इलेक्ट्रॉनिकी : निर्वात अथवा वायूभरित प्रयुक्तीमधील विद्युत् संवहनक्रियेची मूलतत्त्वे, या प्रयुक्तींचे कार्य व त्यांच्या साहाय्याने कार्य करणाऱ्या प्रणाली [→ इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ती]यांसंबंधीचे शास्त्र अशी इलेक्ट्रॉनिकीची व्याख्या पूर्वी करण्यात येत होती. अशा प्रयुक्तींमधील विद्युत् संवहनाकरिता ऋणाग्रापासून मुक्त इलेक्ट्रॉनांचे उत्सर्जन होणे आवश्यक असते. त्यामुळे इलेक्ट्रॉन उत्सर्जन घडवून आणण्याकरता वापरण्यात येणाऱ्या पद्धती, त्यांची तंत्रे, उत्सर्जन क्रियेचे नियम, विद्युत् प्रवाहाचे नियंत्रण व ते करणाऱ्या विद्युत् अग्रांची कार्यपद्धती या सर्वांचा इलेक्ट्रॉनिकीमध्ये समावेश होतो. अर्धसंवाहक द्विप्रस्थ [→ अर्धसंवाहक], ट्रँझिस्टर इत्यादींच्या अलीकडील शोधामुळे या प्रकारच्या प्रयुक्तीचा सुद्धा इलेक्ट्रॉनिकीमध्ये समावेश करणे जरूर आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनीय नलिका (निर्वात अथवा वायुभरित) व अर्धसंवाहक प्रयुक्ती यांची निर्मिती व विद्युत् मंडलात विविध कार्याकरता त्यांचा उपयोग म्हणजेच इलेक्ट्रॉनिकी असे आता म्हणता येते. या प्रयुक्तींचा उपयोग विज्ञान, तंत्रविद्या व उद्योगधंदे यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात पुढे दिलेल्या मूलभूत कार्यांकरिता केला जातो :
(१) एकदिशीकरण म्हणजे प्रत्यावर्ती (उलट सुलट दिशेने वाहणाऱ्या) विद्युत् प्रवाहाचे एकदिश विद्युत् प्रवाहात रूपांतर करणे, (२) विवर्धन म्हणजे प्रत्यावर्ती अथवा एकदिश विद्युत् दाब अथवा शक्तीची वाढ करणे, (३) पर्यसन म्हणजे एकदिश विद्युत् प्रवाहाचे वा दाबाचे प्रत्यावर्ती प्रकारामध्ये परिवर्तन करणे, (४) इलेक्ट्रॉनीय स्विच क्रिया म्हणजे विद्युत् मंडलात विद्युत् प्रवाह सुरू करणे अथवा थांबविणे या क्रिया करणारी यंत्रणा आणि (५) निरनिराळ्या आकारांचे विद्युत् प्रवाह तरंग निर्माण करणे व या तरंगांवर निरनिराळे संस्कार घडवून त्यांच्या आकारांत आवश्यक असे बदल घडविणे. सध्या विज्ञान अथवा तंत्रविद्या यांच्या बहुतेक विभागांत इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ती अथवा प्रणालींचा वापर केला जात आहे. इलेक्ट्रॉनिकीच्या तंत्रात झालेल्या जलद सुधारणा व विकास यांमुळे या विविध विभागांत लागणाऱ्या मापक व नियंत्रक प्रणालींची अचूकता व संवेदनक्षमता यांमध्ये नेत्रदीपक बदल घडून आला आहे.
इतिहास : इलेक्ट्रॉनिकी या शास्त्राची सुरुवात एडिसन यांनी १८८३ साली लावलेल्या शोधापासून झाली. विद्युत् दिव्यात प्रकाशासाठी वापरलेल्या तप्त तंतूपासून ऋण कणांचे (इलेक्ट्रॉनांचे) उत्सर्जन होते, असे त्यांनी दाखविले. या ⇨ एडिसन परिणामावर संशोधन करून फ्लेमिंग यांनी १८९७ साली पहिली इलेक्ट्रॉन नलिका बनविली. हिच्यात एक तप्त ऋणाग्र असून उत्सर्जित इलेक्ट्रॉनांचे ग्रहण करण्याकरिता एक पट्टिका होती. या नलिकेतून एकाच दिशेने विद्युत् वहन होत होते, त्यामुळे तिच्या अग्रांमध्ये प्रत्यावर्ती विद्युत् दाब लावला असता या प्रयुक्तीतून एकदिश विद्युत् प्रवाह वाहतो असे आढळले. तिच्या या एकदिशीकरण वैशिष्ट्यामुळेच तिला व्हॉल्व्ह ही संज्ञा देण्यात आली. या नलिकेमध्ये इलेक्ट्रॉन उत्सर्जन करणाऱ्या ऋणाग्राजवळ एक जाळीसारखा जालक (विद्युत् अग्र) ठेवला, तर त्यामुळे नलिकेत वाहणाऱ्या विद्युत् प्रवाहाचे नियंत्रण करता येते, असे १९०६ साली ली डी फॉरेस्ट यांनी दाखवून दिले. या क्रियेचे मुख्य वैशिष्ट्य हे की, अत्यंत अल्प ऊर्जा आदान करून (आत सोडून)तिच्या साहाय्याने त्यापेक्षा किती तरी पटीने जास्त अशा प्रदान (बाहेर पडणाऱ्या) ऊर्जेचे नियंत्रण करता येते. ट्रँझिस्टरचा शोध १९४८ मध्ये शॉक्ली, बारडीन व ब्रॅटन या तीन अमेरिकन शास्त्रज्ञांनी लावला. यासाठी वापरलेले द्रव्य अर्धसंवाहक जातीचे असते. या घनावस्था प्रयुक्तीमध्ये विद्युत् वाहक मुख्यत: इलेक्ट्रॉन (n) व पोकळी (p) हे असतात [→अर्धसंवाहक].
इ. स. १९२२ च्या आधी इलेक्ट्रॉनीय साधनसामग्री मुख्यत: प्रयोगशाळा व सर्वसाधारण संदेशवहन यांकरिता वापरली जात होती. सार्वजनिक रेडिओ कार्यक्रम प्रेषण या सालापासून सुरू झाले. त्यामुळे या सामग्रीच्या उत्पादनात या वर्षापासून झपाट्याने वाढ झाली. यानंतर दूरचित्रवाणी, रडार, वाहन (विमान, जहाज वगैरे) नियंत्रक व मार्गदर्शक साधने, वैद्यकीय साधनसामग्री, संगणक (गणितकृत्ये करणारे यंत्र) इ. अनेक तंत्रांचा व उपकरणांचा शोध लागून विकास झाल्यामुळे इलेक्ट्रॉनीय उद्योगधंदा हा जगातील एक महत्त्वाचा व विकसित असा धंदा झाला आहे [→ इलेक्ट्रॉनीय उद्योग].
मापन व नियंत्रण कार्याकरिता साधी विद्युत् मंडले व प्रयुक्ती वापरता येतात. इलेक्ट्रॉनीय पद्धतीची यास जोड दिली असता, या कार्याची अचूकता, संवेदनक्षमता व स्थैर्य अनेक पटींनी वाढवता येतात. इलेक्ट्रॉनीय उपकरणे बहुगुणी असल्यामुळे जी कार्ये पूर्वी शक्य नव्हती, ती सुद्धा आता करता येऊ लागली आहेत. उदा., दूर अंतरावरून बिनतारी संदेशाद्वारा गति-नियंत्रण, साधनसामग्रीचे सूक्ष्मीकरण व घनावस्था प्रयुक्ती उपलब्ध झाल्यामुळे नियंत्रक मंडलाचा आकार तर लहान झाला आहेच, पण त्याला कार्यान्वित करावयास लागणाऱ्या ऊर्जेचे प्रमाणही खूप कमी झाले आहे. इलेक्ट्रॉन नलिका ग्राही व ट्रँझिस्टर वापरून तेच कार्य करणारी ग्राही यांची, आकार व आदान ऊर्जा विचारात घेऊन तुलना केल्यास, वरील विधानाची सत्यता पटेल.
संदर्भ : Ryder, J. D. Engineering Electronics, Tokyo, 1967.
चिपळोणकर, व. त्रिं.
“