्लॅस्टॉयडियांच्या सर्वांत जुन्या गोत्रांचे जीवाश्म मध्य-ऑर्डोव्हिसियन कल्पातले होत. डेव्होनियन कल्पात त्यांची बरीच भरभराट झाली व कार्बॉनिफेरस कल्पात परम उत्कर्ष झाला. त्या काळी पेंट्रेमाइटांच्या पुष्कळ जाती अस्तित्वात होत्या. पर्मियन कल्पाच्या अखेरीस ब्लॅस्टॉयडियांचा वर्ग निर्वंश झाला.
एड्रिॲस्टरॉयडिया : लहान लहान कॅल्शियमी पत्रे जुळून यांचा प्रावरक तयार झालेला असतो. पत्र्यांची संख्या पुष्कळ व त्यांचे आकार व जुळणी अनियमित असते. प्रावरक सामान्यत: बत्ताशासारखे, चापट गोल असून त्याचे खालचे पृष्ठ एखाद्या बाह्य पदार्थाला चिकटलेले असते. वरच्या पृष्ठाच्या मध्याशी मुख असून ते पत्र्यांनी झाकलेले असते. पाच अरीय खोबणी (चरणार-क्षेत्रे) मुखापासून वरच्या पृष्ठाच्या कडेस गेलेल्या असतात. त्या सरळ किंवा वक्र असतात व कधीकधी त्यांच्या शेवटाकडचा भाग उलट वळलेला असतो. कधीकधी चरणार-क्षेत्रे ही प्रावरकाच्या खालच्या पृष्ठावर किंचित गेलेली असतात. चरणार-क्षेत्रांना शाखा नसतात. प्रत्येक चरणार-क्षेत्र, पत्र्याच्या दुहेरी रांगेचे बनलेले असते व त्या प्रत्येक रांगेतील दोन पत्र्यांमध्ये एक छिद्र असते. अशा छिद्रावरून या प्राण्यांना नालपाद व अरीय जलवाहिका असाव्यात अशी कल्पना केली जाते. प्रत्येक चरणार-क्षेत्र हे पत्र्यांच्या दुहेरी रांगेने झाकलेले असते व रांगेतील पत्र्यांची व्यवस्था एकांतरित असते. चरणार-क्षेत्रांना बाहू किंवा बाहुक नसतात.
प्रावरकाच्या वरच्या पृष्ठावर, त्याच्या पश्च भागातील व अंतराचरणार-क्षेत्रात गुद असते व ते पत्रे रचून झालेल्या एका पिरॅमिडाने झाकलेले असे. वरच्या पृष्ठावर मुख व गुद यांच्यामध्ये एक बारीक छिद्र असते त्याला मॅड्रेपोर किंवा जलच्छिद्र म्हणतात.
एकायनोडर्माटांपैकी हा सर्वांत जुन्या प्राण्यांचा वर्ग असून कँब्रियन ते कार्बॉनिफेरस कालातील खडकांत या वर्गातील प्राण्यांचे जीवाश्म आढळतात. ऑर्डोव्हिसियन हा त्यांच्या परम उत्कर्षाचा काल, पण जीवाश्म एकंदरीत विरळाच आढळतात.
सॉमॅस्टरॉयडिया : ॲस्टरॉयडिया गणातील प्राण्यांसारख्या गतकालीन प्राण्यांचा गण. या गणातील प्राण्यांचा आकार पाच पाकळ्या असलेल्या चापट पंचपाळ्यासारखा असतो. स्पष्ट वेगळे असे बाहू नसतात. यांची चरणार-क्षेत्रे बारीक पत्र्यांच्या दुहेरी रांगांची असतात व प्रत्येक रांगेतील पत्र्यांची व्यवस्था दुहेरी असते. चरणार पत्र्यांच्या रांगेला तिरप्या व तिच्यापासून बाहेर जाणार्या काड्या किंवा संधित काड्यांच्या सरळ रांगा चरणार पत्र्याच्या बाजूला जोडलेल्या असतात. अशा काड्या असणे हा त्यांच्यातील व ॲस्टरॉयडियातील मुख्य भेद आहे. आयु:कालावधी पूर्व-ऑर्डोव्हिसियन ते उत्तर-डेव्होनियन.
पहा : ॲस्टरॉयडिया; ऑफियूरॉयडिया; एकिनॉयडिया; केक अर्चिन; क्रिनॉयडिया; डिंभ; तारामीन; पिच्छतारा; भंगुरतारा; समुद्री अर्चिन; सागरी काकडी; हार्ट अर्चिन; होलोथूरॉयडिया.
केळकर, क. वा.
संदर्भ : 1. Beerbower, T. R. Search for the Past : An Introduction to Paleontology, New Delhi, 1965.
2. Easton, W. H. Invertebrate Paleontology, New York, 1960.
3. Harmer, S. F.; Shipley, A. E. Ed., The Cambridge Natural History, Vol. I, Codicote (England), 1968.
4. Hyman, L. H. The Invertebrates : Echinodermata, Vol. IV, New York, 1955.