ऑलिंपिक क्रीडासामने : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेमार्फत सर्वराष्ट्रांकरिता दर चार वर्षांनी भरविले जाणारे निरनिराळ्या खेळांचे जागतिक सामने. प्राचीन ग्रीस देशातील ऑलिंपिया या स्थळी ऑलिंपिक खेळ भरत असत. त्यावरुन या सामन्यांना ऑलिंपिक क्रीडासामने हे नाव पडले.
प्राचीन काळी संस्कृतीच्या उच्च शिखरावर असलेल्या ग्रीस देशात तत्त्वज्ञान, साहित्य, काव्य, शिल्प, स्थापत्य, शिक्षण इ. विषयांप्रमाणे शारीरिक शिक्षणावर विशेष भर दिला जात असे. होमरच्या इलियड व ओडिसी या महाकाव्यातील आकिलीझ व युलिसीझ हे नायक अचाट सामर्थ्य, शौर्य, धैर्य इ. गुणांत तसेच कुस्ती, भालाफेक, मुष्टियुद्ध इ. विद्यांत प्रवीण होते, असे वर्णन आहे. ग्रीकांच्या शिक्षणपद्धतीत शारीरिक शिक्षण, आहार व आरोग्यसंवर्धन यांवर विशेष लक्ष दिले जाई.
त्या काळच्या शारीरिक शिक्षणाचा कस पाहण्यासाठी मर्दानी व मैदानी शर्यतींचे सामने मोठ्या प्रमाणावर भरत असत. या सामन्यांत धावणे, भालाफेक, थाळीफेक, शारीरिक कसरती, कुस्ती, मुष्टियुद्ध इत्यादींचा समावेश असे. या विषयांचे शिक्षण देणार्या व्यायामशाळा व आखाडे असत.
ग्रीक लोक धार्मिक वृत्तीचे होते. झ्यूस, अपोलो, हमींझ, अथीना, डिमीटर इ. देवदेवतांची पूजा करून त्यांना प्रसन्न करून घेणे हे त्यांचे उद्दिष्ट असे. या धार्मिक वृत्तीतूनच ऑलिंपियन सामन्यांचा उगम झालेला आहे. हे सामने विविध देवदेवतांच्या उत्सवाप्रीत्यर्थ भरविले जात व त्यांत शरीरसामर्थ्य व कौशल्य यांची कसोटी पाहिली जाई. या सामन्यांचा कालावधी सामान्यत: दर चार वर्षांनी उन्हाळ्याच्या मध्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या आसपास चारपाच दिवसांचा असे. हे सामने ग्रीकांचा देवाधिदेव झ्यूस याच्या उत्सवार्थ भरत व त्यांत भाग घेणारे तरुण तत्पूर्वी दहा महिने सामन्यांसाठी तयारी करीत असत. पहिल्या दिवशी भाग घेणाऱ्या तरुणांची चाचणी व शपथविधी होई. दुसऱ्या दिवशी रथांच्या शर्यती व घोड्यांच्या शर्यती होत. तिसऱ्या दिवशी पौर्णिमेला झ्यूस देवाला प्रसन्न करण्यासाठी आहुती, बलिदान आदी कार्यक्रम सकाळी होत व दुपारी युवकांच्या विविध शर्यती होत. चौथ्या दिवशी महत्त्वाच्या मैदानी व मर्दानी शर्यती म्हणजे धावणे, कुस्त्या, मुष्टियुद्ध आदी होत. पाचव्या दिवशी ऑलिव्हच्या पर्णांचा मुकुट घालून विजयी वीरांचा सन्मान केला जाई व मेजवान्या होऊन समारंभाची सांगता होत असे.
ऑलिंपिक सामने केव्हा व कसे सुरू झाले, हे निश्चितपणे सांगता येत नाही. परंतु ऐतिहासिक पुरावा व परंपरा पाहता इ. स. पू. ७७६ साली इफिटस या राजाच्या कारकीर्दीत कायदेपंडित लायकरगस याने हे सामने सुरू केले असावेत. तत्पूर्वीही दोनतीन शतके अशाच प्रकारचे पायथियन, नेमियन, इस्थामियन सामने चालू होते, असे होमरच्या इलियड या काव्यातील उल्लेखावरून दिसते. दर चार वर्षांनी भरणाऱ्या या क्रीडामहोत्सवात ‘ऑलिंपियड’ ही संज्ञा प्राप्त झाली. हे सामने भरविण्यासाठी वर उल्लेखिलेल्या ऑलिंपिया या वनश्रीयुक्त जागेची योजना होऊन तेथे झ्यूसचे मंदिर बांधण्यात आले व त्यात १२·१९ मी. उंचीचा सुवर्ण, हस्तिदंत व हिरेमाणिकांचा झ्यूसचा पुतळा उभारण्यात आला. त्याच्या सभोवती विजयी वीरांचे पुतळे उभारले गेले. मंदिराच्या परिसरात सामन्यांसाठी इमारती, क्रीडांगणे, नाट्यगृह व प्रचंड प्रेक्षागृहही कालांतराने बांधण्यात आले. मुख्य शर्यतीचे मैदान व प्रेक्षागृह फारच भव्य होते. त्यात एका वेळी सु. ५०,०००लोक सहज सामावले जात. प्रमुख खेळांच्या शर्यती या प्रेक्षागारामध्येच होत असत. त्याची लांबी १९२ मी. व रुंदी २७·४३ मी. असे. या अंतराला एक ‘स्टेड’ म्हणत व अशा अनेक ‘स्टेड’ अंतरांच्या शर्यती असत. क्रीडांगणावर सामान्यत: भुसभुशीत वाळू पसरलेली असे व भाग घेणारे खेळाडू अनवाणीच धावत असत. शारीरिक कसरतींमध्ये संपूर्ण उघड्या शरीराने भाग घ्यावा लागे. त्यामुळे भाग घेणाऱ्या युवकाचे शरीर बांधेसूद आहे किंवा नाही हे समजत असे.
ऑलिंपिक क्रीडासामन्यांत भाग घेणाऱ्या खेळाडूंना सामन्यांपूर्वी १० महिने व्रतस्थ राहून नियमितपणे तयारी केल्याचा दाखला घ्यावा लागे. प्रथमत: फक्त शुद्ध ग्रीक रक्ताच्या ३० वर्षे पूर्ण झालेल्या खेळाडूसच या सामन्यांत भाग घेता येत असे. सामन्यांच्या प्रारंभी खेळाडूंना आपल्या पालकांच्या व शिक्षकांच्या समवेत शर्यतीत, ‘सचोटीने भाग घेऊ व खेळास कमीपणा आणणारे कोणतेही वर्तन करणार नाही’, अशी शपथ घ्यावी लागे. सामन्यांची व्यवस्था पाहणाऱ्या पंचांनासुद्धा शपथ घ्यावी लागे. प्रारंभी सर्व शर्यतींचे निकाल देण्यास एकच पंच असे. कालांतराने शर्यतींची संख्या वाढू लागली व पंचांची संख्याही वाढत गेली. त्या काळच्या सामन्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे पंचांनाही सामन्यात भाग घेता येत असे. परंतु पुढे ही प्रथा बंद करण्यात आली.
सामन्यांचे सुरुवातीस खेळाडू, पंच, नगरपिते, प्रमुख मंत्री, खेळाडूंचे रथ, घोडे व खेळांचे साहित्य यांची मोठी मिरवणूक निघे. अर्वाचीन ऑलिंपिक सामन्यांतील मानवंदना, संचलन इ. पूर्वीच्या मिरवणुकीच्या प्रतिकृतीच होत. सामन्यांत धावण्याच्या शर्यती, उड्यांच्या शर्यती, द्वंद्वे, पाचशर्यती गट (पेंटॅथ्लॉन), घोड्यांच्या शर्यती व रथांच्या शर्यती यांचा समावेश असे. तेविसाव्या ऑलिंपिक सामन्यापासून मुलांकरिताही शर्यती भरविल्या जाऊ लागल्या.
आरंभीच्या काळात विजयी खेळाडूंना मौल्यवान बक्षिसे दिली जात. परंतु सहाव्या सामन्यापासून विजयी वीरास सोनेरी व हस्तिदंती विजयपीठावर उभे केले जाई. सोन्याच्या कोयत्याने कापलेल्या पवित्र ऑलिव्ह फांदीचा मुकुट त्याच्या माथ्यावर ठेवून, दूताकडून त्याचा व त्याच्या मातापित्यांचा जयघोष केला जाई. सर्व प्रेक्षकही त्याचा जयजयकार करीत. नंतर त्याचे नगरबांधव वाद्ये वाजवून त्याची रथातून मिरवणूक काढीत. कवी व भाट त्याच्या यशाचे गुणगान करीत. त्याचे पुतळे उभारले जात व अशा ऑलिंपिक वीराला राष्ट्रवीर मानले जाई.
ऑलिंपिक सामन्यांतील अजिंक्यपद टिकविण्यासाठी काही खेळाडू फार प्रयत्न करीत. चिओनिस या स्पार्टाच्या खेळाडूने धावण्याच्या शर्यतीत (स्टेड-रेस) तीन वेळा, तर लीऑनिडस या खेळाडूने लागोपाठ चार वेळा विजय मिळविला होता. हार्मोजिनस याने तीन खेळांत मिळून आठ विजय संपादन केले, म्हणून त्यास ‘अश्व’ (हिप्पोज) हे नामाभिधान मिळाले होते. सुप्रसिद्ध तत्त्ववेत्ता पायथॅगोरस याचा शिष्य मायलो याने कुस्तीत सात वेळा अजिंक्यपद मिळविले होते. मॅसिडोनियाचा राजा फिलिप (अलेक्झांडरचे वडील) याने रथाची शर्यत जिंकली होती. रोमन राजा नीरो याने व्यायामी खेळ, नाट्य व संगीत यांत अजिंक्यपदे मिळविली होती.
ग्रीक लोकांच्या या ऑलिंपिक सामन्यांचे उज्ज्वल स्वरूप हळूहळू बदलत गेले. खेळासाठी खेळ, कलेसाठी कला, उत्तम नागरिक वा सैनिक तयार करणे, ही उच्च ध्येये मागे पडून या सामन्यांना खेळांच्या दंगलीचे धंदेवाईक स्वरूप आले. कालांतराने ग्रीक परंपरा नष्ट झाल्या व रोमन लोकांच्या कारकीर्दीत तर सामन्यांना रानटी व हिंस्र स्वरूप प्राप्त झाले. धावण्याच्या व उड्या मारण्याच्या शर्यती, कुस्त्या, द्वंद्वे यांऐवजी घोड्यांच्या व रथांच्या शर्यती सुरू झाल्या व प्रतिस्पर्ध्याला जायबंदी करून नामोहरम करण्याची प्रवृत्ती वाढत गेली. पुढेपुढे तर मनुष्य व सिंह किंवा वाघ यांसारखी क्रूर श्वापदे यांची रोमांचकारी व हिडीस द्वंद्वे होऊ लागली. तसेच भीमपराक्रमी पहिलवानांची सशस्त्र द्वंद्वे होऊ लागली. त्यांत एक खेळाडू संपूर्ण जायबंदी होऊन त्याचा निःपात होईपर्यंत द्वंद्व चालत असे. या सामन्यांतील वीर समाजातील पुढाऱ्यांपेक्षाही बलवान झाले व त्यामुळे समाजस्थैर्याला धोका उत्पन्न झाला. त्यामुळे ३९४ साली त्यावेळच्या थीओडोशियस या रोमन बादशहाने कायद्याने या सामन्यांवर बंदी घातली. अशा रीतीने जगाच्या इतिहासात सु. १२० ०वर्षे अखंड चालणारे हे ऑलिंपिक सामने बंद पडले ते कायमचेच. त्यानंतर सु. १५०० वर्षांनी एकोणिसाव्या शतकात या सामन्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले.
अर्वाचीन ऑलिंपिक सामने : ग्रीस देशातील अथेन्स शहरात १८९६ साली अर्वाचीन ऑलिंपिक सामन्यांची सुरुवात झाली. या प्राचीन सामन्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे श्रेय फ्रान्समधील बॅरन कूबर्तँ यांना आहे. बॅरन कूबर्तँ हे फ्रेंच लष्करी अकादमीत शिक्षण घेत असताना, फ्रेंच तरुणांचा रंगेलपणा व पोषाखीपणा पाहून राष्ट्रीय जीवन सुधारण्याच्या दृष्टीने विचार करू लागले. त्यासाठी त्यांनी इंग्लंड, अमेरिका इ. राष्ट्रांच्या राष्ट्रीय जीवनाचा अभ्यास करण्यासाठी दौरे काढले. इंग्लंडमधील मैदानी खेळ व शर्यती यांचा तेथील तरुणांच्या शरीरस्वास्थ्यावर व शीलावर होणारा इष्ट परिणाम पाहून त्यांनी एक पुस्तक लिहिले व त्यात फ्रान्सने इंग्लंडमधील शारीरिक शिक्षणपद्धतीचा अवलंब करावा, असे सुचविले. त्याचा योग्य तो परिणाम होऊन फ्रान्समध्ये १८९१ साली एक समिती नेमण्यात आली. १८८९ मध्ये बॅरन कूबर्तँ यांनी एक शारीरिक शिक्षण परिषद बोलाविली. १८९२ मध्ये इंग्लंडमधील व अमेरिकेतील क्रीडासंघांना फ्रान्सने आमंत्रण दिले. पुढेकूबर्तँ यांच्याच अध्यक्षतेखाली फ्रान्समधील २०० क्रीडासंघांची एक मध्यवर्ती समिती स्थापण्यात आली. त्यात त्यांनी प्राचीन ग्रीक ऑलिंपिक सामन्यांचे पुनरुज्जीवन करण्याची आपली कल्पना मांडली. १८९४ मध्ये त्यांनी निरनिराळ्या राष्ट्रांना परिपत्रके पाठवून पॅरिसमध्ये एक आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषद बोलाविली. या परिषदेत त्यांनी ऑलिंपिक क्रीडासामने भरविण्याची योजना मांडली. विशेष वादविवाद न होता ती संमत होऊन सामने भरविण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय समिती नेमण्यात आली. अशा रीतीने १८९६ साली प्राचीन ऑलिंपिक क्रीडांचा श्रेष्ठ वारसा असलेल्या ग्रीस देशातील इतिहासप्रसिद्ध अथेन्सशहराला पहिले अर्वाचीन ऑलिंपिक सामने भरविण्याचा बहुमान मिळाला. ऑलिंपिक सामन्यांचे नियंत्रण व व्यवस्था ‘इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटी’’ ही संस्था पाहते. या समितीत प्रत्येक सभासद-राष्ट्राचे १ते ३ प्रतिनिधी असतात. भारताचे प्रतिनिधित्व करणारी ‘इंडियन ऑलिंपिक असोसिएशन’ ही संस्था दिल्ली येथे १९२७ मध्ये स्थापन झाली. इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटीची मुख्य कचेरी स्वित्झर्लंडमधील लोझॅन शहरी आहे. १८९६ ते १९२५ पर्यंत ऑलिंपिक सामन्यांचे पुनरुज्जीवन करणारे बॅरन कूबर्तँ हेच इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटीचे अध्यक्ष होते.त्यानंतर १९२५ ते १९४२ पर्यंत बेल्जियमचे कौंट ला तूर व १९४२ ते १९४५ पर्यंत स्वीडनचे सिगफ्रिड एड्स्ट्रम हे अध्यक्ष होते. १९५२ ते १९७० पर्यंत अमेरिकेचे ॲव्हरी ब्रुंडेज हे अध्यक्षपदी होते. त्यानंतर लॉर्ड किलानीन हे अध्यक्ष झाले. ऑलिंपिक सामन्यांत जात, धर्म, राष्ट्र इ. भेद मानत नाहीत. फक्त हौशी खेळाडूंनाच या सामन्यांत भाग घेता येतो. प्रत्येक प्रकारच्या खेळात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्याखेळाडूंचा सन्मान, त्यांना अनुक्रमे सोन्याचे, चांदीचे व ब्राँझचे पदक देऊन करण्यात येतो. यावेळी त्या त्या राष्ट्राचा राष्ट्रध्वज उंचावून त्या त्या राष्ट्राचे राष्ट्रगीत वाजविले जाते.
इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटीचे आवाहन स्वीकारुन अथेन्सला भरणाऱ्या पहिल्या ऑलिंपिक सामन्यांत जगातील सु. १३ राष्ट्रांनी २८५ खेळाडू पाठवून भाग घेतला. ग्रीसचे क्रीडाप्रिय राजपुत्र कॉन्स्टंटीन हे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष व बॅरन कूबर्तँ हे चिटणीस होते. अथेन्स येथे ७लक्ष रुपये खर्च करुन नवीन पद्धतीचे संगमरवरी प्रेक्षागार बांधण्यात आले. शारीरिक कसरती, कुस्ती, मुष्टियुद्ध इत्यादींसाठी एक हॉल बांधण्यात आला. ६ एप्रिल १८९६ रोजी ५०,००० प्रेक्षकांसमोर ग्रीसच्या राजाने या पहिल्या ऑलिंपिक सामन्यांचे उद्घाटन केले. आखलेल्या कार्यक्रमाप्रमाणे सर्व खेळांचे सामने उत्साहाने पार पडले व विजयी खेळाडूंच्या कौशल्याचे कौतुक करण्यात आले.
कार्यपद्धती : अर्वाचीन ऑलिंपिक सामने एका विशिष्ट पद्धतीने पार पाडले जातात. त्यांत प्राचीन सामन्यांची उद्दिष्टे, तत्त्वे व परंपरा कटाक्षाने पाळल्या जाव्यात, यांकडे विशेष लक्ष दिले जाते.
ऑलिंपिक सामन्यांचे ध्येयवाक्य ‘अधिक गतिमान, अधिक उच्च, अधिक बलशाली’ (लॅटिनमध्ये Citius, Altius, Fortius) हे आहे. हे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करावा असे त्यायोगे खेळाडूंस आवाहन करण्यात आले आहे. ऑलिंपिक ध्वजावर निळ्या, काळ्या, पिवळ्या, हिरव्या व लाल रंगांची एकमेकांत गुंफलेली पाच वर्तुळे असतात. ही पाच वर्तुळांची आकृती पाच खंडे व त्यांचे ऎक्य यांचे प्रतीक मानण्यात येते. सामन्यांच्या उद्घाटनाच्या वेळी ‘ऑलिंपिक गीत’ वाजविण्यात येते. सामने सुरू होण्यापूर्वी यजमान राष्ट्राच्या एका मान्यवर खेळाडूने सर्व खेळाडूंच्या वतीने ‘ऑलिंपिक शपथ’ घ्यावयाची असते. त्यानंतर बँडच्या तालात सर्व खेळाडूंचे संचलन होते व पाहुण्यांना मानवंदना देण्यात येते. नंतर तुतारीच्या निनादात शांतीचे प्रतिक म्हणून हजारो कबुतरे आकाशात उडवितात. त्याच वेळी ऑलिंपिक ज्योत प्रेक्षागारात धावत आणली जाते व त्यायोगे प्रेक्षागारातील ऑलिंपिक ज्योत प्रज्वलित केली जाते. सामने संपेपर्यंत ही ज्योत तेवत ठेवण्यात येते. ऑलिंपिक गीत चालू असतानाच ऑलिंपिक ध्वज उभारण्यात येतो व खेळाडू-प्रमुख सर्व खेळाडूंच्या तर्फे शपथ घेतो. त्यानंतर प्रत्यक्ष सामन्यांस सुरुवात होते व ते सु. १५ दिवस चालतात. सामन्यांतील सर्व खेळ संपल्यावर समाप्तीचा समारंभ होतो. त्यावेळी विविध राष्ट्रांतील खेळाडू एकमेकांत मिसळून विश्वबंधुत्वाचे नाते जनसमुदायास प्रत्ययास आणून देतात.
आधुनिक ऑलिंपिक क्रीडासामन्यांंसंबंधी महत्त्वाची आकडेवारी
ऑलिंपिक सामन्यांत विविध खेळांच्या स्पर्धा असतात. त्यांत प्रामुख्याने धावण्याच्या शर्यती, फेकण्याच्या स्पर्धा, उड्यांच्या स्पर्धा, अडथळा-शर्यती, पळण्याच्या गट-शर्यती, चालण्याच्या शर्यती, दशशर्यती गट, अर्वाचीन पंच-शर्यती गट, विविध सांघिक खेळ, सायकल शर्यती,मुष्टियुद्ध, कुस्त्यांचे प्रकार (कुस्त्या व मुष्टियुद्ध यांत वेगवेगळ्या वजनांचे ८ गट असतात), फेन्सिंग, वल्हविण्याच्या शर्यती, शारीरिक कसरतीच्या शर्यती, वजन उचलण्याच्या शर्यती, पोहण्याच्या शर्यती, घोड्यांच्या शर्यती, नेमबाजी, शीड-जहाजांच्या शर्यती, विविध कलास्पर्धा इ. आहेत. अशा प्रमुख २६ स्पर्धांचे प्रकार व त्यांचे सु. ६३ पोटप्रकार १९६८ च्या मेक्सिकोच्या सामन्यांत घेण्यात आले. ऑलिंपिक सामन्यांचाच एक भाग म्हणून बर्फावरील विविध खेळांच्या शर्यती हिवाळ्यात घेतात. त्यांना ‘हिवाळी खेळ’ म्हणून संबोधतात. वरील विविध क्रीडाप्रकारांपैकी स्त्रियांना भाग घेता येईल, अशा बऱ्याचशा क्रीडास्पर्धा खास स्त्री-खेळाडूंसाठी म्हणून स्वतंत्रपणे घेण्यात येतात. दर चार वर्षांनी भरणाऱ्याया ऑलिंपिक सामन्यांत वरील क्रीडाप्रकारांत फेरफार होत असतात.
भारताची ऑलिंपिक सामन्यांतील कामगिरी : अँटवर्प (बेल्जियम) येथे १९२० साली भरलेल्या सातव्या ऑलिंपिक क्रीडासामन्यात भाग घेण्यासाठी सर दोराबजी टाटा यांच्या सक्रिय प्रयत्नांमुळे २ कुस्तीगीर व ४ खेळाडू यांचा पहिला अनधिकृत संघ पाठविण्यात आला. पण त्यांच्यापैकी कोणालाच यश मिळाले नाही. १९२४ च्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धांसाठी श्री. बॅक यांच्या नेतृत्वाखाली एक अधिकृत संघ पाठविण्यात आला. त्यातील फक्त दलिपसिंग याने लांब उडीत सातवा क्रमांक मिळविला. १९२८ च्या ॲम्स्टरडॅम ऑलिंपिक क्रीडासामन्यांसाठी श्री. सोंधी यांच्या नेतृत्वाखाली २५ खेळाडूंचा संघ पाठविण्यात आला. त्यांतील भारतीय हॉकी संघाने सर्व संघावर मात करून जागतिक अजिंक्यपद मिळविले. १९३२ च्या लॉस अँजेल्स ऑलिंपिक क्रीडासामन्यांसाठी श्री. सोंधी यांच्या व्यवस्थेखाली हॉकी, कुस्ती व व्यायामी खेळांसाठी भारतीय संघ गेला होता. त्यातील हॉकी संघाने अजिंक्यपद कायम राखले. हॉकीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने अमेरिकेचा २४-१ अशा गोलांनी पराभव केला. १९३६ च्या बर्लिन ऑलिंपिक क्रीडासामन्यासाठी भारतातून हॉकी, व्यायामी खेळ, कुस्ती यांचे संघ पाठविण्यात आले. हॉकी संघाने आपले अजिंक्यपदकायम राखले. मॅरॅथॉन शर्यतीत सी. एस्. ए. स्वामी याचा सदतीसावा नंबर लागला. दुसऱ्यामहायुद्धानंतर १९४८ साली लंडन येथे ऑलिंपिक क्रीडासामने भरले. भारतातून हॉकी, फुटबॉल, कुस्ती, व्यायामी खेळ इत्यादींसाठी १०४ खेळाडू गेले होते. त्यांतील हॉकी संघातील खेळाडूंनी अजिंक्यपद राखले. कुस्तीत खाशाबा जाधव याचा फ्लायवेट गटात सहावा क्रमांक लागला. बाकीच्या खेळाडूंचा विशेष प्रभाव पडला नाही. १९५२ च्या हेल्सिंकीत भरलेल्या ऑलिंपिक क्रीडामहोत्सवासाठी हॉकी, फुटबॉल, व्यायामी खेळ, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, नेमबाजी इ. खेळांत भाग घेण्यासाठी बराच मोठा संघ गेला होता. त्यात हॉकी संघाने आपले अजिंक्यपद पाचव्यांदा कायम राखले. अशा तऱ्हेने पाच ऑलिंपिक सामन्यांत मिळून प्रतिस्पर्धी राष्ट्रांवर भारताने १४० गोल केले. भारतावर मात्र फक्त सातच गोल करण्यात आले. कुस्तीत श्री. खाशाबा जाधव याने बँटमवेट गटात तिसरा क्रमांक लावून भारताला पहिले व एकमेव ब्राँझ पदक मिळवून दिले. श्री. माणगावे यांचा फेदरवेट गटात पाचवा क्रमांक लागला. १०० मी. व २०० मी. पळण्यात लाव्ही पिंटो व ८०० मी. पळण्यात सोहनसिंग हे उपांत्य फेरीपर्यंत गेले होते. १९५६ च्या मेलबर्न ऑलिंपिक क्रीडासामन्यांसाठी भारताचा बराच मोठा संघ गेला होता. त्यात हॉकी संघाने आपली विजयी परंपरा सहाव्यांदा टिकवून उच्चांक निर्माण केला. फुटबॉल संघाचा चवथा क्रमांक लागला. अजितसिंग उंच उडीत (१·९४ मी.) चवदावा, तर मोहिंदरसिंग लंगडझाप उडीत अकरावा आला. वजन उचलण्यात गोपाल नववा, मूकन बारावा व ईश्वरराव तेरावा आला. बाकीच्या खेळाडूंचा विशेष प्रभाव पडला नाही. १९६० च्या रोम ऑलिंपिकमध्ये भारतातर्फे ६१ खेळाडूंचा संघ गेला होता. त्यात आपल्या हॉकी संघाने ५ सामने जिंकले पण अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून १-० गोलने त्याचा पराभव झाला व १९२८ पासून ६ वेळा मिळविलेले अजिंक्यपद त्याने गमावले. उपविजेतेपदाचे रौप्यपदक भारताला मिळाले. फुटबॉल संघानेही मेलबर्नला मिळविलेला चवथा क्रमांक घालविला. ४०० मी. शर्यतीत मिल्खासिंगचा चवथा क्रमांक लागला. लालचंद, जगमलसिंग व भाटिया यांचे मॅरेथॉन शर्यतीत ४०, ४५ व ६०वे क्रमांक लागले. नेमबाजीत महाराज कर्णीसिग यांचा आठवा क्रमांक लागला. १९६४ च्या टोकिओ ऑलिंपिकसाठी भारताने बरीच तयारी करुन ६० खेळाडू पाठविले. त्यात फक्त हॉकी संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा १-०गोलने पराभव करून अजिंक्यपद परत मिळविले. ११० मी. हर्डल्समध्ये गुरुबचनसिंग पाचवा आला. ४ × ४००मी. रीलेशर्यतीत (मिल्खासिंग, माखनसिंग, अमृतपाल व अजमेरसिंग) भारतीय संघाने उपांत्य फेरीपर्यंतही मजल मारली नाही. कुस्तीत भारतीय कुस्तीगीर तिसऱ्याव चवथ्या फेरीत बाद झाले. वजन उचलण्यात एम्. एल्. घोषचा चवदावा व के. एल्. दासचा तेरावा क्रमांक लागला. नेमबाजीत महाराज कर्णीसिग सव्वीसावे व देवीसिंग एकूणपन्नासावे आले. सांघिक शारीरिक कसरतीत भारताचा अठरावा क्रमांक लागला. १९६८ च्या मेक्सिको सिटी येथे भरलेल्या ऑलिंपिक क्रीडासामन्यांत भारताचा हॉकी संघ अजिंक्यपद गमावून तिसऱ्या क्रमांकावर गेला. १९७२ च्या म्यूनिक (प.जर्मनी) येथे भरलेल्या सामन्यांतही भारताचा क्रमांक तिसराच राहिला.
निरनिराळ्या देशांत १९६८ पर्यंत झालेल्या ऑलिंपिक क्रीडासामन्यांची संख्या १९ आहे. ऑलिंपिकचे विसावे क्रीडासामने २६ ऑगस्ट १९७२ ला म्यूनिक येथे सुरु झाले. ११ सप्टेंबर १९७२ ला आफ्रिकी राष्ट्रांच्या विनंतीवरुन इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटीने ऱ्होडेशियाची या सामन्यांतून हकालपट्टी केली. ५ सप्टेंबरपर्यंत सामने अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडले. पण ६ सप्टेंबर १९७२ ला काही अरब पॅलेस्टिनियन गनिमांनी ९ इझ्राएली खेळाडूंचा खून केला. या संस्थेच्या आंतरराष्ट्रीय सामंजस्याच्या ध्येयाला या घटनेने आव्हान दिले आहे. काही अरब राष्ट्रे सोडल्यास बाकीच्या राष्ट्रांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. या क्रीडासामन्यांत रशियाने सर्वांत अधिक सुवर्णपदके मिळवून अमेरिकेवर मात केली. केन्या व क्यूबा ही राष्ट्रे या ऑलिंपिकमध्ये चमकली. युगांडा, इथिओपिया, उत्तर कोरिया, इराण इ. आफ्रो-आशियाई राष्ट्रांनी या ऑलिंपिकमध्ये उत्साहाने भाग घेतला. हॉकीतील भारत व पाकिस्तान यांचे आजवरचे प्रभुत्व या ऑलिंपिकमध्ये संपुष्टात आले व प. जर्मनीनेहॉकीतील सुवर्णपदक मिळविले. पश्चिम जर्मनीकडून हॉकीच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी जे बेशिस्त व अशिष्ट वर्तन केलेत्यामुळे त्यांच्या संघाला आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यातून तात्पुरते बडतर्फ करण्यात आले होते.
इ.स. १८९६ पासून पुनरुज्जीवित झालेले ऑलिंपिक क्रीडासामने १९१६ साली पहिल्या जागतिक महायुद्धामुळे व १९४० व १९४४ साली दुसऱ्या जागतिक युद्धामुळे होऊ शकले नाहीत. १९०० पासून स्त्रिया या सामन्यांत भाग घेऊ लागल्या. १९२० सालच्या अँटवर्पच्या ऑलिंपिक सामन्यांत प्रथमच ऑलिंपिक ध्वज वापरण्यास प्रारंभ झाला. १९५२ च्या हेल्सिंकीच्या ऑलिंपिक सामन्यांपासून रशिया हे राष्ट्र सामन्यात भाग घेऊ लागले. तेथून पुढील सामन्यांत खरी चुरस रशिया व अमेरिका या राष्ट्रांतच असल्याचे दिसून येते. १९७२ ला म्यूनिक येथे भरलेल्या ऑलिंपिक सामन्यांत इंग्रजी व इतर भाषांबरोबर हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, कानडी व उर्दू या सहा भारतीय भाषांचा निवेदनासाठी वापर करण्यास सुरुवात झाली. यामुळे भारतीय खेळाडूची विशेष सोय झाली आहे. (चित्रपत्र ७८).
संदर्भ : 1. Grombach, J. V. The 1964 Olympic Guide, New York, 1964.
2. Sanyal, Saradindu, Olympic Games and India, Delhi, 1970.
शहाणे, शा. वि.
ऑलिंपिक क्रीडासामने, उदयगिरी