ऑसेलॉट : स्तनिवर्गातील फेलिडी कुलातला हा प्राणी मोठ्या मांजराएवढा असून मध्य व दक्षिण अमेरिकेतील जंगलात आढळतो. याचे शास्त्रीय नाव फेलिस पारडॅलिस असे आहे.

अंगावरील केस दाट, काहीसे आखूड व पिवळसर-तपकिरी रंगाचे असतात. शरीरावर स‌गळीकडे मोठाले काळे ठिपके आणि पट्टे असतात. याच्या निवासस्थानातील परिस्थितीशी हा इतका एकरूप झालेला असतो की स‌हजासहजी तो दिसत नाही. या ⇨मायावरणाचा भक्ष्य मिळण्याकरिता त्याला उपयोग होतो. हा निशाचर आहे, पण कोणी त्रास देणार नाही अशा ठिकाणी तो दिवसाही बाहेर पडतो. पक्षी, त्यांची अंडी, लहान स‌स्तन प्राणी, स‌रडे वगैरे याचे भक्ष्य होय. झाडावर चढता येत असले तरी तो पुष्कळसाजमिनीवरच वावरतो. प्रजोत्पादनाच्या काळात (डिसेंबरमध्ये), माजावर आलेल्या पाळीव मांजरासारखाच आवाज हे प्राणी काढतात. मादीला दर खेपेस प्रायः दोन पिल्ले होतात.

देशपांडे, ज. र.