उपग्रह : ग्रहाभोवती फिरणारा खस्थ पदार्थ म्हणजे उपग्रह होय. सूर्यमालेत निरनिराळ्या ग्रहांना किती उपग्रह आहेत याचे बरेच संशोधन झाले आहे. पृथ्वीला एक उपग्रह आहे, त्यास आपण चंद्र म्हणतो. मंगळ आणि वरुण (नेपच्युन) यांना प्रत्येकी दोन उपग्रह आहेत, प्रजापतीला (यूरेनसला) पाच, शनीला दहा आणि गुरूला एकूण बारा उपग्रह आहेत. बुध, शुक्र व कुबेर (प्लूटो) यांना एकही उपग्रह नाही. सूर्यकुलात एकूण बत्तीस उपग्रह असून शनीच्या यानुस या उपग्रहांखेरीज सर्वांची माहिती कोष्टकरूपाने खाली दिली आहे.
उपग्रह निर्मितीच्या परिकल्पनेची स्थूल रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे : लक्षावधी वर्षांपूर्वी, अत्यंत तप्त अशा वायुरूप वैश्व-वस्तूंच्या महाप्रचंड ढगापासून तारे आणि नंतर क्रमाक्रमाने प्राथमिक अवस्थेतील काही प्रचंड भाग निर्माण झाले हेच ग्रह झाले. या प्रचंड वायुराशीस चक्राकार गती होती, त्यांना अक्षीय (आसाभोवतील) परिभ्रमण आणि कक्षीय परिभ्रमण अशा दोन्ही गती होत्या. कालांतराने यातील उष्णता कमी कमी होऊन ते गोठू लागले. या अवस्थेमध्ये त्यांचे वेगवेगळ्या काळी आणखी वेगवेगळे खंड किंवा तुकडे म्हणजे शकले बाहेर फेकली गेली. ही शकले या गोठत चाललेल्या जनक वायुराशीभोवती वेगवेगळ्या अंतरांच्या कक्षांमधून फिरू लागली. हेच उपग्रह होत. चक्राकार गतीमुळे उडालेली शकले या वायुराशीच्या फुगीर भागातूनच बाहेर पडली असावीत, त्यामुळेच बहुतेक उपग्रह जनक ग्रहाच्या विषुववृत्ताशी अत्यल्प कल ठेवून त्याच्या कक्षीय परिभ्रमणाच्या दिशेने त्याच्याभोवती भ्रमण करीत असलेले दिसतात.
उपग्रहाच्या कक्षेचा बृहदक्ष (लंबवर्तुळाकार कक्षेच्या अक्षांपैकी सर्वांत मोठा अक्ष) आणि त्याचा प्रदक्षिणाकाल माहीत झाल्यास ग्रहाचे वस्तुमान चटकन काढता येते. उपग्रह हा ग्रहाभोवती फिरत असतो खरा, पण ग्रह आणि त्याचे उपग्रह दोघेही मिळून सूर्याभोवती फिरतात. ग्रह आणि उपग्रह हे दोघेही त्यांच्या वस्तुमानाच्या समाईक मध्याभोवती फिरत असतात. ग्रहाच्या मानाने उपग्रहांचे वस्तुमान पुष्कळच कमी असल्यामुळे हा समाईक वस्तुमध्ये ग्रहाच्या पोटातच असतो. काही उपग्रह जनक ग्रहाच्या भ्रमणाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने आणि त्याच्या विषुववृत्त पातळीशी बराच मोठा कोन करून फिरत असलेले असेही आढळतात. या उपग्रहांना अनियमित उपग्रह म्हणणे इष्ट ठरेल. काही उपग्रहांनाच असा अनियमितपणा का आला याबद्दलचा समाधानकारक खुलासा अद्यापि दिला गेलेला नाही. जनक ग्रहातून बाहेर पडल्यावर विशिष्ट परिस्थितीमुळे काही शकले जनक ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेबाहेर फेकली गेल्यामुळे ती सूर्याभोवती फिरू लागली व त्या कक्षेतूनही भ्रष्ट झाल्यामुळे परत जनक ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत आली व त्या कक्षेत शिरतानाच्या विशिष्ट परिस्थितीमुळे ती अशा वक्र गतीने फिरू लागली असा एक खुलासा आहे. पण तो बरोबर असावा असे निश्चित विधान करता येत नाही.
पृथ्वी व चंद्र या ग्रहोपग्रहाच्या जोडीचे एक वैशिष्ट्य आहे. इतर ग्रहांच्या उपग्रहांत आकाराने मोठे असे पाच उपग्रह आहेत व त्यातले तीन वस्तुमानानेही मोठे आहेत, पण त्यांच्या जनक ग्रहाशी त्यांची तुलना करता ते किरकोळ वाटतात. तसे पृथ्वी आणि चंद्राचे नाही. चंद्र व पृथ्वी यांच्या व्यासांचे गुणोत्तर सु. १ : ४ तर गुरूचा सर्वांत मोठा उपग्रह व गुरू यांच्या व्यासांचे गुणोत्तर सु. १ : २४ आणि ढोबळ मानाने हेच गुणोत्तर शनीचा सर्वांत मोठा उपग्रह व शनी यांच्या व्यासांचे आहे. यामुळेच भरती ओहोटीसारखा चंद्राचा प्रभाव पृथ्वीवर दिसतो.
गुरूच्या सात उपग्रहांना नावे दिलेली नाहीत. मार्सडेन नावाच्या ब्रिटिश ज्योतिर्विदांनी हेस्तिआ, हेरा, पोझाइडॉन, हेड्स, डिमिटर, पॅन आणि अड्रॅस्तिआ ही नावे ६ ते १२ या उपग्रहांना सुचविली, पण ती रूढ झालेली नाहीत. शनीला दहावा उपग्रह (यानुस) असल्याचा शोध लागला आहे परंतु त्याची आकडेवार माहिती उपलब्ध नाही. गुरूचे आयो, यूरोपा, गॅनिमिड व शनीचा टायटन या उपग्रहांना विरळ वातावरण आहे.
बहुतेक सर्व उपग्रहांचे कक्षीय परिभ्रमण मूळ ग्रहांच्याच दिशेने (अपसव्य म्हणजे घड्याळाच्या काट्यांच्या हालचालीच्या विरुद्ध दिशेने) असले, तरी गुरूचे ८, ९, ११ व १२ या क्रमांकांचे उपग्रह तसेच शनीचा फीबी, मिरांडा सोडून प्रजापतीचे सर्व उपग्रह व वरुणाचा ट्रायटन हे उलट दिशेने फिरतात.
संदर्भ : Weigert, A Zimmermann, H. Trs. Dickson, J. H. ABC Of Astronomy, London, 1967.
काजरेकर, स. ग.