इंग्रज-रोहिला युद्ध : (१७७२–१७७४). ब्रिटिशांनी उत्तर हिंदुस्थानात राज्यविस्ताराच्या हेतूने रोहिल्यांबरोबर केलेल्या युद्धाला भारतीय इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. अयोध्येच्या वायव्य दिशेला असलेला रोहिलखंड पूर्वीपासून सुपीक प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. तो प्रदेश अफगाण टोळ्यांनी (रोहिल्यांनी) १७४० च्या सुमारास जिंकला व तेथे आपली राजकीय सत्ता प्रस्थापित केली.
पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील (१७६१) पराभवानंतर मराठ्यांनी १७६९-७० पासून उत्तर हिंदुस्थानात परत स्वाऱ्या करण्यास सुरूवात केली. त्यामुळे १७७२ मध्ये रोहिल्यांनी अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला याच्याशी तह केला. या तहानुसार मराठ्यांनी रोहिलखंडावर स्वारी केल्यास नबाबाने रोहिल्यांना लष्करी मदत करावी व त्याबद्दल रोहिल्यांनी नबाबाला चाळीस लक्ष रूपये द्यावे, असे ठरले. १७७२ मध्ये मराठ्यांनी रोहिलखंडावर स्वारी केली तथापि माधवराव पेशव्याचा मृत्यू व नारायणराव पेशव्याचा खून ह्या पुण्यातील घटनांमुळे त्यांना त्वरीत दक्षिणेस परतावे लागले. या युद्धात लष्करी मदतीची गरज न पडताही नबाबाने रोहिल्यांकडून चाळीस लक्ष रूपयांची मागणी केली. ही मागणी रोहिल्यांनी नाकारताच नबाबाने इंग्रजांबरोबर रोहिलखंड जिंकण्यासाठी तह केला.
या तहानुसार इंग्रजांनी नबाबाला रोहिलखंड घेण्यासाठी लष्करी मदत करावी व त्याबद्दल त्याने इंग्रजांना युद्धाचा खर्च व चाळीस लक्ष रुपये द्यावे असे ठरले. या तहान्वये अयोध्या व रोहिलखंड येथील राज्यकारभारात हस्तक्षेप करण्यास वॉरन हेस्टिंग्जला संधी मिळाली. शुजाउद्दौलाने इंग्रजी सैन्याच्या मदतीने कत्रा व मीरानपूर येथे रोहिल्यांचा पराभव केला. रोहिल्यांचा प्रमुख हाफिज रहमत खान हा या युद्धात मारला गेला व वीस हजार रोहिल्यांना हद्दपार करण्यात आले. रोहिलखंडाचा प्रदेश अयोध्येला जोडून घेण्यात आला. पुढे १८५६ मध्ये अयोध्येच्या संस्थानाबरोबरच रोहिलखंडाचा प्रदेशही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रदेशात समाविष्ट करण्यात आला.
मराठ्यांच्या उत्तरेकडील स्वाऱ्यापासून बंगाल प्रांताचे संरक्षण करण्यासाठी हेस्टिंग्जने रोहिलखंड अयोध्येला जोडून ते बलवान मध्यवर्ती राज्य बनविले. या युद्धामुळे बंगालमधील ब्रिटिशांची सत्ता दृढ झाली. तथापि इंग्लंडमध्ये परत गेल्यानंतर हेस्टिंग्जवर शुजाउद्दौल्याला इंग्रजी सैन्याची मदत देऊन रोहिल्यांशी युद्ध ओढवून घेतले व केवळ पैशाच्या अपेक्षेने इंग्रजी सैन्य भाड्याने दिले, असे आरोप करण्यात आले.
संदर्भ : Dodwell, H. H. Ed. The Cambridge History of India, Vol. V, Delhi, 1958.
देवघर, य. ना.