इंद्रध्वजोत्सव : इंद्रदेवतेप्रीत्यर्थ ध्वज उभारून करावयाचा उत्सव. हा उत्सव मुख्यतः भाद्रपद, आश्विन किंवा चैत्र महिन्यात करतात. ह्या उत्सवाच्या उत्पत्तिविषयक कथा वेद व पुराणे यांतून मिळतात. ऋग्वेदाच्या १·१०·१ ह्या ऋचेत या उत्सवाचे बीज आहे, असे पाश्चात्त्य विद्वान म्हणतात.
उपरिचर राजा आपल्या तपोबलाने इंद्रपद प्राप्त करील, अशी इंद्रास भीती वाटली. म्हणून इंद्राने उपरिचराला चेदी देश, वैजयंतीमाला व साधूंच्या रक्षाणार्थ वेळूची काठी दिली. इंद्राच्या या उपकाराचे स्मरण म्हणून वर्षप्रतिपदेच्या दिवशी उपरिचराने त्या काठीला वस्त्र वेढून गंध-पुष्प इत्यादिकांनी तिची पूजा केली. तेव्हापासून हा उत्सव राजे व इतर लोक साजरा करतात.
युद्धात असुरांकडून इंद्राचा पराभव होऊन लागला असता, विष्णूने इंद्राला ध्वज दिला. तो ध्वज फडकावून इंद्राने दैत्यांचा संहार केला आणि जय मिळविला. इंद्राने पाऊस पाडावा म्हणूनही हा उत्सव चालू झाला असावा.
जोशी, रंगनाथशास्त्री