ऑस्ट्रेलिया : जगातील सर्वात लहान आणि लोकसंख्येची घनता सर्वांत कमी असलेले खंड आणि ब्रिटिश कॉमनवेल्थमधील स्वतंत्र देश. क्षेत्रफळ ७६,९५,१०० चौ. किमी. लोकसंख्या आदिवासींसह १,२७,२८,५०० (१९७१). कमाल पूर्व-पश्चिम अंतर ३,८५९ किमी., उत्तर-दक्षिण अंतर सु. ३,१७०किमी., किनारा १९,६४४ किमी. ऑस्ट्रेलिया १०° ४१’ व ४३° ३९’ द. आणि ११३° ९’ पू. व १५३° ३९’ पू. यांमध्ये बसलेला आहे. ऑस्ट्रेलिया म्हणजे दक्षिणेकडील भूमी. ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेस तिमोर व आराफूरा समुद्र, ईसान्येस कोरल समुद्र, पूर्वेस पॅसिफिक महासागर व टास्मन समुद्र आणि दक्षिणेस व पश्चिमेस हिंदी महासागर असून टास्मानिया बेटही दक्षिणेकडेच आहे. उत्तर किनारपट्टीवर कार्पेटेरियाचे आखात व दक्षिणेकडे ग्रेट ऑस्ट्रिलियन बाइट व स्पेन्सर आखात असून ईशान्य किनाऱ्याजवळ ग्रेट बॅरिअर रीफ ही प्रवाळभित्ती सु. २,००९ किमी. पसरलेली आहे. समुद्रांपलीकडे ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेस न्यू गिनी, आग्नेयीस न्यूझीलंड व वायव्येस इंडोनेशिया हे देश आहेत. ऑस्ट्रेलियाची न्यू साउथ वेल्स, व्हिक्टोरिया, साउथ ऑस्ट्रेलिया, क्विन्सलँड, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया व टास्मानिया ही राज्ये असून नॉर्दर्न टेरिटरी व ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटरीहे केंद्रशासित प्रदेश आहेत. पूर्व न्यू गिनीच्या प्रदेशावर ऑस्ट्रेलियाच प्रशासन करतो. पापुआ, ॲशमोर व कार्तीए बेटे, ख्रिसमस बेट, कोको बेटे, हर्ड व मॅकडोनल बेटे, मॅकेरी बेट व नॉर्फोक बेटे ही ऑस्ट्रेलियाच्या मालकीची आहेत. दक्षिणेकडील ग्रेट ऑस्ट्रेलियन बाइटचा किनारा, पश्चिम किनारा व उत्तरेच्या केपयॉर्क द्वीपकल्पाचा किनारा हे वायव्य व पूर्व किनाऱ्यांप्रमाणे दंतुर नाहीत. उत्तरेकडील समुद्रबूड जमीन थेट न्यू गिनीपर्यंत गेलेली आहे. आग्नेय किनाऱ्याची ही जमीन अगदी अरुंद आहे. बाकीची कमीजास्त रुंद आहे. टास्मानिया बेट आग्नेय टोकाच्या समुद्रबूड जमिनीवरच आहे.
भूवर्णन : ऑस्ट्रेलिया खंडात ३ते ६अब्ज वर्षांपूर्वीच्या प्राचीन कँब्रियन-पूर्व खडकांची ढाल मध्य व पश्चिम भागांत पसरलेली आहे काही ठिकाणी यांवर नंतरच्या काळातील खडकांचे स्तर साचलेले दिसतात. खंडाचा पूर्वेकडील भाग हा ह्या ढालीचीच उपवृद्धी दिसतो. ६०ते २०कोटी वर्षांच्या दरम्यानच्या पुराजीव काळात टास्मान विस्तीर्ण अभिनतीने खंडाचे पूर्वेकडील भाग बनले आणि २०कोटी वर्षांपूर्वीमध्यजीव काळात पूर्व-मध्य द्रोणी तयार झाली त्यामुळे अभिनतीचे घडीचे पर्वत व पश्चिमेकडील कँब्रियन-पूर्व खडकांची ढाल ह्यांमध्ये समुद्र व सरोवरे निर्माण झाली. ढाल प्रदेशात आर्कियनयुगातील गाळाचे खडक, लाव्हारसाचे थर व अग्निजन्य खडकांचे नीस, शिस्ट वगैरे प्रकार आहेत. स्लेट, क्वार्टझाइट, ग्रीन स्टोन इ. खडक पश्चिम भागात सापडतात. लोअर प्रोटिरोझोइक काळातील वालुकाश्म, ग्रेवॅक, स्लेट व चुनखडीचे खडक नॉर्दर्न टेरिटरी, पश्चिम क्वीन्सलँड, दक्षिण व पश्चिम ऑस्ट्रेलियात आढळतात. नॉर्दर्न टेरिटरी व वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील अपर प्रोटिरोझोइक खडकांमध्ये बदल न झालेले गाळाचे खडक व लाव्हारसाचे थर आढळतात. साउथ ऑस्ट्रेलियात ॲडिलेड अभिनतीमध्ये वालुकाश्म, ग्रेवॅक, डोलोमाईट व रक्तवर्णी खडक (लोहधातुक खनिजे) हे अपर प्रोटिरोझोइक खडक आढळतात. कँब्रियन-पूर्व ढालीच्या खडकांत खनिज संपत्ती विपुल आहे. ऑस्ट्रेलियात सोने, शिसे, जस्त, लोह व युरेनियम ह्यांचे भरपूर उत्पादन याच खडकांतून मिळू शकले. अपर प्रोटिरोझोइक खडकांत थोड्या प्रमाणात युरेनियम (नॉर्दर्न टेरिटरी) मिळण्याची शक्यता आहे.
पर्मियन काळात ऑस्ट्रेलिया खंडाचे दुसऱ्यांदा हिमाच्छादन झाले व मोठ्या प्रमाणात दगडी कोळशाचे निक्षेप तयार झाले. सोने, कथील, तांबे, चांदी यांचेही निक्षेप पूर्व ऑस्ट्रेलियात तयार झाले. याच प्रदेशात बोवेन व सिडनी द्रोणींमध्ये मोठ्या प्रमाणात बिट्यूमिनस कोळशाचे प्रचंड साठे तयार झाले. टास्मन अभिनतीमध्ये तेलसाठ्याची शक्यता निर्माण झाली. क्वीन्सलँड, व्हिक्टोरिया, टास्मनिया व साउथ ऑस्ट्रेलिया ह्या भागांत बिट्यूमिनस कोळशाचे प्रचंड निक्षेप, तर ग्रेट आर्टेशियन द्रोणी प्रदेशात वालुकाश्मांचे निक्षेप तयार झाले. व्हिक्टोरियात लिग्नाइटचे प्रचंड निक्षेप आहेत. राज्यातील बहुतेक विद्युत्शक्ती व घन इंधन त्यांपासूनच तयार होते. सोने व कथील यांचे उत्पादन होते. तृतीयक काळातील जांभ्या दगडाच्या मातीमुळे येथे बॉक्साइटचेही निक्षेप तयार झाले आहेत. क्वीन्सलँडच्या दक्षिणेकडील भागात व न्यू साउथ वेल्सच्या उत्तर भागात चतुर्थक युगात रुटाइल, झिर्कॉन व इल्मेनाइट ही खनिजे तयार झाली.
काही शास्त्रज्ञांच्या मते पुरातनकाळी ऑस्ट्रेलिया खंड गोंडवनभूमीचा भाग असून दक्षिण अमेरिका, भारत व आफ्रिका ह्यांना जोडलेले होते खंडविप्लवामुळे वरील सर्व प्रदेश वेगवेगळे झाले असावेत. जगातील इतर खंडांप्रमाणे ऑस्ट्रेलियामध्ये आल्प्स पर्वतसदृश संरचना व उंची असलेली पर्वतराजी नाही. पूर्वेकडील ४८० किमी. लांबीच्या प्रदेशात मुख्य गिरिभूमी आढळते तीमध्ये मौंट कॉझिस्को हे अत्युच्च शिखर (२,२३३·५ मी.) असून इतर फारच थोडी शिखरे १,८३० मी.हून उंच आढळतात. या गिरिभूमीमध्ये विच्छिन्न पठारे आहेत त्यांमध्ये बरेच उच्च समतलप्रदेश असून ते अनेक नद्यांच्या घळ्यांनी तुटलेले आहेत. पूर्वेकडील गिरिभूमी उत्तरेकडे २८० मी. व दक्षिणेकडे ६०० मी. उंच असून न्यू साउथ वेल्स व पूर्व व्हिक्टोरियामध्ये ती ६०० मी. ते १,८३० मी. पर्यंत उंच गेलेली आहे. ही जटिल पर्वतराजी खंडाचे पूर्व व पश्चिम असे दोन भाग पाडते, म्हणून हिला ‘ग्रेट डिव्हायडिंग रेंज’ म्हणतात. या पर्वतराजीला ‘ऑस्ट्रेलियन आल्प्स’, ‘न्यू इंग्लंड रेंज’, ‘लिव्हरपूल रेंज’ अशीही नावे आहेत. गिरिभूमीचे पश्चिमेकडील उतार हे अंतर्भागातील मैदानी प्रदेशापर्यंत जातात व ते पुढे साउथ ऑस्ट्रेलियातील फ्लिंडर्स व मौंट लॉफ्टी पर्वतश्रेणीपर्यंत व पुढे वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील मौंट इझाव क्लॉनकरी या कमी उंचीच्या पर्वतांपर्यंत पसरलेले आढळून येतात.
तृतीयक युगात घडून आलेल्या पृथ्वीच्या उलथापालथीमुळे आल्प्स, हिमालय, अमेरिकन कॉर्डिलेरा वॲटलास ह्यांसारख्या पर्वतश्रेणी अस्तित्वात आल्या, तरी ह्या उलथापालथीचा धक्का ऑस्ट्रेलिया खंडाला पोचला नाही. ऑस्ट्रेलियातील पर्वतांचे हे स्वरुप प्राचीन वलीपर्वतांप्रमाणे आहे. हे वलीपर्वत खाली दबले गेले, पुन्हा वरती आले, वक्रित व भ्रंशित झाले. ऑस्ट्रेलियाच्या भूदृश्याची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे विस्तीर्ण मैदाने व पठारे ही होत. ऑस्ट्रेलिया खंडाचा मोठा भाग कमी उंचीचा व पुष्कळ प्रमाणात धुपलेल्या मॅकडोनल व मसग्रेव्ह पर्वतराजींनी व्यापलेला आहे परंतु गिब्सन, ग्रेट व्हिक्टोरिया, ग्रेट सँडी व सिंप्सन या वाळवंटासारख्या प्रदेशांत घन खडक वालुकागिरींनी झाकलेले आहेत. या विस्तीर्ण प्रदेशातील कोणत्याही भागाची उंची ६०० मी. पेक्षा अधिक नाही.
पूर्वेकडील गिरिभूमिप्रदेश व पश्चिमेकडील ढालीचा प्रदेश ह्यांमध्ये एक सखल, रुंद द्रोणीप्रदेश असून तो कार्पेटेरियाच्या आखातापासून पश्चिम व्हिक्टोरियापर्यंत पसरला आहे. हा प्रदेश जुरासिक-तृतीयक युगातील मऊ खडकांनी बनलेला आहे. या भागातच ग्रेट आर्टेशियन द्रोणी व मरी-डार्लिंग नदीखोरे (ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वांत मोठे नदी, खोरे) आहे. नैर्ऋत्येस या निम्नभूमिच्या दोन्ही बाजूंस साउथ ऑस्ट्रेलियातील मौंट लॉफ्टी व फ्लिंडर्स या भ्रंशित पर्वतश्रेणी आहेत. ऑस्ट्रेलिया खंडाचा सु. ७ टक्केच भाग ६०० मी. पेक्षा उंच आहे. खंडाचा पूर्व किनारा खोल दऱ्यांनी छेदलेला आहे. ब्रिस्बेन व सिडनी ह्या शहरांच्या पार्श्वभागांत किनारी मैदाने व रुंद दऱ्या आहेत. हे प्रदेश ऑस्ट्रेलियातील सुपीक व भरभराटलेल्या प्रदेशांपैकी समजले जातात. दक्षिण किनाऱ्यावरील नुल्लारबोर रुक्ष मैदान व पश्चिम, वायव्य आणि उत्तर किनाऱ्यांवरील मैदानी प्रदेश विस्तीर्ण आहेत. १८° द. ते ३३° द. व १२०° पू. ते १३५° पू. ह्या प्रदेशात नद्या अजिबातच नाहीत. हा प्रदेश वायव्येकडील वाळवंटी द्रोणीपासून नुल्लारबोर मैदानापर्यंत पसरलेला आहे. साउथ ऑस्ट्रेलिया व व्हिक्टोरिया या राज्यांच्या सीमावर्ती प्रदेशातही फारशा नद्या नाहीत याचे कारण पर्जन्याचा अभाव व सच्छिद्र खडकांवरील वाळूचे थर हे होय. नुल्लारबोर मैदान हे तर चुनखडी-खडकांनी भरलेले आहे. मरी-डार्लिंग नदी-खोरे सु. ११,३९,६०० चौ. किमी. क्षेत्र व्यापते, तथापि तिचे जलवाहन-क्षेत्र ४,०९,२२० चौ. किमी. एवढेच आहे. डार्लिंग ही ऑस्ट्रेलियाची सर्वांत मोठी नदी (२,७३२ किमी.) असली, तरी ८ महिने ती कोरडीच असते मरी नदी (२,५८४ किमी. लांब) तीन वेळा (१८३०, १९१२व १९२२) आटलेली आहे. पारू ही नदी पुढे डार्लिंगला मिळते. मरी, डार्लिंग व त्यांच्या मरंबिजीसारख्या उपनद्या यांना उंच पर्वतांमध्ये पुरेसे पावसाचे पाणी मिळत असले, तरी नेहमी पाणी उपलब्ध होणारे प्रदेश म्हणजे खंडाचा नैर्ऋत्य कोपरा, उत्तरेकडील किनारी भाग व पूर्वेकडील गिरिभूमिप्रदेश हेच होत. फिट्झ्रॉय, बर्डीकिन, फ्लिंर्डस, स्वान, बार्कू या ऑस्ट्रेलियातील इतर महत्त्वाच्या नद्या होत. नद्यांतून फारच थोड्या प्रमाणात वाहतूक होऊ शकते पूर्वेकडे काही अंतरापर्यंत जलवाहतूक होते व उत्तरेकडील प्रवाहांत ८० ते १६० किमी. पर्यंत नौवहन होते. अनेक अंतर्गत अपवाह-द्रोणीपैंकी एअर सरोवराचे अपवाह-क्षेत्र सर्वांत मोठे, जवळजवळ १२,९५,००० चौ. किमी. आहे. दुसरी अपवाह-द्रोणी बार्कू, डायमँटिना, मलिगन व इतर नद्यांमुळे तयार झाली असून ती चॅनल प्रदेश व क्वीन्सलँडचा काही भाग ह्यांमध्ये आहे. ऑस्ट्रेलियाच्या बहुतेक भागांत नदी या शब्दाचा अर्थ वस्तुतः तसराळ्यासारख्या प्रदेशात जमलेले पाणी असा होतो. असे अनेक तसराळी जलप्रदेश देशात आहेत. एअर सरोवर हे खाऱ्यापाण्याचे सरोवर १४४ किमी. लांब व ६४ किमी. रुंद पसरले असून, ते साधारणतः नेहमी मिठाच्या लांबच लांब पसरलेल्या पट्ट्याप्रमाणेच असते व त्यावरून ट्रकही नेता येतात. वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील बहुतेक सर्व तळी म्हणजे मिठाचे सपाट प्रदेशच बनलेले आहेत. पूर्व गिरिभूमिप्रदेशात व मरी खोऱ्यात अनेक लहान तळी आहेत. त्यांपैकी लेक जॉर्ज हे सरोवर सर्वांत प्रसिद्ध आहे. पाण्याचा पुरवठा व जलसंवर्धन ह्या ऑस्ट्रेलियाच्या दोन मोठ्या समस्या आहेत. अंतर्भागातील शुष्कता ही कित्येक आर्टेशियन द्रोणींमुळे पुष्कळच कमी झाली आहे. या द्रोणींनी १७,५६,०२० चौ. किमी प्रदेश व्यापला असून, सबंध जगात असा मोठा प्रदेश कोठेच नाही. काही ठिकाणचे आर्टेशियन झरे सु. ४० मी. पर्यंतही वर उडतात. जमिनीखालील या पाण्याच्या साठ्यापर्यंत जमिनीस भोक पाडले, म्हणजे हे पाणी स्वतःच्या दाबाने वर उसळून येते. मध्य व पश्चिम क्वीन्सलँडमधील जनावरांना व मेढ्यांना हे पाणी अतिशय उपयुक्त असते.
ऑस्ट्रेलियाचा गाभा मरुभूमी किंवा मरुभूमिसद्दश मृदा, दुमट मृदा, वालुकागिरी, गारेचे दगड विपुल प्रमाणात असलेली मैदाने ह्यांनी बनलेला आहे. उत्तरेकडील प्रदेशात उच्चसमतलभूमिमृदा असलेला मोठा भाग आहे. हे मृदाप्रकार ऑस्ट्रेलियातील एकूण जमिनीच्या ५६·५ टक्के भागात आढळून येतात. गाभ्याच्या या रुक्ष प्रदेशासभोवती अर्धरुक्ष, तपकिरी, करड्या व लवणयुक्त मृदा तसेच लाल-तपकिरी व काळ्या मृदा आणि आर्द्र, भस्मी मृदा आहेत. मॉली मृदा ४२ सेंमी. किवा त्याहीपेक्षा कमी पाऊस पडणाऱ्याप्रदेशात असतात. काळ्या मृदा, क्षारीय मृदा, रेंडझिना किंवा दुमटी मृदा ह्या मुख्यत्वेकरुन क्वीन्सलँडच्या उतारावरील प्रदेशात आहेत. तांबड्या-तपकिरी मृदा ह्या २७·५ ते ६२·५ सेंमी. पर्जन्याच्या, दक्षिणेकडे भूमध्यसामुद्रीय हवामानाच्या आणि मोसमी हवामानाच्या प्रदेशांत आहेत. ५० सेंमी. पर्जनाच्या प्रदेशात भस्मी मृदेची जमीन असते. ऑस्ट्रेलियात अतिशय सुपीक मृदांचे प्रदेश फार कमी आहेत. नैर्ऋत्येकडील प्रदेशातील मृदा अधिक लवणमय असते, तर आग्नेयीकडील प्रदेशातील मृदांत हानिकारक लवणमय सांद्रण तयार होते. मँगॅनीज, तांबे, कोबाल्ट, जस्त इत्यादींची खनिजे घालून ऑस्ट्रेलियातील मृदांचा दर्जा वाढविण्याचे प्रयत्न करण्यात आलेले आहेत. निर्वनीकरण व अतिरिक्त चराई यांमुळे दक्षिणेकडील पूर्व गिरिभूमिप्रदेश मॉली प्रदेश आणि डार्लिंग नदीचे खोरे येथील जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप झालेली आहे.
हवामान : ऑस्ट्रेलियाच्या जवळजवळ मध्यातून मकरवृत्त जात असल्यामुळे त्याचे हवामान उष्णकटिबंधीय व उपोष्ण कटिबंधीय आहे. किनाऱ्याजवळच्या प्रदेशात वार्षिक तपमान कक्षा फार मोठी नसते. फक्त अंतर्भागात मकरवृत्तीय रुंद पट्ट्यात ही कक्षा १९° से. पेक्षा अधिक असते. उत्तरेकडील किनारी प्रदेशातील सरासरी तपमान २३·९° से. (जुलै) पासून २९·४° से. (जानेवारी) पर्यंत जाते, तर दक्षिणेकडील तापमान १०° से. ते १३° से. पासून १८° से. ते २४° से. पर्यंत जाते. पूर्वेकडील गिरिभूमिप्रदेश व बहुतेक टास्मानिया ह्या भागांत जुलैत ७° से. पेक्षाही तपमान खाली येते. तेथील हिवाळा वनस्पतींच्या वाढीच्या दृष्टीने फार कडक असतो. उत्तरेकडे ब्रिस्बेनपर्यंतच्या गिरिभूमिप्रदेशात बर्फ पडते, तथापि ६०० मी. हून कमी उंचीवरील प्रदेशात बर्फ क्वचितच पडते १,५०० मी. वरील प्रदेशात मात्र ते सर्वत्र असते. दक्षिणेकडे जून-ऑगस्ट या काळात सखल प्रदेशातही धुके पसरलेले आढळते. ऑस्ट्रेलियाच्या नैर्ऋत्य व आग्नेय प्रदेशाचे हवामान भूमध्यसागरीय आहे. ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागातील वसंत ॠतू व उन्हाळा यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळी तेथे नीचभार तयार होऊन प्रथम उत्तरेकडील अतिशय गरम, कोरडे व पुष्कळ वेळा धूलिकणयुक्त वाऱ्याचे झोत (नॉर्दर्लीज – ह्यांना ब्रिकफील्डर असेही म्हणतात) अंतर्भागातून येतात व त्यापाठोपाठ समुद्रावरून थंडगार आर्द्र वारे-दक्षिणी वारे – (ह्यांना बस्टर्स म्हणतात) वाहात येतात. उष्णकटिबंधात जवळजवळ सर्व किनारी प्रदेशात किमान सहा महिने तरी २१° से. एवढे तपमान असते व त्याचा अतिशय त्रास होतो. ऑस्ट्रेलियाच्या एकूण भूभागापैकी ११टक्के भागास १०० सेंमी. पेक्षा अधिक पाऊस, तर दोन-तृतीयांश भागास ५०सेंमी. हूनही कमी पाऊस मिळतो. पूर्व किनारी प्रदेशात सर्व ॠतूंत पाऊस पडतो. सर्वांत जास्त पाऊस केअर्न्झ शहराजवळील टुली या गावी पडल्याची (४५४·६ सेंमी.) नोंद आहे. २०° द. अक्षवृत्ताच्या उत्तरेस पश्चिम भागात व उत्तर किनाऱ्यावर मोसमी प्रकारचा पाऊस पडतो. ३२° द. अक्षवृत्ताच्या दक्षिणेस भूमध्यसागरीय प्रकारचा हिवाळी पाऊस पडतो व या दरम्यानच्या पट्ट्यात पाऊस फारच कमी पडतो. उत्तर पूर्वेकडील प्रदेशास आग्नेय व्यापारी वाऱ्यांपासून पाऊस मिळतो. अंतर्भागात पाऊस फारसा पडत नाही. आग्नेय क्वीन्सलँड व ईशान्य न्यू साउथ वेल्स हे भाग बहुतेक सबंध वर्षभर आर्द्र असतात.
वनस्पती व प्राणी : ऑस्ट्रेलियाची वनस्पती वार्षिक पर्जन्याप्रमाणेच सर्वत्र विखुरलेली दिसून येते. नैर्ऋत्य ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागात, उत्तरेस डार्विनजवळ व केपयॉर्कपासून ब्रिस्बेनपर्यंतच्या पूर्वकिनारी भागात उष्णकटिबंधीय अरण्ये आहेत. नैर्ऋत्यभागात प्रामुख्याने प्रचंड गोंदवृक्ष आढळतात. कित्येक वृक्षांची उंची ६० मीटरांहूनही अधिक असते. उत्तरेकडील उबदार प्रदेशांत हूप व बुन्यापाईन वृक्षांची अरण्ये आहेत. अगदी उत्तरेकडे वर्षावनात रुंदपर्णी वृक्ष आढळतात. ५० सेंमी. वा त्याहून कमी पावसाच्या प्रदेशात निलगिरीची अरण्ये आहेत. अंतर्भागात जावे तसतसे पर्जन्यमान कमीकमी होत जाते व अशा कोरड्या प्रदेशात मॉली, निलगिरीची खुजी झाडे किंवा बुटकी बाभळीची झाडे-ह्याना मल्गा असे नाव आहे-दिसतात. वाळवंटी प्रदेशात खाऱ्यावनस्पतींचे प्रकार प्रकर्षाने दिसू लागतात. कमी लवणमय प्रदेशात तुरे वा झुबके असलेल्या गवताच्या जाती-विशेषेकरुन पॉर्क्यपाईन ग्रास व केन ग्रास-आढळतात. निलगिरीचे जवळजवळ ६०० प्रकार आढळतात. यांमध्ये खुज्या निलगिरीच्या झुडपांपासून प्रचंड उंचीच्या मौंटन ॲश निलगिरी वृक्षांचा समावेश होतो बाभळगटाच्या ७६७ जाती आढळतात. परोपजीवी ख्रिसमस वृक्ष, बॉटल ट्री, टास्मानियातील विशिष्ट पानझडी फांद्यांची, सूचिपर्णी वृक्षांची अरण्येही येथे आहेत. इतर वृक्षांत गोरखचिंच, ब्लॅकवुड, रेड सीडार, कोचवुड, मॅपल, ओक, अक्रोड या वृक्षांचा समावेश होतो. भूमध्यसागरीय हवामानाच्या प्रदेशात त्या हवामानात होणाऱ्यावैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींशिवाय जारा व कारी हे कठीण लाकडाचे वृक्ष होतात. जंगली फुलांमध्ये बोरोनिया, ख्रिसमस बुश, डेझर्ट पी, फ्लॅनर फ्लॉवर इ. वनस्पती आहेत. ऑस्ट्रेलियाच्या कोरड्या भागात स्थलीय ऑर्किड वृक्षांची, तर उत्तर व पूर्व भागांतील वर्षावनात उपपरिरोही ऑर्किड वृक्षांची विपुल अरण्ये आढळतात. येथे ऑर्किडांचे ४७० प्रकार आढळतात.
ऑस्ट्रेलियातील प्राणिजीवनात विविधता आढळते. प्लॅटिपस व एशिड्ना हे दोन अंडी घालणारे सस्तन प्राणी फक्त ऑस्ट्रेलियातच दिसतात. जमिनिवरील व गोड्या पाण्यातील मिळून सध्या सु. २४० सस्तन प्राण्यांच्या जाती (त्यांपैकी ११९ धान्यावर जगणाऱ्या), २० पक्ष्यांच्या, २८० सरीसृप प्राण्यांच्या, ११२ बेडकांच्या, १८० गोड्या पाण्यात राहणाऱ्यामाशांच्या, ७५० मृदुकायांच्या व ४०,००० ते ५०,००० कीटकांच्या जाती येथे आढळतात. पिलांसाठी पोटाशी पिशवी असलेल्या सस्तन प्राण्यांत कांगारुशिवाय एक प्रकारचा लांडगा, चिचुंद्री, मांजर, अँटईटर हे प्राणी आढळतात. काही सशांएवढे लहान तर काही १·८ मी. उंच असेही आहेत. फ्लँजर हा झाडावरच राहतो तो पाने, मध व कीटक खाऊन राहतो. कोआला हा छोटासा वृक्षवासी प्राणी असून तो निलगिरीची पाने खाऊन गुजराण करतो. वोम्बॅट हे जड शरीराचे बिलवासी प्राणी गवतावर जगतात. पाकोळ्या, वटवाघळे व तीक्ष्णदंत प्राण्यांच्या अनेक जाती आहेत. एमू, कॅसोबेरी हे उडता न येणारे म्हणून बॉवरबर्ड हा घरट्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण शेपूट असलेला लायरबर्ड हा नक्कल करणे व नरपक्षाचे प्रेक्षणीय नृत्य यांसाठी असे प्रसिद्ध पक्षी आहेत. हनीईटर, पोपट, बदक, किंगफिशर, कोकीळ, क्वेल, फ्लायकॅचर, पेंग्विन वगैरे पक्ष्यांच्याही अनेक जाती आहेत. सरीसृप व जलचर प्राण्यांमध्ये नाग, सरडे, गोड्या पाण्यातील कासव, मगर इत्यादींच्या पुष्कळ जाती आहेत. विषारी नागांच्या ६-७जाती आहेत. याशिवाय नाकतोडा, तुडतुडा, वाळवी, मुंग्या वगैरेंचेही अनेक प्रकार आहेत. जगातील वाळवीचा व मुंग्यांचा सर्वात आद्य प्रकार ऑस्ट्रेलियात आढळतो. व्हिक्टोरिया राज्यातील गिप्सलँड येथे अपृष्ठवंशी दानवे तीन मीटरांहूनही जास्त लांबीचे आढळून येतात. ऑस्ट्रिलियन शासनाने राष्ट्रीय उद्यानांचा कार्यक्रम हाती घेतलेला असून कोआलासाठी अभयारण्ये तयार करण्यात आली आहेत. माणसाने बाहेरुन आणलेले ससे व निवडुंगासारख्या वनस्पती या देशापुढे समस्या उत्पन्न करण्याइतक्या त्रासदायक ठरल्या आहेत. डिंगो हा रानटी कुत्र्यासारखा प्राणी आदिवासींनी सु. सहा ते आठ हजार वर्षांपूर्वी येथे आणला असावा.
गद्रे, वि. रा.
इतिहास : ऑस्ट्रेलियाच्या प्रागैतिहासिक काळाविषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे. काही मानवाचे व सस्तन प्राण्यांचे प्राचीन अवशेष येथे सापडले आहेत. मेलबर्न येथे सापडलेल्या मानवाच्या कवटीवरुन येथील मानव ऑस्ट्रेलॉइड वंशाचा होता, असे सिद्ध झाले आहे. तथापि टास्मानिया येथील आदीवासी नेग्रिटो वंशाचे आहेत, असे काहींचे मत आहे. काहींच्या मते नेग्रिटोआणि ऑस्ट्रेलॉइड वंशांचे मिश्रण येथे दिसते. गुहाचित्रे काढण्याची कलाही ऑस्ट्रेलियातील प्राचीन मानवाला ज्ञात असावी. काही अज्ञात प्राणी, मानवी आकृत्या, कांगारु इ. चित्रे ह्या प्रस्तरालयांत आढळून येतात. यूरोपीय लोक येण्यापूर्वी वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्याअनेक जमाती ऑस्ट्रेलियात होत्या. बहुतेक आदिवासी भटके होते. शिकार हाच त्यांचा प्रमुख व्यवसाय होता. मागासलेल्या अवस्थेत रानटी जीवन जगणाऱ्याह्या जमातींनीगोऱ्यालोकांना प्रथम थोडाफार प्रतिकार केला. गोऱ्यावसाहतवाल्यांना तो सहज मोडता आला. गोऱ्यालोकांशी ह्या मूळ रहिवाशांच्या चकमकी अगदी अलीकडच्या काळापर्यंत होतच राहिल्या. ह्या जमातींपैकी सर्वच मूळ ऑस्ट्रेलियन भूखंडावरील नसाव्यात. मलाया व इतर बेटांवरील परकीयांच्या आक्रमणामुळे हे लोक समुद्रावरुन इथे येऊन स्थायिक झाले असावेत, असा एक अंदाज आहे. काहींच्या मते ह्यांत दक्षिण हिंदुस्थानातून आलेले काही लोकही असावेत.
हे खंड अठराव्या शतकापर्यंत अज्ञातच होते. नवीन भूभागाच्या शोधार्थ भटकणारे काही साहसी प्रवासी ह्या खंडाच्या आसपास पोचले होते. आल्व्हारो दे मेंदान्या (१५६७) , विल्यम जान्झ (१६०५), लुई दी टोरेस (१६०६) हे त्यांपैकी काही होत. १६४२ मध्ये टास्मान या प्रवाशाने शोधलेल्या प्रदेशाला टास्मानिया हे नाव दिले गेले. १६८८ मध्ये विल्यम डॅम्पिअर ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनाऱ्यावर पोचला.
इंग्लंडच्या रॉयल सोसायटीने कॅप्टन कुकच्या नेतृत्वाखाली १७६८ मध्ये एक पथक पाठविले न्यूझीलंडवरुन ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावर जाण्यात त्याला १७७० मध्ये यश मिळाले. त्यानंतर कुकने अनुक्रमे १७७२ व १७७६ मध्ये पुन्हा ऑस्ट्रेलियाला भेट दिली. त्यामुळे इतर यूरोपिय प्रवाशांना उत्तेजन मिळाले.
अमेरिकेची मोठी वसाहत गमावल्यामुळे ग्रेट ब्रिटनला तेथून परत आलेल्या लोकांसाठी, त्याचप्रमाणे इंग्लंडमधील गुन्हेगारांची सोय करण्यासाठी लांब असणाऱ्याभूप्रदेशाची आवश्यकता होती. पहिल्या वसाहतीचा गव्हर्नर म्हणून १७८७ मध्ये अनुभवी कॅप्टन आर्थर फिलिपची नेमणूक झाली. त्याच्याबरोबर सु. १,००० लोक देण्यात आले. त्यांपैकी ७३६ कैदी होते व उरलेल्यांत अधिकारी, शिपाई वगैरेंचा भरणा होता. २६ जानेवारी १७८८ रोजी तो बॉटनी बे या ठिकाणी उतरला पण हा प्रदेश त्यास अयोग्य वाटल्याने पोर्ट जॅक्सन (सिडनी) या ठिकाणी त्याने पहिली वसाहत स्थापन केली. सुरुवातीस अन्नासाठी त्यास इंग्लंडवरच अवलंबून राहावे लागले. शिवाय पुन्हा गुन्हेगारांत भर पडत होतीच. त्याने अधिकाऱ्यांना उपलब्ध जमिनी दिल्या व हंटर नदीकाठी शेतीस सुरुवात केली. गुन्हेगारांपैकी अनेकांना काम देऊन हळूहळू तेथील भूप्रदेशाच्या संशोधनास त्याने सुरुवात केली. तथापि त्याचे अधिकारी त्यास म्हणावे तसे सहकार्य देईनात. तो १७९२ मध्ये प्रकृती बिघडल्याने इंग्लंडला परतला. दरम्यान तेथील वसाहतीचा सर्व ताबा जुन्या अधिकारीवर्गाने घेऊन सर्व व्यापार, मेंढपाळीचा व्यवसाय व दारुची विक्री व निर्मिती यांवर मक्तेदारी मिळविली आणि सु. ६,००० हेक्टर जमीन आपापसांत वाटून घेतली. यांमध्ये मरिनो मेंढ्यांमुळे श्रीमंत झालेला जॉन मॅक्ऑर्थर हा पुढारी होता. जुने अधिकारी कायद्याची सूत्रेही हाती बाळगून होते. यामुळे गुन्हेगार व मुक्त गुन्हेगार यांची पिळवणूक होत होती. जॉन हंटर (१७९५–१८००) गव्हर्नर म्हणून आला पण त्याला ही परिस्थिती आटोक्यात आणता आली नाही. त्यानंतर पी. जी. किंग (१८००–१८०६) गव्हर्नर झाला. हा धीट व धडाडीचा माणूसही वसाहतीच्या भवितव्याच्या द्दष्टीने काही करू शकला नाही. मात्र यावेळी मॅक्ऑर्थर व दुसरा एक वरिष्ठ अधिकारी व विल्यम पॅटर्सन यांच्यात काही कारणावरून द्वंद्वयुद्ध झाले आणि पुढे मॅक्ऑर्थरला इंग्लंडला धाडण्यात आले. मॅक्ऑर्थरने इंग्लंडमध्ये आल्यावर आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि पुढे तो ऑस्ट्रेलियात मेंढपाळीच्या धंद्यासाठी पुन्हा गेला. किंगला या प्रकरणामुळे परत बोलाविले व त्याच्या जागी विल्यम ब्लाय (१८०६–१८०८) याची गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली. यावेळी जुन्या अधिकार्यांच्या मक्तेदारीस ऊत येऊन त्याचे पर्यवसान छोट्याशा लष्करी क्रांतीत झाले व त्यांनी सर्व सूत्रे आपल्या हातात घेऊन ब्लायला अटक केली. लॅक्लॅन मॅक्केरीची (१८०९–१८२१) गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली आणि अधिकाऱ्यांचे जुने पथक इंग्लंडला परत बोलाविण्यात आले. मॅक्केरीने वसाहतीत अनेक सुधारणा केल्या आणि गुन्हेगारांची स्थितीही सुधारली. यानंतर टॉमस ब्रिझ्बेन (१८२१–१८२५), राल्फ डार्लिंग (१८२५–१८३०), रिचर्ड बूर्क (१८३०-१८३८), जॉर्ज गीप्स (१८३८–१८४६) वगैरे गव्हर्नर झाले. या काळात प्रादेशिक स्वायत्ततेच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. गुन्हेगार व मुक्त गुन्हेगार यांना अनेक सवलती देण्यात येऊन त्यांची सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता प्रयत्न झाले. १८२८ मध्ये सु. ६०,००० हेक्टर जमीन वाटण्यात आली. या काळात काही नेत्यांकडून वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली. त्याला अनुसरून १८४२ मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने एक विधेयक मंजूर करून वसाहतीच्या नवीन कायदेमंडळाच्या सभासदांची संख्या वाढविली. त्यांपैकी १२सभासद राणीने नेमावयाचे होते आणि २४ सभासद विशिष्ट आर्थिक गटांनी निवडावयाचे होते. या राजकीय स्थैर्याबरोबरच न्यू साउथ वेल्स वसाहतीचे क्षेत्र वाढत होते आणि हळूहळू इतर प्रदेशही शोधले जात होते. लोकजागृती व आर्थिक सुबत्ता यांमुळे समाजात भांडवलदार, जमीनदार वगैरे वर्गरुढ होऊ लागले होते. या वसाहतींना स्वतंत्र, स्वायत्त स्वरुप देण्याचा प्रयत्न मॅक्केरीने केला. मॅक्केरीनंतर येणाऱ्यागव्हर्नरांना ७ सभासदांच्या मंडळाने साहाय्य करावे असे ठरले. मंडळातील सदस्यांची संख्या १८२३ व १८२८ मध्ये वाढविण्यात आली. १८२३ ते १८२८ पर्यंतचे एकूण कायदे सौम्य होते, तरी त्यांची फारशी अंमलबजावणी होत नव्हती. कारण पूर्वीचे गुन्हेगार म्हणजे सामान्य शेतकरी, छोटे व्यापारी, मजूर व इतर अधिकारी लोक असे गट समाजात होते. पूर्वीच्या गुन्हेगारांना राजकीय हक्क हवे होते. इतरांचा त्याला विरोध होता. बेंजामिन बॉइड, डब्ल्यू. सी. वेंटवर्थ, मॅक्ऑर्थर वगैरेंनी १८३५ मध्ये ऑस्ट्रेलियन पेट्रिॲटिक असोसिएशनची स्थापना केली व आपला प्रतिनिधी इंग्लंडमध्ये पाठविला. या सुमारास ब्रिटिशांच्या वसाहतींचे क्षेत्र न्यू साउथ वेल्सपुरते मर्यादित नव्हते, तर इतर भूप्रदेशही त्यांच्या सत्तेखाली आला होता.
१८५० साली व्हिक्टोरिया न्यू साउथ वेल्सपासून अलग करण्यात आला. न्यू साउथ वेल्सप्रमाणेच इतर सर्व वसाहतींना अधिकार मिळाले. व्हिक्टोरिया, दक्षिण ऑस्ट्रेलिया, टास्मानिया यांनी आपली संविधाने तयार केली.
राजकीय घडामोडी घडत असता ऑस्ट्रेलियातील धाडसी प्रवासी जमीन व जलमार्गांनी नवीन प्रदेशाचा शोध घेत होते. त्यात सर्वच थरांतील लोक सहभागी झाले. न्यू साउथ वेल्सचा बराचसा किनारा जॉर्ज बास व मॅथ्यू फ्लिंडर्स यांनी १७९६ मध्ये शोधून काढला. १८१३ पर्यंत न्यू साउथ वेल्सशिवाय दुसरा कोणताच भाग माहीत नव्हता. ग्रेगरी ब्लॅक्सलॅड, विल्यम लॉसन व डब्ल्यू. सी. वेंटवर्थ यांनी हिरवळीच्या प्रदेशात घुसून लॅक्लन नदीच्या प्रवाहाविरुद्ध जाण्याचे धाडस केले आणि काही नद्यांची माहिती मिळविली. जॉन औक्स्ली, एव्हान्झ व ॲलन कनिंगहॅम यांनी उत्तरेकडे सफर काढली, तर हॅमिल्टन ह्यूम आणि विल्यम हॉवेल यांनी दक्षिणेकडे प्रवास करुन नद्यांसंबंधी माहिती मिळविली (१८२४). कॅप्टन चार्ल्सस्ट्यूअर्टने १८२८ ते १८३० मध्ये पश्चिमेला प्रवास करुन नद्यांचा उगम व प्रवाह यांविषयी माहिती मिळविली. न्यू साउथ वेल्स आणि न्यू हॉलंड हा एकच सलग प्रदेश आहे, हा शोध यावेळी लागला. एडवर्ड एअरने १८४०-४१मध्ये मध्य ऑस्ट्रेलियातील मिठागारांचा शोध लावला. १८४४ व १८६० मध्ये फ्रीड्रिख लायखार्ट व मॅक्डोएल यांनी अनुक्रमे १८४४ व १८६० मध्ये भूभागावरुन ऑस्ट्रेलिया आरपार करुन अनेक नैसर्गिक प्रदेशांचा शोध लावला. १८७५ पर्यंत ऑस्ट्रेलियातील जवळजवळ सर्व प्रमुख भूभागांचा शोध लागला होता.
१८५१ मध्ये ऑस्ट्रेलियात सोन्याचा शोध लागला आणि ऑस्ट्रेलियाच्या इतिहासाला वेगळी कलाटणी मिळाली. परवानगी न घेता अंतर्भागात लोक जात व वस्ती करीत. व्हिक्टोरिया वसाहतीत सोने शोधणारांना मोठी बक्षिसे जाहीर करण्यात आली. परिणामी ह्या स्पर्धेत व्हिक्टोरिया आघाडीवर राहिला. त्याच्या आर्थिक प्रगतीला वेग आला. १८५६ मध्ये या आर्थिक वाढीबरोबरच राजकीय क्षेत्रात प्रौढ मतदानाचा हक्क व्हिक्टोरियातील नागरिकांना मिळाला आणि ऑस्ट्रेलियातील लोकशाहीला सुरुवात झाली.
समाज तसा वर्गविहीन होता. प्रौढ मतदानाधिकार, गुप्तमतदान पद्धती इ. तत्त्वे स्वीकारण्यात आली. स्त्रियांना मात्र मतदानाचा अधिकार मिळविण्यासाठी आणखी काही काळ थांबावे लागले.
१८८१ मध्ये व्हिक्टोरियात कायदेमंडळाची मुदत १० वर्षांवरून ६ वर्षे करण्यात आली आणि मतदानपात्रता व्यापक करण्यात आली. दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये दोन सभागृहांत मतभेद असतील, तर ती बरखास्त करण्याचा अधिकार गव्हर्नरकडे देण्यात आला.
भूधारणपद्धतिविषयक कायदे संमत होऊन शेतमजुरीसंबंधीही लोकमत जागृत झाले. कामगारांना काम उपलब्ध करुन देण्यात आले. शेतीला प्राधान्य प्राप्त झाले. शेती करणारा कायम स्वरुपाचा एक वर्ग असावा, यासाठी प्रत्येक वसाहत प्रयत्नशील होती. मेंढपाळी हा दुसरा प्रमुख व्यवसाय होता.
सोन्याचा शोध ते संघराज्यनिर्मिती ह्या दरम्यान ऑस्ट्रेलियात कामगार संघटनांचा उदय झाला. १८९० या वर्षी संपाच्या अपयशामुळे कामगारांना राजकीय हक्कांची जरुरी भासली. १९०१ पर्यंत ह्या कामगार संघटनांना प्रत्यक्ष राजकीय सत्ता मिळाली नसली, तरी आपल्या संघटनांच्या बळावर त्यांनी विविध राजकीय गटांवर दबाव आणून अनेक फायदे पदरात पाडून घेतले होते.
आपल्या वसाहतींतील उद्योगधंद्यांना सुरक्षितता मिळावी, म्हणून न्यू साउथ वेल्सशिवाय इतर वसाहतींनी १८६० ते १९०० पर्यंत जकात संरक्षणाचे धोरण स्वीकारले. वृत्तपत्रांनी जकात संरक्षणाच्या तत्त्वाचा जोरदार पुरस्कार केला. १८६४ मध्ये व्हिक्टोरियाने ते तत्त्व स्वीकारले. त्यामुळे न्यू साउथ वेल्सशी त्याचे संबंध ताणले गेले. त्याची झळ दक्षिण ऑस्ट्रेलियालाही सोसावी लागली.
गौरेतर लोकांच्या वास्तव्याला हरकत घेणारे ऑस्ट्रेलियाचे धोरण प्रसिद्ध आहे. चिनी अथवा इतर देशांतील कमी मजुरी घेणाऱ्यामजुरांमुळे ऑस्ट्रेलियाच्या राहणीमानाचा दर्जा घसरतो व अनेक नैतिक आणि सामाजिक समस्या उभ्या राहतात, म्हणून त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. ऑस्ट्रेलियातील विविध प्रश्नांवर मतभिन्नता असणाऱ्यासर्व गटांचे ह्या धोरणाबाबत मात्र एकमत होते.
१८९३ मधील ऑस्ट्रेलियातील आर्थिक टंचाई ही संघराज्यनिर्मितीच्या कल्पनेस चालना देणारी महत्त्वाची घटना ठरली. १८५० आणि १८६० मध्ये सर्व वसाहतींचे एक राज्य करावे, असे जोरदार प्रयत्न झाले होते.
जानेवारी १८९५ मध्ये एक संघराज्य असावे, असे वसाहतींच्या प्रमुखांना वाटू लागले. मार्च १८९७ मध्ये ॲडिलेड येथे सर्व वसाहतींच्या प्रतिनिधींची बैठक भरली. संघराज्याचे संविधान करताना काही प्रश्न उभे राहिले. संघराज्यात मध्यवर्ती सत्ता कितपत बळकट असावी, तसेच पश्चिम ऑस्ट्रेलियासारख्या कमी लोकसंख्येच्या प्रदेशांना पुरेसे प्रतिनिधित्व कसे द्यावे, यांसारख्या अनेक प्रश्नांवर साधकबाधक चर्चा झाल्यावर तीन समित्या नेमण्यात आल्या आणि दोन आठवड्यांतच ह्या समित्यांनी संविधानाचा कच्चा मसुदा तयार केला. त्यास व्हिक्टोरिया, टास्मानिया आणि दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या जनतेने प्रचंड बहुमताने मान्यता दिली. न्यू साउथ वेल्समध्ये मात्र आवश्यक तेवढे बहुमत न मिळाल्याने पेचप्रसंग आला. न्यू साउथ वेल्सचा प्रमुख जॉर्ज रीड याने सर्व राज्यप्रमुखांची भेट घेऊन काही दुरुस्त्या सुचविल्या. त्यानंतर सुधारित संविधान न्यू साउथ वेल्सने मान्य केले. ब्रिटिश संसदेने हे विधेयक ९ जुलै १९०० रोजी संमत केले. ह्याचवेळी पश्चिम ऑस्ट्रेलियानेही संघराज्यात सामील होण्यास मान्यता दिली. अखेर १ जानेवारी १९०१ रोजी ऑस्ट्रेलियाचे संघराज्य स्थापन झाले.
संघराज्याच्या स्थापनेमुळे राष्ट्रभावना दृढ होत गेली. अपुरी लोकसंख्या आणि ब्रिटनवरचे अवलंबित्व यांमुळे परराष्ट्र धोरणात ऑस्ट्रेलियाला काही करता येणे शक्य नव्हते. पण आर्थिक क्षेत्रात त्यांना सुधारणा करण्यास वाव मिळाला. आर्थिक समस्या राष्ट्रव्यापी असल्याने केंद्रसत्तेचे अधिकारक्षेत्र वाढविण्याकडे कल होता. कामगार संघटना व मजूर पक्ष यांचे महत्त्व वाढले. कामगारांसाठी कायदे करण्यात आले.
संरक्षणाची आवश्यकता बदलत्या परराष्ट्र राजकारणात वाढली. पॅसिफिक महासागरात जर्मनीच्या हालचाली धोकादायक होत्या. १९१२ मध्ये संरक्षण दलांची ब्रिटनच्या धर्तीवर पुनर्रचना करण्यात आली.
ऑस्ट्रेलियात १९१४ मध्ये निवडणुकांचे वातावरण असतानाच पहिले महायुद्ध सुरू झाले. निवडणुकांत उदारमतवादी व मजूर या प्रमुख पक्षांनी ब्रिटनच्या युद्धधोरणाला पाठिंबा दिला. जोसेफ कुकचा पराभव होऊन अँड्रू फिशर हा मजूर पक्षाचा नेता पंतप्रधान झाला. ३ ऑगस्टला ब्रिटनने युद्ध पुकारताच ऑस्ट्रेलियाचे आरमार ईजिप्तला रवाना झाले. फिशरच्या निवृत्तीनंतर विल्यम ह्यूझ पंतप्रधान झाला. त्याच्या धोरणांवर कडाडून टीका झाली. युद्ध संपताच शांतता परिषदेला ह्यूझ हजर राहिला. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रवादाचा त्याने पुरस्कार केला. अमेरिकन राष्ट्रध्यक्ष विल्सन याच्या आदर्शवादी कल्पनांवर त्याने टीका केली. आंतरराष्ट्रीय राजकारणात ऑस्ट्रेलियाला त्याने स्थान मिळवून दिले. युद्धामुळे ऑस्ट्रेलियाचे काही फायदे झाले. यूरोपीय सत्तास्पर्धेपासून दूर असल्याने ऑस्ट्रेलियाचा व्यापार वाढला. पोलाद व्यवसाय भरभराटीस आला.
ह्यूझला १९२३ मध्ये राजीनामा द्यावा लागला. रॉजर्स ब्रूस आणि अर्ल पेझ यांचे संमिश्र सरकार अधिकारारूढ झाले. ह्या मंत्रिमंडळाच्या कारकीर्दीतील अनेक उपाययोजनांमुळे १९३० च्या आर्थिक महामंदीपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या प्रगतीचा आलेख वाढता होता. १९२८ च्या निवडणुकांत मजूर पक्षाला प्रतिकार करण्याएवढे बहुमत मिळाले. मंदीच्या समस्यांना तोंड देण्यासाठी उपाययोजना आखणे हे ऑस्ट्रेलियाचे प्रमुख राजकारण होते. कागदी चलनात वाढ करण्याची मागणी होती. १९३१ साली अधिकारावर आलेल्या युनायटेड ऑस्ट्रेलिया पक्षाने १९३४ च्या निवडणुकीत बहुमत गमावले. पण कंट्री पक्षाबरोबर समझोता करुन १९३७ साली अधिकारावर येण्यात त्याने यश मिळविले. १९३९ मध्ये आर्. जी. मेंझिझ पंतप्रधान झाला. १९४१ साली जॉन कर्टिन हा मजूर पक्षीय नेता पंतप्रधान झाला. दोन महायुद्धांमधील काळ ऑस्ट्रेलियाला त्रासदायक गेला.
ब्रिटिश पंतप्रधान चेंबरलिन याच्या अनुनयनीतीचा पगडा होताच, तसेच जोपर्यंत जपानच्या आक्रमणापासून संरक्षण द्यायला ब्रिटन सज्ज आहे, तोपर्यंत कसलीही काळजी करण्याचे कारण नाही, असे लोकमत होते. चेंबरलिनच्या धोरणानुसार विचार करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या महायुद्धाची घोषणा अनपेक्षित होती.
ह्याही युद्धात ऑस्ट्रेलियाने महत्त्वपूर्ण भाग घेतला. ऑस्ट्रेलियाचे हवाई दल मध्यपूर्वेकडे गेले. जानेवारी ते मार्च १९४१ पर्यंतच्या संग्रामात ऑस्ट्रेलियाने यशस्वी कामगिरी केली. जर्मनी आणि इटलीच्या हल्ल्यांनी उत्तर आफ्रिकेतील ऑस्ट्रेलियाच्या फौजा एकाकी पडल्या. त्या सतत आठ महिने लढत होत्या. त्यांना विश्रांतीची सक्त आवश्यकता होती. ऑस्ट्रेलियाचा जनरल ब्लेमी याने तशी मागणी केली. चर्चिलने ती मागणी धुडकाविली, पण मेंझिझ व त्याच्या सहकाऱ्यांनी जनरल ब्लेमीचा पाठपुरावा केला. काही दिवसांच्या उत्तरप्रत्युत्तरांच्या फेरीनंतर तेथील फौजा काढून घेण्यात आल्या. ह्या मतभेदांचे पडसाद ऑस्ट्रेलियाच्या अंतर्गत राजकारणावर उमटले. मजूर पक्षाने जपानच्या आक्रमणाची शक्यता दर्शवून सर्व ऑस्ट्रेलियन फौजांना बोलाविण्याची मागणी केली. ऑक्टोबर १९४१ मध्ये दोन प्रमुख पक्षच निवडून आले. मजूर पक्षाने संमिश्र सरकारात जाण्यास नकार दिला. शेवटी युद्धकाळापुरते युद्ध सल्लागार मंडळ नेमण्यात आले पण ह्या मंडळाचा कारभार असमाधानकारक ठरला.
कर्टिन अधिकारावर आला व जपानने आक्रमण केले (७ डिसेंबर १९४१) आणि ऑस्ट्रेलियावर कधी न आलेले संकट कोसळले. याला ऑस्ट्रेलियाने धीमेपणाने तोंड दिले. युद्धानंतर ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रीय धोरणात काही महत्त्वाचे बदल झाले. युद्धकाळात ऑस्ट्रेलिया अमेरिकेच्या अधिक जवळ आले होते. ऑस्ट्रेलियातही साम्यवादविरोधी भावना तीव्र होती. १९५१ साली अँझुस करार करण्यात आला. ऑस्ट्रेलिया सीटोचाही सभासद आहे. १९५६ च्या सुएझ प्रश्नाच्या वेळी ब्रिटनला पाठिंबा देणाऱ्या मोजक्या राष्ट्रांमध्ये ऑस्ट्रेलिया होते. आशियाई राष्ट्रांशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही करण्यात आला. राष्ट्रकुल आणि संयुक्त राष्ट्रांच्या करवी ऑस्ट्रेलिया याविषयी प्रयत्नशील होते. आशियाई राष्ट्रांच्या विकासासाठी आखण्यात आलेल्या कोलंबो योजनेत ऑस्ट्रेलियाने प्रमुख वाटा उचलला. वंशवादी धोरण, साम्यवादविरोध ह्यांमुळे हे संबंध गुंतागुंतीचे झाले होते. आशियातील विद्यार्थ्यांना मुक्तप्रवेश देण्यात आला. १९५९ मध्ये ३,००० आशियाई विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देण्यात आले. दोनशे योजनांना आर्थिक साहाय्य देण्यात आले.
१९५५ पासून मजूर पक्षात फूट पडली व त्यांपैकी काहींनी नवीन डेमोक्रॅटिक पक्ष स्थापन केला. मजूर पक्षावर त्यांनी कम्युनिस्टधार्जिणेपणाचा आरोप केला. चीनला मान्यता देण्याच्या प्रश्नावरुन हे मतभेद उद्भवले होते. १९५५ ते १९७२ दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या राजकीय सत्ताक्षेत्रात अनेक फेरबदल झाले. या कालखंडात होल्ट, जॉन गॉर्टन, मॅक्मोहन वगैरे पंतप्रधान झाले. ऑस्ट्रेलियन संसदेची निवडणूक १९७२ अखेरीस झाली. या निवडणुकीत कनिष्ठ सभागृहाच्या एकूण १२५ जागांपैकी मजूर पक्षाला ६७, कंट्री पक्षाला २० व उदारमतवादी पक्षाला ३८ जागा मिळाल्या, पंतप्रधानपदी गॉफ् व्हिटलॅम याची निवड झाली.
राजकीय स्थिती : ऑस्ट्रेलियात १७९० च्या सुमारास सहा ब्रिटिश वसाहती पूर्णतः स्थापन झाल्या होत्या. त्यांची प्रशासनव्यवस्थेची सूत्रे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत लंडनहूनच हलविली जात. संविधानाच्या दृष्टीने १८५० चा वसाहतविषयक कायदा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. तत्पूर्वी काही स्थानिक उपाययोजनांसाठी वसाहतींस स्थानिक स्वराज्य देऊन त्यांच्या प्रशासनास काही अधिकार दिले होते. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी बहुतेक वसाहती स्थानिक स्वराज्य उपभोगित होत्या. त्या कायदे करीत, कर बसवीत व महसूल गोळा करीत एवढेच नव्हे, तर वसाहतींचा खर्च या महसुलातून करण्यात येई. ब्रिटिश पार्लमेंटला वसाहतींसंबंधी कायदा करण्याचा अधिकार असूनही त्यांनी वसाहतींना ही स्वायत्तता दिली होती. १९०१ मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने संविधी संमत करुन ऑस्ट्रेलिया हे संघराज्य केले. पुढे १९३१ च्या वेस्टमिन्स्टर संविधीनुसार पार्लमेंटने ऑस्ट्रेलियासंबंधी कोणताही कायदा करावयाचा नाही, असे ठरवून त्यास स्वातंत्र्य दिले.
ऑस्ट्रेलियाच्या संघराज्याचे संविधान अमेरिकेप्रमाणेच संघीय आहे. संघराज्य व इतर राज्ये यांचे अधिकार संविधानात स्पष्ट केले असून संविधान हा सर्वोच्च विधी मानण्यात आला आहे. हा विधी संघराज्याची संसद तसेच राज्यांची विधिमंडळे, न्यायसंस्था व नागरिक यांना बंधनकारक आहे. संघराज्याच्या संसदेस कायदे करण्याचा अधिकार असून त्याच्या अखत्यारीत परराष्ट्रीय धोरण, राज्याराज्यांतील व्यापार, कर, कर्ज घेणे, संरक्षण, टपाल व तदनुषंगिक इतर खाती वगैरे महत्त्वाची खाती येतात. अमेरिकेच्या संविधानाप्रमाणे या संविधानात अधिकार विधेयक नाही, तथापि त्यामध्ये काही बाबतींत तरतूद केली आहे. संविधानात्मक दुरुस्तीसाठी संसदेच्या दोन्ही गृहांचे तसेच सहा घटक राज्यांच्या विधिमंडळांचे बहुमत आवश्यक असते. संविधानाने कायदे करणे व त्यांची अंमलबजावणी करणे यांसाठी तरतूद केली आहे. संघीय संसद, सीनेट व हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह अशी द्विसदनी असून कार्यकारी मंडळाचा सर्व प्रमुख ब्रिटिश राजा मानण्यात आला आहे. तिची कार्यवाही गव्हर्नर जनरल या राजाच्या प्रतिनिधीद्वारे केली जाते. त्याची मुदत पाच वर्षे असते.
ऑस्ट्रेलियातील संघीय संसद व राज्यांची विधिमंडळे यांच्या प्रतिनिधींची निवड प्रौढ मतदारांकडून होते. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह या कनिष्ठ गृहात एकूण १२४ सभासद असून त्यांपैकी दोघे ऑस्ट्रेलियाच्या राजधानीच्या व उत्तर क्षेत्रातून निवडले जातात. सर्व राज्यांना सीनेटमध्ये सारखेच सीनेटर निवडण्याचा अधिकार आहे. प्रमुख पक्ष मजूर व उदारमतवादी आहेत. कंट्री पक्ष, डेमॉक्रॅटिक लेबर पक्ष वगैरे पक्ष अलीकडे पुढे येऊ लागले आहेत. सीनेटची मुदत सहा वर्षे असून दर तीन वर्षांनी निम्मे सभासद निवृत्त होतात. अर्थविषयक विधेयके सीनेटमध्ये मांडता येत नाहीत. संयुक्त बैठकीत कनिष्ठ सभागृहाचे मत निर्णायक ठरते. मंत्रिमंडळाचे बहुतेक सदस्य कनिष्ठ सभागृहाचे असतात व ते सभागृहाला जबाबदार राहतात. दोन्ही सभागृहांत तीव्र मतभेद आल्यास दोन्ही सभागृहे विसर्जित करण्याचा अधिकार गव्हर्नर जनरलला आहे. घटक राज्यांतील क्वीन्सलँड वगळता सर्व विधिमंडळे द्विसदनी आहेत.
कार्यकारी सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या हाती असते. कायदेमंडळात बहुमत असलेल्या पक्षनेत्याची पंतप्रधान म्हणून गव्हर्नर जनरल नेमणूक करतो. संघराज्य व घटक राज्य यांच्या प्रशासनव्यवस्थेत सरकारी खाती आणि निमसरकारी निगम इत्यादींचा समावेश होतो. घटकराज्यांच्या कक्षेत स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. अशा संस्थांची निर्मिती, अधिकार, अर्थव्यवस्था इ. गोष्टी घटक राज्ये निश्चित करतात. रस्ते, पूलबांधणी, पाणीपुरवठा, आरोग्य इत्यादींची व्यवस्था स्थानिक संस्थांकडे सोपविलेली आहे. संविधानानुसार उच्च न्यायालयाची स्थापना झाली आहे. या न्यायालयात मुख्य न्याय़ाधीश व इतर सहा न्यायाधीश असून त्यांची नेमणूक मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार गव्हर्नर जनरल करतो. संघराज्याच्या कक्षेतील बाबींसंबंधी उच्च न्यायालय ही अंतिम संस्था होय. उच्च न्यायालयाबरोबर संघराज्य पातळीवर आणखी दोन प्रकारची उच्च न्यायालये अस्तित्वात आहेत ती म्हणजे फेडरल कोर्ट ऑफ बँक्रप्टसी व कॉमनवेल्थ इंडस्ट्रिअल कोर्ट.ऑस्ट्रेलियातील न्यायपद्धतीचा सर्वोच्च अधिकार इंग्लंडमधील प्रिव्ही कौन्सिलकडे पूर्वी होता. परंतु १९६७ मध्ये तो रद्द करण्यात आला.
संरक्षण खात्याला संरक्षणविषयक धोरणे ठरविण्याव्यतिरिक्त संरक्षणाशी संबंधित उत्पादन, पुरवठा, संशोधन इ. विभाग सांभाळावे लागतात. मित्रराष्ट्रांना संरक्षण तळ उभारण्यासाठी परवानगी देण्यात येते. पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध तसेच कोरिया आणि व्हिएटनाम युद्ध यांत ऑस्ट्रेलियाने भाग घेतला होता. चीनच्या अणुस्फोटामुळे ऑस्ट्रेलियाने संरक्षणाकडे अलीकडे अधिक लक्ष देण्याचे ठरविले आहे. संरक्षणाच्या दृष्टीने नव्या योजना हाती घेतल्या आहेत. एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या पाच टक्के खर्च संरक्षणावर केला जातो. १९६९ मध्ये ऑस्ट्रेलियाचे खडे सैन्य ४४,०५१ होते.
जगताप, दिलीप
आर्थिक स्थिती : ऑस्ट्रेलियातील एकूण जमिनीच्या ३४ टक्के जमीन निरुपयोगी असून ४२ टक्के जमिनीत अपुऱ्या पावसामुळे मेंढ्या पाळण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात आढळतो. राहिलेल्या २४ टक्के जमिनीत शेतीला पुरेसा पाऊस पडतो, परंतु हा प्रदेश बव्हंशी डोंगराळ किंवा दुय्यम प्रतीच्या शेतजमिनींचा आहे. सारांश, कृषियोग्य जमीन फक्त ८ टक्केच आढळते. परंतु यातीलही बराचसा भाग मेंढ्या, गाईगुरे ह्यांची जोपासना आणि दुग्धव्यवसाय ह्यांकरिता जातो. यामुळे एक टक्क्यापेक्षा थोडीशी जास्त एवढीच जमीन प्रत्यक्षात लागवडीखाली आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासून आर्थिक-सामाजिक परिस्थितीमध्ये बरेच महत्त्वाचे बदल घडत गेले. शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणावर येऊ लागले प्रशीतन-पद्धतीमुळे गोमांसनिर्मितीस मोठी चालना मिळून उत्तर गोलार्धातील बाजारपेठांमध्ये गोमांसाला प्रचंड मागणी येऊ लागली मरी नदी व तिच्या उपनद्या ह्यांभोवतालच्या प्रदेशात पाटबंधाऱ्यांमुळे सघन मिश्र शेतीचा विकास होऊ लागला. ऑस्ट्रेलियाच्या वायव्य भागापैकी पशुसंवर्धन विभाग, व्हिक्टोरिया व न्यू साउथ वेल्स ह्यांचे पश्चिम विभाग तसेच ग्रेट ऑस्ट्रेलियन बाइटभोवतालचा प्रदेश हे सर्व जमिनीखालील पाण्याचे प्रदेश होत. जमिनीच्या खाली २,१३३ मी. पर्यंत खोल अशा सु. ७,५०० आर्टेशियन विहिरी खोदलेल्या आहेत. त्यांमधून दर दिवशी १·४ अब्ज लीटरपेक्षाही अधिक पाणी निघते. प्रत्येक आर्टेशियन विहीर ही साधारणतः दररोज सु. १७५ ते २२५ लक्ष लीटर पाणी देते. एकूण मेंढ्यापैंकी सु. २० टक्के मेंढ्या आर्टेशियन विहिरींच्या पाण्यावर अवलंबून असतात. मरी खोऱ्यात पाटबंधारे आहेत. सु. ८,०९,४०० हेक्टर लागवडीस आणलेल्या जमिनीपैकी मरी व तिच्या मरंबिजी आणि गोलबर्न ह्या उपनद्या मिळून ८८ टक्के जमीन भिजवितात. मरंबिजी नदीवर बुरिंजुक व मरी नदीवर ह्यूम अशी दोन धरणे बांधलेली आहेत.
ऑस्ट्रेलियाला नैसर्गिक चाऱ्यांचे (वैरणपिकांचे) वरदानच लाभले आहे. सॉल्टबुश हे वैरणपीक गाईगुरांना अतिशय पोषक असते पावसाळ्यानंतर अनेक प्रकारच्या चाऱ्यांचे पीक सर्वत्र उगवलेले आढळते. पिकांना तसेच गाईगुरे, मेंढ्या वगैरेंना होणारे रोग व त्यांच्या साथी ह्यांचे प्रमाण ऑस्ट्रेलियात फार आहे. डिंगो हा कोकरे व वासरे यांस मारतो म्हणून त्याच्या प्रतिबंधार्थ काटेरी कुंपणे, सापळे, विषारी सापळे, औषधोपचार यांवर कोट्यवधी डॉलर खर्च होतात.
मेंढपाळी हा ऑस्ट्रेलियन अर्थव्यवस्थेचा कणाच आहे. १९७० मध्ये १८ कोटी मेंढ्या होत्या. जगातील एकूण मेढ्यांपैकी एकषष्ठांश मेंढ्या ऑस्ट्रेलियात असून जगातील एकूण लोकरीपैकी ३० टक्क्यांहून अधिक लोकर-उत्पादन एकट्या ऑस्ट्रेलियात होते. हवामानाच्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया सर्वोत्कृष्ट मरीनो लोकरीचे उत्पादन करू शकतो. आणि एकूण मरीनो लोकरीच्या सु. निम्मी लोकर तो पुरवितो. १९७०-७१ मध्ये लोकर-उत्पादन सु. ८,७७,७९७ मे. टन झाले. मेंढपाळीइतका गाईगुरांचा उद्योग विकास पावलेला नाही. मांसाच्या २५ टक्के गाई पूर्व व दक्षिणेकडील समुद्रालगतच्या प्रदेशांत व ७५ टक्के देशाच्या उत्तर व वायव्य भागांत आढळतात. १९७० मध्ये देशात २,४३,७२,००० गाईगुरे होती. शॉर्टहॉर्न, हिअरफर्ड, ॲबर्डीन अँगस, डेव्हन आणि रेडपोल्ड अशा गाईंच्या महत्त्वाच्या जाती आहेत. मिश्र पैदासही मोठ्या प्रमाणात केली जाते. व्हिक्टोरिया, न्यू साउथ वेल्स व क्वीन्सलँडचा आग्नेय भाग या राज्यांत दूध उद्योगाची महत्त्वाची केंद्रे असून लहान प्रमाणात ती टास्मानिया, मौंट लॉफ्टी पर्वतश्रेणीच्या भागात आढळतात. देशात ५६ टक्के गोमांसाचे सेवन होते ६ टक्के गोमांस हवाबंद डब्यात भरतात आणि ३८ टक्के निर्यात केली जाते. १९७० मध्ये २५·६८ लक्ष डुकरे व ४·५६ लक्ष घोडे होते. हौस म्हणून आणलेल्या सशांची इतकी बेसुमार वाढ झाली की ते मेंढ्यांचे गवत फस्त करू लागले. त्यांच्या बंदोबस्तासाठी लाखो डॉलर खर्च झाले.
ऑस्ट्रेलियातील लागवडीखालील जमिनीमध्ये गहू ६७·९% हिरवा चारा १४·९% गवत १०% औद्योगिक पिके १·७% फळबागा व विविध फळे १% पालेभाज्या १·४% द्राक्षमळे ०·४% आणि इतर पिके २·७% असे प्रमाण १९६९ मध्ये होते. गहू हे ऑस्ट्रेलियाचे प्रमुख पीक होय. व्हिक्टोरिया, न्यू साउथ वेल्स, साउथ ऑस्ट्रेलिया व वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या ३८·५० सेंमी. पावसाच्या पट्ट्यात एप्रिल-ऑक्टोबर दरम्यान गव्हाचे पीक काढतात. गव्हाचे उत्पादन १९६९-७० मध्ये ३८,७५,१२,००० बुशेल झाले होते. गव्हाच्या सु. ४५ जाती काढण्यात येतात, त्यांपैकी गेबो, बेनक्युबिन व बुंगाला सर्वाधिक लोकप्रिय जाती आहेत. प्रतिवर्षी एकूण गहू पिकाच्या ७२ टक्के एवढी निर्यात असते. ओट, बार्ली, ज्वारी, तांदूळ, मका ही येथील इतर पिके असून यांचाही निर्यातीत वाटा आहे.
नगदी पिकांमध्ये ऊस, जवस, भुईमूग, तंबाखू व कापूस ही पिके येत असून त्यांसाठी सु. २ लक्ष ८४ हजार हेक्टर जमीन राखून ठेवलेली आहे. क्वीन्सलँडच्या किनारी प्रदेशात उसाचे पीक निघते. ऊस-उद्योग ऑस्ट्रेलियन सरकार व क्वीन्सलँड राज्य ह्यांच्या संयुक्त कायद्याने नियंत्रित केला जातो. उसाची मशागत यांत्रिक पद्धतीने करतात. साखर उद्योगास संरक्षण आहे. क्वीन्सलँड राज्यातील डार्लिंगच्या पठारावरील सु. ३८,००० हेक्टर जमिनीत जवस पिकविण्यात येतो. या पिकापासून मिळणाऱ्या तेलामुळे देशाची २० टक्के गरज भागविली जाते. तंबाखूचे पीक क्वीन्सलँड, व्हिक्टोरिया व वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ह्या राज्यांत काढले जाते. तंबाखूसाठी सु. १० हजार हेक्टर जमीन लागवडीस आणण्यात आली असून उत्पादन सु. ९,०७२ मे. टन (देशाच्या एकूण गरजेच्या एक तृतीयांश) होते. कापसाचे पीक क्वीन्सलँड, न्यू साउथ वेल्स, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, साउथ ऑस्ट्रेलिया व व्हिक्टोरिया राज्यांत काढले जाते. देशामध्ये निरनिराळ्या ठिकाणी विविध प्रकारच्या फळबागा लावण्यात आलेल्या असून त्यांमध्ये अननस, पपई, आंबा, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, द्राक्षे इ. फळे होतात. १९६९-७० मध्ये फलउत्पादनाकरिता सु. १,२५,०५२ हेक्टर जमीन लागवडीखाली असून उत्पादन २०·३१ लक्ष किलोलीटर झाले. त्यांमध्ये सफरचंदे, जर्दाळू, केळी, संत्री, पीच, पेअर, द्राक्षे ही फळे प्रामुख्याने होती. द्राक्षबागा साउथ ऑस्ट्रेलिया, व्हिक्टोरिया व न्यू साउथ वेल्स या राज्यांमधील मरी नदीच्या खोऱ्यात प्रामुख्याने आहेत. या भागातील द्राक्षाच्या लागवडीखालील जमिनीपैकी सु. निम्मे क्षेत्र मनुका, बेदाणे वगैरेंच्या उत्पादनाकरिता राखून ठेवलेले असते. बॅरोसा खोरे, मरी व हंटर नद्यांची खोरी, मरंबिजी विभाग व स्वान नदीचे खोरे (वेस्टर्न ऑस्ट्रेलिया) यांत पिकणाऱ्या द्राक्षांपासून मद्योत्पादन करतात. १९६९-७० मध्ये मद्याच्या द्राक्षांच्या लागवडीखालील क्षेत्र व मद्याचे उत्पादन अनुक्रमे ६०,७०५ हेक्टर व २८,७९,०४,३६४ लीटर होते. १,१०,००० हेक्टरांमध्ये भाजीपाला लावण्यात येतो. १९६९-७० मध्ये सु.४३,३०२ हेक्टरांत २,०७२ लक्ष हेक्टोलीटर बटाट्याचे पीक आले होते. हे पीक बव्हंशी व्हिक्टोरिया, न्यू साउथ वेल्स व टास्मानिया राज्यांत काढतात.
ऑस्ट्रेलियामधील जंगलांनी २०·७० कोटी हेक्टर, खंडातील एकूण जमिनीच्या २५ टक्के क्षेत्र, व्यापलेले आहे. तथापि निसर्गजन्य उत्तम तऱ्हेच्या अवशिष्ट जंगलांचे क्षेत्र फक्त सु. ८० लक्ष हेक्टर एवढेच आहे. व्यापारी दृष्ट्या उपयोगी पडू शकतील अशी जंगले किनारी प्रदेशांत, देशाच्या पूर्वेकडील राज्यांतील किनाऱ्यालगतच्या प्रदेशांत व वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या नैर्ऋत्य भागात आहेत. एकूण जंगलक्षेत्राच्या ९४ टक्के भागात कठीण लाकडाच्या वृक्षांची जंगले आहेत. निलगिरीची जंगले टास्मानियाच्या थंडगार, ओलसर हवामानाच्या उंच प्रदेशात व वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या अंतर्भागात उष्ण, कोरड्या हवामानामध्येही आढळतात. व्यापारी दृष्ट्या उपयोगी पडतील अशा जारा, मौंटन ॲश, ब्लॅकबट, स्पॉटेड गम, मेसमेट, कारी, अल्पाईन ॲश, टॅलोवुड, आयर्न बार्क वगैरे निलगिरीच्या जाती आहेत. रेड सीडार, मॅपल, सिल्क ओक, अक्रोड, ब्लॅकवुड व रोझवुड हे इतर वृक्ष आहेत. मृदुकाष्ठ वृक्षांची जंगले क्वीन्सलँड, न्यू साउथ वेल्स व टास्मानिया राज्यांत आहेत. शासनाने दोन्ही प्रकारच्या वृक्षांची जंगले लावली आहेत. रेल्वे स्लीपर, कुंपणकाम, खाणकाम, इंधन ह्यांसाठीही लाकूड उत्पादन केले जाते. कागद व फायबरबोर्ड यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर पल्पवुडचे उत्पादन केले जात आहे. मृदुकाष्ठ लाकडाची बरीच उणीव भासत असल्याने ऑस्ट्रेलिया मोठ्या प्रमाणावर इमारती लाकडाची आयात करतो. कठीण लाकडांची निर्यात केली जाते.
खनिजसंपत्ती : ऑस्ट्रेलियाच्या खाणउद्योगास साउथ ऑस्ट्रेलिया राज्यात १८४२ मध्ये सापडलेल्या तांब्याच्या साठ्यामुळे प्रारंभ झाला पुढे १८५१, १८७१, १८८३ व १८८६ साली पूर्व ऑस्ट्रेलिया व टास्मानिया राज्यांत अनुक्रमे सोने, तांबे, कथील, शिसे-जस्त ह्यांच्या साठ्यांचा शोध लागला. १८९२ व १८९३ मध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलियामधील कूलगार्डी व कॅलगुर्ली येथे सोन्याच्या प्रचंड साठ्यांचा शोध लागला. ह्या विविध खनिजांच्या शोधांमुळे ऑस्ट्रेलियाला आर्थिक बळ मिळाले. पेट्रोलियम, रॉक फॉस्फेट, नैसर्गिक गंधक व कथील ह्या महत्त्वाच्या खनिजांचा देशात प्रकर्षाने अभाव आहे. मात्र बॉक्साइट, लोखंडाचे खनिज, मँगॅनीज, तांबे व युरेनियम ह्या खनिजांचे नवे साठे सापडल्यामुळे (ब्रोकन हिल, मौंट इझा-क्वीन्सलँड आणि मौंट ल्येल-टास्मानिया) धातुउद्योगास मोठी चालना मिळाली. १९६१ मध्ये खनिज-उत्पादनाचे प्रमाण असे होते : धातु खनिजे : ४२% (त्यांमध्ये तांबे : १२% शिसे व शिसे-चांदी : ९% सोने : ९% लोखंड : ३% व जस्ताची सांद्रणे : ३%), इंधन खनिजे : ३६% व अधातु खनिजे : २२%.
खाणउद्योग हा त्या त्या राज्यशासनाच्या अखत्यारात असून तेच स्वामित्वशुल्क ठरविते, खाणउद्योगास अर्थप्रबंध करते आणि भूविज्ञानविषयक प्रयोगशाळा चालविते. केंद्र सरकार विविध केंद्रशासित प्रदेशांतील खाणउद्योगाची व्यवस्था पाहते काही धातू व खनिजे ह्यांच्या निर्यातीवर नियंत्रण ठेवते खनिजसंपत्ती, भूविज्ञान व भौतिकी विभाग चालविते व अर्थप्रबंध करते.
न्यू साउथ वेल्स राज्यात ९० टक्के बिट्यूमिनस व सेमी-अँथ्रासाईट कोळसा आहे. व्हिक्टोरियात भुऱ्या कोळशाचे साठे आहेत. न्यू कॅसल,मेटलँड, सेस्नॉक, मस्वेलब्रुक, हंटर खोरे व लिथगो आणि वुली-वुलनगाँग ह्यांच्या परिसरात दगडी कोळशाची उत्पादन केंद्रे आहेत. सबंध देशभर लोहधातुकाचे साठे विखुरलेले आहेत. एकट्या वेस्टर्न ऑस्ट्रेलियात आठ अब्ज टनांपेक्षाही अधिक साठा असल्याचा अंदाज आहे. साउथ ऑस्ट्रेलियातील आयर्न मॉनर्क व आयर्न बॅरन या साठ्यांमधून तसेच वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या यांपी साउंड येथूनच मोठ्या प्रमाणात कच्च्या लोखंडाचे उत्पादन करण्यात येते. शिसे, जस्त व चांदी ह्या खनिजांचे मुख्यत्वेकरुन ब्रोकन हिल येथील खाणींमधून उत्पादन होते. मौंट इझा व रीड-रोझबेरी येथेही त्यांचे उत्पादन होते. कथील मुख्यतः क्वीन्सलँड व टास्मानियामध्ये सापडते. तांब्याचे सु. निम्मे उत्पादन मौंट इझा येथील खाणींतून होते. राहिलेले मौंट ल्येल, मौंट मॉर्गन व पेकोमाईन (नॉर्दर्न टेरिटरी) येथील खाणींतून होते. प्रतिवर्षी सु. ३१,१८५ किग्रँ. सोन्याचे उत्पादन होत असून जगात ऑस्ट्रेलियाचा सोने-उत्पादनात पाचवा क्रम लागतो. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ह्या एका राज्यातून ८१ टक्के सोने-उत्पादन होते. ह्यापैकी निम्म्याच्या वर उत्पादन कूलगार्डी खाणीतून होते. बाकीचे मर्चिसन, डुंडास व यिलगार्न ह्या खाणींतून काढतात. १९६१ मध्ये ब्रिस्बेनच्या पश्चिमेस ३०६ किमी. वरील मूनी येथे तेल सापडले. १९६४ मध्ये तेथे व्यापारी दृष्ट्या तेल-उत्पादन होऊ लागले. मूनीपासून ब्रिस्बेनपर्यंत ३२० किमी. लांबीचा २५ सेंमी. व्यासाचा तेलनळ घालण्यात आला. मूनीच्या नैर्ऋत्येस ९६ किमी. वरील ऑल्टन येथेही तेलसाठ्यांचा शोध लागलेला असून, तेथे तेलनळ घालण्याचे काम चालू आहे. देशात नैसर्गिक वायूचेही उत्पादन होऊ लागले आहे. वीपा (क्वीन्सलँड) व डार्लिंग रेंज (वेस्टर्न ऑस्ट्रेलिया) येथे बॉक्साइटचे प्रचंड साठे सापडले आहेत. क्विनाना (वेस्टर्न ऑस्ट्रेलिया) व ग्लॅडस्टन (क्वीन्सलँड) येथे ॲल्युमिनियमचे कारखाने उभारण्यात आले आहेत. रूटाईल (टिटॅनिययमचे एक ऑक्साईड) झिर्कॉन ह्या खनिजांच्या उत्पादनात ऑस्ट्रेलिया जगामध्ये अग्रेसर आहे. प्लॅस्टर, काच, मातीची भांडी, विटा, फरशा व सिमेंट ह्यांच्या उत्पादनाकरिता आवश्यक अशी कच्ची साधनसामग्री देशात पुरेशा प्रमाणात आहे. डोलोमाइट, फ्लुओरस्फार, मॅग्नेसाइट, चुनखडी व मीठ ह्यांचीही देशात निर्मिती होते.
मत्स्योद्योग : उत्तर गोलार्धापेक्षा दक्षिण गोलार्धात माशांचे साठे कमी आढळतात. स्वाभाविकच ऑस्ट्रेलियात मत्स्योत्पादन थोडे असून माशांची आयात करावी लागते. मुलेट, ऑस्ट्रेलियन सॅमन व ट्यूना ह्या माशांचे एकूण उत्पादनात ४० टक्के प्रमाण आहे. कॉड, स्नॅपर, फ्लॅटहेड, मॉरवोंग, डेमर्सल व शार्क यांचेही उत्पादन होते. खोल समुद्रातील मासेमारीमध्ये स्पॅनिश मॅकरेल, बॅराकूडा, जॅक मॅकरेल आणि ट्यूना हे मासे सापडतात. शेवंडे, खेकडे व कोळंबी यांचेही मोठे उत्पादन आहे. शेवंड्यांच्या शेपटांना अमेरिकेत मोठी मागणी असल्याने त्यांच्या उत्पादनात अधिक प्रमाणात वाढ होत गेली आहे. ऑस्ट्रेलिया सर्व जगामध्ये मोत्यांच्या शिंपल्यांच्या उत्पादनात अग्रगण्य आहे. हे उत्पादन थर्स्डे आयलंड, टॉरेस सामुद्रधुनी, ब्रूम (वेस्टर्न ऑस्ट्रेलिया) व डार्विन (नॉर्दर्न टेरिटरी) येथे चालते. व्हेल मासेही पकडले जातात.
उद्योग : खुल्या व्यापारास प्रोत्साहन, जकातनीती इत्यादींमुळे ऑस्ट्रेलियातील उद्योग वाढीस लागले होते. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात औद्योगिक विकास आणखी मोठ्या प्रमाणावर होण्याची कारणे म्हणजे अवजड व मूलभूत उद्योगधंद्यात (उदा., पोलाद, मोटार, रसायने, तेलशुद्धीकरण, प्लॅस्टिक उद्योग) गुंतविण्यात आलेले देशी व विदेशी भांडवल, आप्रवाशांच्या प्रचंड संख्येमुळे उद्योगांना आवश्यक अशा मनुष्यबळात झालेली वाढ आणि उत्पादित वस्तूंसाठी निर्माण झालेली स्थानिक बाजारपेठ, ही होत.
ऑस्ट्रेलियातील निव्वळ उत्पादनमूल्याच्या सु. ६० टक्के उत्पादनमूल्य कारखानदारी उद्योगांपासून मिळते. औद्योगिक धातू, यंत्रे व वाहने अन्न, पेये व तंबाखू कापड व वस्त्रोद्योग रसायने, रंगद्रव्ये व स्फोटक पदार्थ आणि कागद, लेखनसाहित्य व मुद्रणसामग्री असे कारखानदारी उद्योगांचे समूह आहेत. हे उद्योग राज्यांच्या राजधान्यांत प्रामुख्याने एकवटलेले असून ह्या शहरांमध्ये एकूणकामगार संख्येच्या ७३ टक्के कामगार राहतात हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ५६ टक्के पडते. उर्वरित उद्योग न्यू कॅसल, वुलनगाँग, पोर्ट केंब्ला, गीलाँग व लाँसेस्टन ह्या शहरांत पसरलेले आहेत तर काही देशाच्या अंतर्भागात बॅल्लारॅट, बेंडिगो इ. ठिकाणी वाढत आहेत. औद्योगिक दृष्ट्या न्यू साउथ वेल्स राज्याचा पहिला व व्हिक्टोरियाचा दुसरा क्रम लागतो. न्यू कॅसल, वुलनगाँग, पोर्ट केंब्ला व व्ह्याल्ला ही किनारी शहरेच लोखंड व पोलाद उद्योगाची प्रधान केंद्रे आहेत. ‘द ब्रोकन हिल प्रोप्रायटरी कंपनी लिमिटेड’ (बी.एच.पी.) ही खाजगी क्षेत्रातील लोखंड पोलादाचे उत्पादन करणारी अतिप्रचंड कंपनी आहे. दुसऱ्या महायुद्धामुळे जहाजबांधणी उद्योगास मोठी चालना मिळाली. सिडनी, न्यू कॅसल, व्ह्याल्ला, मेलबर्न व ब्रिस्बेन ह्या पाच शहरी जहाज उद्योगाचे कारखाने असून १९४२–१९६० च्या दरम्यान या कारखान्यांमधून ७५ व्यापारी व इतर प्रकारची जहाजे बाहेर पडली. परदेशी कंपन्यांच्या सहकार्याने स्थापन झालेले मोटारगाड्यांचे आठ कारखाने असून त्या सर्वांची मिळून प्रतिवर्षी ३.३० लक्ष गाड्यांची उत्पादनक्षमता आहे. विद्युतचलित्र, रोहित्र, केबल, विद्युतकंट्रोल गिअर, रेडिओ व टेलिव्हिजन सामग्री वगैरेंचे उत्पादन देशात केले जाते. इतर वस्तूंच्या उत्पादनात रेल्वेसामग्री, यंत्रे व अवजारे, धातुउद्योगाची यंत्रसामग्री, कृषियंत्रे, गॅसोलीन इंजिने, पंप, बांधकाम सामग्री व गृहोपयोगी उपकरणे इत्यादींचा समावेश होतो. औद्योगिक धातू, यंत्रे व वाहने या निर्मितीउद्योगांत १९६८-६९ मध्ये ३८,८३४ कारखाने, १३,२०,१६७ कामगार असून सु. ७५८·९ कोटी ऑ. डॉलर किमतीचे उत्पादन झाले. देशात आठ तेलशुद्धीकरण कारखाने असून ब्रिस्बेन येथे दोन व मेलबर्न येथे एक असे तीन जादा कारखाने उभारण्यात येत आहेत. देशात १३५ लोकर गिरण्या मुख्यतः व्हिक्टोरिया व न्यू साउथ वेल्स राज्यांत असून त्यांमधून लोकरीचे कापड वर्स्टेड कापड, ब्लँकेट व रग तयार होतात. सुती कापडाच्याही अनेक गिरण्या आहेत. कापडउद्योग, वस्त्रोद्योग, कापडवस्तुउद्योग व पादत्राणनिर्मितिउद्योग ह्यांमध्ये १९६८-६९ साली ४,४८८ कारखाने, सु. १·८९ लक्ष कामगार असून सु. १६८·५ कोटी ऑ. डॉलर किंमतीचे उत्पादन झाले. अन्न, पेय व तंबाखू ह्या औद्योगिक समूहात त्याच वर्षी ५,६१३ कारखाने, सु. १·९४ लक्ष कामगार आणि उत्पादनमूल्य सु. ४२०·२२ कोटी ऑ. डॉलरचे झाले. रसायने, रंगद्रव्ये, पेट्रोलियम पदार्थ, स्फोटक पदार्थ, ग्रीज ह्या औद्योगिक समूहात १९६८-६९ मध्ये १,२६३ कारखाने, ६८,४५९ कामगार व उत्पादनमूल्य सु. १६३·९० कोटी ऑ. डॉलरचे झाले. कागद, लेखनसाहित्य व मुद्रणसामग्री ह्या समूहात १९६८-६९ मध्ये ३,८३४ कारखाने, १,०९,३७० कामगार आणि उत्पादनमूल्य १३४·६७ कोटी ऑ. डॉलरचे होते.
ऑस्ट्रेलियातील बहुतेक कामगारांना केंद्र व राज्य सरकारांनी स्थापिलेल्या औद्योगिक लवाद अधिकाऱ्यांच्या निवाड्यानुसार किमान वेतन,कामाची परिस्थिती इ. गोष्टी उपलब्ध होतात. तथापि काही राज्यांनी कामाच्या परिस्थितीबाबत (उदा., आठवड्याचे कामाचे तास, दीर्घकालिक सेवेनंतरची रजा, वार्षिक रजा वगैरे) वेगळे कायदे केले आहेत. बहुतेक सर्व कर्मचाऱ्यांना ४० तासांचा कामाचा आठवडा, तीन आठवड्यांची भरपगारी वार्षिक रजा आणि दीर्घकालिक सेवेनंतरची रजा (१५ वर्षे एकाच मालकाकडे नोकरी केल्यास १३ आठवडे भरपगारी रजा) मिळते. ऑक्टोबर १९७० च्या अखेरीस, प्रौढ कामगाराची (व्यवस्थापकीय, व्यावसायिक, उच्च पर्यवेक्षकीय कर्मचारीवर्ग वगळून) पूर्णवेळची साप्ताहिक मिळकत व सरासरी साप्ताहिक कामाचे तास अनुक्रमे ८० ऑ. डॉ. व ४३·५ तास होते. सर्व राज्यांतील कर्मचारी कामगार हा निपूर्ति-कायद्याने आरक्षित आहेत. जून १९७१ मध्ये एकूण कामगार संख्या (कृषिक्षेत्र व खाजगी घरगुती सेवाउद्योग वगळून) ४४·८ लक्ष होती. १९७० च्या अखेरीस देशात ३०५ कामगार संघटना व त्यांच्या सदस्य-कामगारांची संख्या २३,१४,६०० होती. १९२७ मध्ये स्थापन झालेल्या ‘ऑस्ट्रेलियन कौन्सिल ऑफ ट्रेड युनियन्स’ ह्या मध्यवर्ती कामगार संघटनेच्या १५० हून अधिक कामगार संघटना आहेत. ह्या मध्यवर्ती कामगार संघटनेची शाखा प्रत्येक राज्यात ‘ट्रेड्स् अँड लेबर कौन्सिल’ या नावाने कार्य करीत असते. ‘ऑस्ट्रेलियन वर्कर्स युनियन’ ही कामगार संघटना वरील मध्यवर्ती कामगार संघटनेशी १९६७ मध्ये संलग्न झाली.
विद्युतशक्ती : दगडी कोळसा व लिग्नाइट कोळसा ह्यांपासून ७६ टक्के विद्युतशक्तीचे उत्पादन करतात जलशक्तीपासून १८ टक्के आणि डिझेल तेलापासून ६ टक्के वीज निर्माण केली जाते. जलविद्युत् निर्मिती मुख्यत्वेकरुन टास्मानिया आणि आग्नेय ऑस्ट्रेलियात होते. स्नोई नदीचे पाणी पश्चिमवाहिनी मरी व मरंबिजी नद्यांकडे वळवून ३७·५ लक्ष किवॉ. तास वीज निर्माण करण्याची योजना १९४८ मध्ये सुरू करण्यात आली १९७२ मध्ये ती पूर्ण होईल असा अंदाज होता. देशातील एकूण विद्युतशक्तीची निर्मिती १९६८ मध्ये ४,६५,०८,००० किवॉ. तास झाली.
व्यापार : ऑस्ट्रेलियाच्या सहाही राज्यांमधील व्यापार मुक्त असतो. जागतिक बाजारपेठांत शेतमालासारख्या प्राथमिक वस्तूंच्या किंमतीमध्ये होणाऱ्या चढउतारांमुळे, प्राथमिक वस्तू मोठ्या प्रमाणावर निर्यात करणारा देश म्हणून आणि परदेशी भांडवलाच्या ओघावर बव्हंशी अवलंबून राहणारा देश म्हणून ऑस्ट्रेलियाला नेहमीच आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदातील अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये १९५० पर्यंत होत असलेल्या औद्योगिकीकरणाचा प्रभाव त्याच्या आयात वस्तूंच्या संख्येवर झाला नाही स्वरुपामध्ये मात्र महत्त्वाचा बदल घडून आल्याचे जाणवते. १९१३ मध्ये उपभोग्य वस्तूंचा एकूण आयातीमधील हिस्सा २८ टक्के होता तो १९६० मध्ये १७ टक्क्यांपेक्षाही खाली आला भांडवली साधनसामग्रीचे प्रमाण १७ टक्क्यांवरुन सु. ३० टक्क्यांवर गेले. उत्पादकांच्या साधनसामग्रीचे मान मात्र होते तेवढेच म्हणजे ४५ टक्के राहिले. प्रारंभापासून, ऑस्ट्रेलियास विविध वस्तू पुरविणाऱ्या देशांमध्ये ग्रेट ब्रिटनचा प्रथम क्रमांक लागतो. १९६५ पासून ग्रेट ब्रिटननंतर अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जपान, पश्चिम जर्मनी, कॅनडा व अरब देशांचा क्रम लागतो. प्राथमिक वस्तू (खनिज द्रव्ये धरुन) एकूण निर्यातीच्या ८५ टक्के व यंत्रोत्पादित वस्तू (प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ धरून) १५ टक्के असे निर्यात व्यापाराचे स्वरुप आहे. निर्यातीमध्ये मुख्यतः लोकर, मांस, गहू, दुग्धपदार्थ, साखर, फळफळावळ आणि खनिजे (प्रामुख्याने शिसे व जस्त) यांचा समावेश होतो. १९६५ पासून ग्रेट ब्रिटन हीच ऑस्ट्रेलियाची एकमेव निर्यातपेठ न राहता अमेरिका, जपान व सामायिक बाजारपेठेतील देशांच्याही निर्यातपेठा उपलब्ध होऊ लागल्या. ऑस्ट्रेलियाच्या विदेश व्यापाराचे स्वरुप, १९७०-७१ साली (३० जून अखेर) एकूण आयात ४१५ कोटी ऑ.डॉ. तर एकूण निर्यात ४३८ कोटी ऑ.डॉ. असे होते.
अर्थकारण : १४ फेब्रु. १९६६ रोजी देशात दशमान नाणेपद्धती सुरू झाली. ऑस्ट्रेलिया संघराज्य झाल्यापासून सरकारी अर्थकारणाच्या स्वरुपात आमूलाग्र बदल झाला. राज्यांकडील वित्तीय जबाबदारी केंद्र शासनाकडे गेली. राष्ट्रीय उत्पन्नाच्या २३ टक्के उत्पन्न एकूण करांपासून जमा होते. केंद्र सरकारच्या महसुली उत्पन्नात प्राप्तिकर, कंपन्यांवरील कर व अप्रत्यक्ष कर (उदा., जकातकर व अबकारी कर, विक्रीकर व वेतनपट कर) या करांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश होतो. राज्यसरकारे व स्थानिक नगरपालिका ह्यांच्या महसुली उत्पन्नांत संकीर्ण अप्रत्यक्ष कर (जमिनीवरील कर, स्टँपड्यूटी वगैरे) आणि उत्तराधिकार शुल्क (वारसा कर) यांचा समावेश होतो. सार्वजनिक खर्चाच्या बाबींमध्ये सामाजिक सेवालाभाच्या रुपात रोख रक्कम, राष्ट्रीय कर्जावरील व्याज, सरकारी कामे, संरक्षण, शिक्षण व आरोग्य ह्यांचा अंतर्भाव होतो. बिअर, मद्य, स्पिरिट, तंबाखू, काही पेट्रोलियम पदार्थ व दूरचित्रवाणीच्या नळ्या ह्या वस्तूंवर अबकारी कर आकारला जातो. मालकांवर वेतनपट कर आकारतात त्याचे प्रमाण पगार व मजुरीच्या (आठवड्याला २०० ऑ.डॉ. हून अधिक) रकमेवर २·५% असे असते. इतर केंद्रीय करांत जकात कर, भूकर, करमणूक कर, मालमत्ताकर व देणगीकर, हे प्रमुख आहेत. प्राप्तिकर व सामाजिक सेवाआकारणी उद्गामी करपद्धतीच्या तत्त्वावर करतात. १९७२ मधील विनिमय दर १ अमेरिकन डॉ.= ०·८२ ऑ. डॉ. आणि १ स्टर्लिंग पौंड = २·१६ ऑ.डॉ. असा होता. १९७० मधील अर्थसंकल्पाचे सामाजिक सेवा कार्यक्रमांकरिता जादा आर्थिक साहाय्य, संरक्षणखर्चात कपात आणि स्वतंत्र शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलांना प्रत्यक्ष उपदान, असे विशेष होते. ‘रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलिया’ ही मध्यवर्ती बँक असून ती कॉमनवेल्थ ट्रेडिंग बँक, कॉमनवेल्थ सेव्हिंग्ज बँक आणि कॉमनवेल्थ डेव्हलपमेंट बँक ह्यांच्याशी समान नियामक व संचालक मंडळाद्वारा संपर्क ठेवते. ह्याशिवाय देशात नऊ मोठ्या व्यापारी बँका, तेरा बचत बँका, चार लहान व्यापारी बँका, तीन विशेष स्टेट बँका व त्या सर्वांच्या शाखा (४,२५५) व अभिकरणे (१,७३५) आहेत १९६९ मध्ये देशात ४६ विमाकंपन्या व ११ शेअरबाजार होते. १९६८ मध्ये ऑस्ट्रेलयाच्या नैसर्गिक साधनसामग्रीच्या विकासास उत्तेजन देण्याकरिता एक ‘ऑस्ट्रेलियन रिसोर्सेस डेव्हलपमेंट बँक’ स्थापन करण्यात आली.
दळणवळण : देशातील ९,११,०२१ किमी. लांबीच्या रस्त्यांपैकी ९७,९८३ किमी. लांबीचे पक्के रस्ते आहेत. मोटारवाहतूक ग्रामीण उद्योगांच्या विकासात महत्त्वाचे कार्य करीत आहे. देशाच्या दूरदूरच्या भागांमध्ये मेंढ्या व गुरे यांची वाहतूक करण्याकरिता पुढच्या बाजूला डिझेल इंजिन असलेली मोटार व तिला पाठीमागे जोडण्यात आलेले दोन तीन ट्रेलर अशा रोडट्रेन वापरतात. १९७०-७१ मध्ये देशात ४३,११,०५६ मोटारी व स्टेशन वॅगन १०,५९,६७५ बसगाड्या व ट्रक आणि १,७६,७६० मोटारसायकली होत्या. सुरुवातीस ऑस्ट्रेलियाच्या काही राज्यांतील लोहमार्ग निरनिराळ्या मापांचे होते परंतु आता बहुतेक संबंध देशात प्रमाण-मापाचेच लोहमार्ग वापरात आहेत. ३० जून १९७० रोजी एकूण लोहमार्गांची लांबी ४०,३२९ किमी. होती. प्रत्येक राज्यातील लोहमार्गांवर त्या त्या राज्यशासनाचे नियंत्रण असते. खाणकाम, जंगलउद्योग, साखरउद्योग वगैरेंसारख्या खाजगी उद्योगांसाठी शेकडो किमी. लांबीचे निरुंदमापी लोहमार्ग वापरण्यात येतात.
दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात साखर व कच्चे लोखंड ह्यांच्या वाहतुकीमुळे खाजगी जहाजकंपन्यांना ऊर्जितावस्था प्राप्त झाली. ऑस्ट्रेलियन कोस्टल शिपिंग ॲग्रिमेंट (१९५६) मुळे हानिकारक आर्थिक स्पर्धेला आळा बसला आहे. ३० जून १९७० रोजी, व्यापारी किनारी जहाजे आणि परदेशी संचार करणारी मोठी जहाजे मिळून १४३ जहाजे (प्रत्येकी २०० ग्रॉ. टनांवर वजनाची) व एकूण ग्रॉ. टन वजन ११,४९,४३७ होते. ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर एकूण १०० व्यापारी बंदरे आहेत सिडनी, मेलबर्न, फ्रीमँटल (पर्थचे बंदर), पोर्ट ॲडिलेड, गीलाँग, पोर्ट केंब्ला,व्ह्याल्ला, ब्रिस्बेन आणि होबार्ट ही आधुनिक सोयींनी युक्त अशी प्रमुख बंदरे आहेत. इतर वाहतूक साधनांच्या तीव्र स्पर्धेमुळे अंतर्गत जलवाहतूक जवळजवळ थंडावलीच आहे. देशातील बहुतेक मोठी शहरे व अनेक लहान केंद्रे हवाई वाहतुकीने जोडलेली आहेत. दर माणशी मालाच्या हवाई वाहतुकीचे प्रमाण जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा ऑस्ट्रेलियात अधिक आहे आणि प्रवासी-किमी. वाहतुकीचे दर माणशी प्रमाण हे अमेरिकेच्या खालोखाल आहे. हवाई रुग्णवाहिका व शाही हवाई वैद्यकीय सेवा (रॉयल फ्लाईंग डॉक्टर सर्व्हिस) हे ऑस्ट्रेलियाचे मोठे वैशिष्ट्य असून देशातील दुर्गम प्रदेशासाठी ही सेवा उपलब्ध केली जाते. ऑस्ट्रेलियाची हवाई वाहतूक मार्गांची लांबी १,३१,९३८ किमी. आहे. ‘क्वांटास एअरवेज’ ही आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक करणारी सरकारी मालकीची कंपनी आहे. इतर आठ कंपन्या आहेत. ब्रिस्बेन, डार्विन, मेलबर्न, पर्थ व सिडनी ह्या शहरांत आंतरराष्ट्रीय विमानतळ असून ३० जून १९७० रोजी देशात ३८४ परवाना काढलेले विमानतळ, १०४ सरकारी विमानतळ आणि १० जलीय विमानतळ होते. जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा ऑस्ट्रेलियात दरडोई तारा पाठविण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. बिनतारी संदेशलेखसेवा, दूरछायाचित्रणसेवा आणि दूरमुद्रकसेवा देशात उपलब्ध आहेत. देशात ७,१५३ डाकघरे आणि ६,१२८ दूरध्वनि-कार्यालये व ३९,१३,१६७ दूरध्वनियंत्रे होती. ऑस्ट्रेलियाच्या ध्वनिक्षेपण आयोगाद्वारा देशभर ध्वनिक्षेपण-सेवा उपलब्ध केली जाते. देशात ७२ मध्यम तरंग केंद्रे, ६ उच्च कंप्रता केंद्रे आणि विदेश सेवेसाठी १२ उच्च कंप्रता केंद्रे कार्य करीत होती. ह्याशिवाय जाहिरातींकरिता ११४ मध्यम तरंग नभोवाणी केंद्रे कार्यशील होती. १९४६ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या विदेश दूरसंदेशवहन आयोगाद्वारा केबल, रेडिओ, दूरध्वनी, रेडिओ-दूरध्वनी इत्यादींच्या विदेश-सेवा उपलब्ध केल्या जातात. ऑस्ट्रेलियात २६,७०,३९३ रेडिओ व २७,५७,९७४ दूरचित्रवाणीसंच यांचे परवाने आणि २२,७४,८६० संयुक्त परवाने होते. त्याच साली, ४१ दूरचित्रवाणी केंद्रे व व्यापारी कार्यक्रम प्रसारित करणारी ४५ दूरचित्रवाणी केंद्रे कार्यशील होती. ऑस्ट्रेलियास १९७० साली ४,१६,१२८ प्रवाशांनी भेट दिली.
लोक व समाजजीवन : ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या १९७१ च्या जनगणनेनुसार १,२७,२८,५०० होती. आदिवासींची संख्या १,१६,००० होती (१९७३). हे आदिवासी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, नॉर्दर्न टेरिटरी, उत्तर क्वीन्सलँड व साउथ ऑस्ट्रेलिया या भागांत राहतात क्वीन्सलँडमध्ये आदिवासी सर्वाधिक संख्येने राहतात असे आढळून आले. यूरोपीय लोकांनी ऑस्ट्रेलियात वसाहत करण्यापूर्वी, आदिवासींची संख्या १·५ ते ३·५ लक्षांच्या दरम्यान असावी. १९६१ च्या जनगणनेनुसार ऑस्ट्रेलियातील एकूण लोकसंख्येत ९९·१ टक्के लोक यूरोपीय, ०·०४ टक्के आदिवासी व उर्वरित ०·०५ टक्के आशियाई (मुख्यतः चिनी) व पॉलिनेशिअन होते. ऑस्ट्रेलियाच्या स्थापनेपासून त्या देशात येणाऱ्या आप्रवाशांमध्ये ब्रिटिशच जास्त होते.
प्रत्येक चौ. किमी. ला १·६८ लोक अशी घनता असल्याने ऑस्ट्रेलिया हे खंड सर्व खंडांमध्ये विरळ लोकवस्तीचेच राहिले. अतिशय दाट लोकवस्तीच्या व्हिक्टोरिया राज्यातही १९६१ मध्ये लोकसंख्या-घनतेचे प्रमाण दर चौ. किमी. ला ३१ लोक असे होते. राज्यांच्या राजधान्यांमध्ये आढळणारी दाट लोकवस्ती, हे ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्या विभागणीचे वैशिष्ट्य आहे. १९६१ च्या जनगणनेप्रमाणे शहरांत ५९ टक्के लोकसंख्या असल्याचे आढळून येते. हे प्रमाण ग्रेट ब्रिटन : ४०%, अमेरिकेची संयुक्त संस्थाने : सु. ३०%, पश्चिम जर्मनी : सु. ४०% व जपान : सु. ३०% आहे. ३० जून १९७० रोजी प्रमुख शहरांची लोकसंख्या पुढीलप्रमाणे होती : सिडनी : २७,८०,३१० मेलबर्न : २४,७५,३०० ब्रिस्बेन : ८,५३,००० ॲडिलेड : ८,२५,४०० पर्थ : ६,६३,००० न्यू कॅसल : ३,४६,९७० वुलनगाँग : २,०३,११० होबार्ट : १,५०,९१० गीलाँग : १,१९,३२० कॅनबरा (राजधानी) : १,४६,४५०. नागरी भागातील हे दाट लोकवस्तीचे प्रमाण उद्योगधंद्यांतही दिसून येते. १९६१ मध्ये कृषी, मत्स्योद्योग व वनउद्योग ह्यांमध्ये केवळ श्रमिक लोकसंख्येच्या १०·९%, तर निर्मितिउद्योगात २९·२% लोक गुंतलेले होते. अर्थ व वाणिज्य ह्यांमध्ये १९·६%, तर व्यावसायिक व लोकसेवांमध्ये ते १३·७% होते.
ऑस्ट्रेलियाच्या शासनाच्या धोरणात आप्रवासन ही एक जटिल समस्येची बाब झाली आहे. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून आप्रवासनाच्या धोरणात तीन वैशिष्ट्ये आढळतात : मोठ्या प्रमाणावरील आप्रवासनाला अंतर्गत सुबत्तेच्या प्रमाणात प्रोत्साहन किंवा विरोध मूळच्या ब्रिटिश वंशजांना अधिमान्यता आणि एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकापासून गौरेतरांस मज्जाव. तथापि ‘श्वेत ऑस्ट्रेलिया’ धोरण जारी असूनही, १९५९ च्या सुमारास प्रवेश परवाना व्यवस्था अमलात आली १९६० नंतर या व्यवस्थेत आणखी शिथिलता आली. १९०५ पासून गौरेतर विद्यार्थी, पर्यटक आणि उद्योगपती-व्यापारी ह्यांना अल्पकालिक परवाने देऊन देशात प्रवेश दिला जात होता १९४५ नंतर तर मोठ्या प्रमाणावर आशियाई विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठांतून व माध्यमिक शाळांतून शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाऊ लागले.
ऑस्ट्रेलिया हा जगातील अत्यंत आरोग्यसंपन्न देशांपैकी एक आहे. उष्णकटिबंधीय व घातक रोग देशात जवळजवळ नाहीतच. सर्दीपडसे व इतर श्वसनविषयक संसर्गरोगांचे प्रमाण मात्र फार आहे. धमनीकाठिन्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण मोठे आहे. बहुतेक शहरांमधील पाणी चांगले असते. शासनाच्या सर्व स्तरांवर सार्वजनिक आरोग्याबद्दल काळजी घेतली जाते. बालककल्याण, शाळांमधील वैद्यकीय दंतविषयक सेवा, संसर्गजन्य व संक्रामक रोग व क्षय ह्यांवर उपचार व त्यांचे निर्मूलन, औद्योगिक आरोग्य कार्यक्रम, अन्न व औषधे ह्यांबाबत प्रमाणीकरण, सार्वजनिक व मनोरुग्णालये इ. आरोग्य विषयक बाबींकडे राज्यांचे आरोग्य विभाग लक्ष पुरवितात. केंद्रशासन वैद्यकीय संशोधनाकरिता अनुदाने देते, राज्यशासनांच्या आरोग्य कार्यक्रमांचा समन्वय करते आणि विशेषित वैद्यकीय संशोधन संस्था व प्रयोगशाळा चालविते. १९७० मधील जननमान, मृत्युमान व विवाहप्रमाण दर हजारी अनुक्रमे २१, ९ व ९ होते. १९६०–६२ या काळात सरासरी आयुर्मान, पुरुष ६८ वर्षे तर स्त्री ७४ वर्षे, असे होते. १९६५ मधील बालमृत्युमान (१ वर्षांखालील) १८·५ होते.
देशांत धर्मस्वातंत्र्य आहे. १९६६ मध्ये ८९ टक्के लोकसंख्या ख्रिश्चन, त्यांपैकी सु. ३३ टक्के रोमन कॅथलिक, २ टक्के हिब्रू, उर्वरित इतरधर्मीय होती. १ जानेवारी : नववर्षदिन, २८ जानेवारी : ऑस्ट्रेलियन दिन, २५ एप्रिल : ॲन्झॅकदिन, १६ जून : राणीचा वाढदिवस (वेस्टर्न ऑस्ट्रेलिया सोडून इतरत्र), २५ व २६ डिसेंबर : ख्रिसमस (साउथ ऑस्ट्रेलियात बॉक्सिंग डे हा सार्वजनिक सुटीचा दिवस धरण्यात येत नाही) गुड फ्रायडे व मार्च २७–३० ईस्टर असे सुट्ट्यांचे दिवस आहेत.
गृहनिवसन ही शासनाची जबाबदारी आहे. १९४५ पासून केंद्रशासनाने राज्यशासनांनी बांधलेल्या घरांना आर्थिक साहाय्य देण्यास प्रारंभ केला. ऑस्ट्रेलियात ७५ टक्के कुटुंबाची स्वतःच्या मालकीची घरे आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर मालकीच्या घरबांधणी कार्यक्रमात जलद वाढ होत गेली.
गद्रे, वि. रा.
शिक्षण : भौगोलिक परिस्थितीचा परिणाम शिक्षणपद्धतीवर कसा होतो, त्याचे ऑस्ट्रेलिया हे एक उद्बोधक उदाहरण आहे. सहा मोठी शहरे व इतर लहान मोठी गावे, विरळ लोकवस्ती व विषम भूप्रदेश, अशा परिस्थितीत इंग्लंडच्या शिक्षणपद्धतीला वेगळे विशेष वळण दिलेले दिसते.
अवघ्या शंभर वर्षात या शिक्षणाची वाढ झाली आहे. १८६६ पासून त्याला सुसंघटित स्वरुप आले. इंग्लंडप्रमाणेच मध्यवर्ती शिक्षणमंडळ निर्माण करुन प्रत्यक्ष कारभार स्थानिक मंडळांकडे सोपवावा, असा प्रयत्न झाला. परंतु इंग्लंडची विकेंद्रित पद्धती तेथे फारशी रुजली नाही. १८७२ पासून प्रत्येक राज्याने हळूहळू राज्यशासित शिक्षण पद्धती स्थापन केली. सरकारी नेतृत्वाने व खर्चाने दिलेले मोफत, सक्तीचे आणि धर्मनिरपेक्ष शिक्षण सहाही राज्यांत सुरु झाले.
माहिती व आकडेवारी प्रसृत करणे, संशोधनाचा पुरस्कार करणे, आदिवासींचे शिक्षण व विशिष्ट शिक्षणाला आर्थिक मदत देणे, एवढीच मध्यवर्ती शासनाची कामे आहेत. राज्यातील शिक्षणमंत्री व शिक्षणाधिकारी शिक्षणव्यवस्था पाहतात. स्थानिक स्वराज्य संस्थांना शैक्षणिक कामे नाहीत. इमारती, साहित्य पुरवठा, अभ्यासक्रम, क्रमिक पुस्तके, शाळांची तपासणी, शिक्षकांच्या नेमणुका इ. कामे राज्यसरकारची यंत्रणा करते. शहरे व ग्रामीण भागांना एकाच दर्जाचे शिक्षण, सर्वांना समान संधी, उत्तम इमारती, एकाच शासनाखालचा शिक्षक वर्ग, कार्यक्षम व कडक तपासणी आणि देखरेख असे काही विशेष आहेत. स्वातंत्र्याचा व प्रयोगप्रवृत्तीचा अभाव, स्थानिक जनतेची उदासीनता आणि सरकारवरील अवलंबन, परीक्षा-तपासणी-रजा-बदल्या अशा गोष्टींना अवास्तव महत्त्व, असे काही दोषही आहेत.
शिक्षण देण्याची मुख्य जबाबदारी सरकारने घेतली असली, तरी त्याची मक्तेदारी नाही. खाजगी संस्थांनाही महत्त्वाचे स्थान आहे. सामान्यपणे ७५ टक्के विद्यार्थी खाजगी शाळांत शिकतात. खाजगी संस्थांना सरकारी अनुदान वगैरे मिळत नाही. सर्वस्वी फीच्या उत्पन्नावर व देणग्यांवर या संस्था चालतात. परीक्षा, शिष्यवृत्त्या इ. गोष्टींकरता त्यांना सरकारी तपासणी व मान्यता स्वीकारावी लागते. शेकडा ७५ ते ८० टक्के विद्यार्थी रोमन कॅथलिक पंथाच्या शाळांत व बाकीचे इतर पंथीय व स्वतंत्र शाळांत शिकतात. फीचे प्रमाण कमीजास्त असते. पण शिक्षणाची पातळी वरच्या दर्जाची आहे.
शिक्षणाच्या बाबतीत प्रत्येक राज्य स्वायत्त असल्याने शिक्षणाची रचना, फी पद्धती, अभ्यासक्रम इत्यादींबाबतीत आपले धोरण ते आखते. पण या विविधतेच्या मुळाशी पुष्कळ समानता आहे. सक्तीचे मोफत शिक्षण सहाव्या वर्षी सुरु होऊन ते चौदा, पंधरा किंवा सोळा वर्षांपर्यंत चालते. किंडरगार्टन शिक्षण ऐच्छिक आहे. प्राथमिक शिक्षण सहा वर्षे व माध्यमिक सहा वर्षे, अशी बारा वर्षे शालेय शिक्षण झाल्यावर विद्यापीठात जाता येते. बारा वर्षांची ही विभागणी ६ + ६ किंवा ८ + ४ अशी निरनिराळी असू शकते. प्राथमिक शिक्षणानंतर बौद्धिक, तांत्रिक किंवा कृषिसंबंधी विषयांच्या माध्यमिक शाळेत जाऊन याच विषयांच्या उच्च महाविद्यालयात जाता येते. सहशिक्षण आणि अलगशिक्षण असे दोन्ही प्रकार प्रचलित आहेत.
बहुसंख्य किंडरगार्टन शाळा खाजगी संस्थानी चालविलेल्या आहेत. सरकारने त्यांची जबाबदारी घेतलेली नाही प्रयोगादाखल काही संस्था व प्रात्यक्षिक केंद्रे चालविली जातात.
प्राथमिक शिक्षण सहा किंवा आठ इयत्तांचे असते. शहरांतील शाळांत गर्दी असते. ग्रामीण भागात एकशिक्षकी शाळांची संख्या मोठी आहे, पण तेथे शिक्षणाच्या सोयी उत्कृष्ट आहेत. खास प्रशिक्षण घेतलेले शिक्षक, उत्तम इमारती, बागबगीचा, रेडिओ, ग्रंथालय, उद्योगमंदिर इ. व्यवस्था असल्याने एकशिक्षकी शाळांतील शिक्षण समाधानकारक आहे. अशा अनेक शाळांचे एकीकरण करुन मध्यवर्ती मोठ्या शाळा काढण्याचे प्रयोग व प्रयत्न चालू आहेत. विद्यार्थ्यांसाठी वाहनांची सोय असून त्यासाठी राज्यसरकारांना बराच खर्च येतो. ऑस्ट्रेलियात १९७० साली सरकारी ७,४७० व खाजगी २,१८० शाळा होत्या आणि त्यांतून अनुक्रमे २१,६०,१७७ व ६,०८,०५६ विद्यार्थी शिकत होते शिक्षकांची संख्या अनुक्रमे ९६,०८५ व २३,९५६ होती.
प्राथमिक शिक्षणानंतर विद्यार्थी आपापल्या आवडीप्रमाणे विद्याविषयक, औद्योगिक किंवा कृषिविषयक शिक्षणाच्या माध्यमिक शाळांत जातात. त्यांची कालमर्यादा विषयांप्रमाणे कमीजास्त असते. शहरांतील या शाळा निरनिराळ्या इमारतींत असतात, पण ग्रामीण भागात एकाच इमारतीत अनेक विषयांची सोय केली जाते.
ऑस्ट्रेलियात १९७० मध्ये पंधरा विद्यापीठे होती. त्यांत ७,३७१ पूर्ण वेळ शिक्षक व १,१६,७७८ विद्यार्थी, त्यांपैकी ७३,६७५ पूर्णवेळ विद्यार्थी शिकणारे होते. यांपैकी एक मध्यवर्ती सरकारचे असून बाकीची राज्यसरकारांतर्फे चालविली जातात. पाच राज्यांत हे शिक्षण मोफत आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या, निर्वाहवृत्त्या इ. अनेक मार्गांनी मदत मिळते. उच्च शिक्षणाची संधी सर्वांना उपलब्ध आहे, मात्र शालांत परीक्षेतील निकाल समाधानकारक असावेत अशी अपेक्षा असते
ऑस्ट्रेलियात एकूण ६३ दैनिके, २७ नियतकालिके व ४८ मासिके, त्रैमासिके वगैरे असून ऑस्ट्रेलियन हे दैनिक अत्यंत लोकप्रिय आहे. येथील २३ संग्रहालयांपैकी ५ कला संग्रहालये ख्यातनाम आहेत. आपल्या भौगोलिक अडचणींवर मात करण्याकरिता ऑस्ट्रेलियाने रेडिओ, टपाल आणि वाहने यांचा शिक्षणाकरिता मोठ्या कौशल्याने उपयोग केलेला आहे. रेडिओवर किंडरगार्टनपासून विद्यापीठीय वर्गांपर्यंतचे सर्व प्रकारचे पाठ, त्याचप्रमाणे पत्रव्यवहाराने प्राथमिक, माध्यमिक व औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण देण्याची व्यवस्था आहे. प्रात्यक्षिक शिक्षणाकरता बस किंवा रेल्वेचा डबा पाळीपाळीने आठवड्यातून एक दिवस निरनिराळ्या ग्रामीण भागात जातो. काही ठिकाणी फिरते शिक्षकही आहेत.
प्रौढांच्या शिक्षणाची व्यवस्था विद्यापीठांचे बहिःशाल विभाग आणि कामगार शिक्षणसंस्था यांच्यामार्फत होते. वाङ्मयीन, औद्योगिक किंवा सांस्कृतिक विषय शिकविले जातात.
सारांश सरकारी मार्गदर्शनाने चालणारी, विशेष चर्चिली न जाणारी, कमी प्रयोगशील, पण सर्वांना समान संधी देणारी शिक्षणपद्धती ऑस्ट्रेलियात चालू आहे. तिच्या मुळाशी असलेल्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचे व पुढील विकासाच्या धोरणाचे स्पष्ट स्वरूप ऑस्ट्रेलियातील शिक्षण क्षेत्रात आढळत नाही, एवढीच एक कमतरता त्या पद्धतीत जाणवते.
खैर, ग. श्री.
सामाजिक कल्याण : दुसऱ्या महायुद्धाच्या काळापासून सामाजिक सुरक्षा उपायांचा विस्तार करण्यात आला.राष्ट्रीय कल्याण निधीतून देशातील सर्व सामाजिक व आरोग्य लाभ ह्यांसाठी पैसा खर्च केला जातो. ऑस्ट्रेलियात किमान दहा वर्षे राहिलेल्या ६५ वर्षे व त्यांवरील पुरुषांना आणि ६० वर्षे व त्यांवरील स्त्रियांना वार्धक्यवेतने देण्यात येतात. कायमचे दौर्बल्य व अंधत्व आलेल्यांना व देशात किमान पाच वर्षांचे वास्तव्य केलेल्यांना विकलांगता निवृत्तिवेतने मिळतात. इतर सामाजिक कल्याणयोजनांमध्ये कौटुंबिक भत्ते, प्रसूति-लाभ, विधवांसाठी निवृत्तिवेतने, बेकारी व आजार लाभ, रुग्णालय लाभ, औषधविषयक लाभ व मोफत औषधी गोळ्या, विकलांग निवृत्तिवेतन धारकांच्या स्त्रियांना व मुलांना आर्थिक साहाय्य, अंत्यसंस्कार लाभ, क्षयरोग्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक साहाय्य गृहपरिचर्यासेवा, युद्धनिवृत्तिवेतने, वैद्यकीय लाभ इत्यादींचा समावेश होतो. सत्तर टक्के लोकसंख्येचा वैद्यकीय लाभांसाठी विमा उतरविण्यात आला आहे. दारिद्र्य व संपन्नता ह्यांची अतीव टोके ऑस्ट्रेलियन समाजात आढळून येत नाहीत. सबंध देशभर सामाजिक प्रौढी व वैयक्तिक कृत्रिमता यांबद्दल तिटकारा आढळून येतो. समाजातील पददलित माणसांना आधार द्यावयाची वा त्यांना साहाय्य करण्याची प्रवृत्ती हरघडी दिसते. याच गुणामुळे व्यक्तिशः औदार्य व आतिथ्यशीलता यांचा अनुभव घडोघडी येतो .
ऑस्ट्रेलियन मनुष्याच्या जीवनात खेळाला फार मोठे स्थान आहे. इतर कोणत्याही देशापेक्षा ऑस्ट्रेलियात क्रीडाविषयक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची, सामील होण्याची धडपड दिसून येते आणि कोणत्यातरी एका किंवा दोन खेळांत प्रावीण्य वा कौशल्य प्रत्येकाने संपादिले पाहिजे, अशी अपेक्षा बाळगण्यात येते. मैदानी खेळांचे प्रमाण ऑस्ट्रेलियातील अनुकूल हवामानामुळे मोठे आहे कौशल्य मिळविण्यासाठी सर्व तऱ्हेच्या सोयी उपलब्ध करुन दिल्या जात असल्याने, आंतरराष्ट्रीय प्रतियोगितांमध्ये ऑस्ट्रेलियनांनी नेत्रदीपक यश प्राप्त केलेले दिसून येते.
ऑस्ट्रेलियात आठवड्याचे कामाचे तास साधारणतः अमेरिका व ग्रेट ब्रिटनप्रमाणेच असले, तरी विश्रांतीवर अधिक भर दिला जातो. सर्वसाधारण ऑस्ट्रेलियन माणूस व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे. पहिल्या महायुद्धात ऑस्ट्रेलियनांनी दोन वेळा सक्तीच्या लष्करभरतीला विरोध केला तथापि नंतर ते स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने लष्करात सामील झाले. दुसऱ्या महायुद्धातही त्यांनी विदेशी लष्करसेवेकरिता सक्तीच्या भरतीस विरोध केला, तथापि नंतर त्यांनी प्रचंड संख्येने विदेशलष्करसेवेकरिता आपले सामर्थ्य उपलब्ध केले. प्राथमिक वस्तूंचे उत्पादन व औद्योगिक आणि व्यापारी उपक्रम यांवरील मोठ्या प्रमाणातील शासकीय नियंत्रण, हे ऑस्ट्रेलियन जनतेला मान्य आहे याचे कारण त्यायोगे कामाची स्थिती अधिक प्रमाणात सुधारेल, पर्याप्त जीवनमान साध्य करण्यासाठी अधिक श्रम करावे लागणार नाहीत तसेच सर्व माणसांना किमान पातळीवरील जीवनमान उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास त्यांना वाटतो.
ऑस्ट्रेलियातील स्त्रियांचे समाजातील स्थान विशेष लक्षणीय आहे.आता ऑस्ट्रेलियन स्त्रिया वाणिज्य व्यवसायांत व सामाजिक क्षेत्रात नोकरीच्या निमित्ताने पुष्कळ प्रमाणात वावरताना आढळून येत असल्या, तरी त्यांचे खरे कार्यक्षेत्र अमेरिकेतील स्त्रियांच्या तुलनेने अधिककरुन घरातच आढळते.
ऑस्ट्रेलियन मनुष्य साधारणतः करड्या रंगाची पँट व त्यावर स्पोर्ट्सकोट असा पोषाख करतो. दक्षिणेकडील प्रदेशात या पोषाखावर नेकटाय घालतात, तर उत्तरेकडील प्रदेशात नेकटाय वापरीत नाहीत. उन्हाळ्यात कोट न घालण्याची प्रवृत्ती वाढत आहे. स्त्रियांनी बाह्य वातावरणाला शोभेल अशी वेशभूषा वापरावयास सुरुवात केली आहे. मद्याची विक्री व सेवन ह्यांबाबत कित्येक राज्यांनी कायदे जारी केले असून, हॉटेलांमधील मद्यसेवनकेंद्रे सकाळी नऊपासून संध्याकाळी सहापर्यंत चालू असतात. या निर्बंधामुळे दरडोई बिअरसेवनाचे प्रमाण मोठे आहे. ऑस्ट्रेलियनांच्या रोजच्या आहारात मांसाचे प्रमाण, विशेषतः गोमांस व मटण, अधिक असते.
उत्पन्नाचे वाटप अतिसमप्रमाणात केले जाण्याबद्दल ऑस्ट्रेलिया सर्व जगात प्रसिद्ध होता तथापि १९५० नंतर हे विभाजन असमान होत चालले आहे तरीही राष्ट्रीय उत्पन्नामधील श्रमाचा वाटा ५५ ते ६० टक्के म्हणजे जवळजवळ स्थिरच राहिला आहे. जगामधील श्रीमंत राष्ट्रांमध्ये ऑस्ट्रेलियाचा आठवा किंवा नववा क्रमांक आहे .
भाषा व साहित्य: ऑस्ट्रेलियात मुख्यतः इंग्रजी हीच भाषा बोलली व लिहिली जाते. तथापि ऑस्ट्रेलियातील आदिवासींच्या ज्या भाषा आहेत, त्या ऑस्ट्रेलियन भाषा म्हणून ओळखल्या जातात. त्यांची संख्यादेखील मोठी आहे.राष्ट्रीय पातळीवरील साहित्य आणि जागतिक वाङ्मयात स्थान मिळालेले साहित्य या दोन्ही दृष्टींनी ऑस्ट्रेलियन साहित्याचा बराच विकास झालेला आहे.गद्य वाङ्मयप्रकारात प्रमुख ऑस्ट्रेलियन लेखक पुढीलप्रमाणे आढळतात : हेन्री हँडेल रिचर्डस (१८७०–१९४६), ख्रिस्तिना स्टीड, कॅथेरिन प्रिचर्ड व पॅट्रिक व्हाईट (१९१२– ) पद्य प्रकारात : क्रिस्टोफर ब्रेनन (१८७०–१९३२), जेम्स मॅकाली (१९१७– ) आणि ज्यूडिथ राइट (१९१५– ). पॅट्रिक व्हाईट याला त्याच्या वाङ्मयीन कार्याबद्दल १९७३ चे नोबेल वाङ्मय पारितोषिक देण्यात येऊन सन्मानित करण्यात आले आहे. एवढा मोठा जागतिक मान मिळविणारा व्हाईट हा पहिलाच ऑस्ट्रेलियन लेखक होय.
कला, क्रीडा इत्यादी : ब्रिटिश चित्रकलेच्या छापातून ऑस्ट्रेलियन चित्रकलेला बाहेर पडता आले नाही. १८५१ मध्ये सोन्याचा शोध लागल्यावर तत्कालीन जीवन रंगविण्याकरिता अनेक चित्रकार पुढे सरसावले. यांमध्ये टॉमस गिल (१८१८–८०) ह्याचा उल्लेख करावयास हवा. विसाव्या शतकात त्याची चित्रे पुन्हा लोकप्रिय ठरली आहेत. कॉन्रॅड मार्टेन्स (१८०१–७८) ह्याने ऑस्ट्रेलियन निसर्गचित्रे जलरंगाच्या माध्यमातून निर्माण केली. १८७३ मध्ये नॅशनल गॅलरी ऑफ व्हिक्टोरियाची स्थापना झाली परदेशी चित्रकार, कलावंत व कलाशिक्षक यांनी यूरोपीय चित्रकलापद्धती व कलाभिरुची आणली. द्दक्प्रत्ययवादी चित्रकारांमध्ये टॉम रॉबर्ट्स (१८५६–१९३१) फ्रेडरिक मॅक्युबिन (१८५५–१९१७), सर आर्थर स्ट्रीटन (१८६७–१९४१) ह्यांचा उल्लेख केला पाहिजे. स्ट्रीटन ह्या चित्रकाराच्या शैलीचा मोठा प्रभाव ऑस्ट्रेलियन चित्रकलेवर पडल्याचे दिसते. जॉन पॅटर्सन, डेव्हिड डेव्हिस व वॉल्टर विदर्स ह्यांसारख्या चित्रकारांनी प्रत्यक्ष अवलोकन पद्धतीच्याही पलीकडे जाण्याचा व ऑस्ट्रेलियन निसर्गदृश्यांमधील भाववृत्ती व मनोवृत्ती रेखाटण्याचा प्रयत्न केला. १८९० च्या पुढील काळात लिंडझी बर्नार्ड हॉल (१८५९–१९३५), जॉर्ज लॅंबर्ट (१८७३–१९३०), रूपर्ट बुनी (१८६४–१९४७), इमॅन्युएल फिलिप्स फॉक्स (१८६५–१९१५), हॅन्स हेसेन (१८७७– ) ह्या चित्रकारांनी आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळविली. १९१६ मध्ये आर्ट इन ऑस्ट्रेलिया हे नियतकालिक सिडनी स्मिथ ह्याने सुरू केले. १९२० च्या पुढील काळात ग्रूनर (१८८२–१९३९), विल ॲश्टन (१८८१– ) ह्यांसारख्या चित्रकारांनी निसर्गचित्रकला अधिकाधिक विकसित केली. जेम्स ग्लीसन ह्या चित्रकाराच्या चित्रकृतींवर अतिवास्तववादाचा प्रभाव पडल्याचे जाणवते. जॉर्ज रसेल ड्रिझ्डेल (१९१२– ) ह्या चित्रकाराने ऑस्ट्रेलियन दृश्यांचे यथार्थ चित्रण करावयास प्रारंभ केला. त्याच्या व विल्यम डोबेलच्या (१८९९–१९७०) कलाकृतींना आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. जीन बेलेट व डेव्हिड स्ट्रॉन ह्यांसारख्या चित्रकारांनी आपल्या कलाकृतींसाठी स्वच्छंदतावादी दृष्टिकोन स्वीकारला. १९२० च्या पुढील काळात ऑस्ट्रेलियन चित्रकलेवर आदिवासी कलेचाही प्रभाव पडत चालल्याचे दिसून येते. या आदिवासी चित्रकलेच्या प्रकारात मार्गारेट प्रेस्टन (१८८३–१९६३) ही चित्रकर्त्री चमकली. वास्तववाद, अभिव्यक्तिवाद या संप्रदायांतील सुप्रसिद्ध चित्रकार नोलॅन, ड्रिझ्डेल, टकर, डोबेल, ए. बॉइड, चार्ल्स ब्लॅकमन व ओल्सेन हे समजले जातात. अम्लउत्कीर्णन आणि व्यंग्यचित्रकला यांमध्ये १८९० पासून काही ऑस्ट्रेलियन कलाकार विशेषपणे चमकू लागले. अम्लउत्कीर्णन कलेमध्ये प्रख्यात कलाकार म्हणजे सरलायोनेल लिंडझी (१८७४–१९६१) व एच्. व्हॅन रॉल्ट हे होत व्यंग्यचित्रकलेत नॉर्मन लिंडझी (१८७९–१९६९), फिल मे (१८६४–१९०३), डेव्हिड लो (१८९१–१९६३), विल्यम हेन्री डायसन (१८८६–१९३८) हे कलाकार विशेष प्रसिद्धी पावले आहेत. ऑस्ट्रेलियन शिल्पकारांनी ब्रिटिश परंपरेचेच अनुकरण केले आहे. ऑस्ट्रेलियात व बाहेरच्या देशांतही उत्कृष्ट शिल्पकार म्हणून सर बर्ट्रॅम माकेनल (१८६३–१९३१) ह्याने प्रसिद्धी मिळविली. इतर चांगल्या शिल्पकारांत लिंडन डॅड्सवेल (१९०८– ), डब्ल्यू लेस्ली बोल्स (१८८५–१९५४) ह्यांचा समावेश होतो. विसाव्या शतकात अमेरिकन वास्तुशिल्पाचा फार मोठा प्रभाव पडला. एडमंड ब्लॅकेट (१८१७–१८८३) हा गॉथिक शैलीचा प्रतिनिधी समजला जातो. त्याने अनेक ख्रिस्तमंदिरे बांधली उदा., सिडनी येथील सेंट मार्क, सिडनी विद्यापीठाचा ग्रेट हॉल. याउलट मेलबर्न येथील संसद भवन, ट्रेझरी व न्यायालये, नवअभिजात वा प्रबोधनकालीन संप्रदायांची निदर्शक आहेत. रॉबर्ट हॅडॉन (१८६६–१९२९) ह्या वास्तुशिल्पज्ञाने ‘आर्ट नूव्हो’ हा वास्तुकलेचा प्रकार ऑस्ट्रेलियात कार्यवाहीत आणला. रॉय ग्राउंड्स (१९०५– ) ह्या वास्तुशिल्पज्ञाने आधुनिक पद्धतीचा पाया घातला. त्याने स्वतःकरिता बांधलेल्या ‘क्लेंडॉन फ्लॅट्स’ (१९४०) ह्या इमारतीचे सर्वत्र अनुकरण झाले परंतु त्याची सर्वांत प्रसिद्ध इमारत म्हणजे कॅनबरा येथील घुमटाकारी ‘ॲकॅडमी ऑफ सायन्स’ (१९५९) ही होय त्याचप्रमाणे सिडनी येथील ‘सिडनी ऑपेरा हाऊस’ आणि मेलबर्न येथील ‘आर्ट्स सेंटर’ ह्या दोन वास्तू आधुनिक वास्तुशिल्पाचे उत्कृष्ट नमुने समजले जातात.
ऑस्ट्रेलियात नाट्यकलेस लोकांकडून उत्तेजन मिळत असूनही स्थानिक नाट्यकलेचा विकास होऊ शकला नाही. ‘एलिझबेथन थिएटर ट्रस्ट’ ह्या १९५४ साली स्थापन झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या नाट्यगृहाने स्थानिक नाट्यकलेला उत्तेजन देण्याकरिता व नाट्यकलेची वृद्धी करण्यासाठी बरेच प्रयत्न चालविले आहेत.
मूळच्या ऑस्ट्रेलियन परंतु इंग्लंड, अमेरिकेत स्थायिक झालेल्या कलाकारांमध्ये ऑस्कर ॲश, मॅज एलिअट, सिरिल रिट्चर्ड, सिसिली कोर्टनीज, ज्यूडिथ अँडरसन, डिॲने सिलेंटो, झो कॉल्डवेल ह्यांचा निर्देश करावा लागेल. आधुनिक ऑस्ट्रेलियन नाट्यदिग्दर्शकांमध्ये रॉबिन लव्हजॉय ह्याला मोठे स्थान आहे. ‘बॅले’ हा नृत्यप्रकार अतिशय लोकप्रिय होऊ लागला आहे. मेलबर्नमधील ‘बॉरोव्हॅन्स्की बॅले’, ‘बॉडेन्वीझर बॅले’, ‘नॅशनल थिएटर बॅले’ आणि सिडनीचा ‘पोलिश ऑस्ट्रेलियन बॅले’ हे नृत्यसंघ सुविख्यात आहेत. ह्यांशिवाय ऑस्ट्रेलियात मुलांकरिता ‘ऑस्ट्रेलियन चिल्ड्रेन्स थिएटर’ ही बालनाट्यसंस्था, जोन व बेटी रेनर ह्या दोन बहिणींच्या प्रदीर्घ प्रयत्नांमुळे मेलबर्न येथे स्थापन झालेली आहे. ही नाट्यसंस्था अनेक शहरांतून व दूरवरच्या गावांतूनही मुलांसाठी नाटके करीत असते.
चलत्चित्रपटांच्या प्रारंभापासून जरी ऑस्ट्रेलियात चित्रपटनिर्मिती होत असली, तरी फारच थोडे ऑस्ट्रेलियन चित्रपट परदेशांत यशस्वी ठरले आहेत. तथापि माहितीपटांच्या (अनुबोधपटांच्या) क्षेत्रात मात्र देशातील काही खाजगी संस्थांनी व ऑस्ट्रेलियन न्यूज अँड इन्फर्मेशन ब्यूरोच्या चित्रपट विभागाने उल्लेखनीय व स्पृहणीय कामगिरी केली आहे.
देशातील सर्व कलाप्रकारांत संगीतप्रकार अतिशय विकसित झालेला आहे. सिडनी, ॲडिलेड इ. विद्यापीठांतून संगीत अध्यासने निर्माण करण्यात आली आहेत. ‘मेलबर्न सिंफनी ऑर्केस्ट्रा’ अतिशय प्रसिद्ध आहे. ह्याशिवाय ‘ब्रिस्बेन सिंफनी ऑर्केस्ट्रा’, ‘टास्मानियन ऑर्केस्ट्रा’, ‘व्हिक्टोरियन सिंफनी ऑर्केस्ट्रा’ हेही प्रसिद्ध आहेत. संगीतिकांचा आविष्कार करणाऱ्यामध्ये नेली मेल्बा (१८६१–१९३१) ह्या ऑस्ट्रेलियन गायिकेचा वरचा क्रम लागतो. हिने लंडन, पॅरिस व न्यूयॉर्क येथे कीर्ती मिळविली. मेल्बाने ऑस्ट्रेलियन संगीताच्या विकासास मोठ्या प्रमाणात हातभार लावला आहे. ॲडा क्रॉसली (१८७४–१९२९), पीटर डॉसन (१८८२– ), मार्जोरी लॉरेन्स (१९०८– ), जोन हॅमंड (१९१२– ), सिल्व्हिया फिशर, लॉर्ना सिडनी, जॉन ब्राउनली (१९०१– ), जोन सदर्लंड (१९२८– ) हे ऑस्ट्रेलियन गायक उना बोर्न व आयलीन जॉइस (१९१२– ) ह्या पियानोवादिका, फ्लॉरेन्स हुड व अर्न्स्ट टॉय हे व्हायोलिनवादक आणि सर विल्यम नील मॅकी (१९०– ) हा ऑर्गनवादक प्रसिद्ध आहेत. संगीत रचनाकारांमध्ये पर्सी ग्रेंजर (१८८२– ) व आर्थर बेंजामिन (१८९३– ) ह्यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे.
ऑस्ट्रेलियन लोक हे अतिशय क्रीडाप्रिय आहेत. टेनिस, क्रिकेट, पोहणे या खेळांमध्ये ऑस्ट्रेलिया अग्रगण्य समजला जातो. हे यश या देशाच्या लोकसंख्येच्या मानाने अधिकच डोळ्यात भरते. मोटारींच्या जागतिक शर्यती मध्य व लांब अंतर धावणे, जलद धावणे, अडथळा-शर्यती, गोल्फ, सायकल-शर्यती इ. खेळांमध्ये ऑस्ट्रेलियन पुरुषांनी तसेच स्त्रियांनीही महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. अतिशय निवडक अशा ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मिळणारे प्रशिक्षण व मार्गदर्शन, खेळाडूंची नैसर्गिक क्षमता, अतिशय सुंदर पुळणी, गवताळ प्रदेश, घोड्यांचा अधिक वापर, दीर्घ उन्हाळे व उत्कृष्ट आहार ह्यांमुळे ऑस्ट्रेलियाला क्रीडाक्षेत्रात भव्य यश मिळविणे शक्य झाले आहे.
घोड्यांच्या शर्यतीप्रमाणेच रोडिओ, ग्रेहाउंड कुत्रे व ससे ह्यांच्याही शर्यती देशात खेळल्या जातात. पोलो व पोलोक्रॉस हे दोन्ही खेळ धनिकांमध्ये प्रिय आहेत. रग्बी, गोल्फ, बेसबॉल, बास्केटबॉल हे खेळही लोकप्रिय आहेत. क्रिकेट व हॉकी हे खेळ पुरुष व स्त्रिया अशा दोहोंमध्येही प्रिय आहेत. सॉफ्टबॉल व व्हिगॅरो हे खेळ शाळांमधून खेळले जातात. लाकडाचे काप करणे (वुड चॉपिंग) ह्या खेळात ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड देशांतील लोक कौशल्य दाखवितात. बर्फावरील बंदुकीची निशाणबाजी तसेच मासेमारी हेही खेळ लोकप्रिय आहेत. मुष्टियुद्धाच्या लोकप्रियतेस ओहोटी लागली असून त्याची जागा कुस्तीने घेतली आहे. जूडो हा क्रीडाप्रकार नव्यानेच सुरु करण्यात येऊनही यशस्वीपणे रुळला आहे. बिलिअर्ड्स हा खेळ मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. दुसऱ्या महायुद्धापासून स्क्वॅश हा खेळ लोकप्रिय झाला असून हीदर मॅके आणि केन हिस्को हे ऑस्ट्रेलियन खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यशस्वी ठरले आहेत. जलक्रीडांमध्ये पोहणे हा अतिशय लोकप्रिय खेळ असून त्याचेच उपप्रकार म्हणून ‘सर्फिंग’, ‘स्किनडायव्हिंग’ आणि ‘वॉटर शीईंग’ हे खेळ लोकांना आवडू लागले आहेत. नौकानयनस्पर्धाही मोठ्या प्रमाणावर घेतल्या जातात. ऑलिंपिक सामने व जागतिक नौकानयन स्पर्धा यांकरिता ऑस्ट्रेलिया आपली पथके पाठवितो. १९५६ साली मेलबर्न येथे ऑलिंपिक सामने भरले होते. १९६७ मध्ये प्रथमच ऑस्ट्रेलियन नौकानयन-पथकाने आंतरराष्ट्रीय नौकानयन स्पर्धांमध्ये अमेरिकेच्या पथकाविरुद्ध अजिंक्यपद मिळविले. ऑस्ट्रेलियात शेफील्ड शील्डसाठी आंतरराज्यीय क्रिकेटस्पर्धा होतात या स्पर्धांमधून ऑस्ट्रेलियन खेळाडूला सम्यक् शिक्षण व संधी मिळू शकते. क्रिकेटमध्ये रायडर, वुडफुल, पॉन्सफोर्ड, ओरायली, ब्रॅडमन, बार्न्झ, हॅसेट, हार्व्ही, सिम्प्सन, बेनॉ, लिंडवॉल, लँग्ले, मिलर, डेव्हिडसन हे खेळाडू चमकलेले आहेत. पोहण्यामध्ये जॉन व इल्सा कॉनरॅड्स हे भाऊबहिण व डॉन फ्रेझर ह्यांनी जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत. डॉन फ्रेझरने तर १९५६, १९६० व १९६४ अशा तिन्ही ऑलिंपिक सामन्यांत जागतिक विक्रम केले आहेत. माँक्टन हाही पोहण्यामध्ये प्रसिद्ध आहे. टेनिसमध्ये फ्रँक सेजमन, लूइस होड, रॉड लेव्हर, केन रोझवॉल, ॲशली कूपर, मॅक्रॅगॉर, नील फ्रेझर, रॉय इमर्सन, जॉन न्यूकम ह्या खेळाडूंनी तसेच मार्गारेट स्मिथ, जेन लेहान, मार्गारेट कोर्ट, वुली वुलनगाँग या स्त्री-खेळाडूंनी सबंध जग व विंबल्डन गाजविले आहे. लांब अंतर धावण्याच्या शर्यतीत जॉन लँडी व हर्ब एलियट ह्यांनी जागतिक विक्रम केले आहेत.
ऑस्ट्रेलियातील जलद व स्वस्त हवाई वाहतुकीमुळे पर्यटनविकास अतिशय झपाट्याने होत आहे. पॅसिफिकच्या पुळणींवर पोहणे व सर्फिंगचे खेळ सिडनी व इतर बंदरांतून नौकानयन ग्रेट बॅरियर रीफ येथे स्किनडायव्हिंग आणि ब्ल्यू माउंटन्स पर्वतभागांत उन्हाळी व हिवाळी खेळ, ह्यांमुळे ऑस्ट्रेलियास प्रवासी वाढत्या संख्येने भेट देत आहेत. ऑस्ट्रेलियात अनेक ठिकाणी खेळाच्या सोयी असून क्रिकेट-मैदाने जगप्रसिद्ध आहेत. कॅनबरा हे राजधानीचे शहर व औद्योगिक केंद्र असून तेथील प्राणिसंग्रहालय प्रसिद्ध आहे. ब्रिस्बेन हेही औद्योगिक केंद्र आहे येथे राष्ट्रीय कलावीथी, वस्तुसंग्रहालय व अनेक अँग्लिकन आणि रोमन कॅथीड्रल आहेत. पर्थ हे व्यापारी व सांस्कृतिक शहर असून तेथे अनेक कॅथीड्रल, वस्तुसंग्रहालय, कलावीथी ह्या प्रेक्षणीय आहेत. येथे दरवर्षी महोत्सव भरविण्यात येतो. त्यामध्ये नृत्य, नाट्य, प्रदर्शने, संगीतिका वगैरे कार्यक्रम आंतरराष्ट्रीय कलाकार बोलावून केले जातात. मेलबर्न हे विस्तीर्ण पृष्ठप्रदेशाचे व्यापारी केंद्र तसेच लोहमार्गाचे केंद्र व उत्कृष्ट बंदर आहे. प्रेक्षणीय वनस्पतिउद्यानांकरिता मेलबर्न प्रसिद्ध आहे. येथील ‘मेलबर्न कप’ ही घोड्यांची शर्यत अतिशय विख्यात आहे. मेलबर्नजवळच ब्रायटन हे सागराजवळील आरोग्यस्थान प्रसिद्ध आहे. ॲडिलेड हे औद्योगिक शहर असून येथेही आंतरराष्ट्रीय पातळीवर द्विवार्षिक कलामहोत्सव भरविण्यात येतो. (चित्रपत्र ३२, ३३, ३४).
गद्रे, वि. रा.
संदर्भ : 1Arndt, H. W. & Corden, W. M. The Australian Economy, Melbourne, 1963.
2. Caiger, George-Ed. Australian way of Life, Melbourne, 1954.
3. Chisholm, Alec H. & Pratt Bruce W. The Australian Encyclopaedia, Sydney, 1963.
4. Davidson, Frank G. The Industrialization of Australia, Melbourne, 1957.
5. Laseron, Charles F. The Face of Australia, Sydney, 1953.
6. Learmonth, A.T.A. & A.M. Encyclopaedia of Australia, London, 1968.
7. Cramer J. F. & Browne, G. S. Contemporary Education, New York, 1956.
8. UNESCO, Compulsory Education in Australia, Paris, 1951.