ऑरिजेन : (सु. १८५–सु. २५४). ख्रिस्ती ईश्वरशास्त्रवेत्ता. संपूर्ण लॅटिन नाव ओरिजेनीझ ॲडमॅन्शिअस. जन्म ईजिप्तमध्ये ॲलेक्झांड्रिया येथे. टायटस फ्लेव्हिअस ऊर्फ ॲलेक्झांड्रियाचा क्लेमेंझ याच्या हाताखाली त्याचे शिक्षण झाले. वयाच्या अठराव्या वर्षी ॲलेक्झांड्रियाच्या ख्रिस्ती विद्यालयाचा तो प्रमुख झाला. तथापि ॲलेक्झांड्रियाचा बिशप डीमीट्रिअस याच्याशी त्याचे वितुष्ट आल्यामुळे डीमीट्रिअसने त्याला ॲलेक्झांड्रियातून हद्दपार केले (सु. २३०). त्यानंतर त्याने सीझारीआ येथे नव्या विद्यालयाची स्थापना केली. (२३१). सेंट ग्रेगरी (ग्रेगरी थोमाटर्गस) हा त्याचा सीझारीआ येथील विद्यार्थी. सेंट जेरोमच्या मतानुसार त्याने ८०० ग्रंथ लिहिले तर ऐपिफेनिअसच्या मते त्याने ६,००० ग्रंथांची रचना केली. आज मात्र त्याचे Hexapla (इं. शी. सिक्स कॉलम्ड), De principiis (इं. भा. ऑन फर्स्ट प्रिन्सिपल्स, १९३६), Contra Celsum (इं. शी. अगेन्स्ट सेल्सस) यांसारखे काही ग्रंथच उपलब्ध आहेत. बायबलच्या पाठचिकित्सेच्या दृष्टीने Hexapla चे मोल फार मोठे आहे. या ग्रंथात सहा समांतर स्तंभ दिलेले असून एकेका स्वतंत्र स्तंभात बायबलच्या जुन्या कराराची हिब्रू संहिता, त्याचे चार ग्रीक अनुवाद आणि सेप्ट्‌यूअजिंटची (बायबलच्या जुन्या कराराचे हेलेनिस्टिक ज्यूंनी ॲलेक्झांड्रियन ग्रीकमध्ये केलेले भाषांतर) सुधारित संहिता लिहून काढली आहे. हा ग्रंथ आज अंशत:च उपलब्ध आहे. De principiis वरून त्याच्या ईश्वरविद्यची कल्पना येऊ शकते. सेल्सस (दुसरे शतक) या रोमन तत्त्वज्ञाने ख्रिस्ती धर्मावर केलेल्या आक्रमक हल्ल्याला उत्तर म्हणून त्याने ContraCelsum हा ग्रंथ लिहिला. बायबलबरोबरच ग्रीक तत्त्वज्ञानाचाही त्याने सखोल अभ्यास केला होता. सेंट ऑगस्टीनपूर्वीच्या ईश्वरशास्त्रवेत्त्यांमध्ये ऑरिजेन हा विशेष प्रभावी होता. डीशिअस ह्या रोमन बादशहाने ख्रिस्ती धर्मीयांविरुद्ध आरंभिलेल्या मोहिमेत त्याला तुरुंगवास आणि असह्य यातना भोगाव्या लागल्या (सु. २५०). टायर येथे तो मरण पावला.

कुलकर्णी, .