उत्रेक्त : (यूत्रेक्त). मध्य नेदर्लंड्समधील उत्रेक्त प्रांताची राजधानी. लोकसंख्या २,७४,९७४ (१९७२). हे ॲम्‌स्टरडॅमच्या आग्नेयीस ४२ किमी., ऱ्हाइन नदीच्या एका फाट्यावर वसले आहे. देशातील हे एक प्राचीन, सुंदर व पवित्र शहर मानले जाते. सातव्या शतकात येथे ख्रिश्चन धर्मकेंद्र सुरू झाले. येथील बिशप फ्रिझियन लोकांना मार्गदर्शन करू लागला. बाराव्या शतकात शहराला सनद मिळाली. सोळाव्या शतकात बिशपने बादशहाला शहर विकले. त्यानंतर हे अनेक घडामोडींचे केंद्र बनले. मध्ययुगात हे भरभराटलेले व्यापारी ठिकाण होते. हल्ली हे लोहमार्ग, जलमार्ग, व्यापार इत्यादींचे केंद्र असून, येथे वर्षातून दोनदा औद्योगिक प्रदर्शने भरतात. येथे विमा कंपन्यांच्या मुख्य कचेऱ्या व टांकसाळ असल्याने नेदरर्लंड्सच्या आर्थिक जीवनात याला महत्त्व आहे. पोलाद, ॲल्युमिनियम, खाद्यपदार्थ, खते, कापड, रसायने आदींचे कारखाने येथे आहेत. येथे गॉथिक स्थापत्यकलेच्या अनेक वास्तू असून त्यांपैकी सेंट मार्टिन कॅथीड्रल सुप्रसिद्ध आहे. येथील विद्यापीठ (स्थापना १६३६) नामवंत समजले जाते.

ओक, द. ह.