इलेक्ट्रॉनीय उद्योग : इलेक्ट्रॉन नलिका व अर्धसंवाहक प्रयुक्ती, या प्रयुक्तींच्या मंडलामध्ये लागणारे घटक भाग व गुंतागुंतीची इलेक्ट्रॉनीय मंडले असलेली विविध प्रकारची साधनसामग्री यांचे उत्पादन करणारा उद्योगधंदा.

इतिहास व विकास : १९०६ साली त्रिप्रस्थ नलिकेचा [→ इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ति] शोध लागल्यानंतरही बरीच वर्षे इलेक्ट्रॉन नलिकांचा वापर व्यवहारात फारसा केला जात नसे. पहिल्या महायुद्धात रेडिओ संदेशवहनासाठी या नलिकांचा काही प्रमाणात वापर करण्यात आला. तथापि अब्जावधी डॉलरांच्या भांडवलावर आज उभ्या असलेल्या इलेक्ट्रॉनीय उद्योगाची वाढ, रेडिओ कार्यक्रमांचे प्रेषण १९२२ पासून सुरू झाल्यानंतरच्या काळात झाली, असे सामान्यपणे समजले जाते. या उद्योगाची सुरुवात अमेरिकेतील संयुक्त संस्थानांत प्रथम झाली व त्या मागोमाग कॅनडा, ऑस्ट्रेलिया व यूरोपातील प्रमुख देशांतही या उद्योगाची वाढ होऊ लागली. संयुक्त संस्थानांत १९२२ साली सु. १० लक्ष इलेक्ट्रॉन नलिका व सु. १ लक्ष रेडिओ ग्राही तयार झाल्या. १९२५ पर्यंत याच मालाचे उत्पादन १ कोटी २० लक्ष नलिका व २० लक्ष रेडिओ ग्राही इतके वाढले. प्रारंभी मुख्यत: रेडिओ प्रेषक व ग्राही आणि यांच्या जोडणीत लागणारे सुटे भाग व प्रयुक्ती यांच्या निर्मितीपुरताच हा उद्योग मर्यादित होता. पण अल्पावधीतच रेडिओ प्रेषक व ग्राही यांत उपयोगात येणाऱ्या निरनिराळ्या मंडलांचा व इतर इलेक्ट्रॉनीय मंडलांचा अन्यत्र उपयोग करण्यात येऊ लागला. या प्रगतीबरोबरच इलेक्ट्रॉनीय उद्योगाची संदेशवहन व्यवसायाशी निगडीत असलेली प्राथमिक अवस्था संपून आता हा उद्योग अधिक व्यापक व स्वयंपूर्ण स्वरूपात स्थिर झाला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात दूरचित्रवाणीचा वापर पाश्चात्त्य राष्ट्रांत सार्वत्रिक प्रमाणात सुरू झाला व कारखान्यांत व अनेक व्यावसायिक क्षेत्रांत स्वयंचलन व नियंत्रण या कार्यांसाठीही इलेक्ट्रॉनीय मंडलांचा वापर होऊ लागला. यामुळे इलेक्ट्रॉनीय उद्योगाचा विस्तार दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात प्रचंड प्रमाणात वाढू लागला. यामध्ये संगणकांच्या (गणितकृत्ये करणाऱ्या यंत्रांच्या) व्यावसायिक उपयुक्ततेमुळे अधिकच भर पडली. १९४८ साली ट्रॅंझिस्टरचा शोध लागल्यापासून एका नव्या दिशेने या उद्योगाची वाढ सुरू झाली. ⇨ अर्धसंवाहक  द्रव्यांपासून बनविलेल्या अनेक प्रकारच्या प्रयुक्ती व त्यांना पूरक असे इतर घटक यांच्या उत्पादनास प्रचंड प्रमाणावर चालना मिळाली.

इलेक्ट्रॉनीय साधनांच्या उपयुक्ततेचे आणखी एक प्रमुख क्षेत्र म्हणजे जगातील निरनिराळ्या राष्ट्रांच्या संरक्षण यंत्रणा. आजच्या घटकेस तर या उद्योगाच्या वाढीस सर्वांत अधिक पोषक असलेले क्षेत्र म्हणजे राष्ट्रीय संरक्षण व्यवस्था असेच म्हटले पाहिजे. आरमार, सैन्य व विमानदल यांच्या सामग्रीत इलेक्ट्रॉनीय सामग्रीची टक्केवारी गेल्या काही वर्षांत कल्पनातीत प्रमाणात वाढली आहे. पहिल्या महायुद्धात फक्त रेडिओ संदेशवहनासाठी इलेक्ट्रॉनीय सामग्रीचा वापर काही प्रमाणात करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धात रडारची भर पडली व विमान वाहतुकीसाठी इलेक्ट्रॉनीय साधनसामग्री वापरणे अत्यावश्यक होऊन बसले. दुसऱ्या महायुद्धापूर्वी एका बाँबफेकी विमानात साधारणपणे ५,००० डॉलर किंमतीची इलेक्ट्रॉनीय सामग्री असे, तर आजच्या उच्च प्रतीच्या बाँबफेकी जेट विमानात सु. ५० लक्ष डॉलर किंमतीची अशी सामग्री असते. मुख्य म्हणजे संरक्षण कार्याकरिता इलेक्ट्रॉनीय प्रयुक्तींच्या क्षेत्रात फार मूलभूत व मोलाचे संशोधन करावे लागते व त्याचा या उद्योगाच्या इतर क्षेत्रांतील वाढीस निर्णायक स्वरूपाचा फायदा होतो.

वरील सर्व घडामोडींचा परिणाम म्हणून संयुक्त संस्थांनात १९६० साली इलेक्ट्रॉनीय साधनसामग्रीचे उत्पादन सु. १५ अब्ज डॉलर किंमतीचे झाले. ब्रिटन व फ्रान्समध्ये याच वर्षी अशा साधनसामग्रीचे उत्पादन प्रत्येकी सु. १ अब्ज डॉलर किंमतीचे झाले. १९६० नंतर अवकाशप्रवासाचे युग सुरू झाले व त्यामुळेही इलेक्ट्रॉनीय उद्योगाच्या वाढीस अधिकच उत्तेजन मिळाले. १९६०–७० या कालखंडात या उद्योगाची वाढ निदान ४ ते ५ पटींनी झालेली आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर या उद्योगात जपान, पश्चिम व पूर्व जर्मनी, सोव्हिएट रशिया, यूरोप खंडातील इतर लहानमोठे देश आणि भारतासारखी काही नवस्वतंत्र राष्ट्रे यांनी प्रवेश केला. जपानने तर या उद्योगात इतकी आघाडी मारली की, काही बाबतींत त्या देशाने अमेरिकेलाही मागे टाकले. मालाचा उत्तम दर्जा व कमी उत्पादन खर्च यांमुळे जपानमध्ये तयार झालेली इलेक्ट्रॉनीय सामग्री अमेरिकेच्या बाजारपेठेतही स्पर्धा करू शकते. १९६० मध्ये इलेक्ट्रॉनीय सामग्रीचे उत्पादन जपानमध्ये सु. १ अब्ज डॉलर किंमतीचे म्हणजे ब्रिटन व फ्रान्स इतकेच होते. तर या बाबतीत अमेरिकेच्या खालोखाल जपानचा क्रमांक लागतो.

सध्याचे स्वरूप : इलेक्ट्रॉनीय उद्योगधंद्याचे साधारणपणे तीन विभाग पडतात : (१) इलेक्ट्रॉनीय सामग्रीमध्ये लागणारे घटक भाग व इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ती तयार करणारे कारखाने. उदा., इलेक्ट्रॉन नलिका, ट्रँझिस्टर व इतर अर्धसंवाहक प्रयुक्ती, निरनिराळ्या प्रकारचे रोधक, निरनिराळ्या प्रकारची धारित्रे (विद्युत् भार साठविणारी साधने), प्रवर्तक (विद्युत् गुणधर्मामुळे विद्युत् प्रवाहाच्या बदलास विरोध किंवा विलंब करणारी) वेटोळी इ. सामग्री तयार करणारे कारखाने (२) सामान्य लोकांना करमणुकीसाठी उपयोगी पडणारी इलेक्ट्रॉनीय सामग्री तयार करणारे कारखाने. उदा., ध्वनीच्या विवर्धनासाठी वापरावयाचे विवर्धक, फीत मुद्रक (फितीवर ध्वनीची नोंद करणारे यंत्र), रेडिओ ग्राही, दूरचित्रवाणी ग्राही इ. सामग्री तयार करणारे कारखाने. (३) व्यावसायिक उपयोगाची इलेक्ट्रॉनीय सामग्री तयार करणारे कारखाने. उदा., रेडिओ व दूरचित्रवाणी यांच्यासाठी लागणारे प्रेषक, तारायंत्र व दूरध्वनी यांसाठी लागणारी सामग्री, लष्करी दले व पोलीसदल यांना संदेशवहनासाठी लागणारे प्रेषक व ग्राही, सागरी व हवाई वाहतुकीशी संबंधित संदेशवहन व नियंत्रण यांसाठी लागणारी सामग्री, लष्करी उपयोगाची रडारसारखी साधने, संगणक व औद्योगिक क्षेत्रात लागणारी इतर सामग्री, औद्योगिक उपयोगाकरिता व संशोधनाकरिता लागणारी इलेक्ट्रॉनीय उपकरणे इत्यादी.

भारतामध्ये या तीनही विभागांतील कारखान्यांची वाढ १९५० नंतर झालेली आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वीपासूनच रेडिओ ग्राही तयार करणारे काही कारखाने भारतात निघाले होते पण १९५० नंतरच या उद्योगाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असे म्हणता येईल. वरील तीन विभागांपैकी पहिल्या दोन विभागांतील उत्पादन बहुतांशी खाजगी क्षेत्रात होते, परंतु घटक भाग व प्रयुक्तींचे उत्पादन खाजगी क्षेत्राबरोबरच सरकारी क्षेत्रातही करण्यात येते. तिसऱ्या विभागातील सामग्री बहुतांशी सरकारी क्षेत्रातील कारखान्यांत तयार होते, परंतु इलेक्ट्रॉनीय उपकरणे, संगणक व औद्योगिक क्षेत्रात स्वयंचलित प्रणालींकरिता लागणारी सामग्री खाजगी क्षेत्रातील कारखान्यांतही तयार होते.

इलेक्ट्रॉनीय उद्योगाच्या वर निर्देश केलेल्या तीन विभागांचे स्वरूप व स्थिती यांचा आढावा खाली दिला आहे :


(१) इलेक्ट्रॉनीय घटक व प्रयुक्ती : १९५० सालानंतर नवनवीन प्रयुक्ती शोधण्यात या उद्योगातील बरेच प्रयत्‍न कारणी पडले आहेत. त्यांतूनच साध्या ट्रँझिस्टरपासून अनेक टप्प्यांत हजारो ट्रँझिस्टर लागतील असली महाकाय मंडले जवळजवळ एका ट्रँझिस्टरच्या आकारमानात समाकलित (एकत्रित केलेल्या) मंडलांच्या स्वरूपात उपलब्ध झाली आहेत. या नवीन जातीच्या प्रयुक्तींचे उत्पादन करताना लागणारी यंत्रे, सामग्री, परिसर, कौशल्य व दक्षता ही केवळ १९५० नंतरच व्यावहारिक संभाव्यतेच्या कक्षेत येऊ शकली. आधुनिक इलेक्ट्रॉनीय प्रयुक्तींच्या उत्पादनास प्रचंड भांडवली खर्च लागतो व प्रचंड प्रमाणावर उत्पादन केल्यासच हा खर्च व्यवहार्य ठरतो. मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याबरोबरच या प्रयुक्तींच्या उत्पादक यंत्रांमध्ये व तंत्रामध्ये नव्या सुधारणा करून उत्पादन खर्च कमी करण्यावरही प्रयुक्तिनिर्मिती उद्योगाची व पर्यायाने सर्वच इलेक्ट्रॉनीय उद्योगाची भरभराट अवलंबून आहे. प्रयुक्तिनिर्मिती क्षेत्रात आज अमेरिकेची संयुक्त संस्थाने हे राष्ट्र जगात आघाडीवर आहे व तंत्रदृष्ट्या सर्वसाधारणत: इतर प्रगत राष्ट्रांच्या मानाने २-३ वर्षे पुढे आहे असे मानले जाते. भारतातील हा उद्योग सध्या बाल्यावस्थेतच आहे, पण काही वर्षांत तंत्रदृष्ट्या बरीच मोठी प्रगती होईल असा तज्ञांचा अंदाज आहे. प्रयुक्तिनिर्मिती उद्योगाच्या उत्पादनावरच इलेक्ट्रॉनीय सामग्रीचे इतर उद्योग पूर्णत: अवलंबून आहेत.

(२) व्यक्तिगत करमणुकीची इलेक्ट्रॉनीय साधने : भारतातील एकूण इलेक्ट्रॉनीय उद्योगाच्या उत्पादनापैकी ५७ टक्के उत्पादन या क्षेत्रात होते. रेडिओ ग्राही, ध्वनिक्षेपक, ध्वनिमुद्रक, दूरचित्रवाणी ग्राही इ. साधनांचा या वर्गात उल्लेख करता येईल.

(३) व्यावसायिक क्षेत्रात वापरावयाची इलेक्ट्रॉनीय सामग्री : या विभागात राष्ट्रीय संरक्षणोपयोगी सामग्री, औद्योगिक उपयुक्ततेची सामग्री, नागरी संदेशवहन सेवांसाठी लागणारी सामग्री, संकीर्ण उपकरणे व संगणक इ. सामग्री असे उपविभाग कल्पिता येतील. या उपविभागांतील उद्योगांच्या परिस्थितीचा आढावा वेगवेगळा घ्यावयास हवा.

(अ) संरक्षणोपयोगी इलेक्ट्रॉनीय सामग्री : आधुनिक युद्धशास्त्रामध्ये अचूक, कार्यक्षम व तत्काल कार्य करणाऱ्या संदेशवहन सामग्रीची मोठी गरज असते. इलेक्ट्रॉनीय उद्योगाने अगदी प्रारंभिक अवस्थेपासून ही गरज पुरी करण्यात हातभार लावलेला आहे. त्यातूनच रेडिओ प्रेष-ग्राही (प्रेषक व ग्राही एकत्र असणारे साधन), रेडिओ दूरध्वनी, रडार इ. प्रणालींमध्ये लागणारी अनेक प्रकारची इलेक्ट्रॉनीय सामग्री निर्माण झाली. त्यांशिवाय नवनवीन अवजड व शीघ्रगती शस्त्रांचे व अस्त्रांचे कार्य अचूकतेने व निपुणतेने व्हावे म्हणून त्यांचे चालन व नियंत्रण करण्यासाठी नवीन प्रकारची इलेक्ट्रॉनीय सामग्री निर्माण होत आहे. म्हणून वाढत्या युद्ध प्रयत्‍नांबरोबर संरक्षण सामग्रीची निर्मिती हा इलेक्ट्रॉनीय उद्योगातील वाढत्या महत्त्वाचा भाग म्हणून जगात व भारतातही अधिकाधिक प्रमाणात पुढे येत आहे. भारतात १९६४-६५ या वर्षात इलेक्ट्रॉनीय संरक्षण साहित्याचे उत्पादन सु. ५ कोटी रुपयांचे होते. ते १९६९-७० साली ३० कोटी रुपयांच्या घरात गेले व १९७५ सालापर्यंत ६० कोटी रुपयांच्यावर पोहोचेल असा अंदाज आहे. १९६९-७० या वर्षात एकूण इलेक्ट्रॉनीय उद्योगाचे उत्पादन सु. ११० कोटी रुपयांचे होते. त्यातील २७% पेक्षा थोडा अधिक भाग संरक्षण सामग्रीचा होता (भाभा समितीच्या अहवालानुसार तो १९७५ पर्यंत ४५% पर्यंत असावयास पाहिजे). या टक्केवारीनुसार करमणूक इलेक्ट्रॉनिकी पेक्षा संरक्षण इलेक्ट्रॉनिकी जरी दुय्यम महत्त्वाची वाटली तरी प्रकल्प व संशोधन या प्रीत्यर्थ राष्ट्रीय उत्पन्नातून भरपूर व सुलभतेने द्रव्य प्राप्त होत असल्याने इलेक्ट्रॉनीय उद्योगाच्या भवितव्याच्या संदर्भात संरक्षण इलेक्ट्रॉनिकी सर्वांत अधिक महत्त्वाची ठरते शिवाय भारतात वाढत्या संरक्षण गरजांनुसार भविष्य काळात या क्षेत्रातील इलेक्ट्रॉनीय सामग्रीचे एकूण इलेक्ट्रॉनीय सामग्रीच्या उत्पादनातील प्रमाण हल्लीपेक्षा बरेच वाढेल हेही निश्चित आहे.

(आ) औद्योगिक इलेक्ट्रॉनीय सामग्री : कित्येक औद्योगिक कारखान्यांच्या उत्पादनाची मागणी दिवसेंदिवस इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे की, ती पुरी करण्यासाठी या कारखान्यांना नवनवीन प्रचंड यंत्रसंच बसवावे लागत आहेत. अशा संचांचे व त्यांमधील यंत्रांचे कार्य स्वनियमित ठेवणे अनेक दृष्टींनी अपरिहार्य ठरते. स्वयंचालन आणि त्यासाठी आवश्यक पूरक उपकरण योजना यांना लागणारी सामग्री ही बहुतांशी इलेक्ट्रॉनीयच असते. आजमितीस भारतात या वर्गातील सामग्रीचे उत्पादन नाममात्रच होत असले, तरी इतर प्रगत देशांप्रमाणे ते पुढील काळात बरेच वाढेल यात शंका नाही.

(इ) नागरी संदेशवहन सेवांसाठी लागणारी सामग्री : डाक व दूरलेखा विभाग (दूरध्वनी, तारायंत्र, दूरमुद्रक इ.), पोलीस, रेल्वे इ. सेवांमध्ये संदेशवहनासाठी लागणारी विशिष्ट प्रकारची सामग्री व सर्व प्रकारची रेडिओ प्रेषक सामग्री या वर्गात मोडते. १९६९-७० साली भारतात एकूण इलेक्ट्रॉनीय उद्योगाच्या उत्पादनापैकी सु. ५% उत्पादन या गटातील सामग्रीचे झाले.

(ई) संकीर्ण उपकरणे व संगणक :अनेक क्षेत्रांत परीक्षा, मापन, गणन व संगणन यांच्या निरनिराळ्या गरजा असतात व त्या पुऱ्या करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनीय सामग्रीचे व उपकरणांचे उत्पादन आवश्यक असते. भारतात १९६९-७० या वर्षी या संकीर्ण स्वरूपात एकूण इलेक्ट्रॉनीय उत्पादनाच्या १०% उत्पादन झाल्याचे दिसते.

वरील निरनिराळ्या क्षेत्रांत लागणाऱ्या इलेक्ट्रॉनीय सामग्रीचा दर्जा व गुणवत्ता यांच्यात फार तफावत असते. साधारणत: करमणूक इलेक्ट्रॉनिकीसाठी सामान्य दर्जाची, साधारण स्थैर्याची पण स्वस्त किंमतीची सामग्री वापरतात. परंतु संरक्षण व्यवस्था, शास्त्रीय संशोधन, औद्योगिक उपकरण योजना इ. काही क्षेत्रांत किंमतीपेक्षा गुणवत्ता व अचूकता यांना अधिक महत्त्व असल्याने जास्त किंमतीची पण अत्यंत प्रतिकूल परिस्थिती व परिसर यांमध्येही जिची विश्वसनीयता टिकून राहील अशी निवडक सामग्रीच वापरावी लागते. यामुळेच भिन्न सामग्रीचे उत्पादन करणारे भिन्न कौशल्याचे दोन गट या उपयोगात स्पष्टपणे पहावयास मिळतात व त्यांचा पुष्कळदा करमणूक दर्जाची सामग्री करणारे व व्यावसायिक दर्जाची सामग्री करणारे असा पृथक् उल्लेख केला जातो.

इलेक्ट्रॉनीय उद्योगाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये : (१) इतर अनेक उद्योगांशी तुलना करता या उद्योगतील उत्पन्नापैकी भांडवली खर्चाच्या व कच्च्या मालाच्या किंमतीचा हिस्सा बराच कमी व कामगार कौशल्याचा मोबदला त्या मानाने जास्त असतो. भारतासारख्या  देशाच्या बाबतीत या उद्योगाच्या विकासाच्या संदर्भात ही बाब फार महत्त्वाची आहे. (२) हा उद्योग अशा काही मोजक्या उद्योगांपैकी आहे की, ज्यात एकूण उत्पन्नापैकी फार मोठा भाग संशोधन व विकास या प्रीत्यर्थ खर्च करणे परिणामी अत्यंत श्रेयस्कर ठरते. (३) राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व सामाजिक व्यवहाराच्या जवळजवळ सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित असणाऱ्या अत्यंत मोजक्या उद्योगांपैकी हा एक प्रमुख उद्योग आहे. (४) या उद्योगाची उभारणी विकल्पाने विकेंद्रित लघु-उद्योगाच्या जाळ्यामध्ये किंवा प्रचंड प्रमाणावरील केंद्रित प्रकल्पात एकाच वेळी सारख्याच व्यवहार्यतेने करता येणे सहज शक्य असते (जपान व अमेरिका ही अनुक्रमे या दोन पद्धतींच्या यशाची ठळक उदाहरणे आहेत). या विधानाचा अधिक विस्तार पुढीलप्रमाणे करता येईल : इलेक्ट्रॉनीय सामग्री व उपकरणे यांत वापरले जाणारे सुटे भाग हे आकाराने लहान व माफक किंमत असलेल्या यंत्रांच्या साहाय्याने बनविता येण्याजोगे असतात. तसेच आटोपशीर व सुसिद्ध इलेक्ट्रॉनीय मंडलांच्या निर्मितीत हे सुटे भाग परस्परांशी सहजतेने व माफक मजुरीच्या मोबदल्यात जोडून घेता येतात. त्यामुळे या प्रकारच्या उत्पादनासाठी लघु-उद्योग क्षेत्र हे जास्त कार्यक्षम ठरते. या उलट जास्त गुंतागुंतीची मंडले व त्यांच्या प्रणाली यांच्या कार्यात जी विश्वसनीयता व स्थिरता अपेक्षित असते ती पडताळून पाहण्यासाठी, संशोधन व विकास सातत्याने चालू राहण्यासाठी भांडवली खर्च खूप जास्त प्रमाणात लागतो. अशा परिस्थितीत मोठ्या उद्योगाचे क्षेत्र अधिक व्यवहार्य ठरते.

निरनिराळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनीय सामग्रीचे भारतातील उत्पादन (कोटी रुपये)

वर्ष

घटक व प्रयुक्ती 

करमणुकीची इलेक्ट्रॉनीय साधने 

संरक्षणाशी निगडित सामग्री 

नागरी संदेशवहनासाठी लागणारी सामग्री 

इलेक्ट्रॉनीय उपकरणे व संगणक 

एकूण 

१९६४-६५

४·०

१७·४

५·३

२·३

१·५

३०·५

१९६५-६६

६·५

२४·०

६·५

३·०

३·५

४३·५

१९६६-६७

१०·०

३२·०

८·७

३·२

६·१

६०·०

१९६७-६८

१५·०

४०·०

१३·३

३·५

८·२

९०·०

१९६८-६९

२१·०

४८·०

२१·३

४·७

११·०

१०६·०

१९६९-७०

२८·०

६३·०

३०·०

५·०

१२·०

१३८·०


भारतातील इलेक्ट्रॉनीय उद्योगाची सद्यस्थिती : या उद्योगाचा भारतामध्ये गेल्या काही वर्षात कसा विकास होत आहे हे तळाशी दिलेल्या कोष्टकावरून लक्षात येईल.

१९७३-७४ सालापर्यंत म्हणजेच चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरच्या वर्षात सरकारी क्षेत्रातील वार्षिक उत्पादन (सुटे भाग धरून) अंदाजे ७५ कोटी रुपयांच्या घरात जाईल अशी अपेक्षा आहे. तुलनेने खाजगी क्षेत्रातील उत्पादन याच्या तिप्पट असेल.

चौथ्या योजनेच्या काळात भारतात बनविल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनीय सामग्रीच्या उत्पादनाची खाली दिलेल्या वर्गवारीत तज्ञांच्या अंदाजानुसार पुढीलप्रमाणे किंमत होईल :

उत्पादनाचा वर्ग 

एकूण किंमत (कोटी रु.) 

इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ती व सुटे भाग 

करमणुकीची इलेक्ट्रॉनीय सामग्री (रेडिओ ग्राही, दूरचित्रवाणी ग्राही,ध्वनिक्षेपक, फीतमुद्रक इ.). 

इलेक्ट्रॉनीय उपकरणे, संगणक इ. 

नागरी उपयोगाची संदेशवहन सामग्री 

संरक्षणविषयक इलेक्ट्रॉनीय सामग्री 

२०० 

५५० 

१०० 

१५० 

५०० 

 

एकूण : १३०० (सामग्री) २०० (घटक भाग). 

संभाव्य वाढ : भाभा समितीच्या शिफारशीनुसार १९७५ सालापर्यंत इलेक्ट्रॉनीय सामग्रीचे एकूण वार्षिक उत्पादन ३०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचावयास पाहिजे. याच वर्षी प्रयुक्ती व घटक भाग यांचे ८४ कोटी रुपयांचे उत्पादन अपेक्षित आहे. ही उद्दीष्टे गाठण्यासाठी १९६६-७५ या दहा वर्षांत एकूण भांडवल गुंतवणूक अनुक्रमे ११८ कोटी रु. व ४१ कोटी रु. करावी लागेल. याशिवाय या उद्योगाला वरील उद्दिष्ट गाठण्यासाठी २८ कोटी रु. किंमतीचा विशेष प्रकारचा कच्चा माल लागेल व तो तयार करण्यासाठी १२ कोटी रु. ची भांडवल गुंतवणूक करावी लागेल. १९७५ या वर्षाअखेर एकूण इलेक्ट्रॉनीय उद्योगाच्या वाढीस अत्यावश्यक असलेल्या संशोधन व विकास या बाबींवर होणारा वार्षिक खर्च ८० कोटी रुपयांच्यावर गेलेला असेल असा अंदाज आहे. त्या वर्षी या उद्योगात काम करणाऱ्या लोकांची संख्या ४ लक्ष व त्यांपैकी प्रशिक्षित तंत्रज्ञ व शास्त्रज्ञ यांची संख्या ४० हजारावर असेल. यावरून प्रत्येक कर्मचाऱ्यामागे अंदाजे सरासरी ९ हजार रुपयांचे सालीना उत्पादन होईल असे दिसते. १९७५ पर्यंत भारतामधील इलेक्ट्रॉनीय उद्योगाकडून प्रतिवर्षी सु. ३० कोटी रु. किंमतीची सामग्री निर्यात होण्याची अपेक्षा आहे. त्यातील सर्वांत मोठा भाग (२० कोटी रु.) फक्त रेडिओ ग्राहींच्या निर्यातीमधून मिळेल. सध्या एकूण राष्ट्रीय उत्पादनापैकी इलेक्ट्रॉनीय उद्योगाचा हिस्सा जेमतेम ०·१५% इतका अल्प आहे. १९७५ पर्यंत त्यामध्ये काहीशी वाढ झाली तरी हा हिस्सा एक टक्क्याहून कमीच राहील.

वरील आकड्यांच्या तुलनेसाठी इतर काही देशांचे आकडे उद्‌बोधक ठरतील. जपानमध्ये सध्या भारतापेक्षा सु. ३५–४० पट इलेक्ट्रॉनीय सामग्रीचे उत्पादन होत असून हा त्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनाचा ३·५% इतका अंश होतो. संयुक्त संस्थानांतील या उद्योगामध्ये आघाडीवर असलेल्या कंपन्यांचे दर कामगारामागे अंदाजे दीड लक्ष रुपयांचे उत्पादन होते.

परदेशांतील प्रमुख उत्पादक : संयुक्त संस्थानांमध्ये रेडिओ कॉर्पोरेशन ऑफ अमेरिका (आर. सी. ए.),जनरल इलेक्ट्रिक, वेस्टिंगहाऊस, बेल टेलिफोन लॅबोरेटरीज, इंटरनॅशनल बिझिनेस मशिन्स (आय. बी. एम.), वर्ल्ड ट्रेड कॉर्पोरेशन इ. ब्रिटनमध्ये मार्कोनी वायरलेस टेलिग्राफ कं., मार्कोनी इन्स्ट्रुमेंट्स, जनरल इलेक्ट्रिक कं., इंग्‍लिश इलेक्ट्रिक कं., मुलार्ड रेडिओ, इंटरनॅशनल काँप्यूटर्स लि., जर्मनीमध्ये टेलिफुंकेन व ग्रुंडिग हॉलंडमध्ये फिलिप्स स्वित्झर्लंडमध्ये ब्राउन बोव्हेरी जपानमध्ये हिताची हे निरनिराळ्या देशांतील इलेक्ट्रॉनीय सामग्रीचे उत्पादन करणारे प्रमुख कारखाने आहेत.

भारतातील उत्पादक : या उद्योगाच्या निरनिराळ्या विभागांतील मालाचे उत्पादन करणाऱ्या भारतातील प्रमुख कारखान्यांची नावे खाली दिली आहेत :

प्रयुक्ती व घटक भाग तयार करणारे कारखाने : (१) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., हैदराबाद (सरकारी क्षेत्र) (२) भारत इलेक्ट्रॉनिक्स लि., बंगलोर (सरकारी क्षेत्र) (३) एशियन इलेक्ट्रॉनिक्स लि., मुंबई (४) सेमीकंडक्टर्स लि., पुणे (५) फिलिप्स इंडिया लि., पुणे (६) कॉन्टिनेंटल डिव्हाइसेस (इंडिया) लि., फरिदाबाद (७) बॅकेलाइट हायलम लि., हैदराबाद (८) डेल्टन केबल इंडस्ट्रीज प्रा. लि., दिल्ली (९) खंडेलवाल हरमान इलेक्ट्रॉनिक्स लि., मुंबई (१०) इलेक्ट्रिकल काँपोनंट्स मॅन्यु. कं., मुंबई (११) रेस्कॉन मॅन्यु. कं. प्रा. लि., पुणे.

करमणुकीची घरगुती साधने तयार करणारे कारखाने : (१) नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स लि., मुंबई (२) जे. के. इलेक्ट्रॉनिक्स, कानपूर (३) मर्फी इंडिया लि., मुंबई (४) फिलिप्स इंडिया लि., पुणे व कलकत्ता (५) फोटोफोन इक्विपमेंट्स लि., मुंबई (६) वॅको रेडिओ इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीज, मुंबई (७) आंध्र वायरलेस इंडस्ट्रीज, विशाखापट्टनम् (८) टेलिरॅड प्रा. लि., मुंबई (९) मूळचंदानी इलेक्ट्रिकल अँड रेडिओ इंडस्ट्रीज लि., मुंबई (१०) स्टँडर्ड टी. व्ही., मुंबई.

व्यावसायिक सामग्री तयार करणारे कारखाने : (१) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., हैदराबाद (सरकारी क्षेत्र) भारत इलेक्ट्रॉनिक्स लि., बंगलोर (सरकारी क्षेत्र) (३) इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज बंगलोर (सरकारी क्षेत्र) (४) हिंदुस्थान टेलिप्रिंटर्स लि., मद्रास (सरकारी क्षेत्र) (५) हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लि., बंगलोर (सरकारी क्षेत्र) (६) इन्स्ट्रुमेंटेशन लि., कोटा (सरकारी क्षेत्र)  (७) व्हायब्रॉनिक्स प्रा. लि., मुंबई (८) एशियन इलेक्ट्रॉनिक्स लि., मुंबई (९) पॉलिटेक्‍निक कॉर्पोरेशन, मुंबई (१०) ईस्टर्न इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि., दिल्ली (११) अल्फाइड इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि., ठाणे (१२) फिलिप्स इंडिया लि., मुंबई (१३) द दिल्ली क्लॉथ अँड जनरल मिल्स कं. लि., दिल्ली (१४) इलेक्ट्रॉनिक्स अँड काँप्यूटर्स (इंडिया) लि., गाझियाबाद (१५) इंटरनॅशनल काँप्यूटर्स (इंडिया) लि., पुणे (१६) रतनशा असोशिएट कंपनीज, मुंबई(१७) आय. बी. पी. कं., मुंबई (१८) टाटा इलेक्ट्रिक कंपनीज लि., मुंबई (१९) मॉरिस इलेक्ट्रॉनिक्स लि., पुणे (२०) सिस्ट्रॉनिक्स, अहमदाबाद (२१) आय. बी. एम. वर्ल्ड ट्रेड कॉर्पोरेशन, दिल्ली (२२) बरोडा इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीज, मुंबई (२३) तोश्निवाल इंडस्ट्रीज प्रा.लि., अजमीर (२४) अडवानी ओर्लिकॉन प्रा. लि., पुणे (२५) टेक्‍निक्राफ्ट प्रा. लि., पुणे (२६) अम्फेट्रॉनिक्स प्रा. लि., पुणे (२७) असोशिएटेड इन्स्ट्रुमेंट मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इंडिया प्रा. लि., दिल्ली.

यांशिवाय लघु-उद्योग क्षेत्रात पंजाब, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, केरळ, प. बंगाल या राज्यांत अनेक लहान लहान कारखाने तीनही विभागांतील निरनिराळ्या प्रकारचा माल तयार करतात. या कारखान्यांपैकी अनेक कारखाने अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड व जपान या देशांतील प्रसिद्ध कारखान्यांच्या मदतीने व सहकार्याने उत्पादन करतात. काही परदेशीय कंपन्यांनी अशा प्रकारच्या भारतीय कारखान्यांमध्ये भांडवलही गुंतविले आहे.

संदर्भ : Electronics Commission, Government of India Proceedings of National Conference on Electronics, 1971.

जोशी. मु. य. जोशी, के. ल.