इराण : पश्चिम आशियातील एक इस्लामी राष्ट्र. क्षेत्रफळ १६,४८,००० चौ. किमी. लोकसंख्या ३,०१,५१,२७५ (१९७१ अंदाज). सीमांची लांबी ४,४१८ किमी. विस्तार २५ उ. ते ४० उ. आणि ४४ पू. ते ६३ पू. इराणच्या उत्तरेस रशिया वा कॅस्पियन समुद्र, पूर्वेस अफगाणिस्तान व पाकिस्तान, दक्षिणेस इराणचे व ओमानचे आखात आणि पश्चिमेस इराक व तुर्कस्तान हे देश आहेत. इराणच्या आखातातील हॉर्मझ, लाराक, किश्म, हेंगाम, फोरूर, क्वैस, हेंडोराबी, शेखसार, शेख शोएब, खार्क व खार्कू अशी अनेक बेटे इराणच्या मालकीची असून बहरीन बेटांवरही तो आपला ताबा सांगतो. १९३५ पासून हा देश पर्शियाऐवजी इराण म्हणून ओळखला जाऊ लागला.

भूवर्णन: इराणी पठाराचा पश्चिमेकडील दोन तृतीयांश भाग इराण देशाने व्यापला असून, हे पठार म्हणजे आल्प्स-हिमालय ह्या वलीकृत पर्वतश्रेणींचा एक महत्त्वाचा भाग समजले जाते. कुह-इ-दिनारमध्ये तसेच झॅग्रॉस पर्वतराजीत आढळणारे तांबड्या व हिरव्या रंगांचे शैल हे कॅंब्रियन युगातील मानतात. जुना तांबडा वालुकाश्म वायव्य, उत्तर व पूर्व इराणमध्ये पुष्कळ प्रमाणात सापडतो. टेथिस समुद्राखाली हा प्रदेश प्राचीन काळी असताना, ह्या वालुकाश्माचे जाड, काळ्या कार्बनयुक्त चुनखडीत रूपांतर झालेले होते. ट्रायासिक काळात सामुद्रीय अवसादन झाले होते. लोअर जुरासिक काळात झॅग्रॉसमध्ये मोठ्या प्रमाणात चुनखडीचे साठे उपलब्ध होते. एल्बर्झ पर्वतातही लाव्हारसाचे उद्रेक झालेले होते. इराणमधील बाख्तियारी पर्वतसमूह, उंचावलेले आखातीय किनारे आणि भ्रंशरेखा, यांवरून मुख्य पर्वतराजी फ्लायोसीन युगातीलच दिसतात. फ्लायोसीन युगात आझरबैजान (कुह-ए-साबालान, कुह-ए-सहांद पर्वत), एल्बर्झ (डेमॅव्हेंड पर्वत), केरमान (कुह-ए-हाझारान, कुह-ए-लालेह झार पर्वत) व बलुचिस्तान (कुह-ए-ताफ्तान, कुह-ए-बाझमान) या ठिकाणी ज्वालामुखीक्रिया घडल्याचे आढळते. अजूनही इराणमध्ये भूकंप होतातच. पश्चिमेस व आग्‍नेयीस पर्वतराजी रुंदावलेल्या असून त्यांना झॅग्रॉस पर्वतश्रेणी असे संबोधतात. सरासरी २,४४० ते ३,०५० मी. पासून ३,६६० ते ३,९६० मी. पर्यंत उंच पर्वतशिखरे या श्रेणीत आढळतात. उत्तरेकडील एल्बर्झ पर्वतराजीत डेमॅव्हेंड ५,६६२ मी. व आलम कूह ४,८३६ मी. ही सर्वोच्च शिखरे आहेत. अंतर्भागात मोठे पठार असून विस्तीर्ण दऱ्या तसेच घळ्या आहेत. पर्वतरांगा वायव्येकडून आग्‍नेयीकडे पसरलेल्या आहेत. पूर्वेकडे, उत्तर-दक्षिण असा एक मार्ग इराणी पठार व अफगाण-बलुची पठार ही एकमेकांपासून अलग करतो. वायव्येपासून आग्‍नेयीकडे दर्‍या व घळ्या यांची उंची १,२२०–१,८२० मी. पासून ४५६–३०० मी. इतकी खाली येते. झॅग्रॉस व एल्बर्झ पर्वतश्रेणी इंग्रजी  ‘व्ही’ अक्षराप्रमाणे पसरलेल्या आहेत. एल्बर्झ पर्वतश्रेणी व बलुचिस्तान यांमध्ये मोठी वाळवंटे आहेत. त्या भागाच्या वायव्येस-दश्त-इ-कावीर व आग्‍नेयीस दश्त-इ-लूत या दोन्ही वाळवंटांच्या दरम्यान अनेक मरूद्याने आहेत. त्यांपैकी ताबास हे सर्वांत प्रसिद्ध आहे. आरास, साफिद रूद, आत्रेक ह्या नद्या उत्तरेकडील पर्वतांतून, तर पश्चिमेकडील पर्वतांतून कारखेह, देझ, कारून व मांड ह्या नद्या उगम पावतात. अंतर्भागातून कारासू, रूद ए कूम, झायांदेह रूद, कोर, कालशूर ह्या नद्या उगम पावतात. हंगामी प्रवाहही पुष्कळ आहेत. कारून हीच काय ती वाहतुकीस योग्य (११२ किमी. पर्यंत) नदी आहे. इतर नद्या अतिशय उंचीवरून खाली वहात येत असल्यामुळे त्यांचा वाहतुकीस उपयोग नसला, तरी त्यांच्या जोरावर वीज निर्माण केली जाते. उर्मिया सरोवर, कॅस्पियन, इराणचे आखात व मध्य वाळवंट यांकडे नद्या वहात जातात.

इराणचे भूरचनेच्या दृष्टीने सात भाग पडतात :

(१) आझरबैजान : हा प्रदेश भ्रंशित भूमिखंड व खोरी ह्यांनी बनला आहे. खोऱ्यांतून वहात गेलेले पाणी पुढे उर्मिया ह्या उथळ व खाऱ्या सरोवरास जाऊन मिळते. बाकीचे पाणी आरास, लिटल् झॅब व किझिल उझुन ह्या नद्यांतून जाते. भौगोलिकदृष्ट्या आझरबैजानचा प्रदेश म्हणजे पूर्व ॲनातोलिया, ट्रान्स कॉकेशिया व इराणचा अंतर्भाग ह्यांमधील संक्रमणप्रदेश समजला जातो. एकेकाळी हा प्रदेश युद्धभूमीचे केंद्र होता. याच भागात कुह-ए-साबालान हे ज्वालामुखीशिखर (४,५७२ मी.) आहे. आझरबैजानमधील हिवाळे अतिशय कडक व हिमयुक्त, तर उन्हाळे उष्ण व शुष्क असतात. येथील पठारांवर उत्तम कुरणे असल्यामुळे तेथे भटक्या टोळ्यांचे-कुर्द व शाहसेवान-प्राबल्य आढळते. उर्मिया सरोवराच्या सभोवतालचे सपाट मैदानी प्रदेश जलसिंचित असून दाट लोकवस्तीचे आहेत. ताब्रीझ हे शहर उर्मियाच्या दलदली किनार्‍यापासून ५६ किमी. असून ते इराणचे दुसर्‍या क्रमांकाचे शहर, मोठी बाजारपेठ व मार्गकेंद्र आहे.

(२) झॅग्रॉस पर्वत : हा जुरासिक काळातील आहे आझरबैजानच्या सरहद्दीपासून बंदर आब्बासच्या ईशान्येपर्यंत तो १,४०७ किमी. लांब पसरलेला असून, त्याची रुंदी ३२१ किमी. आहे. उत्तरेस ही पर्वतराजी फार उंच नसली, तरी देझ दरी व शीराझच्या ईशान्येपर्यंतच्या भागामध्ये तिची उंची ४,२६७ मी. असून पुढे ती दक्षिण फार्स व लुरिस्तानपर्यंत गेलेली आहे. हिवाळी हिमवर्षाव आणि विपुल झरे यांमुळे येथील नद्यांना बारमहा भरपूर पाणी असते. बगदाद-तेहरान यांमधील केरमानशाह मार्गावर आणि बूशीर-शीराझ मार्गावर महत्त्वाची शहरे वसली आहेत. खोरामाबादमधून एक चांगला रस्ता जातो ट्रान्स-इराणियन लोहमार्ग देझ घळईतून गेलेला आहे. नैर्ऋ‌त्य झॅग्रॉसच्या पायथ्याशी तेल सापडले असून लाली (कारून नदीवरील) आणि गख सारान यांमधील भागांत तेलउत्पादन होते.

(३) मकरान : हा किनारीय प्रदेश मैदानी व काही ठिकाणी डोंगराळ असून ह्या डोंगराळ भागाचा एक फाटा बंदर आब्बासच्या पूर्वेस उत्तर-दक्षिण गेलेला आहे तेथून तो पुढे पूर्वेस वळून नैर्ऋ‌त्य पाकिस्तानात जातो. हा प्रदेश अतिशय रुक्ष असून तेथे वनस्पती तुरळक आहेत. किनारीय मैदानी प्रदेशच लागवडीस आणतात. मासेमारी हा येथील एक प्रमुख व्यवसाय आहे माशांची निर्यातही करतात. अंतर्भागातील दर्‍यांमधून खजुरीचे पीक काढतात.

(४) उत्तर सीमा प्रदेश : यात एल्बर्झ पर्वत व खोरासानच्या सीमावर्ती पर्वतरांगा येतात. एल्बर्झ पर्वतराजी कॅस्पियन समुद्राच्या दक्षिणेकडील किनार्‍यासभोवती तुटक वर्तुळाकार पसरली आहे. यांमधील कित्येक शिखरे ५,६०० मी. पर्यंत उंच आहेत. कॅस्पियनचा मैदानी प्रदेश सर्वत्र ८० किमी. रुंद असून तो दलदलीच्या खारकच्छ किनार्‍यापासून उंचावत गेला आहे. पूर्वीचे घनदाट अरण्य बरेचसे तोडण्यात आले आहे. येथील उष्ण व दमट हवामान भात, तंबाखू, कापूस, लिंबू जातीची फळे व चहा अशा विविध पिकांना अतिशय अनुकूल आहे. हा इराणमधील सर्वाधिक लोकवस्तीचा प्रदेश आहे. पूर्वेकडे एल्बर्झ पर्वतराजी उंचीला कमी कमी होत जाऊन शेवटी  ५६पू. येथे ती आग्‍नेयीला वळते. तेथून खोरासान पर्वतश्रेणी सुरू होते. तिच्यात कुह-इ-आलादाघ आणि कुह-इ-बिनालूद (३,४१३ मी.) तसेच कोपेतदा (३,०४८ मी.) ही पर्वतशिखरे आहेत. यांमधील विस्तीर्ण खोऱ्यांतून मोठ्या प्रमाणावर शेती करतात, तर उंच भागांचा उपयोग चराऊ कुरणांसाठी होतो. मेशेद हे शहर याच भागात वसले असून ते इराणचे एक धान्याचे कोठार त्याचप्रमाणे धार्मिक स्थान म्हणूनही प्रसिद्ध आहे.

(५) मध्य पठार : हा अल्पजल प्रदेश आहे. कूम शहराच्या पश्चिमेकडून येझ्द व केरमान ह्यांना ओलांडून सरहाद-ए-बालामध्ये घुसणाऱ्या पर्वतमालिकेला मध्य इराणी पर्वतश्रेणी म्हणतात. इतरही अशाच मोठ्या पर्वतश्रेणी आहेत. उदा., तब्बास-केरमान व कुहिस्तान-सरहाद. या पर्वतश्रेणी बलुचिस्तानच्या पर्वतराजीस मिळतात. दश्त-इ-लूत व दश्त-इ-कावीर ही दोन मोठी वाळवंटे या भागत असून त्यांनी ९८,४२० चौ. किमी. प्रदेश व्यापला आहे. हा प्रदेश ओसाड व निर्मनुष्य आहे. दश्त-इ-लूत हे वाळवंट खडकाळ आहे. दश्त-इ-कावीरमध्ये मिठाचे कणही बर्‍याच प्रमाणात आहेत. वायव्य भागात तेहरान, काझ्वीन, कूम, माहालात, इस्फाहान, नीशापूर यांसारखी अतिशय मोठी मरूद्याने आहेत.

(६) पूर्व सीमावर्ती प्रदेश : इराणची पूर्व सीमा देशाच्या सर्वसामान्य रचनेच्या दिशेला छेदून जाते. उत्तरेकडे ती हरीरूद नदीच्या घळईला अनुवर्ती जाते, मध्यभागी ती सीस्तान द्रोणीस छेदते व दक्षिणेकडे ती बलुचिस्तानचे कडे पार करते. हा सीमाप्रदेश ओसाड व निर्मनुष्य असून तेथे पाऊस थोडा पडतो. तपमान अतिकडक व वारे सोसाट्याचे असतात. जूनपासून उत्तरेकडून अतिशय सोसाट्याचे वारे १२० दिवस वाहत असतात ते जमीन पुष्कळ प्रमाणात उखडून टाकतात व वालुकागिरी निर्माण करतात. सीस्तान द्रोणीचा खालचा भाग हामून-इ-साबेरी या गोड्या पाण्याच्या सरोवराने व्यापला आहे.

(७) खुझिस्तान मैदान : हे इराणी आखाताच्या उत्तरेस झॅग्रॉस पर्वत व इराकची सीमा यांमध्ये पसरलेले आहे. हा प्रदेश प्राचीन ईलम संस्कृतीचे माहेरघर होता. या प्रदेशाला पर्शियन साम्राज्ये व इस्लाम यांच्या संदर्भात महत्त्व आले होते. हा सपाट व उजाड प्रदेश होता, तथापि झॅग्रॉस पर्वताजवळ सापडलेल्या पेट्रोलियमच्या खाणींमुळे खुझिस्तान आता इराणचा सर्वांत महत्त्वाचा प्रांत बनला आहे.

हवामान : इराणचे हवामान खंडांतर्गत म्हणजे कडक उन्हाळा व कडक हिवाळा असे असते. उन्हाळा दीर्घकालिक, उष्ण व किनारी प्रदेशांतील दमटपणा वगळल्यास, अतिशय रुक्ष व कोरडा असतो. उत्तरेकडील वार्‍यांचे प्रमाण मोठे आहे. तेहरान (१,२१९ मी.) चे जुलैमधील सरासरी किमान तपमान २९ से. आहे. जुलै-ऑगस्ट या महिन्यांतील दैनिक सरासरी कमाल तपमान ४३ ते ४६ से. असते. परंतु रात्री फार थंड असतात. समुद्रसपाटीपासून १,८३० ते २,१३५ मी. उंचीवरील प्रदेशांत उन्हाळे सुखकर असतात. उन्हाळ्यात या ठिकाणी केवळ मेंढ्यांचे कळपच नव्हे, तर अनेक लोकही येऊन राहतात. आवाझ शहरात जुलै व  ऑगस्टमध्ये किमान व कमाल तपमान अनुक्रमे ३८ से. व ४९ से. असते. इराणच्या आखातावरील बंदरे थोडीफार थंड, परंतु बहुतेक काळ अतिशय दमट असतात. पठारावरील प्रदेशात शरद ऋतू बरा वाटतो परंतु उत्तरेकडील व पश्चिमेकडील उंच प्रदेशात वसंत ऋतूही उशीरा येतो, तो थंड व आर्द्र असतो. हिवाळ्यात मध्य आशियातून थंडगार व कोरडे वारे येतात. आझरबैजान हा सर्वांत अधिक थंडीचा प्रांत आहे. जानेवारीत ताब्रीझ (१,४०० मी.) येथे सरासरी तपमान १.७ से. असून किमान तपमान शून्याच्याही खाली जाते. उष्ण हवामानाचा प्रदेश वगळल्यास सर्वत्र दाट धुके आढळते. हिवाळ्यात भूमध्यसागरी प्रदेशाकडूनही वारे येतात. ते सौम्य व दमट असतात. उत्तर व पश्चिम इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होते, तर दक्षिणेकडे पावसाळी वादळे होतात. दक्षिण इराणमध्ये हिवाळ्यात पाऊस पडतो, तर उत्तर व पश्चिमेकडील उंच प्रदेशांत तो एप्रिल किंवा मे महिन्यात येतो. या प्रदेशातील शेती पावसावरच अवलंबून असते. या प्रदेशात साधारणत: ३० सेंमी, तर झॅग्रॉसच्या काही भागांत ५०–७५ सेंमी., एल्बर्झ पर्वताच्या कॅस्पियनकडील उतारावर १०० सेंमी. हून जास्त पाऊस पडतो. खोरासानमधील पर्वत श्रेणींमध्ये त्याचे प्रमाण ५० सेंमी. एवढेच आहे. ग्रेट कावीर, लूत व सीस्तान या वाळवंटी प्रदेशांत पाऊस १० सेंमी. हूनही कमी पडतो. अनियमित पर्जन्यमान हे बहुतेक भागांचे वैशिष्ट्यच आहे. तेहरान येथे १० ते ५० सेंमी. पर्यंत, तर बूशीर येथे ५ ते ६५ सेंमी. पर्यंतही पाऊस पडतो. वर्षातून जवळजवळ सहा महिने आकाश निरभ्र राहते. ऋतूंमध्ये अचानक बदल होत असतो. एल्बर्झ व झॅग्रॉस पर्वतराजींची उत्तुंग शिखरे नेहमीच बर्फाच्छादित असतात व तेथे हिमनद्याही आढळतात. बर्फ वितळावयास मार्च वा एप्रिलमध्ये प्रारंभ होतो. इराणमधील नव्या वर्षाच्या सुरुवातीस-वसंत ऋतूचा पहिला दिवस-फळबागा फळांनी डवरून जातात व अनेक रानफुलांना बहर येतो.

वनस्पती : इराणमध्ये हवामान व पर्जन्य यांच्या विविधतेमुळे वनस्पती व प्राणी यांबाबतही विविधता आढळते. देशाच्या मध्य भागतील खारट दलदली व वाळवंटे यांमध्ये प्राणिजीवनाचे प्रमाण फारच थोडे, तर कॅस्पियनतटवर्ती प्रदेशात प्राणिजीवनाचे व वनस्पतींचे प्रमाण मोठे दिसून येते. इराणमध्ये १०,००० हून अधिक वनस्पतींच्या जाती आहेत कॅस्पयन किनार्‍यावरील हिर्केनियन जंगलात मुबलक पाऊस असल्याने तेथे उंच पानझडी वृक्ष, कॉकेशियन विंगनट व कॅस्पियन हनी, लोकस्ट या प्रकारच्या वृक्षांचे वैपुल्य आहे. एल्बर्झच्या पूर्वेकडील उतारावर अक्रोड, ओक, मॅपल, बीच, ॲश, एल्म, हॉर्नबीम, सायप्रस, सीडार, बॉक्सवुड आणि मिमोसा हे वृक्ष पठारावर विलो, अक्रोड, टॉल पॉप्लर, तुती ह्या जातींची झाडे फार सापडतात. ट्यूलिप, गुलाब, ग्लॅडिओला, बेलफ्लॉवर, जिरेनियम, प्रिमरोज, व्हॉयोलेट ही फुलझाडेही उगवतात. स्टेप भागात सेल्व्हिया, कुझिनिया, फेनेल ह्यांसारख्या खुरट्या वनस्पती कमी उंचीच्या प्रदेशात वर्मवुड अर्धवाळवंटी प्रदेशात कॅमल्स थॉर्न दक्षिणेकडील उष्ण प्रदेशात कोनार, काहूर, ॲकेशिया व बलुचिस्तानमध्ये खुजी ताडझाडे आहेत. खजुरीची झाडे हे येथील ठळक वैशिष्ट्य आहे.

प्राणी : सस्तन प्राण्यांच्या शंभरांहून अधिक जाती, त्यांतही १८ टक्के स्थानिक, इराणमध्ये आढळतात. सिंह हे अर्वाचीन इराणचे राष्ट्रीय चिन्ह असूनही ते लुप्तप्रायच झालेले आहेत. कॅस्पियन अरण्यात थोडेफार वाघ आहेत परंतु बिबळे व रानमांजरे मोठ्या प्रमाणात आहेत. चित्ते, कोल्हे, लांडगे, तपकिरी अस्वले, रानटी डुकरे, जर्बोआ, मुंगूस, साळिंदर, डोंगराळ भागात रानमेंढ्या व आयबेक्स, स्टेप प्रदेशात व वाळवंटी भागात अनुक्रमे पर्शियन काळवीट व रानगाढवे आढळतात. कॅस्पियनच्या सखल भागात पक्ष्यांच्या ३२० पेक्षा अधिक जाती आहेत. कवडा, पाणलावा, ग्राऊझ असे शिकारीचे पक्षी आहेत. कॅस्पियनचा किनारा व सीस्तान भागात हंस, बदके, तर दक्षिणेकडील सरोवरांत व इराणी आखाताच्या किनार्‍यावर पाणकोळी आणि हंस पक्षी मोठ्या संख्येने आढळतात. विविध प्रकारची घुबडे, बहिरी ससाणे, गिधाडे, डोमकावळे, मॅगपाय, ऑरिओल, जे, रॉबिन, कबुतरे, बुझर्ड, केस्ट्रेल वगैरे पक्षी आहेत. गरुडपक्षीही पुष्कळ आहेत. एल्बर्झमधून उगम पावणार्‍या नद्यांमध्ये छब, बार्बेल, ट्राऊट, कॅटफिश, तर कॅस्पियनमध्ये स्टर्जिअन व सॅमन आणि दक्षिणेकडील नद्यांमधून विविध प्रकारचे कार्प मासे आढळतात. ग्रीक कासवे, सरडे, नाग व व्हायपरही बरेच आढळतात.

गद्रे, वि. रा.

इतिहास : इराणची प्राचीन संस्कृती समृद्ध होती. प्राचीन इराणी साम्राज्यात अनेक राजघराणी होऊन गेली [→ इराणी संस्कृति ]. सातव्या शतकात इराणी साम्राज्य इस्लामी सत्तेखाली गेले आणि प्राचीन इराणी संस्कृती संपुष्टात आली. ६३३ मध्ये अरब लोकांनी सॅसॅनिडी अंमलाखालील इराक उद्ध्वस्त केला. त्याच वर्षीच्या मे महिन्यात अरबांनी इराणवर आक्रमणे करून तो प्रदेशही आपल्या अंमलाखाली आणला आणि या प्रकारे बहुतेक सॅसॅनिडी साम्राज्य ६४१ च्या सुमारास मुसलमानांच्या आधिपत्याखाली आले. मुसलमानी सत्तेखाली इराणचा प्राचीन धर्म, भाषा व लिपी संपुष्टात येऊन त्यांची जागा इस्लामी-धर्म आणि अरबी भाषा व लिपी यांनी घेतली.

मध्ययुगात म्हणजे सु. ६६१ ते १२५८ च्या दरम्यान सु. ६०० वर्षे इराण हे खिलाफती सत्तेचा एक घटक होते. ११८५ नंतर खिलाफतीची सत्ता केवळ नाममात्रच उरली होती. वरील काळात प्रथम ⇨ उमय्या खिलाफत (६६१–७५०) व पुढे ⇨ अब्बासी खिलाफत (७५०−१२५८) यांनी इराणवर सत्ता गाजविली. अब्बासी वंशाच्या वेळी इराणने शियापंथ स्वीकारला. अब्बासी वंशाने आपली राजधानी दमास्कसहून इराकमधील बगदाद या स्थळी नेली. त्यामुळे साहजिकच इराणवरील खलीफांचे लक्ष कमी झाले. दहाव्या शतकात अब्बासी वंश कमकुवत झाला. त्या सुमारास खिलाफती शासनाने नेमलेले प्रशासक-राज्यपाल आपापले स्वतंत्र वंश जाहीर करून स्वतंत्र बनले. तहिरिद व सामानिड हे त्यांपैकीच काही प्रमुख वंश होत. बुवैहीद ह्या पश्चिम इराणमधील वंशाने अब्बासीविरुद्ध बंड पुकारले व बगदादचा कबजा घेतला. कमकुवत अब्बासी खिलाफतीची काही सूत्रे बुवैहीद वंशाच्या हाती गेली. इराणच्या खिलाफतीच्या सत्ताधार्‍यांनी इराणमध्ये अनेक सुधारणा केल्या. त्यांपैकी जलसिंचन योजना महत्त्वाच्या होत. या योजनांमुळे शेतीस उत्तेजन मिळाले. त्यांनी कलानिर्मितीलाही उत्तेजन दिले.

भूराजनीतितत्त्वाप्रमाणे इराणचा प्रदेश हा नेहमी रानटी टोळ्यांचे वा परकीय आक्रमकांचे भक्ष्य होई. १०५५ मध्ये सेल्जुक तुर्क मलिक शाह याच्या नेतृत्वाखाली इराणमध्ये घुसले आणि त्यांनी बुवैहीद वंशाची सत्ता नष्ट केली. मलिक शाहच्या मृत्यूनंतर (१०९२) सेल्जुक राज्याचे तुकडे पडले. यानंतर मंगोलांनी इराणवर स्वारी केली. चंगीझखानाचा नातू हुलागूखान याने १२५८ मध्ये अब्बासी खिलाफतीच्या सत्तेखालील उर्वरित भाग उद्ध्वस्त करून तो आपल्या अंमलाखाली आणला. त्याने इल्‌खनिद हा स्वतंत्र वंश स्थापन केला. या वंशाने पुढे इराण, इराक, कॉकेशस, ॲनातोलिया वगैरे प्रदेशांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. हुलागूखानाच्या पुढील वारसांनी इस्लामी धर्माची दीक्षा घेऊन चीनचे राजकीय व धार्मिक वर्चस्वही झुगारून दिले होते. तथापि यानंतरच्या वारसांत एकही कर्तबगार राज्यकर्ता निर्माण झाला नाही. त्यामुळे इराणमधील मंगोल साम्राज्याची १३३५ नंतर शकले झाली आणि त्यांमधून अनेक लहानलहान राज्ये अस्तित्वात आली. तैमूरलंग हा स्वत:स चंगीझखानाचा वारस समजत असे. त्याने इराणवर स्वारी केली आणि सर्व प्रदेश पादाक्रांत केला. त्याच्या मृत्यूनंतर मात्र इराणची सत्ता पुन्हा रानटी टोळ्यांच्या हाती गेली.

तुर्की व मंगोल राजे लुटारू व विध्वंसक होते. मंगोल राजांनी सु. एक शतक इराणवर स्वामित्व गाजविले. त्यांचे धोरण लुटालुटीचे व जाळपोळीचे असले, तरी प्रखर अशा इस्लामी धर्मनिष्ठेमुळे त्यांनी मशिदी बांधल्या व नवीन विद्यालये सुरू केली. तैमूरलंग तर विद्वानांचा चाहता होता. ह्या काळात इराणी वास्तुकलेची भरभराट झाली. लघुचित्रकारांनी अनेक सुंदर कलाकृती निर्माण केल्या. सुलेखनकलाही विकसित झाली. सादी, हाफीझ यांसारखे ख्यातनाम कवी या काळात इराणमध्ये होऊन गेले. म्हणून तुर्की व मंगोल राजांच्या उत्तेजनामुळेच इस्लामी वास्तुशैली वृद्धिंगत झाली, असे मानण्यात येते.

अखेरच्या तुर्की राजांच्या कारकीर्दीत इराणमध्ये अनागोंदी माजली. राज्यपाल व जमाती यांमध्ये वारंवार तंटे-बखेडे माजू लागले. ह्यातूनच सफाविद ह्या मूल इराणी वंशाकडे इराणची सूत्रे गेली. ह्या सुमारास उझबेग जमातीचे प्रमुख व तुर्की राज्यपाल यांत धूमाकूळ चालू होता. सफाविद वंशाचा मूळ संस्थापक इस्माईल हा अली खलीफाच्या वंशातील होता. त्याने आझरबैजान घेऊन स्वत: शाह ही पदवी धारण केली आणि ताब्रीझ या राजधानीतून अधिकृत धर्म म्हणून शिया पंथाची घोषणा केली. त्याने इराणला राष्ट्रीय दर्जा मिळवून दिला. त्याच्यानंतर शाह पहिला अब्बास (१५५८–१६२९) सत्तारूढ झाला. त्याच्या कारकीर्दीत रस्ते, पूल, जलसिंचन इ. योजना अंमलात आल्या इराणने सर्वंगीण प्रगती केली. अब्बासने सोळाव्या शतकात इराणच्या आखातात वसाहती केलेल्या पोर्तुगीजांना हाकलून लावले. सफाविद वंशाच्या कारकीर्दीत ऑटोमन सम्राटांनी इराणवर स्वार्‍या केल्या, पण त्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. अब्बासच्या वेळी १५९८ मध्ये त्याच्याकडे दोन इंग्रज इसम आले होते. त्यापैंकी एकास तोफखान्याची चांगली माहिती होती. त्याच्या साहाय्याने अब्बासने आपले सैन्य सुसज्‍ज केले व ग्रेट ब्रिटनबरोबर व्यापारासाठी संबंध प्रस्थापित केले. इंग्रज व्यापार्‍यांना सवलती मिळाल्या. अब्बास निष्ठावान शिया पंथीय होता. त्याने इमामरेझा हे आठव्या इमामचे स्मारक मेशेद या ठिकाणी बांधले. अब्बासनंतर गादीवर आलेले राजे कर्तृत्वशून्य व दुर्बल होते. त्यांना रशियन व अफगाण लोकांची आक्रमणे थांबविता आली नाहीत. १७२२ मध्ये अफगाणांच्या एका लहान तुकडीने इस्फाहान राजधानी काबीज केली व शाह हुसैन या शेवटच्या सफाविद सत्ताधीशास पदच्युत केले. १७२९ मध्ये अफ्शार वंशातील नादीरखान या पुढार्‍याने अफगाणांना इराणमधून हाकलून देऊन सफाविद वंशाची पुन्हा स्थापना करतो, असा आविर्भाव आणला आणि प्रत्यक्षात सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने अफगाण व रशियन या दोघांनाही पिटाळून लावले आणि काही वर्षांनी पुढे १७३६ मध्ये नादीरशाह ही पदवी धारण केली. १७३८ मध्ये त्याने हिंदुस्थानवर स्वारी करून अमाप लूट नेली. त्यातच मयूर सिंहासन होते. त्याची कारकीर्द लूट, जाळपोळ व रक्तपात ह्यांनी भरलेली होती. त्यामुळे १७४७ मध्ये झांड वंशाने (१७५०–१७९४) त्याविरुद्ध उठाव केला. त्यात नादीरशाहचा खून झाला. साहजिकच झांड वंशाकडे इराणची राजकीय सूत्रे गेली. त्याचा संस्थापक करीमखान याने राजधानी शीराझ येथे नेली व ते शहर सुशोभित केले. परंतु थोड्याच अवधीत कजार व झांड ह्या वंशांत यादवी युद्धास प्रारंभ होऊन १७९४ मध्ये झांड वंशाचे वर्चस्व संपुष्टात आले. त्यात आगा मुहंमदखान कजार या धोरणी हिजड्याचा सिंहाचा वाटा होता. त्याने कजार या तुर्की वंशाची स्थापना केली (१७९४−१९२५).

ह्या सु. सव्वाशे वर्षांच्या काळात जरी इराण हा कोणत्याही पाश्चात्त्य राष्ट्राची वसाहत नव्हता, तरीसुद्धा गूलिस्तान (१८१३) व तुर्कमानचाई (१८२८) या तहांनी त्यास कॉकेशियासारखा भाग गमवावा लागला. हेरात हा सुपीक भाग अफगाणांनी घेतला, तर तेलाच्या शोधामुळे रशिया व ब्रिटन यांत इराणबद्दल सत्तास्पर्धा सुरू झाली. एकूण इराणच्या इतिहासातील हा अत्यंत अपकर्षाचा काळ समजला जातो. पहिल्या महायुद्धात इराण तटस्थ राहिला, तरीसुद्धा रशिया व तुर्कस्तान यांनी उत्तर इराणचा काही भाग गिळंकृत केला. त्याकरिता १९१९ च्या पॅरिस शांतता तहात इराणने आपल्या प्रदेशाची मागणी केली, त्यात इराणला न्याय मिळाला नाही. इराण फक्त राष्ट्रसंघाचा सभासद झाला. पुढे अवचित सत्तांतरानंतर रशिया व इराण यांत तह होऊन रशियाने व्यापलेला प्रदेश इराणला परत मिळाला. तसेच इराणमध्ये मजलिस स्थापन होऊन संविधानात्मक सत्ता आली व शाहने त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यानुसार १९२५ मध्ये पेहलवी घराण्यातील रेझाशाह गादीवर निवडून आला. दुसर्‍या महायुद्धात इराणला तटस्थ राहणे अशक्य होते. कारण जर्मन फौजांनी रशियाचा पश्चिम भाग व्यापला होता आणि हळूहळू त्या इराणच्या उत्तरेकडे घुसत होत्या. ब्रिटन व रशिया  यांच्याशी रेझाशाह मैत्रीचा करार करू शकला नाही, तेव्हा १९४१ मध्ये त्याने राज्यत्याग केला. त्याचा मुलगा मुहम्मद हा राजा झाला. दि. ९ सप्टेंबर १९४३ रोजी इराणने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. मित्र राष्ट्रांनी इराणला सर्वोतोपरी साहाय्य करण्याचे कबूल केले. पुढे तेलाच्या साठ्याबाबत रशिया व इराण यांत वितुष्ट आले, पण कालांतराने १९४६ मध्ये रशिया-इराण तह मजलिसने धुडकावून लावला आणि इराण हे स्वतंत्र राष्ट्र असल्याची ग्वाही देण्यात आली. १९५१ मध्ये मजलिसने सर्व तेलसाठ्यांचे राष्ट्रीयीकरण केले.

देशपांडे, सु. र.

राजकीय स्थिती: १९०६ पर्यंत निरंकुश सत्ताधीश असलेल्या इराणच्या शहाने त्याच वर्षी राष्ट्रीय विधानसभा किंवा मजलिस स्थापण्यास अनुमती दिली. मजलिसने देशाचे संविधान तयार केले. ३० डिसेंबर १९०६ रोजी शहाचे त्यावर शिक्कामोर्तब झाले. संविधानात सीनेटच्या स्थापनेची तरतूद असली, तरी प्रत्यक्षात ती फेब्रु. १९५० मध्ये स्थापन झाली. सीनेटचे ६० सभासद असतात त्यांपैकी निम्मे शहा नेमतो व उर्वरित ३० सभासदांची (त्यांतही १५ सभासद तेहरानमधून व १५ इतर प्रांतांतून) निवडणूक होते. सर्व सीनेटर मुस्लिम असावे लागतात त्यांची मुदत सहा वर्षांची असते. १९४९, १९५७ व १९६७ मधील संविधानांतील दुरुस्त्यांनंतर मजलिसच्या सभासदांची संख्या १३६ वरून २२० वर नेण्यात येऊन त्यांची मुदतही दोन वर्षांवरून चार वर्षांची करण्यात आली. संसदेचे एक वा दोन्ही गृहे बरखास्त करण्याचा तसेच वित्तविधेयके मजलिसकडे पुनर्विचारार्थ पाठविण्याचा अधिकार इराणच्या शहाला आहे.

संसदेच्या जुलै १९७१ मधील निवडणुकीनंतर विविध पक्षांना दोन्ही सभागृहांत (सीनेट व मजलिस) अनुक्रमाने पुढीलप्रमाणे जागा मिळाल्या : (१) इराण नोव्हिन पार्टी (नव इराण पक्ष) : २८/२३० (२) मार्डोम पार्टी (पीपल्स पार्टी) x / ३७ (३) पॅन इराणियन पार्टी १९७१ च्या निवडणुकीवर बहिष्कार घातला (४) अपक्ष x / १. ह्याशिवाय देशात मेलीयून पक्ष (स्था. १९५८) असून तूदेह पक्षावर (कम्युनिस्ट पक्ष) १९४९ पासून बंदी घालण्यात आली. ऑगस्ट १९६९ पासून इराणचे पंतप्रधान अमीर अब्बास होवैदा हे आहेत.

प्रशासनाच्या दृष्टीने इराणचे १४ प्रांत (उस्तान), ६ गव्हर्नर जनरलच्या अधिकारातील विभाग, १४५ गव्हर्नरांच्या अधिकाराखालील विभाग व ४५४ जिल्हे बनविण्यात आले आहेत. प्रांत ‘शहरेस्तानां’त काउंटी) विभागण्यात आले असून, प्रत्येक शहरेस्तानावर एकेक फर्मानदार प्रशासन करतो. शहरेस्तानांचे ‘बक्श’ (जिल्हे) व ‘देहिस्तान’ (खेडेगावांचा समूह) असे विभाग पाडण्यात आले असून पहिल्यावर ‘बक्शदार’ व दुसर्‍यावर ‘देहदार’ प्रशासन करतो. प्रत्येक खेडेगावात एक ‘कादखोदा’ (गावप्रमुख) असतो. कादखोदा वगळता, सर्व प्रमुखांच्या नेमणुका केंद्रशासनाद्वाराच होतात. सेंट्रल प्रॉव्हिन्स (राजधानी तेहरान), खोरासान (मेशेद), इस्फाहान (इस्फाहान), पूर्व आझरबैजान (ताब्रीझ), पश्चिम आझरबैजान (रेझाईया), खुझिस्तान (आवाझ), माझांदेरान (सारी), फार्स (शीराझ), गिलान (रेश्त), केरमान (केरमान), केरमानशाहान (केरमानशाह), पोर्टस अँड आयलंड्स ऑफ द सी ऑफ ओमान (बंदर आब्बास), बलुचिस्तान-सीस्तान (झाहिदान) व कुर्दिस्तान (सानान्दाज) हे प्रांत आणि हामादान, लुरिस्तान, सेमनान, चारमहल व बख्तियारी, ईलम आणि कोह किलुएह व बायर अहमदी हे गव्हर्नर जनरलच्या अधिकारातील विभाग होत.

इराणमधील न्यायव्यवस्था फ्रान्सच्या धर्तीवर बनविलेली आहे. खेडेगावे व लहान शहरे यांमध्ये जे. पी. (जस्टिस ऑफ द पीस) मोठ्या शहरांत उच्च न्यायालये सर्व महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस दंडाधिकारी तेहरान, ताब्रीझ, शीराझ, केरमानशाह, इस्फाहान, मेशेद, केरमान आणि आवाझ ह्या शहरांत अपील न्यायालये आणि तेहरानमध्ये सर्वोच्च न्यायालय अशी व्यवस्था आहे. न्यायमंत्रालयाद्वारा सर्व न्यायसंस्थांवर देखरेख ठेवण्यात येते. १९३० च्या सुमारास फ्रेंच व स्विस संहितांवर आधारित नवीन दिवाणी, फौजदारी व वाणिज्यविषयक संहिता इराणमध्ये लागू करण्यात आल्या.

संरक्षण :भूदलामध्ये सु. दोन लक्ष सैनिक असून पायदळ, चिलखती विभाग व साहाय्यकारी सेना अशा विभागांत ते संघटित करण्यात आले आहे. प्रत्येक नागरिकास दोन वर्षांची सक्तीची लष्करी सेवा असते. पोलिसांची संख्या सु. २५,००० आहे. भूदल व पोलिसदल या दोघांनाही सल्ला देण्याकरिता अमेरिकेची दोन लष्करी शिष्टमंडळे आहेत. नौदलात विनाशिका, फ्रिगेट, कार्व्हेट, माइनस्वीपर, पेट्रोलबोटी, हॉव्हरक्रॅफ्ट, तेलवाहू, जलवाहू इ. मिळून ५३ विविध प्रकारची जहाजे आहेत. ग्रेट ब्रिटनकडून इराणने १९६६ मध्ये एक विनाशिका व १९६७–७० या काळात चार फ्रिगेट खरेदी केल्या. १९५५ मध्ये स्थापन झालेल्या वायुदलात १९७० साली चार विंग होत्या. फायटर बाँबर, फँटम इंटरसेप्टर व सेबर फायटरची प्रत्येकी दोन पथके, टेहळणीविमानांचे व हवाई-वाहतुकीचे प्रत्येकी एक पथक होते. हेलिकॉप्टर पथक बळकट करण्यात आले आहे. इराणी वायुदलाचे एकूण सामर्थ्य २०,००० अधिकारी व सैनिक, १८० जेट फायटर व ६५ पिस्टन इंजिन असलेली विमाने एवढे आहे. दूर पल्ल्यावरील पाणबुड्यांना प्रतिबंधक ठरतील अशी पी-३ सी ओरायन विमाने १९७४ मध्ये इराण खरेदी करणार असून फ्रान्सबरोबरच्या करारानुसार त्याला अण्वस्त्रेही मिळणार आहेत. इराणच्या संविधानाप्रमाणे शहा हाच तिन्ही दलांचा प्रमुख असतो. इराण सेंट्रल ट्रीटी  ऑर्गनायझेशनचा (सेंटो) सभासद आहे.

आर्थिक स्थिती : इराणी लोकांचा कृषी हाच प्रमुख व्यवसाय आहे. देशाच्या विविध प्रकारच्या हवामानाच्या प्रदेशात निरनिराळी पिके काढली जातात. गेल्या चाळीस वर्षांचा कृषिव्यवसाय पाहता, निर्वाहशेतीपासून नगदी पिकांच्या उत्पादनापर्यंत इराणी कृषिव्यवसायाने मजल मारली आहे. एकूण १६·४८ कोटी हेक्टर जमिनीपैकी १·६८ कोटी हेक्टर जमीन कृषियोग्य, २·७८ कोटी हेक्टर जंगले व पर्वतराजींनी व्याप्त आणि ३·२७ कोटी हेक्टर जमीन निरुपयोगी आहे, असा अंदाज करण्यात आलेला आहे. दळणवळणाच्या अविकसित साधनांमुळे शेतमालकेंद्रे व बाजारपेठा ह्यांच्या समन्वयाचा अभाव कमी प्रतीची बी-बियाणी, निकृष्ट शेतीअवजारे आणि पारंपरिक मशागतपद्धती नैसर्गिक आपत्ती पाण्याचे दुर्भिक्ष आणि कृषिउद्योगात घातले जाणारे अपुरे भांडवल ह्यांवर उपाययोजना केली जात आहे नव्या पंचवार्षिक योजनांत ग्रामीण रस्तेबांधणीला अग्रहक्क देण्यात आला आहे अमेरिकेच्या मदतीने कृषिसंशोधनकेंद्रे व कृषिमहाविद्यालये उभारली जात आहेत पूरनियंत्रण व जलसंवर्धन ही उद्दिष्टे फलद्रूप करणारे प्रकल्प बांधले जात आहेत.

इराणमध्ये जवळजवळ ४५ ते ५० हजार खेडी आहेत. त्यांतील दहा हजार खेड्यापैंकी ४ ते ५ खेडी एकेका जमीनदाराच्या मालकीची आहेत. यामुळेच इराणमध्ये अनुपस्थित जमीनमालकांचा मोठा वर्ग निर्माण झालेला होता. १९६२ च्या जमीनसुधारणाकायद्यामुळे मोठ्या जमीनदारांच्या ताब्यातील हजारो हेक्टर जमिनी शासनाने आपल्या ताब्यात घेतल्या व त्या भूमिहीन शेतकर्‍यांस वाटण्यास सुरुवात केली. १९६८ पर्यंत ३० लक्ष शेतकरी कुटुंबे (जवळजवळ १·४० कोटी शेतकरी) ती कसत असलेल्या जमिनीची मालक बनली. जमीसुधारणा, कृषियंत्रांचा वापर, रासायनिक खतांचा उपयोग आणि हवामानाची साथ या सर्व घटकांमुळे गेल्या काही वर्षांत कृषिउत्पादनप्रमाण पुष्कळच वाढले आहे. आझरबैजानमधील रेझाईया मैदानी प्रदेश, क्यूशान-मेशेद मैदानी प्रदेश (खोरासान प्रांत) तसेच इस्फाहान, केरमानशाह, फार्स व केरमान जिल्हे येथे गव्हाचे पीक प्रामुख्याने होते. हेक्टरी ४५३ किग्रॅ. गहू उत्पादन होते. बार्लीही गव्हाच्याच प्रदेशात होते. कॅस्पियन प्रांतात भात होतो. हेक्टरी तांदूळ उत्पादन (सडलेला) ४५० किग्रॅ. हूनही थोडे अधिक आहे. कापूस, बीट, तंबाखू ही महत्त्वाची नगदी पिके होत. पाटबंधार्‍यांच्या साहाय्यानेच कापसाचे उत्पादन केले जाते. विशेषत: आझरबैजान, तेहरान, माझांदेरान, खोरासान, केरमानशाह, फार्स व खुझिस्तान या प्रांतांत कापूस पिकतो. फिलिस्तानी हा लांब धाग्याचा कापूस त्याचप्रमाणे अमेरिकन आणि स्थानिक आखूड धाग्याचा कापूस होतो. कॅस्पियन किनार्‍याच्या भागात रेशीम किडे पाळून रेशीम-उत्पादन करतात. बीटचे पीक खोरासान, मेशेदजवळ, तेहरानच्या सभोवतालच्या प्रदेशात व केरमानशाह आणि शीरझच्या भागांत होते. ताग माझांदेरान येथे होतो, पण त्याचे उत्पादन फार कमी आहे. चहाचे पीक पुष्कळच नवीन आहे लाहीजान येथे चहाचे मळे लावण्यात आले आहेत. १९३२ मध्ये २८३ हेक्टरांवरून आता ९,७१० हेक्टरांवर चहाचे मळे पसरले आहेत. तंबाखूचे पीकदेखील महत्त्वाचे आहे. घेवडा, फरसबी, मसूर, कांदे, टोमॅटो, गाजर, वाटाणे, काकड्या व बराचसा भाजीपाला समशीतोष्ण व उष्ण कटिबंधास लागून असलेल्या प्रदेशात होतो. मनुका, बदाम, जर्दाळू, पीच, सफरचंद, चेरी, अंजीर, खजूर, ऑलिव्ह, संत्री, लिंबे, द्राक्षे, खरबुजे ही उत्कृष्ट फळफळावळ येथे होते. मनुका, बदाम व जर्दाळू ह्या फळांची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. गम ट्रगाकंथ केरमान, केरमानशाह ह्या प्रदेशांत व बाभळीचा डिंक शीराझजवळील भागात गोळा करतात.

मेंढ्या व बकरे हे येथील सर्वात महत्त्वाचे पशुधन आहे. गाईंचेही महत्त्व वाढू लागले आहे. अमेरिकेच्या तांत्रिक सहकार मंडळाच्या साहाय्याने पशूंच्या संख्येत वाढ व त्यांची सुधारणा करण्याचा कार्यक्रम जारी करण्यात आला आहे. बैल, गाढव व खेचर ह्यांचा ओझ्याचे प्राणी म्हणून वापर करतात. तुर्कोमान, अरबी व संकरित असे घोड्यांचे तीन प्रकार आहेत. खेचरे (लुरिस्तान, कुर्दिस्तान व बाख्तियारी प्रदेश) १६० किग्रॅ.हूनही अधिक, तर गाढवे ९० किग्रॅ. वजन दिवसाला सु. ५० किमी. पर्यंत वाहून नेतात. मध्य व आग्‍नेय इराणमध्ये उंटांचा अधिक वापर होतो. पाळीव पक्षी साधारणत: सर्वत्र आढळतात. १९७२ मध्ये मेंढ्या ३·१ कोटी बकरे १·३४ कोटी गाई व बैल ५२ लक्ष गाढवे ४·७० लक्ष घोडे ३·८ लक्ष व उंट १·९८ लक्ष होते.

इराणच्या आखातात व कॅस्पियन समुद्राच्या दक्षिण किनार्‍यावर प्रामुख्याने मासेमारी उद्योग चालतो. वाळलेली व खारी मासळी इराक, भारत व अरबस्तानला निर्यात करतात. मासेमारी उद्योगात ‘द कॅस्पियन फिशरीज कंपनी’  ह्या शासकीय कंपनीची मक्तेदारी असून इराणच्या आखातावरील मत्स्योद्योग सुसंघटित व अधिक फलदायी करण्यासाठी जपानी सहकार्य मिळविलेले आहे. १९६९–७० साली कॅव्हिअर माशांचे निर्यातमूल्य ४२ कोटी रियाल होते.

इराणमधील एकूण जमिनीच्या सु. ११ टक्के क्षेत्र जंगलव्याप्त आहे. कॅस्पियनच्या किनार्‍यापासून एल्बर्झ पर्वताच्या समुद्राकडील उताराच्या बाजूने ईशान्य आझरबैजानपर्यंत अरण्ये पसरली आहेत. यांपैकी अर्धे क्षेत्र उत्कृष्ट वृक्षांच्या दाट अरण्यांनी व्याप्त आहे. झॅग्रॉस पर्वतीय ओक अरण्यांचा विस्तार कुर्दिस्तानपासून लुरिस्तानमधून पूर्व फार्सपर्यंत गेलेला आहे. याचे क्षेत्र एकूण जमिनीच्या सु. ६·२४% आहे. या क्षेत्राचा १/१० भाग दाट अरण्यांचा असून तो उत्पादक आहे. ईशान्येकडील चुनखडीच्या प्रदेशातील अरण्ये ही बुजनूर्दपासून एल्बर्झच्या आग्‍नेय उतारापर्यंत पसरलेली आहे. या अरण्यात महत्त्वाचे वृक्ष म्हणजे ज्यूनियर परंतु मॅपल व हॉथॉर्नही आढळतात. खोरासानपासून केरमानपर्यंत व उत्तर फार्सपर्यंत तुरळक अरण्ये पसरलेली असून त्यांत जंगली (अखाद्य) बदामवृक्ष आहेत. इराणी आखात व मकरान प्रदेशांतील उपोष्णकटिबंधीय अरण्ये आणि दश्त-इ- कावीर व दश्त-इ-लूत या वाळवंटी प्रदेशांतील अरण्ये यांमध्ये खुजी झुडपे बरीच आढळतात. इराणी शासनाने १९४९ मध्ये एक वनविषयक संघटना स्थापन केली असून तिच्याकडे वनविषयक प्रशासन, शिक्षण व संशोधन वनविषयक व लाकूड- उद्योगांची स्थापना सर्वेक्षण व जंगल लागवड ही कामे दिली आहेत.

खनिजसंपत्ती: इराणमध्ये खनिजे विपुल आहेत. शेंदूर, गंधक, मीठ, तांबे, क्रोमाइट, शिसे व लोहधातुक या सर्व खनिजांची १९६०–६५ या काळात प्रतिवर्षी एक लक्ष टनांहूनही जास्त निर्यात करण्यात आली. शमसाबाद व केरमान येथे अनुक्रमे लोहधातुक व दगडी कोळसा यांच्या उत्पादनवाढीचे प्रयत्‍न चालू आहेत.

तेलउद्योग हा इराणचा सर्वांत महत्त्वाचा व मोठा उद्योग आहे. तेलाचे व्यापारी उत्पादन देशात १९०१ पासून सुरू झाले. १९०८ मध्ये मस्‌जिद-इ-सुलेमान येथे मोठ्या प्रमाणावर तेल सापडले व १९०९ मध्ये अँग्‍लो-पर्शियन तेल कंपनी स्थापन करण्यात आली, तिचे पुढे १९३५ मध्ये अँग्‍लो-इराणियन तेल कंपनी व १९५४ मध्ये ब्रिटिश पेट्रोलियम कंपनी असे नामांतर करण्यात आले. इराण शासनाने देशातील तेलउद्योगाचे १९५१ मध्ये राष्ट्रीयीकरण केल्यानंतर अँग्‍लो-इराणियन कंपनी व इराण शासन ह्यांच्यात दीर्घकालीन कलह सुरू झाला तो अँग्‍लो-इराणियन कंपनीऐवजी ‘कन्सॉर्टियम’च्या (अनेक तेलकंपन्यांचा समूह) स्थापनेमुळे बंद झाला. कन्सॉर्टियममध्ये ब्रिटिश पेट्रोलियम ४०%, अमेरिकन कंपन्या ४०%, रॉयल डच शेल १४% व फ्रेंच कंपनी ६% अशी भागीदारी आहे. या कन्सॉर्टियमला शासनाने तेलउत्पादनाबाबत १९७९ पर्यंत सवलती दिल्या असून, पुढेही पंधरा वर्षे सवलत वाढविली जाण्याची शक्यता आहे. इराणमधील सर्व ठिकाणच्या तेलखाणींची मालकी व त्यांतून तेलउत्पादन करण्यासंबंधीचे सर्व हक्क हे नॅशनल इराणियन ऑईल कंपनी (एन्. आय्. ओ. सी.) ह्या राष्ट्रीय तेलकंपनीकडे आहेत. १९५४ मध्ये कन्सॉर्टियमशी झालेल्या करारानुसार इराण शासनाला एकूण तेलउत्पादनाच्या किंमतीच्या १२·५ टक्के पैशाच्या स्वरूपात किंवा अशुद्ध तेल निर्यात करून जे पैसे येतील त्याच्या १२·५ टक्के महसूल मिळतो. याशिवाय शासन कन्सॉर्टियमच्या कंपन्यांकडून तेलउत्पादनात होणार्‍या नफ्यावर कर बसवून ती रक्कम मिळविते. एन्. आय्. ओ. सी. ने आपल्या द इराण ऑईल कंपनी ह्या दुय्यम कंपनीद्वारा इराकी सीमेजवळील नफत-इ-शाह व कुमजवळील आल्बोर्झ (तेहरानच्या दक्षिणेस १३६ किमी.) येथे दोन तेलविहिरी खोदल्या आहेत. एन्. आय्. ओ. सी. ने इटालियन, पॅन अमेरिकन इंटरनॅशनल, कॅनेडियन इ. कंपन्यांशी करार करून नवीन कंपन्या स्थापन केल्या व त्यांना निरनिराळ्या भागांत तेलउत्पादन करण्यास मंजुरी दिली. १९६५ मध्ये अमेरिकन, डच, जर्मन, इटालियन, भारतीय अशा अनेक तेलकंपन्यांशी एन्. आय्. ओ. सी. ने करार करून नवीन कंपन्या स्थापिल्या. तथापि तेलउत्पादनाच्या बाबतीत, कन्सॉर्टियम कंपन्याच अग्रेसर आहेत. १९६७ मध्ये त्यांनी एकूण तेलापैकी ९० टक्के उत्पादन केले. नैर्ऋ‌त्य इराणमध्ये तेलउद्योगाचे केंद्रीकरण आहे. सर्वांत मोठी तेलविहीर आघाजारी येथे असून, दुसरी मोठी तेलविहीर गख सारान येथे आहे. १९६० पासून इतर अनेक तेलविहिरींतून उत्पादन होऊ लागले आहे. बीबी हाकिमेह व मारूम या दोन तेलविहिरी इराणमधील सर्वांत मोठ्या चार विहिरींपैकी समजतात. १९६७ मध्ये इराण तेलउत्पादनात मध्यपूर्व देशांत दुसरा व जगात सहावा होता सध्या इराणचा मध्यपूर्वेत पहिला व जगात चौथा क्रम लागतो. कन्सॉर्टियमने एन्. आय्. ओ. सी. कंपनीस २०० लक्ष टन अशुद्ध तेल पूर्व यूरोपीय देशांना वस्तुविनिमयपद्धतीने विकण्यास मंजुरी दिल्याने इराणने रूमानियाशी वस्तुविनिमयकरार केला असून, त्यायोगे रूमानियास अशुद्ध तेल व त्याबदली इराणला दहा वर्षांपर्यंत १० कोटी डॉलर किंमतीची औद्योगिक यंत्रसामग्री मिळणार आहे. अशाच प्रकारचे करार इराणने बल्गेरिया, हंगेरी, यूगोस्लाव्हिया व चेकोस्लोव्हाकिया देशांशी केले आहेत. कन्सॉर्टियम कंपन्या आबादान येथे एक मोठा तेलशुद्धीकारखाना चालवितात तेहरान येथे १९६८ मध्ये प्रतिवर्षी ४२·५ लक्ष टन उत्पादनक्षमतेचा तेलशुद्धीकारखाना पूर्ण झाला. शीराझ येथे २० लक्ष टन उत्पादनक्षमतेचा कारखाना एन्. आय्. ओ. सी. उभारत आहे. १९७१ मध्ये देशात अशुद्ध तेलाचे उत्पादन २२·७७ कोटी मेट्रिक टन व १९६९ मध्ये निर्यात १३·९९ कोटी मेट्रिक टन झाली. इराण हा ‘पेट्रोलियम निर्यातक संघटनेचा (ओपीईसी – ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज, १९६०) संस्थापकसदस्य आहे. नैसर्गिक वायूच्या उत्पादनांबाबतही इराणला बराच फायदा झाला आहे. १९६६ मध्ये इराण-रशिया ह्यांमधील एका करारानुसार, १९७० पासून १५ वर्षे इराणने रशियास नैसर्गिक वायूचा पुरवठा करावयाचा असून १,२०० किमी. लांबीचा नळ बांधण्यात येणार आहे. १९७४ साली फ्रान्सशीही असाच करार झाला आहे. देशात अनेक पेट्रोरसायन-प्रकल्पांची योजना आहे. अमेरिकन कंपन्यांच्या सहकार्याने प्लॅस्टिके, प्रक्षालके, कॉस्टिक सोडा, गंधक, अमोनिया इत्यादींचे कारखाने उभारले जात आहेत.

उद्योग: तेलशुद्धीकरण व खनिजतेलरसायने सुती व लोकरी कापडउद्योग अन्नप्रक्रिया, तंबाखू व सिमेंट आणि पोलाद, यंत्रावजारे व ॲल्युमिनियम असे येथील उद्योगांचे चार प्रकार पाडता येतील. देशात पाच तेलशुद्धीकारखाने आहेत. त्यांपैकी दोन कन्सॉर्टियमच्या मालकीचे आबादान व मसजिद-इ-सुलेमान येथे असून उर्वरित तीन एन्. आय्. ओ. सी. च्या मालकीचे आहेत. एन्. आय्. ओ. सी. आबादान येथे २·६ कोटी डॉलरचा एक प्रचंड कारखाना उभारत असून त्यामधून प्लॅस्टिके, प्रक्षालके, कॉस्टिक सोडा इत्यादींचे उत्पादन होणार आहे. खनिजतेलरसायनांचे आणखी दोन कारखाने खार्ग व बंदर शाहपूर येथे आहेत. १९६० मध्ये ४,४३० कारखान्यांपैकी एकट्या तेहरानमध्ये सु. निम्मे कारखाने होते. इराणमधील औद्योगिक विकास लघुउद्योगांच्या योगेच होत आहे, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. १९६७-६८ मध्ये देशात सु. ३·५ लक्ष औद्योगिक संस्था होत्या त्यांपैकी केवळ ५०० उद्योगांमध्ये पन्नासच्या वर आणि १६ उद्योगांमध्ये एक हजाराच्या वर कामगार होते. इस्फाहान हा इराणमधील सर्वांत मोठा कापूस पिकविणारा प्रदेश असल्याने त्याच विभागात कापडउद्योगाचे केंद्रीकरण झालेले आहे. शाही (माझांदेरान) व बेहशहर (गुरगान) येथेही कापडगिरण्या आहेत. इस्फाहान, ताब्रीझ या ठिकाणी लोकरी कापडाच्या मोठ्या गिरण्या आहेत. ज्यूट व रेशीम ह्यांचे उत्पादन माझांदेरान येथे होते. चालूस व रेश्त ह्या ठिकाणीही रेशीम-उत्पादन-केंद्रे आहेत. शासनाने रेशीम उद्योग महामंडळ उभारले असून त्यायोगे रेशीम उत्पादनाला मोठी चालना मिळाली आहे. विद्युत् उपकरणे, रेडिओ, दूरध्वनियंत्रे, मोटारी व बसगाड्या ह्यांची जुळणी करणारे कारखानेही देशात उभारले जात आहेत. देशात सुट्या भागांचे व मूल रसायनांचेही उत्पादन होऊ लागले आहे. इस्फाहान येथे रशियाच्या साहाय्याने पोलादकारखाना बांधण्यात येत आहे. विद्युत्‌सामग्री व अभियांत्रिकी साधने (आवाझजवळ दिझफूल येथे), ॲल्युमिनियमचा कारखाना, स्टील रोलिंग मिल, ट्रॅक्टर, यंत्रसामग्री, डिझेल एंजिने व कागद इत्यादींचे कारखाने रशिया, पाकिस्तान, अमेरिका, फ्रान्स  वगैरेंच्या साहाय्याने उभारावयाच्या योजना आहेत. १,२१० लक्ष डॉलरचा ट्रॅक्टरनिर्मिती प्रकल्प ताब्रीझ येथे १९७१ मध्ये सुरू झाला. आराक येथे प्रतिवर्षी २५,००० टन ॲल्युमिनियम उत्पादन करणारा कारखाना १९७२ मध्ये सुरू व्हावयाचा होता. आराक व ताब्रीझ येथे प्रत्येकी एकेक असे यंत्रावजारे व अभियांत्रिकी ह्यांचे कारखाने (प्रतिवर्षी ४०,००० टन निर्मितीक्षमतेचे) १९७० मध्ये उभारले जात होते. ताब्रीझ, हामादान, बिजार, सानान्दाज, सुलतानबाद, शीराझ, केरमान या भागांत जगभर प्रसिद्ध असलेले गालिचे तयार करण्याची केंद्रे आहेत. १९६७–६८ मध्ये ३७१·८० कोटी रियाल किंमतीच्या गालिच्यांची निर्यात झाली. चहा, साखर, सिमेंट यांचे उत्पादन वाढते आहे. पिठाच्या गिरण्या खाजगी क्षेत्रात आहेत. यांशिवाय देशात पाश्चरीकृत दूधउत्पादन होत असून काच, साबण, तेल गाळणे, आगपेटी, कागद व कार्डबोर्ड यांचे कारखाने आहेत. हस्तव्यवसायांसाठी इराण प्रसिद्ध असून असे हस्तोद्योग देशात ठिकठिकाणी आहेत. इस्फाहानचा कापड-छपाई उद्योग, मातीकाम, कुट्टिमचित्र, फरसकाम शीराझ, झीजान व इस्फाहान येथील चांदीच्या भांड्यावरील कोरीव काम आबादेह व गोलपायगान येथील लाकडावरील कोरीव काम हे उद्योग प्रसिद्ध आहेत.

देशात १९५९ च्या कामगार कायद्यान्वये ४८ तासांचा कामाचा आठवडा, मजुरी, पगार व अतिकालिक वेतन यांबाबतचे करार पगारी सुट्टी, रोजगारीचे करार, सांघिक करार, औद्योगिक सुरक्षितता, आरोग्य व कल्याण ह्यांबाबतचे नियम कामगारसंघटना व मालकसंघटना ह्यांची स्थापना, नोंदणी व कार्य औद्योगिक कलहाचे निवाडे कामगार परीक्षण वगैरे तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. १९५८ मधील एका सर्वेक्षणानुसार, देशात कृषिउद्योगतील कामगार वगळून, अन्य उद्योगांतील कामगारसंख्या १३·७ लक्ष होती त्यांपैकी सु. ७०,००० स्त्रिया व सु. ३३,००० तेरा वर्षांखालील मुले होती. सु. ५२·४ टक्के (७,१८,०००) कामगार हे उत्पादन प्रक्रियाउद्योग, विविध व्यवसाय व इतर उद्योगधंद्यांत व १८ टक्के कामगार विक्रीव्यवसायात व तदनुषंगिक व्यवसायांत गुंतलेले होते. १९६० सालच्या कामगारांच्या सामाजिक विमा कायद्यानुसार सामाजिक सुरक्षा व्यवस्थेचे फायदे– उदा., आजार, अपघात, निवृत्ती, मृत्यू, विवाह, मोफत वैद्यकिय उपचार व सेवा, तसेच विमेदार कामगारांना व त्यांच्या आप्तांना मोफत रुग्णता सेवा, प्रसूती वगैरे– उपलब्ध करण्यात आले आहेत. तथापि हे सर्व लाभ औद्योगिक कामगार व खाणकामगार (सु. ६,८३,४९६) ह्यांच्या पुरतेच आहेत या कायद्यानुसार दोन वा अधिक मुले असलेल्या कामगारांना मालकांकडून कौटुंबिक भत्ते मिळण्याची तरतूद आहे. त्यांचा सर्व प्रकारच्या कामगारांना लाभ मिळालेला नाही. १९६३ मध्ये सर्व कामगार संघटना विसर्जित करण्यात आल्या व कामगारांचे व्यवसायसंघ (सिंडिकेट) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व व्यवसायसंघांची शासनाकडे नोंद करावी लागते. मार्च १९६३ मध्ये देशात विविध व्यावसायांचे निदर्शक असे ६७ कामगार व्यवसाय होते त्यांपैकी नॅशनल इराणियन ऑईल कंपनी वर्कर्स सिंडिकेट हा व्यवसायसंघ सर्वांत मोठा होता त्याची सभासदसंख्या ६,००० होती.

व्यापार व अर्थकारण : देशांतर्गत वाहतूकसाधने व व्यवस्था, मालसाठवणाची व्यवस्था आणि पुरेसा पतपुरवठा ह्या सर्व गोष्टींचा नीट विकास न झाल्याने अंतर्गत बाजारपेठेचाही विकास होऊ शकलेला नाही. शहरांमधील बाजार हाच किरकोळ व घाऊक व्यापाराच कणा समजला जातो. तेहरानमध्ये विभागीय वस्तुभांडारे उघडण्यात येऊ लागली आहेत. खेडेगावात फिरस्ते व फेरीवाले हेच चहा, साखर व नित्योपयोगी वस्तूंचा पुरवठा करतात. निर्यात व आयात व्यापारावर सर्वसाधारणतः शासनाचेच नियंत्रण व महत्त्वाच्या वस्तूंच्या निर्यातआयातीच्या बाबतीत मक्तेदारी आहे. खाजगी व्यापार्‍यांना काही शासकीय अटी पाळल्यास व्यापारास उत्तेजन मिळते. इराणचा व्यापारशेष अनुकूल आहे. तेल, फळफळावळ व सुकी फळे, तांदूळ, कातडी व चामडी, लोकर व केस, कापूस, गोंदप्रकार, तेलबिया, खनिजे व गालिचे या निर्यातवस्तू होत. साखर, चहा, कॉफी, कोको, कागद व कार्डबोर्ड, रेशीम, कापड व लोकरीची वस्त्रे, लोखंड, पोलाद, तांबेपितळ-उपकरणे, अवजड यंत्रे व यांत्रिक उपकरणे, विजेची उपकरणे व मोटारगाड्या, या आयातवस्तू होत. १९६९-७० मधील १,८५३·३० कोटी रियाल किंमतीच्या एकूण निर्यात व्यापारापैकी एकट्या तेलाचा वाटा ८८ टक्के होता. त्याच वर्षी एकूण आयात ११,५५६·७ कोटी रियाल होती. रियाल हे देशाचे चलन असून ते १०० दिनारांमध्ये विभागलेले आहे. देशाने दशमानपद्धती स्वीकारली असूनही, ग्रामीण भागात अद्यापि जुनी पद्धतच चालू आहे. विदेश विनिमयदर हा १ अमेरिकन डॉलर = ७६·५० रियाल १ स्टर्लिंग पौंड = १८०·५० रियाल असा आहे. महसुली उत्पन्न प्रामुख्याने अप्रत्यक्ष करांपासून मिळते. १९६९-७० च्या अंदाजपत्रकात जमा व खर्च अशा दोन्ही बाजूंस, ३३०·३ अब्ज रियाल अशी समान रक्कम होती. १९६८-६९ व १९६९-७० या दोन्ही वर्षांचे समतोल अर्थसंकल्प होते.

देशांत १९६१ मध्ये स्थापण्यात आलेली ‘बॅंक मारकाझी हीच मध्यवर्ती बॅंक आहे. ‘बॅंक मेली इराण (१९२७) ही प्रमुख व्यापारी बॅंक असून तिच्या देशभर शाखा आहेत. शेतीविकास, अंतर्गत विनिमय, सैन्याचा अर्थप्रबंध, बांधकामउद्योग, गरीब वर्गास घरे, खाणउद्योग विकास, उद्योगांचे आधुनिकीकरण, विदेशव्यापार, शेतकर्‍यांना कर्जे, इ. कामांसाठी निरनिराळ्या बॅंका साहाय्य देतात. ‘शेरकात सहामी बिमेह इराण (द इराण इन्शुरन्स कंपनी, १९५४) ही विमाव्यवसाय करते. याशिवाय देशात १९ खाजगी बॅंका, ६ खाजगी विमाकंपन्या आणि रशिया, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, हॉलंड, जपान इ. देशांच्या बॅंकशाखा आहेत. तेहरान येथे १९६८ साली शेअरबाजार सुरू झाला.

दुसर्‍या महायुद्धानंतर इराणने नियोजनाची कास धरली. त्यासाठी मॉरिसन-नडसेन ह्या अमेरिकन कंपनीचा सल्ला घेतला. पहिली सप्तवर्षीय योजना १९४९ साली कार्यवाहीत आणली गेली. ती शेतीवर भर देणारी होती. तिच्यावर २,८८० कोटी रियाल खर्च करण्यात येणार होते. तथापि ही योजना फलद्रुप झाली नाही. दुसरी योजना ७,२०० कोटी रियालची होती. ती १९५६ मध्ये सुरू झाली. ह्या योजनेत वाहतूक, संदेशवहन यांवर अधिक भर होता कृषी व सामाजिक सेवा प्रत्येकी २६ टक्के, उद्योगावर १५ टक्के, असा खर्च करण्यात यावयाचा होता. तथापि ही योजनाही पहिल्या योजनेप्रमाणे पैशाच्या पुरवठ्याअभावी अपेशी ठरली. १९६०–६४ या काळात आर्थिक स्थिरीकरण व काटकसर ही अर्थनीतीची प्रधान अंगे होती. तिसर्‍या योजनेत (१९६३–६८) १६,००० कोटी रियाल खर्च करण्यात यावयाचे होते. सर्वांत अधिक भर लहान प्रकल्पांवर दिल्याचे आढळते. कृषिक्षेत्रात छोटे जलसिंचन प्रकल्प, शेतकर्‍यांस साहाय्य, ग्रामीण उपमार्गरचना औद्योगिक क्षेत्रात देशी कच्चा माल वापरणार्‍या उद्योगांना अधिक साहाय्य यांची तरतूद होती. तिसर्‍या योजनेसाठी इराणला रशिया, हंगेरी, पोलंड, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, जपान, ग्रेट ब्रिटन, जागतिक बँक व तिच्या संलग्‍न संस्था ह्यांनी आर्थिक साहाय्य केले. चौथ्या योजनेत (१९६८–१९७३) विकासाचे प्रमाण ९ टक्के हे लक्ष्य ठरविण्यात आले आहे. हे साध्य झाल्यास, दरडोई राष्ट्रीय उत्पादन प्रतिवर्षी २२,५०० रियालच्यावर जाईल. तेलउद्योग व इतर उद्योग ह्यांच्यायोगे हा विकास साध्य होण्याची शक्यता इराणच्या नियोजनकारांनी व्यक्त केली आहे. १९६५-६७ या तीन वर्षांत शेतीने देशाला चांगला हात दिला त्यामुळे परदेशी चलनाचा साठा इराणजवळ भरपूर असून आर्थिक मंदीही कमी होती. १९६७-६८ पासून इराणने अमेरिकेकडून आर्थिक मदत मागितली नाही, ही गोष्ट लक्षणीय आहे. चौथी योजना ८१,००० कोटी रियालची होती.

वाहतूक व संदेशवहन:१९७० मध्ये ५२,५९१ किमी. लांबीचे रस्ते होते. १९६८-६९ मध्ये देशात २,५७,५५० प्रवासी गाड्या व ७२,५२९ व्यापारी गाड्या होत्या. उत्तर-दक्षिण लोहमार्ग (ट्रान्स इराणियन रेल्वे) बंदर-इ-शाहपासून तेहरानमधून बंदर-शाहपूरपर्यंत जातो उत्तर-पश्चिम (वायव्य) लोहमार्ग तेहरान-ताब्रीझ (७३४ किमी.) असा आहे. तो पुढे रशियन लोहमार्गास जोल्फा येथे मिळतो. उत्तर-पूर्व (ईशान्य) लोहमार्ग हा तेहरान व मेशेद ही शहरे जोडतो, दक्षिण-पूर्व (आग्‍नेय) लोहमार्ग कुम ते केरमानपर्यंत जातो. हे सर्व लोहमार्ग प्रमाणमापी आहेत. एकूण लोहमार्गांची लांबी ४,९४४ किमी. (१९७०) आहे. कारून हीच नदी जलवाहतुकीस योग्य आहे. खुर्रामशहर ते आवाझ हे १२० किमी. अंतर लहान जहाजांतून जाता येते. खुर्रामशहर हे इराणी आखातावरील प्रमुख बंदर बंदर-इ-शहापूर हे दुसरे बंदर आहे. आबादान हे तेलाचे बंदर म्हणून प्रसिद्ध आहे. लिंगे, जास्क व चाहबहार ही इराणी व ओमान आखातांतील इतर बंदरे आहेत. तेहरान व आबादान येथे प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. सर्व महत्त्वाच्या देशांच्या विमानकंपन्या तेहरानला जगातील इतर शहरांशी जोडतात. इराण नॅशनल एअरलाइन्स कॉर्पोरेशन ह्या इराणी विमानकंपनीची (स्था. १९६२) अंतर्गत हवाई वाहतुकीबाबत मक्तेदारी असून ती इराणी आखात, पाकिस्तान व मध्य पूर्वेकडील देशांत हवाई वाहतूक करते. तेहरान, ताब्रीझ, मेशेद, केरमानशाह, केरमान, खुर्रामशहर, बूशीर, येझ्द, शीराझ व लिंगे ही शहरे बिनतारी संदेशवहनाने जोडलेली आहेत. तेहरान व ताब्रीझ यांमध्ये बिनतारी दूरध्वनिव्यवस्था आहे. तेहरान हे यूरोपशी बिनतारी संदेशवहनाने व बिनतारी दूरध्वनीने बगदाद, लंडन, बर्न व न्यूयॉर्क शहरांशी जोडलेले आहे. देशात बारा प्रादेशिक नभोवाणी केंद्रे आहेत  ‘रेडिओ इराण’  चे कार्यालय तेहरान येथे आहे. १९६८-६९ मध्ये २९,३३,००० रेडिओ परवानाधारक होते. ‘नॅशनल इराणियन टेलिव्हिजन’  ही सरकारी मालकीची दूरचित्रवाणी-संस्था आहे.देशात १९६९ मध्ये आठ दूरचित्रवाणी केंद्रे होती. १९६९ मधील दूरचित्रवाणी परवानाधारकांची संख्या २·५ लक्ष होती. ‘टेलिव्हिजन ऑफ इराण’  ही खाजगी दूरचित्रवाणी कंपनीही कार्य करते. देशात १९६८-६९ मध्ये २,६८,९८० दूरध्वनी होते. १९६९-७० साली इराणला २,४१,१९८ प्रवाशांनी भेट दिली व ३·६७ कोटी डॉलर खर्च केले.

लोक व समाजजीवन: ख्रिस्तपूर्व दुसर्‍या सहस्रकात आर्यांनी इराणच्या पठारावर वास्तव्य केले. हल्लीचे इराणी वा पर्शियन हे त्यांचेच वंशज असल्याचे मानतात. हे लोक पर्शियन (फार्सी) भाषा बोलतात. यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक आहे. इराणी हे मध्यम उंचीचे, कृश आकाराचे, काळ्याशार केसांचे व काळ्या डोळ्यांचे असतात. इराणी स्त्रिया गौरवर्णी, नाजूक व रेखीव असतात. याशिवाय देशात तुर्क व अरब समूहाचे लोक आहेत बलुची, कुर्द, लूर, हे लोक टोळ्या करून राहतात अल्पसंख्यांक समूहापैकी आर्मेनियन, ॲसिरियन, जॉर्जिअन, द्रविडी, ब्रहूई व मंगोलवंशीय अफगाण हजारा हेही लोक येथे राहतात. केरमानशाहच्या दक्षिणेस असलेल्या पिशकूह व पोश्तकूह ह्या डोंगराळ भागांत राहणारे लूरही कुर्दांप्रमाणेच टोळ्या करून व मेंढ्यांचे, गाईगुरांचे कळप बाळगून राहतात. बाख्तियारी लोकांची जमात झॅग्रॉस भागात रहात असून तिचे लूर जमातीशी बरेच साम्य आहे. ‘हफ्ट लांग’  व ‘चाहार लांग’ असे त्यांचे दोन गट असून पहिला गट भटक्या वृत्तीचा, तर दुसरा स्थिर जीवन कंठणारा आहे. बाख्तियारी टोळीप्रमुख इतर टोळीप्रमुखांपेक्षा अधिक प्रगत आहेत १९०६ च्या क्रांतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांना धंद्याचे व व्यवसायाचे अचून ज्ञान असते पुष्कळ वर्षे त्यांचे शिक्षण यूरोपात झाले असून त्यांच्या मुलींनाही प्राथमिक शिक्षण मिळालेले असते. कुर्द, लूर व बाख्तियारी टोळ्यांमधील स्त्रियांना इतर टोळ्यांतील स्त्रियांपेक्षा अधिक स्वातंत्र्य होते त्यांना पडदा वापरावा लागत नसे किंवा पुरुषसमूहातून वेगळे बसावे लागत नसे. कुर्दिस्तानमध्ये मातृसत्ताक परंपरा आहे व अद्यापही टोळ्यांवर स्त्रियांचे आधिपत्य असते. काशगाई ह्या टोळीचे मूळ तुर्की असून ती बाख्तियारी टोळ्यांच्या जवळच राहते. हिवाळ्यात काशगाईंच्या मेंढ्यांचे कळप शीराझच्या पश्चिमेस व वायव्येस सखल प्रदेशात चरत असतात. १९४६ मध्ये काशगाईंनी बंड केले होते व इराणी शासनाने ते शमविलेही तथापि आजही काशगाईंचे राजकीय दृष्ट्या मोठे महत्त्व आहे. खुझिस्तानच्या दक्षिण भागात ‘अल् काथीर’ व ‘बानी लम’ या प्रमुख टोळ्या आहेत. स्थिरजीवन जगणार्‍या टोळ्या गाईगुरांचे कळप बाळगतात व भातशेती करतात. काहीजण मेंढ्या किंवा उंट बाळगतात, तर काहीजण खजुरीच्या बागांमध्ये काम करतात. खोरासानमध्ये तुर्की, कुर्द व बलुची टोळ्या आहेत. इतर भटक्या पण महत्त्वाच्या टोळ्यांमध्ये खामेश, शाहसेवन, अरबी, बलुची व तुर्कोमान यांचा अंतर्भाव होतो. या टोळ्यांची भटकी जीवनवृत्ती हळूहळू नाहीशी होत चालली आहे. ह्या टोळ्या अतिशय सामर्थ्यशाली, अभिमानी व स्वतंत्रवृत्तीच्या आहेत. घोडे, गाई-गुरे, शेळ्या-मेंढ्या ह्यांची जोपासना ह्या टोळ्या मोठ्या प्रमाणावर करतात आणि मांस, लोकर, कातडी, दूध व इतर पदार्थ यांचे उत्पादन करतात. ह्या टोळ्या व  शहरांतील लोक ह्यांच्यामध्ये संशय व द्वेष ह्यांचे दाट पटल असून इराणी शासनापुढे हा संशयाचा पडदा बाजूला करून दोन्ही बाजूंकडील लोकांचा समन्वय कसा करावा, हा एक जटिल प्रश्न आहे.

शिया इस्लाम हा राष्ट्राचा अधिकृत धर्म असून तो ‘इश्‍ना अशरिया’ या नावाने ओळखला जातो. एकूण लोकसंख्येपैकी ८·५ लक्ष लोक सुन्नी पंथीय, १९,१८६ पारशी (जरथुश्त्राचे अनुयायी), ६०,६८२ ज्यू, १,०८,४२१ आर्मेनियम, २०,००० नेस्टोरियन आणि ८,५०० प्रॉटेस्टंट आहेत. केंद्रशासनाचे सामर्थ्य अधिक वाढलेले असल्याने साहजिकच धर्मगुरूंची सत्ता कमी झाली आहे. आयातुल्ला हे सर्वोच्च धार्मिक पद आहे. सर्व मशिदी व पवित्र स्थाने ह्यांना कायमस्वरूपी देणग्या मिळतात. त्यांचा विनियोग धर्मादाय म्हणून व शैक्षणिक कार्यासाठी केला जातो. ही सर्व व्यवस्था शिक्षणमंत्रालय पाहते. देशात पुढील सुट्ट्या असतात : नवरोज (नववर्षदिन), वसंताचा पहिला दिवस (२१ किंवा २२ मार्च), हा उत्सव पाच दिवस चालतो नवरोजाचा तेरावा दिवस संविधान अंमलात आले तो दिवस (१५ ऑगस्ट) शहाचा वाढदिवस. यांशिवाय धार्मिक सुट्ट्याही आहेत.

इराणमधील बतेहुक समाज हा कृषिकच असल्याने सर्व वर्गांच्या – शहरी व ग्रामीण – चालीरीती, रिवाज आणि नैतिक दृष्टिकोन ह्यांवर शेतमजूर, शेतकरी व जमीनदार ह्यांच्या जीवनाचा फार मोठा प्रभाव पडला आहे. समाजात अनेक वर्ग आहेत तथापि इराणमध्ये जातिव्यवस्था नाही. विविध चालीरीती, संस्कृती व धार्मिक श्रद्धा ह्यांकडे फार पूर्वीपासून सहिष्णुतेने पाहिले गेल्याचे दिसते. उत्कट कलाभिरुची, सौंदर्याचे गुणग्रहण आणि तीक्ष्ण विनोदबुद्धी ह्यांचा विकास होत गेल्याचे दिसते. बहुतेक शहरे ही व्यापारी म्हणूनच प्रसिद्ध आहेत. १९३० पर्यंत टोळ्यांमधील स्त्रियांचे स्थान इतर समुदायांतील स्त्रियांपेक्षा कितीतरी चांगले होते. इतर समाजातील स्त्रियांवर पुरुषांचे पूर्ण वर्चस्व असे. बहुपत्‍नीकत्व व घटस्फोटास मुभा, यांमुळे त्यांच्या स्थानास फारशी किंमत राहिली नव्हती रेझाशहा पहेलवीच्या कारकीर्दीत स्त्रियांची गोषापद्धत बंद करण्याचे प्रयत्‍न झाले तसेच स्त्रियांना नोकरीचेही स्वातंत्र्य देण्यात आले. आता त्यांना पुरुषांइतके वैधिक हक्क व अधिकार मिळालेले असून मोठमोठ्या शहरांत तर स्त्रिया विविध व्यवसायांत काम करू लागल्या आहेत. १९६३ मध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला.

इराणी लोक आतिथ्यशीलतेबद्दल प्रसिद्ध आहेत. हे लोक अतिशय भावनाविवश, व्यक्तिनिष्ठ व सुसंस्कृत आहेत. बहुतेक स्त्रिया लहान वयातच लग्न करतात. विवाहाचे कायदेशीर वय १६ असते. बहुतेक विवाह कुटुंबाच्या कर्त्याकडूनच ठरविले व पार पाडले जातात. कुटुंबाशी निष्ठा हा एक मोठा विशेष मानला जातो.

आधुनिकीकरणामुळे वेशभूषेत मोठी क्रांति झाली आहे. १९२७ मध्ये ‘टार्बूशनावाची एक लाल हॅट वापरात होती, तिची जागा  ‘पहलवी हॅट ने घेतली ती १९३५ मध्ये मागे पडून तिच्याऐवजी ‘फेडोरा ही देशोदेशी वापरात असलेली मऊ फेल्ट हॅट व पाश्चिमात्यांचे कपडे प्रचारात आले. ग्रामीण भागातील लोकांचा तसेच टोळीवाल्यांचा पोषाख चित्रविचित्र रंगाचा व भिन्नतादर्शक असतो. अर्थात त्याच्यावरही आधुनिकीकरणाच्या नवनवीन तर्‍हांचा निश्चितच परिणाम झाला आहे व होत आहे.

इराणमधील भोजनप्रकार व खाद्यपदार्थ अतिशय प्रसिद्ध किंबहुना सबंध पश्चिम आशियात विख्यात ठरलेले आहेत. शेतकर्‍याचे जेवण काटकसरीचे असते : पाव, चीज, मॅस्ट (आंबट दह्याचा एक प्रकार), अंडी, कांदे, निरनिराळ्या भाज्या, मनुका व बेदाणे, नारळासारखी टणक फळे व सुकी फळे. विशेष समारंभप्रसंगी मांस, कोंबडी आणि कॅस्पियनच्या मैदानी प्रदेशात माशांचाही भोजनात समावेश करतात. मध्यमवर्गाच्या व त्याहूनही अधिक श्रीमंत लोकांच्या जेवणात डोलमेह, मुरंबे, लोणची, अनेक रुचकर कालवणे आणि मंदाग्‍नीवर शिजविलेले विविध पदार्थ असतात. विशेष समारंभात पुलाव व तर्‍हतर्‍हेच्या मिठाया असतात. चहा हे इराणी लोकांचे राष्ट्रीय पेय आहे. पुरुष व स्त्रिया दोघेही धूम्रपान करतात. अफूचे धूम्रपान, अफूवर बरेच निर्बंध घातले असले, तरी दक्षिणेकडील प्रदेशात प्रचलित आहे. देशात सामुदायिक स्‍नानगृहांचा प्रसार बराच आहे.

इराणमध्ये पहिली जनगणना नोव्हेंबर १९५६ मध्ये घेण्यात आली. ऑक्टोबर १९६६ च्या जनगणनेप्रमाणे, इराणची लोकसंख्या २,५७,८१,०९० होती. ती १९७१ च्या अंदाजाप्रमाणे तीन कोटी झाली. तेहरानच्या सभोवार, कॅस्पियन समुद्राचा पूर्व किनारा, आझरबैजानचा आणि खोरासानचा भाग येथे दाट लोकवस्ती आहे. इराणमधील लोकसंख्यावितरण पर्जन्यमान व प्रदेशाची उंची ह्या दोन भौगोलिक घटकांवर अवलंबून असल्याचे आढळते. एक लक्षाहूनअधिक लोकसंख्येची शहरे पुढीलप्रमाणे आहेत : तेहरान (राजधानी) : ३१·५ लक्ष (१९७२) इस्फाहान : ५,७५,००१ मेशेद : ४,१७,१७१ ताब्रीझ : ४,६८,४५९ आबादान : २,७०,७२६  शीराझ : २,६९,२७८ आवाझ : २,०६,३७५ केरमानशाह : १,८७,९३० रेश्त : १,४३,५५७  हामादान : १,६१,९४४ रेझाईया : १,१०,७४९ कुम : १,३३,९४१ काझ्‌वीन : १,०३,७९१ येझ्द : १,५०,५३१ व दिझफूल : १,०५,३८१. अर्दाबिल, खुर्रामशहर, आराक, काशान व झंजान ह्या पाच शहरांची लोकसंख्या ७० हजार ते एक लक्षाच्या दरम्यान आहे. २५ ते ५० हजार लोकवस्तीची शहरे २१ व ५ ते २५ हजारांची ५० आहेत. जीवनमानाच्या तुलनेने मजुरीचे प्रमाण कमी आहे, हे शेतमजूर व कारखान्यांतील कामगार ह्यांच्या वेतनांतील फरकावरून स्पष्ट होते. १९३६–५५ ह्या काळात इराणमधील जीवनमान बारा पटींनी, तर दैनंदिन वेतनमान पाच पटींनीच वाढल्याचे दिसते. काही उद्योगांत वेतन स्थलागणिक बदलताना दिसते. तेहरानमधील बांधकाम-उद्योगातील कामगारास अथवा आबादानमधील तेलउद्योगातील कामगारास मिळणारे २५० रियाल हे वेतन सरासरी दैनंदिन वेतनापेक्षा कितीतरी जास्त आहे. हेच प्रमाण अकुशल कामगाराला १९६० च्या सुमारास ४५ रियाल होते.

निरनिराळी मंत्रालये, शासकीय संस्था, काही बँका व मोठाले उद्योग ह्यांनी आपापल्या कर्मचार्‍यांकरिता गाळे बांधलेले आहेत. बांधकाम बँक (बँक सख्तेमानी), गहाणबँक (द बँक रहनी), इराणी विमा कंपनी (शेरकात साहामी बिमेह इराण) आणि शासकीय गृहसंघटना ह्यांसारख्या संघटनांनी वरील गृहनिवसन प्रकल्पाच्या नियोजन व अर्थप्रबंध कार्यांत मोठा भाग घेतला. १९६० च्या सुमारास भूकंपग्रस्त व पूरग्रस्त भागांकरिता १०,००० गाळे बांधण्यात आले होते.

आरोग्य मंत्रालय देशाची आरोग्यव्यवस्था पाहते. मलेरियाविरोधी मोहिमेत मोठेच यश मिळाले आहे. कॅस्पियन व इराणी आखाताजवळील प्रदेशात तसेच आझरबैजानमधून मलेरियाचे पूर्ण उच्चाटन झाले आहे. अफूची आसक्ती पुष्कळ प्रमाणात कमी झाली आहे. क्षय, देवी, खुपरी, गुप्तरोग ह्यांसारख्या भयंकर रोगांवर मात करण्यासाठी कार्यक्रम जारी करण्यात आले आहेत. १९६७ मध्ये देशात २७,४२४ (त्यांतील निम्म्या तेहरानमध्ये) खाटा उपलब्ध होत्या व ३,८२० लोकांमागे एक वैद्य असे प्रमाण होते. त्याच वर्षी ५,०२४ वैद्य व शल्यचिकित्सक, ८१० दंतवैद्य, २,७०२ औषधनिर्माते व २,००० परिचारिका होत्या. देशात रुग्णालये, प्रसूतिगृहे, बालचिकित्सालये आणि चौदा परिचर्याशाला आहेत.

कामगार सामाजिक विमा कायद्यानुसार (१९६०) विमेदार कामगारास व त्याच्या कुटुंबियांस अपघात, आजार, निवृत्ती, मृत्यू, विवाह, प्रसूती व अपत्यजन्म ह्यांबद्दलचे लाभ तसेच मोफत वैद्यकीय सेवा व रुग्णालयसेवा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. वेतन किंवा पगार घेणार्‍या सर्व कामगारांना विमा उतरून घ्यावा लागतो तथापि सध्या औद्योगिक व खाणकाम क्षेत्रांतील सु. २·४ लक्ष कामगारांनाच (किमान १० वा अधिक कामगार असलेल्या उद्योगांनाच) या योजनेचा फायदा मिळत आहे. १९६० च्या कायद्यानुसार दोन किंवा अधिक मुले असलेल्या कामगारांना कौटुंबिक भत्तेही मालकांनी द्यावेत, अशी तरतूद आहे. इराणमध्ये १९४३ साली सक्तीचे प्राथमिक शिक्षण क्रमाक्रमाने सर्वांना दिले जाण्यासंबंधीचा एक कायदा करण्यात आला. १९७२ मध्ये शालेय वयाच्या एकूण मुलांपैकी ८०% मुलांना शिक्षण उपलब्ध झाले होते. ४०% लोकसंख्या साक्षर असल्याचा अंदाज आहे. सरकार चालवीत असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांचे प्रमाण फार मोठे आहे. प्राथमिक व विद्यापीठीय शिक्षण मोफत असते. सरकारी माध्यमिक शाळांतून अत्यल्प फी आकारली जाते. प्राथमिक शाळांमधून पहिल्या चार इयत्तांपर्यंत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मोफत दिली जातात. १९६९-७० मध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळा अनुक्रमे १५,७७६ व २,२९८ आणि त्यांमधील विद्यार्थ्यांची संख्या अनुक्रमे २९,१६,२६६ व ८,९७,४४३ होती शिक्षकांची संख्या अनुक्रमे ८१,१२७ व २२,५३४ होती. याशिवाय, तांत्रिक व व्यवसायशिक्षण शाळांतून १६,२७३ व शिक्षण-प्रशिक्षण महाविद्यालयांतून ६,६९३ विद्यार्थी होते. १९६७-६८ मध्ये ५८,७७४ विद्यार्थी ९ विद्यापीठांतून व उच्च शिक्षण संस्थांतून शिक्षण घेत होते. १९६६-६७ मध्ये परदेशांत (विशेषत: अमेरिका व पश्चिम यूरोपीय देश) शिष्यवृत्त्या मिळवून शिकणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या २०,५०७ होती. परदेशांत उच्च शिक्षण घेणार्‍या इराणी विद्यार्थ्यांची तेथेच नोकरी करण्याची प्रवृत्ती दिसून आली आहे कारण त्या देशांतील कामाची परिस्थिती व वेतने ही केव्हाही इराणपेक्षा अतिशय उच्च असतात. इराण शासन ह्या बुद्धिमंतांच्या निर्गमनाला आळा घालण्याचा हरप्रकारे प्रयत्‍न करीत आहे. त्या दिशेने १९६८ मध्ये शासनाने एक पाऊल टाकले आहे. परदेशांतून उच्च शिक्षण घेऊन स्वदेशी परतणार्‍या विद्यार्थ्यांना लष्करी सेवा माफ करण्यात आली आहे. तेहरान येथे तीन व शीराझ, ताब्रीझ, रेझाईया, इस्फाहान, मेशेद, आवाझ येथे प्रत्येकी एक अशी नऊ विद्यापीठे इराणमध्ये आहेत. यांशिवाय तेहरान येथे एक तंत्रविद्यासंस्था असून यांत्रिक, वस्त्रविषयक, विद्युत् व स्थापत्यविद्याविषयक अभियांत्रिकीचे शिक्षण देणारे तंत्रनिकेतन आहे. नॅशनल इराणियन ऑइल कंपनी आबादान येथे एक तंत्रविद्यासंस्था चालविते. सेंटोतर्फे १९५९ मध्ये तेहरान येथे एक अणुशास्त्रीय संस्था व तेहरानजवळील कारज येथे १९६१ मध्ये कृषियंत्रे व मृदसंधारण प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले. देशात ३६ विद्वत्‌संस्था व संशोधन संस्था, २७ ग्रंथालये आणि ८ वस्तुसंग्रहालये आहेत. तेहरान येथील पुरातत्वशास्त्रीय वस्तुसंग्रहालय तसेच मानववंशशास्त्रीय वस्तुसंग्रहालय आणि गुलिस्तान प्रासाद प्रेक्षणीय आहेत. इस्फाहान, मेशेद, कुम व शीराझ येथील वस्तुसंग्रहालये प्रसिद्ध आहेत. त्यांमध्ये बारा ते अठराव्या शतकांमधील निरनिराळ्या वस्तू-सतरंज्या व गालिचे, कलाकुसरीची मातीची भांडी, हस्तलिखिते इ. असून लाकूड आणि धातू यांवरील कोरीव काम अत्यंत प्रेक्षणीय आहे. इराणमध्ये २५ दैनिके (पैकी २० तेहरानमध्ये) आणि ४० नियतकालिके प्रसिद्ध होतात. दैनिक वृत्तपत्रांचा खप केहान : १,००,००० एत्तेलान : ७०,००० पैगामे एमरूझ : २३,००० आणि केहान इंटरनॅशनल १२,००० प्रती असून बाकीच्यांचा खप ६,००० प्रतींपेक्षा कमी आहे. राजकीय पक्षांची काही व सरकारी वृत्तपत्रे वगळल्यास, उर्वरित वृत्तपत्रे खाजगी मालकीचीच आहेत. १९६५ पासून तेहरान विद्यापीठात वृत्तपत्रविद्येचे दोन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.

भाषा व साहित्य : इराणमध्ये पर्शियन (फार्सी), कुर्दी, लूरी, बलुची व अरबी ह्या भाषा बोलल्या जातात. पर्शियन ही एक इंडो-यूरोपियन भाषा असून ती मध्य आशियाई स्टेप प्रदेशातून आलेल्या आक्रमकांनी सुरू केली. इराणने इस्लामचा स्वीकार केल्यावर या भाषेत बरेच अरबी शब्द समाविष्ट झाले आणि त्यानंतर अरबी लिपीचा स्वीकार करण्यात आला व आजही तीच प्रचलित आहे. तुर्कस्तानप्रमाणे इराणमध्येही पर्शियन भाषेतून अरबी शब्दांचे व रूपांचे उच्चाटन करण्याची प्रवृत्ती बळावली असली, तरी प्राचीन अरबी साहित्यावरील नि:सीम भक्तीमुळे त्या प्रवृत्तीस आळा बसत आहे. पर्शियन भाषेच्या बोलभाषा देशाच्या काही भागांत प्रचारात आहेत. कुर्दी भाषा ही पर्शियन भाषेपेक्षा भिन्न असली, तरी तीही इंडो-यूरोपियन भाषाकुटुंबातील एक मानतात. गोरानी ही एक प्रमुख बोलभाषा असून ईशान्येकडील जिल्ह्यांतून मुक्री कुर्द ही दुसरी एक बोलभाषा वापरतात. लूरी ही लुरिस्तान प्रांताची भाषा असून प्रामुख्याने बाख्तियारी व इतर काही टोळ्यांमध्ये बोलली जाते. लूरीचे जुन्या पर्शियन भाषेशी बरेच साधर्म्य आहे. आझरबैजानमध्ये बोलली जाणारी ॲझेरी ही तुर्की भाषेची पोटभाषा असून तिचे ॲनातोलियन तुर्की भाषेशी फार सादृश्य आहे. बलुची ही एक आर्यभाषा असून ती आधुनिक पर्शियन भाषेत मिसळून गेली आहे. खुझिस्तान प्रांतातील अरबी टोळ्या, इराणी आखाताच्या किनाराभागातील आणि मकरानमधील टोळ्या तसेच फार्स प्रांतातील खामेश टोळ्यांपैकी काहीजण अरबी भाषा वापरतात. [→ इराणी भाषासमूह].

इराणी साहित्यात विपुल ग्रंथनिर्मिती झालेली आहे. फिर्दौसी (९३२–१०२०) ह्या महान कवीचे शाहनामा  हे महाकाव्य सुविख्यात आहे. यामध्ये चार प्राचीन घराण्यांचा इतिहास त्याचबरोबर अद्‌भूत व वीररसपूर्ण कथाही ग्रथित केलेल्या असल्याने ह्या महाकाव्याची लोकप्रियता आजही टिकून आहे. कवी खगोलशास्त्रज्ञ उमर खय्याम हा त्याच्या ‘रुबायां मुळे पश्चिमी जगतात अतिशय प्रसिद्ध आहे. अल्-गझाली (१०५८–११११) हा तत्त्वज्ञ व गूढवादी ईश्वरशास्त्रवेत्ता होता. त्याचा पुढील काळातील विचारांवर मोठा प्रभाव पडल्याचे दिसते. शेख फरीद-उद्-दीन अत्तार (१११९–१२३९) हा गूढवादी कवींचा बादशहा समजला जातो. निजामी-ए-गंजवी (११४१–१२०२) हा त्याच्या चार अद्‌भुत महाकाव्यांबद्दल विख्यात आहे. तेराव्या शतकात जलाल उद्दीन रूमीने (१२०७–७३) मसनवी  नामक एक प्रदीर्घ गूढवादी काव्य यमकबद्ध रचनेत तयार केले. इराणमध्ये व इराणबाहेर सर्वाधिक प्रसिद्धी पावलेल्या सादी (११४८–१२९१) ह्या कवीने गुलिस्ताँबुस्तान  ही दोन काव्ये रचिली. हाफीझ शीराझी (१३२५–१३८९) ह्या कवीने सु. ७०० कविता रचिल्या, त्यांतील पुष्कळशा कविता वसंतऋतू, गुलाब, यौवन आणि शाश्वत सौंदर्य यांवर अप्रतिम गझलांत रचिल्या आहेत. नासिर-इ-खुसरौ हा पर्शियन कवी, ईश्वरशास्त्रवेत्ता तसेच प्रवासवर्णनलेखक याच काळात होऊन गेला.

विसाव्या शतकातील प्रसिद्ध कादंबरीकार मोहम्मद बकीर खुस्रवी (१९०९– ), मूसा नाथ्री (१९१९– ) हे होत. जमालझादा (१९२२– ) हा पहिला कथालेखक. त्याचे अनुकरण मोहम्मद हिजाझी (१९००– ), बुझुर्ग अलवी (१९०८– ), सादिक चुबक, जलाल अल्-इ अहमद आणि सादिक हिदायत (मृ. १९५१) ह्यांनी केले. सादिक हिदायत नवीन शैली चा निर्माता म्हणून मान्यता पावला. त्याची सर्वांत प्रसिद्ध कादंबरी बुफ् इ कुर  ही इंग्रजी (द ब्‍लाइंड आउल, अनु. १९५८) व फ्रेंच भाषांत (१९५३) अनुवादित झाली. आधुनिक कवींमध्ये अदीब ए पिशावरी (मृ. १९३०), अदीब-उल-ममालिक (मृ. १९१७) व ईरज मिर्झा (मृ. १९२६) हे महत्त्वाचे होत. क्रांतिकारी कवींमध्ये इश्की (मृ. १९२४), लाहुती (मृ. १९५७) हे प्रसिद्ध आहेत. मलिक-श-शुअरा बहार व लेखिका पर्वीन ए इतिसामी (मृ. १९४१) प्रसिद्ध आहेत. पर्वीझ नातेल खानलारी (१९२४– ) हा सुखान  मासिकाचा संपादक, मोहम्मद हुसेन शहरियार (१९०४– ), गुलशन फेरेयेइन, ताव्हालाली व सईद यासिमी हे कवी दुसर्‍या महायुद्धानंतर प्रसिद्धी पावले. पश्चिमी साहित्यकृतींचा त्यांच्या रचनांवर प्रभाव पडल्याचे आढळते [→ फार्सी साहित्य].

कला, क्रीडा इत्यादी : चित्रकला व सुलेखनकला या दोन्ही क्षेत्रांत इराणने मुस्लिम युगापासून भर घातलेली आहे. पुस्तकनिर्मितिप्रकार हा या कलेतील एक विशेष प्रकार होय. सर्व इस्लामी राष्ट्रांमध्ये या कलेचा विकास करण्याचे श्रेय इराणला अब्बासी कालापासून (७५०) दिले जाते. कुराणाच्या प्रती जरी कूफी लिपीत बसरा व कूफा येथे तयार होऊ लागल्या, तरी बसर्‍याचा इराणी खोशनाम यानेही कूफी लिपीत मोठे कार्य केले आहे. नक्षीचे विविध प्रकार इराणी सुलेखनकारांनी तयार केले. पर्शियन चित्रकलेत बगदाद संप्रदाय, तैमूर संप्रदाय, हेरात संप्रदाय (हेरातचा बिहजाद याला सर्वोत्कृष्ट पर्शियन चित्रकार मानतात), ताब्रीझ संप्रदाय, इस्फाहान संप्रदाय होऊन गेले. वास्तुकला, मृत्तिकाशिल्प, वस्त्रोद्योग व धातुकाम ह्यांवरही पर्शियन चित्रकलेप्रमाणे सजावटीच्या कौशल्याचा ठसा उमटलेला दिसतो. वास्तुकलेत पिंप-घुमटाकारी कमानींची आवड फार दिसून येते. घुमटाचा अधिककरून उपयोग केलेला आढळतो. बांधकामातील कल्पकता जागोजागी दिसून येते. सिंह, गिधाडे व कल्पनारम्य प्राणी भूमितिविन्यासबद्ध करून रेशीम वा कधी कधी सोन्याच्या तारेत गुंफून ही चित्रे कापडावर गुंफण्याची कला, ही इराणमध्ये अठराव्या शतकापासून आकारिकता व यथार्थता ह्यांचे संमिश्रण दाखवू लागली. विविध प्रकारचे रग व गालिचे हे पर्शियन वस्त्रकलेचे सर्वांत मोठे उदाहरण होय रचनाबंधामध्ये अप्रतिम कौशल्य व अतिशय दाट रंग ह्यांनी ते उठून दिसत. धातुकामामध्ये विशेषत: धातूंच्या निरनिराळ्या भांड्यांवर सोनेरी व चांदीचा मुलामा देण्याचे कसब खास करून इराणी कारागिरांचेच होते या कलेत त्यांचा सौंदर्यवादी दृष्टिकोन पराकाष्ठेस पोहोचला होता. अल्पाकृती कुट्टिमशिल्पन (मोझेईक), हस्तिदंत, एबनी, लाकूड व काच यांच्या संमिश्रणाने लाकडाचा आधार घेऊन तयार केलेली कलाकृती खाताम, गुंतागुंतीचे धातुकाम, आरास केलेली हस्तलिखिते, पुस्तके व पुस्तकांची बांधणी हे इराणी कलेचे विशेष होत. इराणी कला सॅसॅनिडी काळापासून अलंकरण व सजावटीचा तपशील ह्यांनी विनटलेली दिसते, उदा., मशिदींचे दर्शनी भाग. पंधराव्या शतकातील वास्तुकलेचे सर्वांत गुंतागुंतीचे उदाहरण म्हणजे इस्फाहानची मशीद होय [→ इराणी कला].

इराणमध्ये ‘झुरखानेह (शारीरिक व्यायामगृहे) सर्वत्र आढळतात. कुस्ती हा मर्दानी व्यायामप्रकार अतिशय लोकप्रिय आहे तो इराणचा राष्ट्रीय खेळ आहे. शहरांतून व मोठाल्या गावांतून चित्रपटगृहे, नाट्यगृहे, कॅफे व कॅबरे यांसारखे मनोरंजनाचे विविध प्रकार आहेत. टेनिस, सॉकर, पोहणे, स्कीईंग आणि स्केटिंग, बास्केटबॉल व पोलो हे आधुनिक खेळ लोकप्रिय आहेत. मेक्सिको सिटी येथे १९६८ साली भरलेल्या ऑलिंपिक सामन्यात इराणला फ्री स्टाईल कुस्ती व वजने उचलणे ह्यांमध्ये अनुक्रमे एक सुवर्ण, एक रौप्य व एक ब्राँझ आणि एक सुवर्ण व एक रौप्य अशी पदके मिळाली होती तर म्यूनिक १९७२ ऑलिंपिकमध्ये दोन रौप्य व एक ब्राँझ पदक मिळाले होते. १९७४ मध्ये आशियाई सामने तेहरान येथे भरणार आहेत.

इराणचा इतिहास प्राचीन असल्याने येथे विविध दृष्टींनी आकर्षक अशी अनेक ठिकाणे आहेत. ॲकिमीनिडी राजा डरायस ह्याने पर्सेपलिस ही अत्युत्कृष्ट नगरी वसविली होती. सॅसॅनिडी काळात कलेच्या (विशेषत: धातुकाम व वस्त्रांवरील नक्षीकाम) विकास मोठ्या प्रमाणावर झाला. दहाव्या व अकराव्या शतकांत शीराझ हे इस्लामी कलेचे, विद्येचे व विज्ञानाचे केंद्र बनलेले होते. आजही शीराझ, कुम, मेशेद, इस्फाहान, तेहरान ह्या शहरांमधील वस्तुसंग्रहालयांतील वस्तू प्राचीन संस्कृतीच्या समृद्धतेची साक्ष देतात. तेहरान हे राजधानीचे शहर प्रशासकीय, औद्योगिक, व्यापारी केंद्र व बुद्धिवंतांचे शहर समजले जाते. येथील राजप्रासाद, मयूरसिंहासन, विस्तीर्ण पटांगण, गूलिस्तान चौक इ. प्रेक्षणीय आहेत. इस्फाहान हे सुंदर ऐतिहासिक शहर उत्कृष्ट सतरंज्या, गालिचे, चांदीच्या मुलाम्याचे धातुकाम इत्यादींसाठी सुविख्यात आहे. शीराझ हे व्यापारी शहर उत्कृष्ट दर्जाची मद्ये, रसाळ संत्री, मोठी उपवने आणि रंगेल व कविवृत्तीचे लोक ह्यांकरिता प्रसिद्ध आहे. ताब्रीझ हे थंड हवेचे ठिकाण, औद्योगिक शहर, व्यापारी केंद्र तसेच हस्तव्यवसायांचे महत्त्वाचे केंद्र– उत्कृष्ट सतरंज्या व रग यांसाठी– म्हणून सुविख्यात आहे. आबादान हे तेलउद्योगाचे प्रधान केंद्र आहे. इराणचा प्राचीन इतिहास मोठा असला, तरी विसाव्या शतकात विशेषत: तेलसमृद्धीमुळेच इराण अतिशय प्रसिद्धी पावला आहे. तेलसमृद्धीच्या जोडीला रशियाचा शेजारी राष्ट्र म्हणून इराणला महत्त्व मिळाले आहे. (चित्रपत्रे ४९, ५०).

संदर्भ : 1. Avery, Peter, Modern Iran, London, 1965.

2. Davar, F. C. Iran and It’s Culture, Bombay, 1953.

3. Frye, R. N. Iran, London, 1960.

4. Shearmon, John, The Land and People of Iran, London, 1962

गद्रे, वि. रा.

तेहरान

 

इस्फाहानमधील बाजार दृश्य
इतिहासप्रसिद्ध मयूरासन
जगप्रसिद्ध इराणी गालिच्यांचे विणकाम
तेहरान : एक दृश्य.
आबादान येथील तेलशुद्धी कारखाना
एल्बर्झ पर्वतातील धरण : येथन तेहरानला वीज व पाणी मिळते.
इराणमधील भटक्या जमातीचे लोक
फार्स येथील सिमेंट कारखाना