इंग्रज-म्हैसूरकर युद्धे : सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात दक्षिणेत जुन्या म्हैसूरमध्ये हैदर अली ह्या एका गरीब नायकाच्या मुलाने हळूहळू सैन्यास वश करून तेथील नंदराज ह्या दिवाणाची जागा प्रथम पटकाविली व पुढे राजा चिक्क कृष्णराय ह्यास बाजूस सारून सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. हैदरच्या वाढत्या बळास १७६४-६५ मध्ये मराठ्यांनी पायबंद घालण्याचा प्रयत्न केला, तरीही तो अधिक बलवान झाला. साहजिकच मराठयांप्रमाणे इंग्रजांनाही त्याचा धोका वाटू लागला. हैदर अलीकडे लक्ष दिल्याशिवाय गत्यंतर नाही, असे पाहून ते युद्धाचे निमित्त शोधू लागले, तर हैदर अली कर्नाटकात आपले वर्चस्व स्थापण्याच्या मागे लागला.
पहिले युद्ध : (१७६७–१७६९). हैदर अलीच्या वाढत्या सत्तेचा निजाम, इंग्रज व मराठे यांना धोका वाटू लागला. म्हणून १७६६ मध्ये त्या तिघांनी एकजूट करून हैदर अलीला कमजोर करण्याचे ठरविले. हे पाहून हैदर अलीने मराठ्यांना पैसे देऊन गप्प बसविले व निजामाला त्रिकूटातून फोडून आपल्या बाजूस वळविले. निजाम व हैदर अली यांनी इंग्रजांवर हल्ला करून तिरूवन्नामलई व चंदगामा येथे कर्नल स्मिथचा १७६७ मध्ये पराभव केला, तथापि निजाम पुन्हा हैदर अलीची बाजू सोडून इंग्रजांना मिळाला. इंग्रजांना थोडेफार यश येऊ लागले, तरीही त्यांनी निजामाशी तह केला. ह्या तहाप्रमाणे उत्तर सरकार प्रांत घेऊन त्याबद्दल निजामाला वार्षिक खंडणी देण्याचे आणि एकमेकांना वेळप्रसंगी मदत करण्याचे मान्य केले. हैदर अलीबरोबर इंग्रजांचे युद्ध चालूच राहिले. हैदर अलीने कर्नाटक प्रांत बेचिराख करून तो मद्रासजवळ आला. त्यामुळे घाबरून जाऊन इंग्रजांनी हैदर अलीशी १७६९ मध्ये तह केला. ह्या तहाप्रमाणे एकमेकांनी एकमेकांचा घेतलेला मुलूख परत करावा व प्रसंगी एकमेकांस साहाय्य करावे असे ठरले. शेवटची अट पुढे इंग्रजांना तापदायक झाली, तथापि वरील तहाने पहिले युद्ध संपुष्टात आले. १७७१ मध्ये मराठ्यांनी हैदर अलीवर स्वारी केली. तेव्हा वरील तहाप्रमाणे त्याने इंग्रजांची मदत मागितली. पण इंग्रज मदत देईनात. त्यामुळे हैदर अली इंग्रजांचा कडवा शत्रू बनला. अशा परिस्थितीत हैदर अलीला मराठ्यांना मोठी खंडणी व सुपीक प्रदेश देणे भाग पडले. इंग्रजांनी केलेला विश्वासघात हैदर अली कधीही विसरला नाही.
दुसरे युद्ध : (१७८०–१७८३). १७७८ मध्ये फ्रान्स अमेरिकेच्या बंडखोर वसाहतवाल्यांना मिळाला. त्यामुळे इंग्रजांनी फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले. हिंदुस्थानात इंग्रजांनी फ्रान्सचे महत्त्वाचे बंदर माहे ताब्यात घेतले. त्यामुळे हैदर अलीची कुचंबणा झाली. म्हणून त्याने इंग्रजांना दम दिला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. इंग्रजांच्या १७७१ मधील विश्वासघातामुळे हैदर अली इंग्रजांना चिरडण्याची वाट पाहात होता. माहेच्या वरील प्रकरणाने त्याला अधिकच बिथरविले. इतक्यात १७७९ मध्ये नाना फडणीसाने इंग्रजांविरुद्ध युद्धाची एक प्रचंड आघाडी उभारली. तीत हैदर अली व निजाम सामील झाले. हे युद्ध १७८० मध्ये चालू झाले आणि १७८२ मध्ये संपले. हैदर अलीने कर्नाटक संपूर्णपणे बेचिराख केला. कर्नल बेलीच्या तुकडीचा विध्वंस करून त्यास शरण आणले. सर टॉमस मन्रो याने घाबरून आपला दारूगोळा कांजीवरमला बुडविला व तो मद्रासला पळाला. १७८० मध्ये हैदर अलीने अर्काट घेतले. पण हेस्टिंग्जने मुत्सद्देगिरीने निजामाला फोडले. शिंद्यांची मनधरणी करून त्यांच्याशी तह केला व वर्हाडच्या भोसल्यास लाच देऊन गप्प बसविले, अशा प्रकारे वरील बनावातून निजाम व मराठे बाजूस झाले. त्यामुळे हैदर अली एकाकी पडला. नंतर हेस्टिंग्जने सर आयर कूट यास मोठ्या सैन्यासह बंगालमधून बोलाविले. त्याने हैदर अलीचा पोर्टो नोव्हो येथे १७८१ मध्ये पराभव करून इंग्रजांची अब्रू राखली. आणखीही काही चकमकी झाल्या, पण त्या निर्णायक नव्हत्या. नंतर इंग्रजांनी डचांची नेगापटम व त्रिंकोमाली ही ठाणी घेतली. इतक्यात फ्रेंच जनरल सफ्रेन सैन्य घेऊन आला. त्याने त्रिंकोमाली परत घेतली व हैदर अलीने इंग्रजांपासून कडलोर घेतले. इंग्रजांच्या सुदैवाने ह्याच वेळी हैदर अली मरण पावला. तरीपण त्याचा मुलगा टिपू याने १७८२ मध्ये कर्नल ब्रॅथवेटच्या सैन्याचा पराभव करून त्यास ताब्यात घेतले. नंतर १७८३ मध्ये इंग्रज व फ्रेंच यांचा तह झाला. तेव्हा इंग्रजांनी मद्रास ताब्यात घेतले व टिपूशी मंगळूर येथे तह करून हे युद्ध संपविले.
तिसरे युद्ध : (१७९०–१७९२). १७८८ मध्ये गव्हर्नर जनरल कॉर्नवॉलिस याने निजामाचा गुंतूर प्रांत मागितला व त्याबद्दल टिपूने निजामाचा घेतलेला मुलूख परत घेण्यासाठी त्यास सैन्याची मदत देण्याचे मान्य केले. तथापि ज्या मुलखावर निजाम हक्क सांगत होता, तो टिपूचाच आहे, ही गोष्ट मंगळूरच्या तहात इंग्रजांनी मान्य केली होती. तरीही कंपनीच्या मित्रराज्यांविरूद्ध सैन्य न वापरण्याच्या अटीवर इंग्रजांनी सैन्य दिले व मित्रराज्यांच्या यादीतून म्हैसूरला वगळले. यामुळे १७८४ चा तह मोडल्याबद्दल टिपू इंग्रजांवर फार चिडला. त्याने कंपनीच्या अंकित राज्यांपैकी त्रावणकोरवर हल्ला चढविला. कॉर्नवॉलिसला वरील घटनेची कल्पना असल्यामुळे त्याने निजाम व मराठे यांच्याबरोबर दोस्तीचा तह केला व १७९० मध्ये तो स्वत:च स्वारीवर निघाला. त्याने बंगलोर घेतले व टिपूचा अरिकेरे येथे पराभव केला. तथापि युद्धसाहित्याच्या अभावी कॉर्नवॉलिसला माघार घ्यावी लागली, पण मराठ्यांमुळे त्याची अब्रु बचावली. कॉर्नवॉलिसने श्रीरंगपटणवर हल्ला चढविला व मराठ्यांनी म्हैसूरचा प्रदेश बेचिराख केला. शेवटी १७९२ मध्ये टिपूने श्रीरंगपटण येथे तह केला. ह्या तहान्वये टिपूने अर्धे राज्य व प्रचंड खंडणी देऊन आपले दोन मुलगे इंग्रजांकडे ओलीस ठेवण्याचे मान्य केले. इंग्रजांना मलबार, कूर्ग, डिंडिगल आणि बारामहाल हे प्रांत मिळाले. मराठ्यांना वायव्येकडील व निजामाला ईशान्येचा प्रदेश मिळाला. काही इतिहासकारांचे असे म्हणणे आहे, की कॉर्नवॉलिसला १७९२ मध्येच टिपूचे उच्चाटन करता आले असते, पण तो चुकला म्हणून वेलस्लीला पुन्हा युद्ध करावे लागले. खरोखरी अजीर्ण होईल एवढा मोठा घास कॉर्नवॉलिसने घेतला नाही, तेच शहाणपणाचे होते. तसे तो करता, तर एवढ्या मोठ्या प्रदेशाची चांगली व्यवस्था करणे त्याच्या आवाक्याबाहेरचे होते. शिवाय मराठे व निजाम यांनी त्यास सगळा मुलूख पचू दिला नसता.
चौथे युद्ध : १७९२ च्या तहानंतर टिपूने इंग्रजांना हाकलण्यासाठी फ्रेंचांशी संधान बांधले. वेलस्लीने टिपूला खुलासा मागितला. त्यातूनच चौथे युद्ध निर्माण झाले व त्यात श्रीरंगपटणला टिपू मारला गेला व त्याचे राज्य खालसा करण्यात आले. निजामाला थोडासा मुलूख मिळाला, तर कंपनीने मोठा मुलूख घेतला. राहिलेल्यावर ज्या वोडेयर राजघराण्याला हैदर अलीने गुंडाळून ठेवले होते, त्याची पुन्हा स्थापना करण्यात आली.
संदर्भ : 1. Forrest, Denys, Tiger of Mysore, New Delhi, 1970.
2. Mileo, W. Trans. History of Tipu Sultan, Calcutta. 1958.
देवधर, य. ना.