इरिडियम : घनरूप मूलद्रव्य. चिन्ह Ir. अणुभार १९३·१, अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ७७, आवर्त सारणी (मूलद्रव्यांच्या विशिष्ट पद्धतीने केलेल्या कोष्टकरूप मांडणीतील) गट ८, संक्रमणी मूलद्रव्य [दीर्घ आवर्ताच्या मध्यावरील मूलद्रव्य, → संक्रमणी मूलद्रव्ये], वि. गु. २२·४२ (२०० से.), कठिणता (ब्रिनेल) २१८, द्रवांक (वितळबिंदू) २४५०० से., क्वथनांक (उकळबिंदू) ४२००० से. स्थिर समस्थानिक (तोच अणुक्रमांक पण भिन्न अणुभार असलेले त्याच मूलद्रव्याचे प्रकार) १९१ व १९३, किरणोत्सर्गी (कण वा किरण बाहेर टाकणारे ) समस्थानिक दहा, सामान्य संयुजा ३व ४ यांशिवाय १, २, ५ व ६ संयुजाही आढळतात [→ संयुजा].
गुणधर्म : ही धातू रुपेरी रंगाची असून हवेमध्ये ती गंजत नाही. तीव्र उष्णता दिल्यास थोडेसे बाष्पनशील असलेले ऑक्साइड तयार होते. प्रबल अम्लांचा व सामान्य तापमानास अम्लराजाचाही (संहत नायट्रिक अम्ल व संहत हायड्रोक्लोरिक अम्ल यांच्या १ : ३ प्रमाणातील मिश्रणाचाही) परिणाम या धातूवर होत नाही. तिच्या गटातील इतर धातूंबरोबर व विशेषत: प्लॅटिनमाबरोबर तिच्या मिश्रधातू बनविता येतात. इरिडियमाचा विद्राव करण्यासाठी क्षारीय (अल्कलाइन) ऑक्सिडीकारक [ऑक्सिडीकरण क्रिया घडविण्यास मदत करणारा, → ऑक्सिडीभवन] अभिवाह (पदार्थाचा वितळबिंदू कमी करण्यासाठी त्यात मिसळलेला पदार्थ) वापरून ती वितळविणे जरूर असते. सहसंयुजी (दोन अणूंत इलेक्ट्रॉनांची भागीदारी असणारे) संयुग घडविण्याकडे इरिडियमाचा अतिशय कल आहे.
प्राप्ती : इरिडियम ही प्लॅटिनम गटातील असून, ती नेहमी प्लॅटिनमाच्या धातुपाषाणात सापडते. १८०४ मध्ये स्मिथसन टेनंट यांनी ती शोधून काढली. प्लॅटिनमच्या निष्कर्षणामध्ये (धातुपाषाणापासून धातू मिळविण्याच्या क्रियेमध्ये) मिळणारे ऑस्मिरिडियम द्रव्य जस्ताबरोबर वितळवून नंतर ते हायड्रोक्लोरिक अम्लाबरोबर शिजविल्याने तिची बारीक पूड मिळते. ही पूड क्षारीय ऑक्सिडीकारक अभिवाहाच्या योगाने वितळवून अम्ल-विद्राव्य स्थितीत आणतात. हीच कृती पुन:पुन्हा करतात. नंतर विद्राव्य सोडियम क्लोरोइरिडेट बनवितात. त्यापासून अविद्राव्य अमोनियम किंवा पोटॅशियम क्लोरोइरिडेट तयार करतात. ते तापविले म्हणजे धातुरूप इरिडियम मिळते.
शिशामध्ये सोने वगैरे अभिजात धातू विद्राव्य आहेत, पण इरिडियम अविद्राव्य असल्यामुळे ह्या गुणधर्मांचा उपयोग करून इरिडियम निराळी करतात.
उपयोग : इरिडियमाच्या न गंजण्याच्या गुणामुळे ऑक्सिडीभवन होणार नाही, अशा वातावरणात उच्च तापमानासाठी वापरण्यात येणार्या मुशींकरिता ती वापरतात. जेथे शुद्ध प्लॅटिनम मऊ असल्यामुळे वापरता येत नाही, तेथे प्लॅटिनम-इरिडियम यांची कठीण असलेली मिश्रधातू वापरतात. ही मिश्रधातू दागिने तयार करण्यासाठी तसेच विद्युत् उपकरणांतील रोधक तारा, विद्युत् अग्रे इत्यादींसाठी वापरतात. ऑस्मियम व इरिडियम यांच्या मिश्रधातूचा फौंटनपेनांची निबे बनविण्यासाठी उपयोग करतात. इरिडियम (१९२) या किरणोत्सर्गी समस्थानिकाचा कर्करोगावरील उपचारासाठी उपयोग करतात.
कारेकर, न. वि.