इरेक्थीयम : अथेन्स येथील ⇨ अक्रॉपलिस या किल्ल्यावर असलेले अथीना देवतेचे मंदिर. पौराणिक आख्यायिकेनुसार अथेन्सचा संस्थापक इरेक्थीयस या पौराणिक सम्राटावरून ‘इरेक्थीयम’ नाव आले. नेसिक्लीझ या प्रख्यात ग्रीक वास्तुकाराने सु. ४२१ ते ४०६ इ. स. पू. या काळात या मंदिराची उभारणी केली मात्र अखेरपर्यंत ते अपूर्णावस्थेतच राहिले. पेंटेलिकॉनच्या खाणीतून काढलेल्या पांढऱ्या संगमरवरात हे मंदिर बांधले. त्यात काळ्या दगडाच्या कोरीव नक्षीपटांची रचना होती. या मंदिराची वास्तुरचना सर्वसामान्य ग्रीक मंदिरांहून भिन्न आहे. अनियमित रचनाकल्प, बाह्यस्तंभावलीचा अभाव तसेच तलपृष्ठ व छत यांचे तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर केलेले आयोजन यांत तो वेगळेपणा दिसतो. मंदिरास चार अंतर्दालने व तीन द्वारमंडप होते. आयोनिक स्तंभरचनांचे तीन नमुने त्यात होते. दक्षिणेकडील द्वारमंडपात शीर्षपादास आधार देण्यासाठी वस्त्रविभूषित स्त्रीरूपी सहा स्तंभ होते. या वैशिष्ट्यपूर्ण रचनेचे अनुकरण लंडन येथील सेंट पँक्रसच्या चर्चमध्ये दिसते. इरेक्थीयम मंदिराचा काही भाग अद्यापही अस्तित्वात आहे. अभिजात ग्रीक वास्तुकलेचे हे अवशिष्ट रूप अभ्यसनीय आहे.
इनामदार, श्री. दे.