उडिपी : कर्नाटक राज्याच्या दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र. लोकसंख्या २९, ७५३ (१९७१). हे मंगलोरच्या उत्तरेस ५४ किमी. आहे. उडुपी अथवा चंद्र तपश्चर्या करून शिवप्रसादाने येथे कलंकमुक्त झाला, या आख्यायिकेवरून गावाला उडिपी (उडुपी, उडुपपूर) नाव पडले. याच कारणाने चंद्रमौलीश्वराचे मंदिर व चंद्रसरोवर येथे आहेत. परशुरामाने सागर हटवून निर्मिलेल्या नवभूमीतील सात क्षेत्रांपैकी रजतपीठ येथे आहे. तेराव्या शतकातील द्वैतवादी वेदान्ती मध्वाचार्यांची ही जन्मभूमी व कर्मभूमी. त्यांनी स्थापन केलेले कृष्णमंदिर येथे असून त्याची पाळीपाळीने दोनदोन वर्षे व्यवस्था पाहणारे वैष्णवांचे आठ संपन्न मठ उडिपीत आहेत. जवळच मणिपाल येथे एक वैद्यक महाविद्यालय आहे. चंदनाचे तेल काढण्याच्या, भात कांडण्याच्या व साखरेच्या गिरण्या आणि मॅकरेल व सार्डिन मच्छी खारवणे हे येथील उद्योग आहेत. पश्चिमेस ७ किमी. वर मालपे बंदर आहे. येथील बरेच लोक भारताच्या इतर राज्यांतही यशस्वी उपहारगृहचालक म्हणून नाणावलेले आहेत.

ओक. शा. नि.