ऑर्स्क : रशियाच्या ओरेनबुर्ग ओब्लास्टमधील औद्योगिक केंद्र. लोकसंख्या २,२५,००० (१९७०). उरल पर्वताच्या दक्षिण टोकाशी अस‌लेल्या ऑर्स्कखालिलोवो या खनिजसमृद्ध भागात, उरल व ओब नद्यांच्या संगमावर हे वसलेले असून येथे नजिकच्या एंबा तेलक्षेत्रातून आणलेल्या तेलाचे शुध्दीकरण मोठ्या प्रमाणावर होते. याशिवाय लोखंड, निकेल व ॲल्युमिनियम यांचे मोठे कारखाने येथे असून बॉयलर, टर्‌बाइन वगैरेकरिता लागणारी यंत्रसामग्री, आगगाडीची एंजिने, शेतीची व बांधकामाची यंत्रे येथे तयार होतात. फळे डबाबंद करणे, मांस‌संवेष्टन, आटा व मद्य तयार करणे हे उद्योगही ऑर्स्कमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत.

शाह, र. रू.