उत्तरा भाद्रपदा: भारतीय नक्षत्रमालेतील सव्विसावे नक्षत्र. अल्फेरात्झ [भोग ३५०० २८·३’ शर २५० ४०·९’ अंतर १३० प्रकाश वर्षे प्रत २·१२, → ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति प्रत] हा योगतारा (प्रमुख तारा) व उच्चैःश्रव्यातील (गॅमा) अल्जेनीब (प्रत २·८७) हे दोन तारे यात आहेत. कोणी अल्जेनीबऐवजी देवयानीतील बीटा हाही यातील एक तारा समजतात. पेगॅसी चौरसातील पूर्वेकडील हे दोन तारे आहेत. त्यामुळे उत्तराभाद्रपदा ओळखणे सोपे असते. याची देवता अहिर्बुध्नीय व आकृती पलंग असे मानतात. वेदात पूर्वाभाद्रपदा व उत्तराभाद्रपदा या दोहोंचाही प्रौष्ठपदा असा उल्लेख असल्याचे आढळते. या नक्षत्राचा अंतर्भाव मीन राशीत होतो.
पहा : नक्षत्र.
ठाकूर, अ. ना.