इस्लामपूर : सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या २७,१५८ (१९७१). पुणे-बंगलोर महामार्गावरील पेठ नाक्यापासून हे ३·२२ किमी. आत असून येथूनच पुढे सांगली ४०·२३ किमी. आहे. याला उरण-इस्लामपूर या जोडनावानेही संबोधण्यात येते. येथे माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय व शिक्षक-प्रशिक्षण महाविद्यालय असून दवाखाना व बऱ्याच सहकारी संस्था आहेत. हे प्रामुख्याने शेतमालाच्या व्यापाराकरिता प्रसिद्ध असले, तरी याचे औद्योगिक महत्त्वही आता वाढले आहे. गावात तेलघाणी, विटा, लोकर, कांबळी, हातमाग, चर्मकाम इ. कुटिरोद्योग चालतात.
जोशी, चंद्रहास.