इथिओपिया : पूर्वीचे नाव ॲबिसिनिया व तद्देशीय आम्हारिक भाषेतील यइत्योप्या निगुसा नगस्त मंगुइस्त. ईशान्य आफ्रिकेतील एक प्रजासत्ताक राष्ट्र. ३ ३०’ उ. ते १८ उ. व ३३ पू. ते ४८ पू. क्षेत्रफळ १२,२१,९०० चौ. किमी. लोकसंख्या २,४३,१९,००० (१९७१ अंदाज). याच्या उत्तरेस व पश्चिमेस सूदान, दक्षिणेस केन्या, आग्‍नेयीस व पूर्वेस सोमाली प्रजासत्ताक व आफार्झ अँड ईसाझ (पूर्वीचे फ्रेंच सोमालीलँड) आणि ईशान्येस तांबडा समुद्र आहे. दक्षिणोत्तर व पूर्व-पश्चिम अंतर प्रत्येकी सु. १,४५० किमी. असून १,२४० किमी. लांबीची तांबड्या समुद्राची किनारपट्टी देशाला लाभलेली आहे. अदिस अबाबा ही राजधानी आहे.

भूवर्णन : इथिओपिया म्हणजे एक मोठा थोरला डोंगराळ व पठारी जटिल प्रदेश आहे. आफ्रिकेतील प्रसिद्ध खचदरीने त्याचे दोन भाग केले आहेत. खचदरीच्या पश्चिमेकडील भागात येथील सर्वांत उंच पर्वतशिखरे आहेत. डोंगराळ प्रदेशाची सामान्य उंची सु. २,४०० मी. असून काही भाग ३,९०० मी. उंचीचे आहेत. आफ्रिकेतील तिसऱ्या क्रमांकाचे रास दाशान (४,६२० मी.) तसेच आबूना योसेफ (४,१९२ मी.), बातु (४,३०८ मी.), चिलालो (४,१३४ मी.), गुना (४,२०१ मी.) ही यांवरील काही उंच व रम्य शिखरे होत. भूवैज्ञानिक दृष्ट्या हा डोंगराळ प्रदेश वलीकरण आणि विभंग झालेल्या स्फटिकी खडकांचा असून त्यांवर स्तरित खडक, चुनखडक, वालुकाश्म आणि लाव्हापासून बनलेले खूप जाडीचे खडक यांचे थर आहेत. हा प्रदेश अलीकडील मध्यनूतन कालखंडात निर्माण झालेला असल्याने अद्यापही येथे स्थिरता आलेली नाही येथे अनेक ज्वालामुखी असून नेहमी भूकंप होतात नद्यांच्या निदऱ्यांवरून प्रदेश उंचावत जात असल्याचे पुरावे मिळतात. अनेक ठिकाणी उष्णोदकाचे झरे व सरोवरे आढळतात.

येथील खचदरी अरबस्तानापासून दक्षिण आफ्रिकेत गेलेल्या खचदरीचाच भाग असून तिचा तळ समुद्रसपाटीपासून सु. १,५०० मी. उंच आहे. ही खचदरी नैर्ऋ‌त्येकडे अरुंद असून ईशान्येकडे रुंद आणि अधिक खचलेली आहे. हा एक मोठा त्रिकोणी प्रदेश असून त्यात आवाश नदीचा अंतर्गत जलवाहनचा प्रदेश आणि दानाकिलचे रुक्ष मैदान यांचा समावेश होतो. यातील कोबारसिंक हा भाग समुद्रसपाटीपेक्षा खोल आहे. या सखल प्रदेशाच्या उत्तरेस तांबड्या समुद्रालगत अफार आल्प्स नावाची लहान पर्वतराजी आहे. खचदरीच्या पूर्वेकडील पर्वतराजी सरासरी ३,००० मी. उंच असून ती आग्‍नेयीकडील सोमालीच्या सखल प्रदेशाकडे उतरत गेली आहे. खचदरीच्या पश्चिमेकडील पर्वतराजीचा सूदानकडील डोंगरपायथा व मैदानी प्रदेश अरुंद आहे.

इथिओपियाच्या डोंगराळ पठारी प्रदेशात अनेक लहानमोठ्या नद्या आहेत. आब्बाय (नील नाईल), टकझे (आतबारा), बारो (सोबॅत) या इथिओपियाच्या डोंगराळ प्रदेशातून निघून नाईलला मिळणाऱ्या प्रमुख नद्या होत. नील नाईलचा उगम देशातील सर्वांत मोठ्या ताना सरोवरात होतो. हिच्यावर अनेक धबधबे असून इथिओपियातील इस्सात हा धबधबा प्रसिद्ध आहे. हिला जामा, मुगेर, गुडेर इ. अनेक उपनद्या मिळाल्या आहेत. या नदीवर बांधलेल्या पुलामुळे इथिओपियाचे गोजम व शीबा प्रांत जोडले आहेत. दक्षिणेकडील रूडॉल्फ सरोवराला मिळणारी ओमो ही प्रमुख नदी असून पूर्वेकडे वाहणाऱ्या जूबा व शिबेली या प्रमुख नद्या होत. उत्तरेकडे वाहणाऱ्या आवाश नदीवर मोठे धरण बांधण्याचे काम चालू आहे. सु. ५,८०० चौ. किमी. क्षेत्रफळ व १४ मी. खोल असलेल्या ताना सरोवराशिवाय येथे आब्बाय, चामो इ. अनेक सरोवरे आहेत.

भूप्रदेशाच्या उंचसखलपणावर येथील हवामान अवलंबून असते. २,४००–३,००० मी. उंचीच्या मध्यवर्ती डोंगराळ पठारी प्रदेशाचे हवामान सम व सौम्य असून सरासरी तपमान १६° से. असते. १,८०० ते २,४०० मी. उंचीवरील भागात सरासरी तपमान २२° से. तर समुद्रसपाटी, वाळवंटी प्रदेश येथील तपमान २६° से. पेक्षा जास्त असते. या सखल, उंच व अतिउंच भागांना इथिओपियात अनुक्रमे डेगा, वोइना-डेगा आणि कोल्ला अशी नावे आहेत. या तीन विभागांत अनुक्रमे ५० सेंमी. पेक्षा कमी, ५०–१५० सेंमी. आणि १२५–१७५ सेंमी. पाऊस पडतो. पाऊस मुख्यतः जून-सप्टेंबर मध्ये पडतो. त्यानंतरच्या कोरड्या ऋतूत मार्च-एप्रिलमध्ये थोडा पाऊस पडतो. अतिउंच भागात काही वेळा हिमवृष्टी होते, तर दानाकिलच्या भागात कित्येक वेळा पाऊस पडतच नाही.

भरपूर पाऊस व समशीतोष्ण किंवा थंड हवामान असलेल्या डोंगराळ व पठारी प्रदेशांत आफ्रो-आल्पाई जातीच्या, जूनिपर प्रकारच्या टिड किंवा झिग्बा, कूसो, लोबेलिया, सेनेचिओ इ. अनेक वनस्पती आढळतात. जास्त पाऊस व जास्त तपमानाच्या भागात करारो, सिसा, टुकूर, इंचेट, सोंबो इ. रुंदपर्णी झाडे आढळतात. यातील काफा प्रांतात कॉफीची झाडे नैसर्गिक रीत्या उगवतात व त्या प्रांतावरूनच या झाडास कॉफी नाव पडले आहे. नैर्ऋ‌त्य भागात बांबूंची बने असून उत्तरेकडे तसेच डोंगरपायथ्याशी बाभळीच्या जातीची झाडे आढळतात. सखल मैदानी प्रदेशात सॅव्हाना गवत उगवते. पठारी प्रदेशात निलगिरीची मुद्दाम लागवड व वाढ केली आहे.

पश्चिमेकडील सखल भागात हत्ती व गेंडे आढळतात. नद्या व सरोवरे येथे हिप्पो, सुसरी, मॉनीटर, ऑटर हे प्राणी आढळतात. दक्षिण, नैर्ऋ‌त्य आणि ओगाडेन भागात सिंह आहेत. डोंगराळ भागात चित्ता, तरस, कोल्हा, लांडगा, सिवेट, वानर, बॅजर आदी विविध प्राणी आढळतात. गवताळ भागात जिराफ, झेब्रा आणि विविध जातीची हरणे आहेत. गरूड, गिधाड, ससाणा, बदक, भांडक, शहामृग वगैरे अनेक जातीचे पक्षी येथे असून मराबू, पोपट, जय वगैरे पक्षी सुंदर पिसाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अजगर, नाग, पफॲडर इ. सर्पाच्या अनेक जाती असून हिवताप पसरविणारे डास, टोळ, चित्रविचित्र फुलपाखरे भरपूर आहेत. सिमेन चिलालो पर्वतविभागात आणि आवाश खोऱ्यात अभयारण्ये राखलेली आहेत. तेथे दुर्मिळ प्राणी व पक्षी यांचे मुद्दाम संरक्षण केले आहे. त्यांपैकी न्याला हरिण व वॉलिया आयबेक्स हे फक्त इथिओपियातच सापडतात.

इतिहास : ओमो नदीच्या खोऱ्यात सु. २५ लक्ष वर्षांपूर्वीचे अवशेष सापडले आहेत. इ.स.पू. ३००० पासून इथिओपियाविषयी माहिती मिळते. इथिओपियास पुरातन काळी पूंट लोकांचा देश म्हणून संबोधित असत. ईजिप्त व इथिओपिया यांचा संबंध अनेक शतके टिकून होता. त्यानंतरची माहिती मत्शाफा नेगास्त (राजांचा ग्रंथ) व केब्रा नेगास्त (राजवैभवाचा ग्रंथ) यांमध्ये सापडते. जेरूसलेमचा राजा सॉलोमन व शीबाची (इथिओपियाचा भाग) राणी मेकेडा यांच्या प्रेमप्रकरणाचा उल्लेख अनेक ठिकाणी आला आहे. सॉलोमन राजापासून मेकेडा राणीला एक पुत्ररत्‍न प्राप्त झाले होते. त्याचे नाव (पहिला) मेनेलिक (इ.स.पू. सु. ९७५–९५०). त्याच्यापासून आजतागायत सॉलोमन घराणे (मधला काही काळ सोडल्यास) राज्य करीत आहे. पहिल्या मेनेलिकपासून सॉलोमन घराण्यास सुरुवात होऊन २५९ राजांनी राज्य केल्यानंतर ९२७ ते १२६० पर्यंत यात खंड पडला. या खंडित कालात झाग्वे राजघराण्यातील अकरा राजांनी ३३३ वर्षे राज्य केले. १२६० मध्ये येकुनो आम्‍लाक राजाने पुन्हा सॉलोमन घराण्याची प्राणप्रतिष्ठा केली. त्यानंतर आजतागायत ६५ राजांनी राज्य केले. हल्लीचे बादशहा हायली सेलॅसी हे सहासष्टावे होत.

आक्सूम साम्राज्यात (पहिले ते सहावे शतक) इथिओपियाची फार भरभराट झाली होती. सुरुवातीला इथिओपिया ख्रिश्चन राष्ट्र झालेले नव्हते. अडुलिस बंदरातून आंतरराष्ट्रीय व्यापार चालत असे. याच काळात अनेक सूर्य-स्तंभ (ऑबेलिस्क) उभारण्यात आले. त्यांतील सर्वांत उंच स्तंभ सध्या रोममध्ये आहे. चवथ्या शतकात इथिओपिया ख्रिश्चन राष्ट्र झाले. त्यानंतर ६३७ मध्ये अरबांनी पॅलेस्टाइन, सिरिया व ईजिप्त पादाक्रांत केले. यामुळे इथिओपिया व न्यूबिया या ख्रिश्चन राष्ट्रांचा मध्यपूर्व व यूरोपीय ख्रिश्चन राष्ट्रांपासून संबंध तुटला. नवव्या शतकात तांबड्या समुद्राची किनारपट्टी पुन्हा इथिओपियाच्या ताब्यात आली. ९२८ मध्ये टेक्ले हायमानोत या लास्ताच्या (इथिओपियातील) राजाने आक्सूम साम्राज्याचा नाश करून, झाग्वे घराण्याची स्थापना केली. १२६० मध्ये सॉलोमन घराणे पुन्हा राज्यावर आले. पहिला आमदा सेयोन (१३१४–१३४४) याने मुसलमानांच्या अमलाखालील प्रदेश परत ताब्यात घेतला. झारा याकूब (१४४४–१४६८) याचा काळ इथिओपियातील प्रबोधनकाळ समजला जातो. यानंतर १५२७–१५४३ मध्ये पुन्हा मुसलमानांचे आक्रमण सुरू झाले. ग्रान (डावरा) इमाम अहमद याने हरार प्रांत जिंकला. पोर्तुगालने डॉम ख्रिस्तोपर गामा (वास्को द गामाचा मुलगा) बरोबर सैन्य पाठविले नसते, अथवा ग्रान लढाईत मेला नसता (२१ फेब्रुवारी १५४३), तर इथिओपिया इस्लाम राष्ट्र झाले असते. परंतु यामुळे इथिओपियाची एकता मात्र भंग पावून अनेक लहान लहान राज्ये उदयास येऊन यादवीस प्रारंभ झाला. ही यादवी दुसरा थीओडोर (१८५५–१८६८) याने मोडून पुनश्च एकसंघ राज्य निर्माण करण्याचा प्रयत्‍न केला. १८५५ मध्ये त्याने राजाधिराज ही बिरुदावली स्वीकारली. थीओडरच्या मृत्यूनंतर पुनःश्च यादवीस सुरुवात झाली. चौथा योव्हानिस याच्या दूरदर्शित्वामुळे व दुसरा मेनेलिक याच्या समजुतीच्या धोरणाने इथिओपियाचे तुकडे होण्याचे वाचले. याच काळात, ईजिप्त, इटली यांनी इथिओपियाचा घास घेण्याचे ठरविले. १८६९ मध्ये आसाब बंदर व १८८५ मध्ये मसावा बंदर इटलीने घेतले. या दरम्यान ईजिप्तशी लढा देत असताना योव्हानिस मेतेम्माच्या लढाईत मारला गेल्याने दुसरा मेनेलिक राजा झाला (१८६५–१९१३). देशाची भरभराट व्हावी म्हणून मेनेलिकने इटालियनांशी उशाली येथे १८८९ मध्ये तह केला. या तहातील सतराव्या कलमात इटालियन भाषेतील प्रतीत इथिओपियाने इटलीचे मांडलिकत्व स्वीकारले आहे असे लिहिले होते. याच मजकुरावरून १८९६ चे युद्ध निर्माण झाले. या आडूवा युद्धात इथिओपियासारख्या अविकसित देशाने इटलीचा धुव्वा उडविला परंतु इटलीने स्वस्थ न बसता एरिट्रीया व सोमालियाचा काही भाग पादाक्रांत केलाच व १९३६ ला संपूर्ण इथिओपिया इटलीचे मांडलिक राष्ट्र केले. परंतु १९४१ मध्ये दोस्त राष्ट्रांच्या मदतीने इटलीचा पराभव होऊन इथिओपिया पुनश्च स्वतंत्र झाला. ब्रिटिश व्यवस्थेखाली असलेला एरिट्रीया संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार १९५२ मध्ये इथिओपियास मिळाला. तो १९६२ मध्ये इथिओपियाचा अविभाज्य भाग झाला.

मेनेलिकने आधुनिकीकरणाचा भक्कम पाया घातला. त्याच्याच कारकिर्दीत दूरध्वनी, जिबूती ते अदिस अबाबा लोहमार्ग टपाल-तार-खाते, नदीवर पूल, रस्ते, शाळा, इस्पितळे वगैरे बांधावयास सुरुवात झाली. त्याने परदेशी तंत्रज्ञांचा उपयोग करावयास सुरुवात केली यूरोपीय देशांतून लढाऊ हत्यारे विकत घेण्यास सुरुवात करून इथिओपियास बलवान बनविण्याचा प्रयत्‍न केला. १९१३ मध्ये लिज ईयासू गादीवर आला. तो मुसलमान व इतर जातींना प्रोत्साहन देत असल्याने त्यास सक्तीने बाजूंस सारून मेनेलिकची मुलगी राणी झउदितु हिच्या हाती राज्यकारभार देण्यात आला. झउदितुच्या मृत्युनंतर २ नोव्हेंबर १९३० रोजी हल्लीचे बादशहा हायली सेलॅसी गादीवर आले. त्याआधी १९२४ पासून ते राणी झउदितुचा राज्यकारभार चालवीत असत. बादशहा हायली सेलॅसींच्या कारकिर्दीत इथिओपिया आधुनिकीकरणाची एकएक पायरी चढू लागला. गादीवर आल्याबरोबर त्यांनी इथिओपियाला पहिले संविधान देऊन संविधानात्मक राज्यपद्धतीचा पाया रचला. नंतर १९५५ व १९६६ मध्ये त्या संविधानात अनेक सुधारणा करून, राजाला संविधानात्मक अस्तित्व प्राप्त करून देण्याचा प्रयत्‍न केला गेला.

राजकीय स्थिती : १९३१ पर्यंत इथिओपियात सरंजामशाही अस्तित्वात होती व यादवी युद्धांचाही सुकाळ होता. इथिओपियाला काही काळ केंद्रशासित करण्याचा पहिला मान, दुसरा थीओडोर याचा आहे. त्यानंतर दुसरा मेनेलिक याने मध्यवर्ती सत्ता स्थापिली व बादशहा हायली सेलॅसी यांनी ती स्थिर केली. १९३१ मध्ये संविधान देऊन त्यांनी पुन्हा सत्तेचे संविधानात्मक विकेंद्रीकरण करण्यास सुरुवात केली. या संविधानात १९५५ व १९६६ मध्ये बदल करून जबाबदार शासकीय सत्ता स्थिर करण्याचा प्रयत्‍न केला. सध्या इथिओपियात मर्यादित अर्थाने संविधानात्मक राज्यपद्धती अमलात आहे. बादशहांना मदत करण्यास एक समिती आहे. राज्यसभा (सीनेट) व लोकसभा (चेंबर ऑफ डेप्युटीज) अशी दोन सदने आहेत. सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीने चार वर्षांसाठी निवडून आलेले २५० सभासद लोकसभेत असतात. राज्यसभेत राजनियुक्त सभासद असून ते लोकसभेच्या सभासदसंख्येच्या निम्म्याहून जास्त नसतात. राज्यकारभार मंत्रिमंडळाकडून चालविला जातो. पंतप्रधानाच्या सल्ल्यावरून बादशहा इतर मंत्री नियुक्त करतात. राज्यात एकूण चौदा प्रांत असून प्रत्येक प्रांताच्या प्रमुखाची नियुक्ती बादशहाच करतात. त्यांना तक्‌लाय गाझी म्हणतात. प्रांताची विभागणी अनेक जिल्ह्यांत केलेली आहे व प्रत्येक जिल्ह्याचा अधिकारी अग्रागाझी असतो. जिल्ह्यांची विभागणी वोरेडेंत (तालुका) केलेली आहे. तालुकाप्रमुखास मिस्लानी म्हणतात.

बादशहा सर्वश्रेष्ठ न्यायाधीश समजले जातात. त्यांच्या खाली आफनिगुस (उच्च न्यायालयांचे अध्यक्ष) असतात. त्यांच्या खाली उच्च न्यायालयीन न्यायाधीश असतात. त्यांच्या खालोखाल प्रांतीय न्यायालये, जिल्हा न्यायालये व त्यानंतर तालुका न्यायालये असतात.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटिशांनी शिकविलेल्या सैनिकांनी इथिओपियाची सेना बनलेली असून १९६७ अखेर ४०,००० सैन्य होते. याशिवाय २,१२० सैनिकांचे छोटे हवाईदल व १,३७४ सैनिकांचे नाविकदल असून अदिस अबाबा, हरार व मसावा येथे शिक्षणकेंद्रे आहेत. बादशहा सर्वोच्च अधिकारी असून परकीय तंत्रज्ञांचे साहाय्य घेऊन इथिओपियाच्या सेनेस शिक्षण देण्याचे कार्य चालू आहे. देशाच्या एकूण खर्चाच्या एक पंचमांश भाग संरक्षणावर खर्च होतो.

इथिओपिया संयुक्त राष्ट्रांचा सभासद असून अदिस अबाबा येथे आफ्रिकन एकता संघटनेचे मुख्य कार्यालय आहे. तसेच इतर १३ आंतरराष्ट्रीय संघटनांच्या कचेऱ्या व ५३ परराष्ट्रीय वकिलातींच्या कचेऱ्या आहेत.

आर्थिक स्थिती : इथिओपिया शेतीप्रधान देश आहे. शेकडा ९० लोक शेतीवर अवलंबून आहेत. राष्ट्रीय उत्पन्नापैकी ६०% वाटा कृषी उत्पन्नाचा असतो. इथिओपियाची लाव्हाजन्य जमीन फारच सुपीक व सकस आहे. बहुतेक प्रदेश पर्वतमय असून दऱ्याखोऱ्यांनी व्याप्त आहे. उंच प्रदेशात कुरणे आहेत. १९६५ साली इथिओपियातील एकूण जमिनींपैकी लागवडीखालील जमीन ८·१%, कॉफीखालील ०·६%, कुरणांखालील २८%, जंगलाखालील ६·३% होती. ओसाड वाळवंटी प्रदेश ५६% व नद्या सरोवरे १% आहेत.

इथिओपियाचा शेतकरी अजूनही जुनीच अवजारे वापरतो व जुन्याच पद्धतीने शेती करतो. तो हुशार व मेहनती असला, तरी दळणवळणाच्या गैरसोयींमुळे अजूनही जेमतेम पोटापुरतेच कमावतो. अलीकडे आंतरराष्ट्रीय कृषी-संघटनेकडून बरीच मदत होत असल्याने आधुनिकीकरणास सुरुवात होत आहे. जमिनीचा कस जाऊ नये म्हणून पीकपाळीचा अवलंब केला जातो. रासायनिक खतांचाही वापर होऊ लागला आहे. तुकडापद्धती अजूनही अस्तित्वात आहे. जलसिंचनाच्या योजना हाती घेण्यात आल्या आहेत. आवाश नदीवर मोठे धरण बांधण्याचे कार्य चालू आहे. या योजनेद्वारा अंदाजे १,५०,००० हे. जमीन लागवडीखाली येण्याची शक्यता आहे. तेंडाहो व दुबते येथील नापीक जमीन यायोगे कापसाखाली आणली गेली. याच विभागात अनेक कारखाने उभारले गेले आहेत. अदिस अबाबा, नॅझारेथ, डर्बेमार्कोस, बहारदार येथे धान्यकोठारे बांधण्यात आली आहेत. एरिट्रीयातील केरेनजवळील एलाबेर्रेथ येथे १९५७ पासून अद्ययावत पद्धतीने बागायती केली जात आहे अनेक ठिकाणी प्रयोगात्मक शेती चालू असून अमेरिकेच्या ओक्लाहोमा विद्यापीठातर्फे येथे शेतकी शाळा चालविली जाते.

इथिओपियाची कॉफी अरेबिका जगात प्रसिद्ध आहे. इथिओपिया आंतरराष्ट्रीय कॉफी संघटनेचा सदस्य आहे. त्वात हे नागवेलीसारखे परंतु लहान पान आहे. ही पाने मुसलमान लोकच खातात. हरार प्रांतात यांची खूप लागवड होते. देशात तंबाखू होत असून सिगारेटचा व्यापार सरकारी मालकीचा आहे. नूग, तलबा, गोमन वगैरे प्रकारच्या तेलबियांचे उत्पादन होते. टेफ हे येथील प्रमुख अन्नधान्य असून त्याखालोखाल बार्ली, गहू, मका, डुरा आणि द्विदलधान्ये होतात. उसाची लागवड नवीन असून सध्या इथिओपियातील महत्त्वाच्या पिकांत याची गणना होते.

इथिओपियात १९६८ मध्ये गुरांची संख्या अडीच कोटींहून जास्त होती शेळ्यामेंढ्या चार कोटी, कोंबड्या चार कोटी व गाढवे, उंट, खेचरे, घोडे इ. ७३ लक्ष होते. झेबू, लांबशिंगी, बोराना, फोयारा या येथील गुरांच्या महत्त्वाच्या जाती होत. देशात पशुसंवर्धनकेंद्रे उगडली असून पशुधनाचा योग्य उपयोग करून घेण्याचे प्रयत्‍न चालू आहेत. चामडी, हाडे व लोणी परदेशी निर्यात होतात.

१९५७ मध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेद्वारा औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. औद्योगिकीकरणासाठी वीस वर्षाचा काळ नियोजित करण्यात आला आहे. दरवर्षी १३% वाढ होत आहे. सर्वांत मोठा तेलशुद्धीकरणाचा कारखाना आसाब येथे आहे. बिर्लाच्या सहयोगाने अदिस अबाबा येथे कापडगिरणी चालू झाली आहे. साखरेचा कारखाना वोन्जी येथे आहे. गोएंकाच्या सहयोगाने लोकरीची गिरणी सुरू झाली आहे. सिमेंट, मीठ, कागद, मांस, साखर, तेले, खनिज तेल, पीठ, सुती कपडे, गोण्या, पादत्राणे, विटा, लोखंड, पोलाद, पत्रे, कृत्रिम धाग्याचे कापड, गालिचा व रग इत्यादींचे कारखाने देशात सुरू झाले आहेत. १९६७ मध्ये देशात ४६४ कारखान्यांतून ५०,००० कामगार काम करीत होते. याशिवाय येथे २०६ पिठाच्या मोठ्या गिरण्या, ४५ पेय कारखाने, १०४ कॉफी साफ करणारे कारखाने, ८१ लाकूड गिरण्या व २७ चामड्याचे कारखाने होते. कारखान्यातील बहुतेक तज्ञ अद्याप परदेशी आहेत. देशात शक्तीची साधने पुरेशी नाहीत. कोळशाच्या अभावी जलविद्युत्‌वर अवलंबून रहावे लागते. आवाश, तिइस्सात, फिंचा इ. प्रकल्प पुरे होण्याच्या मार्गावर आहेत. १९७१ मध्ये देशात ३३·१ कोटी किवॉ. तास वीज उत्पन्न झाली.

अडोला (किब्रेर्मेगेस्त) येथे सोने युब्दो (वोल्लेगा) भागात प्लॅटिनम देबारूआ व सकार (एरिट्रीया) येथे तांबे सिडामो येथे निकेल दानकिल भागात पोटॅश हरार, एरिट्रीया, वोल्लेगा, शोआ भागांत गारगोटी व जडावाचे खडे आसाब, मसावा येथे मीठ तांबडा समुद्र किनारपट्टीवर तेल व एंके फेल्ला (तीग्रे) येथे मँगॅनीज सापडते. गंधक, युरेनियम, अभ्रक, ॲसबेस्टॉस व कथील ही विविध भागांत सापडतात परंतु त्यांचा पूर्ण उपयोग करून घेण्याचा प्रयत्‍न अद्याप झाला नाही. १९६७ मध्ये प्रतिवर्षी ६ लक्ष टन तेल शुद्ध करण्याचा कारखाना आसाब येथे रशियाच्या मदतीने निघाला आहे.

मच्छीमारीच्या योजनेस १९६३ पासून सुरुवात झाली. पंचवार्षिक योजनेत रेड सी फिशिंग कॉर्पोरेशन स्थापण्यात आली आहे. ताना सरोवर, नील नाईल, खचदरीतील सरोवरे, आवाश नदी, तांबड्या समुद्राचा किनारा ही मच्छीमारीची प्रमुख केंद्रे आहेत. १९६७ मध्ये २,००० टन घरगुती उपयोगासाठी व १०,००० टन परदेशी रवाना करण्याइतपत उत्पन्न झाले.

दुसऱ्या महायुद्धानंतर इथिओपियाची नाणेपद्धती सुधारली. त्यामुळेच परदेशी व्यापारास चलन मिळून अंतर्गत व्यापारही वाढला. इथिओपियाचे अंदाजपत्रक तुटीचे आहे. १९७१ मध्ये आयात ४७·०४ कोटी इथिओपियन डॉलर व निर्यात ३१·५६ कोटी इथिओपियन डॉलर होती. इथिओपियाची सर्वांत जास्त आयात यूरोपीय राष्ट्रे : इटली १८%, प. जर्मनी ११%, यू. के. ९%, जपान ९% व अतिपूर्वेकडील देश व अमेरिका १९%, येथून होते, तर निर्यात अमेरिका ४३% व यूरोपीय राष्ट्रे : प. जर्मनी ८%, इटली ६% व सौदी अरेबिया ७% यांकडे होते. निर्यातीमध्ये कॉफीचे प्रमाण जास्त, ५८% असून त्याखालोखाल धान्य ८%, तेलबिया ८%, हाडे चामडी ९% आणि फळे व भाजीपाला आहेत. आयातीमध्ये कापड, वाहने, यंत्रे, लोखंड व पोलाद यांच्या वस्तू, पेट्रोलियम इत्यादींचा समावेश होतो. १९४७ पासून येथे वाणिज्यमंडळ स्थापन झाले आहे.

स्टेट बँक ऑफ इथिओपियाने १९४३ ते १९६३ पर्यंत देशाच्या अर्थकारणाला बराच हातभार लावला. देशाच्या आर्थिक गरजेनुसार १९६३ मध्ये स्टेट बँकेचे दोन विभाग पाडण्यात आले : नॅशनल बँक व कमर्शियल बँक. याशिवाय येथे काही परदेशी बँकांच्या शाखा आहेत.

इथिओपियन डॉलर हे येथील अधिकृत चलन असून त्याची १०० सेंटमध्ये विभागणी केली आहे. तांब्याची ५, १० व २५ सेंटची नाणी प्रचारात आहेत. १९६९ मध्ये एका इथि. डॉलरची किंमत रु. ३·०० होती.

नवे राजमार्ग तयार करण्यासाठी व असलेले दुरुस्त करण्यासाठी १९५१ मध्ये सरकारने वेगळे खाते उघडले. तेव्हापासून ते १९६७ पर्यंत ७,५०० किमी. चे डांबरी रस्ते व १०,००० किमी. कच्चे रस्ते बांधण्यात अथवा दुरुस्त करण्यात आले. १९६८ नंतर ४० कोटी इथि. डॉलर खर्च करून ४,००० किमी. नवीन रस्ते बांधण्याचा व जुने दुरुस्त करण्याचा कार्यक्रम आहे. १९७० मध्ये ४०,००० मोटारी, ६,००० ट्रक, ३,००० बसगाड्या व २,२३६ ट्रॅक्टर होते. अदिस अबाबा ते जिबूती व अस्मारा-मसावा व केरेन-तेसेने आणि नॅझारेथ-डिल्ला असे लोहमार्ग आहेत. लोहमार्गांची लांबी १,२४१ किमी. आहे. १९५८ मध्ये आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीस सुरुवात झाली. १९५९-६० मध्ये हायली सेलॅसी विमानतळ बांधण्यात आला येथून यूरोप, आशिया व आफ्रिका खंडातील २७ शहरी वाहतूक चालते. १९६९ मध्ये देशात ३३ विमानतळ असून आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीस सुरुवात झाली आहे. मसावा व आसाब बंदरांतून जलवाहतूक होते. आसाबला ६,६०,००० टन मालाची चढउतार होऊ शकते एकाचवेळी १५ समुद्री जहाजे थांबू शकतात व दररोज १२५ जहाजे जात येत असतात. मसावा बंदरात ६ धक्के आहेत. ताना सरोवर, बारो, गँबेला, शामो वगैरेंचाही जलवाहतुकीसाठी उपयोग केला जातो. १९६४ मध्ये इथिओपियन शिपिंग लाइन सुरू करण्यात आली १९६९ साली तिच्याकडे पाच मालवाहू जहाजे व एक तेलवाहू जहाज होते.

इथिओपियाच्या डोंगराळ प्रदेशामुळे निरनिराळ्या ५४ ठिकाणी प्रामुख्याने हवाईमार्गाने डाकेची व्यवस्था आहे. १९७१ मध्ये देशात ५०,५१८ दूरध्वनी यंत्रे असून यूरोप, भारत आदी ठिकाणी दूरध्वनीवर बोलण्याची सोय आहे. १९६३ मध्ये येथे टेलेक्स पद्धत आली. देशात १९६९ मध्ये पाच लक्ष रेडिओ होते. १९६४ मध्ये येथे दूरचित्रवाणी सुरू झाली. १९६८ अखेर ६,००० दूरचित्रवाणी यंत्रे होती. अदिस अबाबाच्या शाळांपैकी ७० शाळांत दूरचित्रवाणी यंत्रे बसविण्यात आली आहेत.

लोक व समाजजीवन : बहुतेक लोक सेमेटिक आहेत परंतु गाल्ला लोक कुशायटिक कुलात मोडतात. काही निग्रो वंशाचे लोक सूदान सरहद्दीजवळ वसलेले आहेत. तसेच लहानसा ज्यू धर्मीय समाजही आहे. देशात आम्हारा, गाल्ला, सोमाली, सिठामा, आफरसाहो, निग्रो, गुरोगे, फलाशा वगैरे जाती आहेत. त्यांतील आम्हारा जातीचे वर्चस्व असून इथिओपियाचे राजे आम्हारा जातीचे आहेत. इथिओपियात ख्रिश्चन व मुस्लिम धर्मीयच विशेषत्वाने आढळतात. एझाना राजाने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यापासून मोनो फिजाइट ख्रिश्चन धर्म इथिओपियाचा राजधर्म झाला आहे. ख्रिश्चन धर्माआधी ज्यू धर्म, मूर्तिपूजा, निसर्गपूजा वगैरे प्रचलित होत्या. अनेक धार्मिक शब्द व विधी हिब्रूमधून आलेले आहेत. आठव्या दिवशी सुंता करण्याची हिब्रू पद्धत व सब्बाथ इथिओपियातील ख्रिश्चन पाळतात. काही सिरियाक धार्मिक शब्दही प्रचारात आहेत. इथिओपियातील ख्रिश्चनांचा अद्याप भुताखेतांवर विश्वास आहे. ते ५२ दिवसांचा उपवास करतात. त्यावेळी मांस, दूध, तूप वर्ज्य असते मात्र मासळी चालते. तसेच दर आठवड्यात बुधवार व शुक्रवार उपवासाचे दिवस म्हणून पाळले जातात. साधुसंतांचे दिवसही उत्सवासारखे पाळतात. शिष्टाचाराच्या कल्पना पुष्कळदा भारतीय कल्पनांशी मिळत्याजुळत्या वाटतात. उदा., लहानांनी वडिलधाऱ्यांच्या पायांस स्पर्श करणे, त्याचवेळी डोक्यावरील आच्छादन काढणे इत्यादी. हस्तांदोलनाचा प्रचार अतिशय आहे. बायकामुलांबरोबरच पशुपक्ष्यांचीही चौकशी करण्याचा प्रघात आहे. तसेच नातेवाईक, मित्र भेटल्यानंतर भररस्त्यातही चुंबने घेण्याची प्रथा आहे.

पाश्चात्त्य व इथिओपियाच्या पंचांगांत (आमाता मिहरत) फरक आहे. ९ सप्टेंबर १९६९ रोजी इथिओपियाचे १९६२ वर्ष सुरू झाले. वर्षात एकून ३६५ दिवस व १३ महिने (१२ महिने ३० दिवसांचे व ५ किंवा ६ दिवसांचा तेरावा महिना) असतात.

रोजच्या जेवणात इंजिरोवत (तोंडी लावणे) असते. तैफचे पीठ आंबवून डोशासारखा परंतु बराच मोठा इंजिरो केला जातो. वाटाणे, मसुराची डाळ, बटाटे, कोबी, अंडी, कोंबडी, मांस, वगैरेपासून वत तयार करतात. या सर्वांपेक्षा गाई बैलांचे कच्चे मांस फार चवीने खाल्ले जाते. मांसाचे तुकडे मितामिता (लवंगी मिरच्यांची भुकटी) बरोबर खातात. त्यांचे राष्ट्रीय पेय तेल्ला (बीअर) व तेज आहे. मध, पाणी, सड्डोची पाने किंवा गेशोची पाने एकत्र करून आंबवून तेज तयार केला जातो तर बाल्ली व गेशोच्या पानांना पाण्यात ठेवून आंबवून तेल्ला तयार केला जातो. तेल्लाची चव आंबट असते, तर तेजची चव गोडसर असते.

राष्ट्रीय पोषाख काठेवाडी पेहेरावाची आठवण करून देतो. काठेवाडी माणसाचा फेटा काढून त्या जागी भली मोठी गवताची टोपी डोक्यावर ठेवल्यास व लहान बंडी ऐवजी लांब नेहरू शर्ट चढविल्यास इथिओपियाचा राष्ट्रीय वेष तयार होईल. त्यावर शम्मा (उपरणे) घेतलेले असते. स्त्रियाही शम्मा वापरतात. स्त्रियांच्या पोषाखात शम्मा, त्याखाली सदऱ्यासारखा घोट्यापर्यंत पोहोचेल असा लांब झगा व डोक्यावर शाश असते.

येथील झोपड्या कोकणातल्यासारख्या असतात. तुकुल किंवा अग्दो म्हणजे शंक्वाकृती झोपड्या सगळीकडे दिसतात. अशा झोपड्या व चांगली घरे बांधण्यास चिखल, वाळलेले गवत व लाकूड यांचा उपयोग केला जातो. अदिस अबाबासारख्या शहरात अद्ययावत पद्धतीच्या इमारती बांधल्या जात आहेत.

भाषा व साहित्य : इथिओपियाची पुरातन भाषा गीझ आज मृतावस्थेत आहे. मठांतच थोड्याफार प्रमाणात पाद्री लोक तिचा उपयोग करतात. इथिओपियाची राष्ट्रभाषा आम्हारिक आहे. आफ्रिकेतील इतर राष्ट्रांप्रमाणेच इथिओपियातही अनेक जाती आहेत व प्रत्येक जातीची वेगळी भाषा आहे. आम्हारिकलाच फक्त लिपी आहे. इथिओपिक भाषा सेमेटिक महाकुलात मोडते. आम्हारिकला लेसना नेगूस किंवा यह निगुस क्वाक्ववा म्हणजे राजभाषा असे पुरातनकाळापासून संबोधिले जाते. आम्हारिकामध्येही प्रांतपरत्वे फरक आढळतो. तीग्रीन्ये, तीग्रे किंवा अल् खास्सिया, हरारी (अडारे), गुरागे, गफात, अर्गोब्‌बा, गाल्ला, सोमाली, सिडामा, बेजा, बिलेन व अगाव या येथील इतर बोलीभाषा होत.

लुडाल्फ याने २५० वर्षांपूर्वी आम्हारिक व्याकरण लिहिले. कोएन, पोलोत्स्काय, लेस्लाव, लिटमन, सेरुल्ली वगैरे विद्वानांनी इथिओपिक भाषांवर अनेक ग्रंथ लिहिले. पुरातन लिखाण शिलालेख, ताम्रपट, गुहांतील भिंती यांवर आढळते. भूर्जपत्रावर चित्रांसहित बायबल  गीझ भाषेत लिहिले आहे. पाचोमिअस, कोरिल्लोस  व फिसालगोस  आक्सूम काळात लिहिले गेले. नंतरच्या काळातील हस्तलिखिते ब्रिटनमध्ये व पॅरिसमध्ये आहेत. अमदा सेयोनच्या काळात साहित्याचे पुनरुत्थान झाले. याच काळात अतिमहत्त्वाचे केब्रा नेगास्त  लिहिले गेले. त्याची बरोबरी कुराण बायबल बरोबर केली जाते. वेद्दासे मारियम, सशाफा गन्झात, गाड्ला समाएतत, गाड्‌ला हवार्यातसेन्केस्सार, फेक्‍कारे इयासस राया शेनुते, झेना आयहुडा  वगैरे पुस्तके याच काळात लिहिली गेली. दुसरा भरभराटीचा काळ झारा याकुबच्या कारकीर्दीत आढळतो. मशाफा बेर्हान, मशाफा मिलाद, लेफाफा सेदेक, सेलोता कप्र्‌यानोस, सलोता केद्दस कालेब, तामेर मार्यम, इझागियामरे नग्सा  वगैरे ग्रंथ तेव्हा निर्माण झालेले आढळतात. आम्हारिक साहित्याची भरभराट थीओडोरच्या काळात झाली. मेनेलिकने अदिस अबाबाला छापखाना उभारल्यापासून आजतागायत शेकडो पुस्तके प्रकाशित झाली. अलेका ताय्ये, आफवर्क, ब्‍लाता मर्शा हाझेन, बायमनात गेब्रे आमलक, रास बितवाद्देद मेकोन्नेन एन्डाल्फात्च्यु, ब्‍लाता गेर्मात्च्यु टेक्लेदे हवार्यात, केब्बेडे मिकाएल हे काही आधुनिक लेखक आहेत. महात्मा गांधींच्या जीवनावरही पुस्तके लिहिली गेली आहेत.

इथिओपियात १९६९ मध्ये ६ दैनिके व १७ नियतकालिके होती. अदिस झेमेन  या आम्हारिक भाषेतील वर्तमानपत्राचा खप १०,००० होता. याशिवाय येथे इंग्रजी, इटालियन व फ्रेंच भाषांत वर्तमानपत्रे व नियतकालिके निघतात.

पूर्वी मठांवर शिक्षणाची जबाबदारी होती. खेड्यांतून अजूनही काही प्रमाणात ते कार्य चालू आहे. दुसऱ्या मेनेलिकने शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर हायली सेलॅसींच्या कारकीर्दीत १९४१ पासून शिक्षणाची खूप भरभराट झाली. शिक्षण माध्यमिक शाळेपर्यंत विनामूल्य आहे. माध्यमिक शाळेत बारावीपर्यंत वर्ग असतात. नंतरची जबाबदारी विद्यापीठाची असते. १९४९ मध्ये विद्यापीठ स्थापण्यात आले त्याला सध्या १३ महाविद्यालये संलग्न आहेत. १९५९ मध्ये अस्मारा येथे दुसरे विद्यापीठ स्थापण्यात आले. १९७०-७१ मध्ये दोन्ही विद्यापीठांमधून सु. ५,००० विद्यार्थी होते. १९६६-६७ मध्ये देशात १,६४७ प्राथमिक शाळांत ४,०५,७१० विद्यार्थी व ९,४३१ शिक्षक होते ३९५ माध्यमिक शाळांत ६०,३१२ विद्यार्थी व १,८९३ शिक्षक होते विशिष्ट शिक्षणाच्या ६३ शाळांतून ६,६७४ विद्यार्थी व ५५९ शिक्षक होते. महाविद्यालयांत ३,०९६ विद्यार्थी व ४६९ शिक्षक होते. यांशिवाय इथिओपियाचे सु. १,७०० विद्यार्थी परदेशात शिकत आहेत. १९७०-७१ मध्ये २,००० प्राथमिक व माध्यमिक शाळांतून ७,९०,८१२ विद्यार्थी शिकत होते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने देशात आरोग्यविषयक सुधारणा होत आहेत. १९६७ मध्ये देशात ४० डॉक्टर व ९०९ परिचारिका होत्या. ७२ रुग्णालयांतून ९,१५१ खाटा होत्या. बहुतेक प्रमुख ठिकाणी आरोग्यकेंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.

कला व क्रीडा : पुरातन वास्तू व शिल्पे धार्मिक आहेत. आक्सूम येथील एक सूच्याकार सूर्यस्तंभ २४ मी. उंच आहे. ३३ मी. उंचीचा स्तंभ १९३७ मध्ये इटालियनांनी रोमला नेला. गोंडार येथे बांधलेले किल्ले प्रेक्षणीय आहेत. आक्सूमजवळील लालीबेलाजवळ राजे लालीबेलांनी उभारलेल्या अकरा मठांपैकी मधाने आलम मठ सर्वांत मोठा आहे. कोहैता व गोबेदा येथील पुरातन भित्तिचित्रेही दृष्ट लागण्याइतपत सजीव आहेत. कॅनव्हास, हस्तलिखित भूर्जपत्रे व मठांच्या भिंती यांवर चितारलेली चित्रे इथिओपियाचे वैशिष्ट्य आहे. या सर्वांवर ब्रायझंटिन कलेचा प्रभाव पडलेला आहे.

बायबल  चालीवर म्हटले जाते यास डेग्वाझेमा म्हणतात. गाण्यानाचण्याशिवाय इथिओपियन जगूच शकत नाही. नृत्य मात्र आपल्याकडील भांगड्याची आठवण देते. अलीकडे मात्र पाश्चिमात्य नृत्यप्रकारांचाच प्रचार तरुण मंडळीत जास्त आहे. वाद्यांत केरार हे सहा ते दहा तारांचे, बगाना हे ८ ते १० तारांचे व मसान्को हे एकतारी असते. कबोरो (तंबुरासदृश) सर्वांत जुने वाद्य आहे. सनासेल (झांझ) व प्रार्थनेच्या वेळी ठेक्यासाठी उपयोग करण्याची काठी मक्वामिया इथिओपियाचे वैशिष्ट्य होत. अदिस अबाबाला राष्ट्रीय नाट्यगृहाची स्थापना करण्यात आली आहे. नाटके संगीत असतात.

फुटबॉल इथिओपियाचा राष्ट्रीय खेळ आहे. इथिओपियाचाच अबेबे बिकिला याने पळण्याच्या मॅरॉथॉन शर्यतीत तीनदा ऑलिंपिक सोन्याचे पदक मिळविले आहे. याशिवाय टेबल टेनिस, बास्केट बॉल वगैरे खेळ खेळले जातात. ड्रॉटचा खेळ लोकप्रिय आहे. चित्रपटनिर्मिती होत नाही १९७३ मध्ये अदिस अबाबात नऊ, अस्मारात सात व इतर गावांत मिळून सु. १२ चित्रपटगृहे होती.

महत्त्वाची स्थळे : इथिओपिया आफ्रिका खंडातील स्वित्झर्लंड मानले जाते. अनेक सरोवरे, उष्ण पाण्याचे झरे, धबधबे वगैरेंना भेटी दिल्याशिवाय इथिओपिया बघितल्यासारखे होत नाही. पर्यटनखाते या दृष्टीने फार जागरूक आहे व अनेक सुखसोयींच्या योजनाही वेळोवेळी आखल्या जात आहेत. पुरातन अवशेष असलेल्या ठिकाणी व शिकारीसाठी राखून ठेवलेल्या वनविभागांच्या जागी प्रवाशांसाठी उत्तम सोयी आहेत. अदिस अबाबा हे राजधानीचे अद्ययावत शहर असून, अस्मारा दुसऱ्या प्रतीचे शहर आहे. गोंडार हे पुरातन किल्ल्यांसाठी तसेच लालीबेला हे पुरातन मठांसाठी प्रसिद्ध आहे. आक्सूम प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे; ही इथिओपियाची जुनी राजधानी असून पेरिल्पसमध्ये हिचा उल्लेख आढळतो. येथील चर्च सर्वांत जुने असून त्यात आक्सूम साम्राज्यातील अवशेष मिळतात. आक्सूममधील सूर्यस्तंभ प्रख्यात आहेत. जगातील काही मोठे स्तंभ येथे असून ते एकाच दगडातून कोरलेले आहेत. मसावा हे तांबड्या समुद्रावरील महत्त्वाचे व्यापारी बंदर आहे; येथे इथिओपियाचे नौदलही आहे. आसाब हेही चांगले बंदर असून येथे तेलशुद्धीकरणाचा मोठा कारखाना आहे. हरार येथे सैनिक अकादमी असून ते हवा खाण्याचे ठिकाण आहे. (चित्रपत्र ४५).

संदर्भ : 1. Boyd. A. K. H. & Van Rensburge, An Atlas of African Affairs, London, 1962.

2. Last, G. C. A Regional Survey of Africa, Addis Ababa, 1964.

3. Pankhurst, Sylvia, Ethiopia-A Cultural History, Essex, 1955.

4. Ullendorff, Edward, The Ethiopians–An Introduction to the Country and the people, London, 1967.

पांडे, वि. गो.

इथिओपिया
इथिओपियन युवती

इथिओपियन वनराज  

 

 

आफ्रिका हॉल’, अदिस अबाबा
ऊसानाम राजाचे एक नाणे, ६ वे शतक
गोंडारजवळच्या चर्चमधील प्राचीन भित्तिचित्र