एकांकिका : एकांकिका म्हणजे एक अंकी नाटक. एकांकिका ही एकरसात्मक, एककेंद्री, एकजिनसी नाट्यकृती असते. काव्यप्रकारात भावगीताचे जे स्वरूप आहे, तेच नाट्यप्रकारात एकांकिकेचे आहे. एकांकिकेत एकच प्रसंग वा एकच घटना असते. तीमध्ये उपकथानकांना अवसर नसतो. अत्यंत मोठ्या संदर्भाचा गतिमान भार घेऊन एकांकिकेची सुरुवात होते. या संदर्भामुळे नाट्यवेग अखेरपर्यंत एकसारखा वाढत जातो आणि तो उच्च बिंदूला येताच एकांकिका संपते. प्रसंगांच्या आणि व्यक्तिचित्रांच्या अनावश्यक तपशीलांच्या काटछाटीतून एकांकिकेचे सामर्थ्य एककेंद्रित होते. एकांकिकेत वापरलेला प्रत्येक शब्द नाट्यगर्भ आणि अभिनयगर्भ असल्याविना तिला सामर्थ्य आणि सौंदर्य लाभत नाही.

संस्कृत एकांकिका : भाण, वीथी, व्यायोग आणि उत्सृष्टिकांक हे चार रूपकप्रकार (नाट्यप्रकार) एकांकी असून प्रहसन हे एकांकी, तसेच दोन अंकीही असते. भासाची ऊरूभंग, कर्णभार  इ. पाच रूपके एकांकी आहेत. विश्वनाथाच्या साहित्यदर्पणात उपरूपकाचे जे अठरा प्रकार दिले आहेत, त्यांत गोष्ठी, नाट्यरासक, उल्लाप्य, प्रेङ्‍खण, रासक, श्रीगदित, विलासिका, हल्लीश हे एकांकी आहेत. रैवतमदनिका, वालिवध, मेनकाहितम्, देवीमहादेवम्, इ. त्यांची उदाहरणे होत. एकांकिकांचे हे प्रकारभेद रसवैचित्र्य, पुरुषपात्रसंख्या, स्त्रीपात्रसंख्या, नायकनायिकाभेद, वृत्तिवैचित्र्य, संधिवैचित्र्य, भाषाभेद इत्यादींवर अवलंबून आहेत. पण बहुसंख्य एकांकिकांमध्ये दोन लक्षणे साधारण म्हणून आढळतात : (१) कथानकरचनेतील पंचसंधींपैकी  ‘गर्भ’  आणि ‘विमर्श’  हे दोन संधी एकांकिकेमध्ये नसतात, म्हणजे कथानकाचा विकास अंकुरदशेनंतर झपाट्याने होऊन फलप्राप्तीकडे जातो. (२) एकांकिका नृत्यप्रधान असल्याने कैशिकी आणि भारती या दोन वृत्तींचा तेथे प्राय: वापर होतो.

    

      उपरूपकामध्ये डोम्बी, भाणिका, प्रेक्षणक, प्रस्थानक इ. आणखी काही एकांकीरचना म्हणून दिल्याचे आढळते.

पश्चिमी एकांकिका : देशोदेशींच्या साहित्यप्रकारांत एकांकिकांचे मूळ खोलवर रुजलेले दिसते. बहुतेक प्राचीन ग्रीक नाटके एकांकीच आहेत (जपानमधील ‘नो’  नाट्यप्रकारही एकांकी स्वरूपाचाच आहे). कलादृष्ट्या पाहिले, तर पंधराव्या ते सतराव्या शतकांमध्ये इटलीत जी छोटी प्रहसने होत असत, त्यांमध्ये आधुनिक एकांकिकांचे मूळ सापडते. मध्ययुगात इंग्लंड आणि इतर देशांत जी चमत्कृतिपूर्ण आणि गूढरम्य नाटके होत, त्यांतही एकांकिकेच्या मूळ रूपाचा शोध लागेल. इंग्लंडमध्ये एकांकिका ह्या नाट्यप्रकाराने १८९० मध्ये नाट्यप्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ‘कर्टन रेझर्स’  म्हणूनच हा नाट्यप्रकार तेथे रीतसर रंगभूमीवर आला. १९०३ मध्ये डब्ल्यू. डब्ल्यू. जेकब्स यांच्या द मंकीज पॉ  या लघुकथेचे नाट्यरूपांतर रंगभूमीवर इतके लोकप्रिय झाले, की त्याने पूर्ण नाटकाचे यश हिरावून घेतले. पण व्यावसायिकांऐवजी हौशी मंडळ्यांनी आणि ‘लिट्ल थिएटरां’ नी ही प्रहसनावजा एकांकी हाती घेतल्यावर तिला खरे चैतन्य लाभले.

इंग्रजी एकांकिकांनी उच्च दर्जाचे वाङ्‌मयीन मनोरंजन केले शिवाय नाटक आणि नाट्यशास्त्र यांमध्ये गोडी निर्माण करण्याचे कार्यही त्यांनी केले. इंग्लंडमधील ‘ब्रिटिश ड्रामा लीग’  आणि अमेरिकेतील ‘लिट्ल थिएटर’  चळवळ यांनी एकांकिकेला लोकप्रियता मिळवून दिली. टेनेसी विल्यम्स, क्लिफर्ड ओडेट्स, कॉफ्‌मन, जेम्स बेरी, शॉ, ड्रिंकवॉटर,  पिनेरो , मिल्न, स्ट्रिंडबर्ग, सिंग, ब्रिगहाऊस, सार्त्र, रवींद्रनाथ टागोर इत्यादींच्या एकांकिका रसिकप्रिय झाल्या आहेत. द बेस्ट वन ॲक्ट प्लेज या संग्रहमालिकेतून आजकालच्या पश्चिमी एकांकिका आणि एकांकिकालेखक यांचा यथार्थ परिचय होतो.

 

मराठी एकांकिका : तंजावरच्या ‘सरस्वती महाल’ या ग्रंथालयात जी मराठी नाटके हस्तलिखित स्वरूपात आहेत, त्यांमध्ये एकांकी नाट्य रचनेचा आढळ होतो. त्या एकांकिकांचा उद्देश आपल्या आराध्य देवतांच्या लीलांचे नाट्यरूपाने दर्शन घडविणे हा आहे. त्यांची रचना सरळ, साधी असून ती शृंगार-हास्य-रसमिश्रित व गीतनृत्यप्रधान असते. १७०० च्या सुमाराची श्री लक्ष्मीनारायण कल्याण नाटक ही नाट्यरचना मराठी एकांकिकेचा मूळारंभ म्हणता येईल. १८७० ते १९०० पर्यंत पौराणिक नाटकांच्या जोडीने प्रहसने करून दाखविण्याची मराठी रंगभूमीवर टूम निघाली. ही सर्वच प्रहसने एकांकिकांच्या स्वरूपाची आहेत, असे नाही पण त्यांतील कित्येक प्रहसने अनेकप्रवेशी एकांकी नाटकाच्या स्वरूपाची आहेत. केवळ स्थलांतर दाखविण्यासाठी हे प्रवेश येत. सरळ रेषेत धावणारे आटोपशीर कथानक, उपकथानकांचा अभाव, सुटसुटीतपणा आणि एकजिनसीपणा यांमुळे ही प्रहसने एकांकिकासदृश्यच आहेत. त्यांपैकी दत्तात्रय वासुदेव जोगळेकर यांच्या सुस्त्रीचातुर्यदर्शन प्रहसन अथवा गुलाबछकडीचा मनोरंजक फार्स (१८८५) यासारखी प्रहसने नीतिबोध करणारी आहेत.

अर्वाचीन काळात हरिभाऊ आपटे (जबरीचा विवाह), राम गणेश गडकरी (सकाळचा अभ्यास, दीडपानी नाटक), नाट्यछटाकार दिवाकर (सुट्टी ! शाळेला सुट्टी !!, ऐट करू नकोस इ.) यांसारख्यांनी एकांकिका लिहिल्याचे आढळते. १९३० पर्यंत एक स्वतंत्र साहित्यप्रकार म्हणून एकांकिकेकडे पाहिलेच गेले नव्हते. इब्सेनची एक अंकी, एकप्रवेशी नाटके परिचित झाली. नभोवाणी हे एक नवे माध्यमही उपलब्ध झाले आणि श्रुतिकांची नियमितपणे निर्मिती व प्रसार होण्याची एक हुकमी यंत्रणाच हाती आली. इंग्रजी एकांकिकांचा स्वतंत्रपणे डोळस अभ्यास सुरू झाला. प्रारंभीच्या काही उत्कृष्ट एकांकिकांचे स्वरूप नभोनाट्याचे आहे, हे विसरून चालणार नाही. हा कालखंड म्हणजे मराठी एकांकिकेचे जणू भाषांतर-युगच! अनंत काणेकर आणि माधव मनोहर यांनी या बाबतीत भरघोस कार्य केले. याच काळात शामराव ओक यांनी एकांकिकांमधील विडंबनाचे सामर्थ्य अधिक जोपासले. व्यंकटेश वकील आणि वि. मा. दी. पटवर्धन यांचेही एकांकिकालेखन उल्लेखनीय आहे. ‘नाट्यनिकेतन’ या संस्थेने मो. ग. रांगणेकरांच्या तुझं माझं जमेना, सतरा वर्षे आणि फरारी या तीन एकांकिका व्यावसायिक रंगभूमीवर यशस्वी करून दाखविल्या. या काळात एकांकिकेच्या प्रयोगक्षमतेपेक्षा तिच्या वाचनीयतेकडे व श्राव्यगुणाकडे लक्ष देण्यात येत होते. पण गेल्या पंधरा वीस वर्षांत एकांकिकेकडे एक स्वयंपूर्ण नाट्यप्रकार म्हणून पाहिले जात आहे. या कालखंडात जीवनाकडे व साहित्यकलेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात क्रांतिकारक बदल घडला. माणसाचे व्यक्तिमत्व हे एकेरी, एकपदरी नसून ते संमिश्र स्वरूपाचे असते. मानवी मनाच्या दर्शनी भागाच्या पलीकडचे भाग दृश्यमान करणारे क्ष-किरण टाकण्याचे कार्य ललित साहित्य करू लागले. एखादा उत्कट प्रसंग, एखादी उत्कट भाववृत्ती, एखादी सखोल जीवनानुभूती, मनावर आघात करणारा एखादा व्यक्तिगुण, एखादे अर्थपूर्ण वातावरण इत्यादींतून नवी एकांकिका जन्माला येऊ लागली. अभिनय आणि रंगभूमिविषयक कल्पना यांतही क्रांतिकारक बदल घडून आला. ‘इंटिमेट थिएटर’, ‘लिट्ल थिएटर’ आदींचा उदय झाला नाट्यशिक्षणसंस्था उदयास आल्या, एकांकिकास्पर्धा नियमितपणे सुरू झाल्या विद्यापीठे नाट्य-शिबिरे भरवू लागली.  मराठी एकांकिकेच्या आजच्या स्वायत्त आणि महत्त्वपूर्ण विकासाला ही सर्व परिस्थिती पोषक ठरली.


एकांकिकेला साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रांत प्रतिष्ठा मिळवून देण्याचे फार मोठे श्रेय पु.ल. देशपांडे आणि विजय तेंडुलकर यांना आहे. भोवतालच्या जीवनातील हास्यगर्भ नाट्य टिपून त्याचा एकांकिकेच्या रूपाने समर्थपणे आविष्कार करण्याचे कार्य मुख्यत: पु. ल. देशपांडे यांनी केले, तर गंभीर नाट्याचा आविष्कार विजय तेंडुलकर यांनी केला, असे स्थूलमानाने म्हणता येईल. एकांकिकेच्या पृथगात्मतेची, जीवननाट्य व्यक्त करण्याच्या तिच्या सामर्थ्याची व तिच्या यशस्वितेची खातरजमा त्यांनी करून दिली. पु. ल. देशपांडे, वसंत सबनीस, पद्माकर डावरे, गंगाधर गाडगीळ आदींच्या विनोदी एकांकिकांनी आणि विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी, वसुधा पाटील, महेश एलकुंचवार, चंद्रकांत देशपांडे आदींच्या गंभीर एकांकिकांनी आज मराठी एकांकिकेला एक सुंदर तोल लाभला आहे.

आज काही नवे लेखक अस्तित्ववादी म्हणता येईल, अशा जीवनवृत्तीने हा प्रकार हाताळत आहेत, तर विद्याधर पुंडलिकांसारख्या कथालेखकाने चक्रसारख्या एकांकिकेतून अत्यंत मूलगामी धर्मकर्ममीमांसा मांडली आहे. माधवीएक देणे लिहिणार्‍या पु. शि. रेगे यांनी एकांकिकेला काव्यात्म रूप दिले आहे. अशा विविध प्रवाहांनी मराठी एकांकिकांची प्रगती झपाट्याने होत आहे, असे दिसते.

संदर्भ : 1. Wilde, Percival, The Craftsmanship of the One-Act Play, Boston, 1951.

             २. भिडे, श्री. र. कुलकर्णी, व. दि. केळकर, भालबा, संपा. एकांकिका वाटचाल, मुंबई. १९६९.

कुलकर्णी, व. दि. महाम्बरे, गंगाधर