उपरोध : (सटायर). उपरोध समाजातील विसंगतींचे मर्मग्राही दिग्दर्शन करतो. उपरोधाचा हेतू त्या विसंगती दूर करण्याचाही असतो. उपरोध हा एखादा विषय नसून कोणत्याही विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोण आहे. उपरोधाचे संदर्भक्षेत्र सामाजिक असते. सामाजिक व्यवहारातील दांभिकता, विसंवाद आणि इतर दोषांवर उपरोधाद्वारे नेमके बोट ठेवले जाते परंतु उपरोधकाराची भूमिका बंडखोराची वा प्रेषिताची नसते. उपरोधकार विनोदाचा चतुराईने वापर करून सामाजिक ढोंगाचे वाभाडे काढतो. केवळ टर उडविणे, थट्टा करणे, टोमणे मारणे म्हणजे उपरोध नव्हे. तुमच्याकडे बुद्धिमत्ता नसेल, तर डोके कितीही आपटलेत तरी तुम्ही काही लिहू शकणार नाही, ही भाषा अपमानकारक झाली पण पोपसारखा प्रख्यात उपरोधकार जेव्हा,तुम्ही तुमच्या टकलावर कितीही टपला मारा, आतून उत्तर येईल वाजवा, आत कोणी नाही, असे लिहितो तेव्हाच तो उपरोध होतो.

विडंबन, उपहासिका, वक्रोक्ती, शाब्दिक कोटिक्रम ही विनोदसाधने स्वतंत्र असली, तरी त्यांचा उपरोधकारास उपयोग होतो. व्याजनिंदा (सार्‌कॅझम) आणि उपरोध यांतील सीमारेषा पुष्कळदा अस्पष्ट असतात. प्रभावी औपरोधिक आशय व अभिव्यक्ती साधण्यासाठी मार्मिक विचारशक्तीची व भाषाप्रभुत्वाची अत्यंत गरज असते. अनेक गोष्टींचा निषेध करताना आपण हसू शकत नाही. कशालाही हसण्यासाठी आत्मविश्वास लागतो आणि तो उपरोधकाराकडे असतो. तो आपल्या लक्ष्यावर मर्मभेदी आघात करतो आणिहसवतही ठेवतो.

उपरोध म्हणजे विनोद हेही बरोबर नाही. सौम्य उपरोधाला हॉरिशियनपद्धतीचा उपरोध म्हणतात तर त्याहून तीव्र, बोचरा हल्ला करणारा उपरोध जूव्हेनलियनम्हणून ओळखला जातो. जॉनाथन स्विफ्टच्या ए मॉडेस्ट प्रपोजलमध्ये त्याने आयर्लंडच्या दारिद्र्याचे वर्णन केले आहे. लोक मुलाबाळांना खायलासुद्धा घालू शकत नव्हते. स्विफ्ट लिहितो, आयर्लंडमधील मुले जगायलाच हवीत म्हणजे त्यांना इंग्लंडच्या कत्तलखान्यात पाठविता येईल, तिथे ग्राहकांना मांस मिळेल, मुलांच्या पालकांना पैसे मिळतील आणि दारिद्र्याच्या कचाट्यातून मुलेही सुटतील. हा उपरोध दुसऱ्या प्रकारचा आहे.

उपरोधाचा उगम ग्रीक आणि रोमन वाङ्मयात आढळतो. रोमनांचा नैतिकतेचा आग्रह आणि स्वभावातील आक्रमकता ही दोन्ही वैशिष्ट्ये त्यांच्या उपरोधातही आढळतात. मध्ययुगातील औपरोधिक लेखन हे केवळ पूर्वसूरींचे अनुकरण असल्याने त्याला स्वतःची वैशिष्ट्ये नाहीत. सतराव्या शतकापर्यंत उपरोध हा एक वाङ्मयप्रकार होता. नंतर उपरोध हा केवळ एक शैली म्हणूनच ओळखला जाऊ लागला.

प्राचीन ग्रीक व लॅटिन साहित्यात ॲरिस्टोफेनीस, मार्शल पेट्रोनिअम, जूव्हेनल हे उपरोधकार म्हणून विशेष प्रसिद्ध आहेत. सतरावे व अठरावे शतक प्रामुख्याने उपरोधाचे युग होते. ड्रायडन, स्विफ्ट, ॲडिसन, स्टील, पोप, फील्डिंग, बायरन आणि थॅकरी हे उपरोधकार याच काळातले. स्विफ्टचे गलिव्हर्स ट्रॅव्हल्स  हे उपरोधाचे प्रसिद्ध उदाहरण आहे. विसाव्या शतकात जॉर्ज बर्नार्ड शॉ, नोएल कॉवर्ड, एव्हेलिन वॉ, सिंक्लेअर ल्यूइस, जेम्स थर्बर, इ. बी. व्हाइट ह्यांच्या लेखनात औपरोधिक शैलीचा आविष्कार आढळतो. ऑल्डस हक्सलीची ब्रेव्ह न्यू वर्ल्ड आणि जॉर्ज ऑर्वेलच्या ॲनिमल फार्म व नाइन्टीन एटीफोर  ह्या कांदबऱ्या उपरोधप्रधान कादंबर्‍यांची उदाहरणे होत.

मराठी साहित्यात उपरोधाचा वापर पहिल्यापासून केलेला आढळतो. उदा., तुकारामाचे अभंग. विष्णुशक्ती चिपळूणकर व शिवरामपंत परांजपे यांचे निबंध, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर व गडकरी यांचे विनोदी लेखन व माधव ज्यूलियनांच्या व मर्ढेकरांच्या काही कविता यांतही उपरोध आढळतो. पंचन्यूयॉर्कर  यांसारख्या नियतकालिकांनी औपरोधिक शैलीने राजकीय स्थितीवर कोरडे ओढण्याची प्रथा सुरू केली. अलीकडच्या काळात चित्रपट, रूपण कला, आरेख्यक कला, वृत्तपत्रातील विविध सदरे आणि व्यंगचित्रे ह्यांद्वारे सामाजिक व्यंगांवर बोचरे भाष्य केले जाते. प्रसिद्ध भारतीय चित्रकार आर्‌. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचे उदाहरण या संदर्भात उल्लेखनीय वाटते.

संदर्भ : Pollard, Arthur, Satire, London, 1970.

जगताप, दिलीप.