इझमिर : (प्राचीन स्मर्ना). तुर्कस्तानच्या इझमिर प्रांताची राजधानी व अंकाराखालोखाल महत्त्वाचे शहर. लोकसंख्या ७,५३,४४३ (१९७०). तुर्कस्तानच्या पश्चिमेकडील इजीयन समुद्रकिनाऱ्यावरील इझमिर आखाताशी, किझिलकुलू नदीच्या त्रिभुज प्रदेशात हे वसले आहे. इ. स. पू. सातव्या शतकात लिडियाने येथील आयोनियन वसाहतीचा नाश केल्याचा इतिहास मिळतो. रोमन काळात आशियातील सातांपैकी एक चर्च येथे होते. सेल्जूक, बायझंएटिन, मोंगल यांच्या नंतर शेवटी १४२५ च्या सुमारास हे ऑटोमन तुर्काच्या हाती आले. पहिल्या महायुद्धानंतर हे काही काळ ग्रीकांकडे होते. तुर्की राष्ट्रवाद्यांनी केलेल्या उठावात शहर १९२२ मध्ये जवळजवळ बेचिराख झाले. बऱ्याच ग्रीकांनी देशांतर केले. नवीन रेखीव शहराची रचना १९६० पर्यंत चालू होती. समृद्ध पृष्ठप्रदेशातील तंबाखू, द्राक्षे, अंजीर, फळे, धान्य, भाजीपाला, रेशीम व गालिचे यांची ही बाजारपेठ असून सिमेंट, साबण, रंग, कापड तसेच फळे व तंबाखू यांवर प्रक्रिया करणारे कारखाने येथे आहेत. याचा निर्यातीत देशात पहिला, तर आयातीत इस्तंबूलखालोखाल क्रमांक लागतो. पहिली तुर्की रेल्वे येथूनच सुरू झाली (१८५६). येथील विमानतळ मोठा असून हे उत्तम सडकांनी देशातील प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. येथील विद्यापीठ, ग्रंथालय, पुरातात्त्विक संग्रहालय प्रेक्षणीय असून येथे नाटोचे शाखाकेंद्र आहे. दरवर्षी ऑगस्टमध्ये येथे आंतरराष्ट्रीय व्यापारी प्रदर्शन भरते.
शाह, र. रू.