उर्वशी : इंद्रदरबारातील एक लावण्यवती अप्सरा. नारायणाच्या ‘ऊरू’ पासून (मांडीपासून) ती निर्माण झाली म्हणून ‘उर्वशी’ हे नाव, अशी व्युत्पत्ती पुराणांत सांगितली आहे. पुरूरव्याने केलेल्या उर्वशीच्या प्रणयाराधनेवरील ऋग्वेदातील (१०·९५) सूक्त, ही उत्कृष्ट भावकविता समजली जाते. शतपथ ब्राह्मण (११·५·१·१), महाभारत तसेच काही पुराणांमध्ये पुरूरवा-उर्वशीची कथा तपशीलवार आली आहे. एकदा ती अर्जुनावर मोहित झाली होती परंतु अर्जुनाने तिला नकार दिला. त्यामुळे तिने अर्जुनाला ‘तू एक वर्षभर षंढ होशील’, असा शाप दिला. उर्वशीचे लावण्य पाहून मित्रावरुणांचे रेतस्खलन झाले आणि त्यापासून अगत्य व वरिष्ठ हे ऋषी निर्माण झाले. ती मार्गशीर्ष महिन्याची अधिष्ठात्री अप्सरा आहे. हेमंत ऋतूत ती सूर्यरथावर असते. तिला ब्रह्मवादिनी म्हटले असून ती नृत्यादी कलांत निपुण असल्याचेही उल्लेख पुराणांत आढळतात. कालिदासाचे विक्रमोर्वशीय नाटक पुरूरवा- उर्वशीच्या प्रेमकथेवरच आधारलेले आहे.
सुर्वे, भा. ग.