आल्फव्हेन, हान्नेस : (३० मे १९०८– ). स्वीडिश शास्त्रज्ञ. १९७० च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते. त्यांचा जन्म व शिक्षण अप्साला येथे झाले. स्टॉकहोम येथील रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या इलेक्ट्रानिकी विभागात ते १९४० पासून कार्य करीत असून या संस्थेच्या आयनद्रायू भौतिक विभागाचे ते प्रमुख आहेत. १९७०-७१ मध्ये त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन डिएगो येथे संशोधन व अध्यापन केले.

आल्फव्हेन यांनी भूभौतिकीय व खगोलीय भौतिकी यांमधील प्रश्न सोडविण्यासाठी  आयनद्रायू भौतिकी (आयनद्रायू म्हणजे धन विद्युत् भारित अणुकेंद्रे व ऋण विद्युत्‌ भारित इलेक्ट्रॉन यांनी बनलेला, समूहदृष्ट्या विद्युत् भाररहित परंतु विद्युत् संवाहक असलेला वायू) आणि चुंबकीय द्रवगतिकी [आयनद्रायू व चुंबकीय क्षेत्र यांच्यामध्ये होणाऱ्या परस्पर क्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र, → चुंबकीय द्रवगतिकी ] या विषयांत महत्वाचे कार्य केलेले असून त्यांच्या संशोधनाचा खगोलीय भौतिकीमध्ये विशेष उपयोग करण्यात आलेला आहे. १९४२ मध्ये सौर डागांसंबंधी अभ्यास करताना त्यांनी द्रवचुंबकीय तरंगांची संकल्पना मांडली. या तरंगांना ‘आल्फव्हेन तरंग’ असे म्हणतात. अशा तरंगांचे अस्तित्व पुढे प्रयोगशाळेत सिद्ध झाले. भूचुंबकत्वासंबंधीचे काही प्रश्न सोडविण्यास या तरंगांच्या संकल्पनेचा फार उपयोग झाला.

आयनद्रायूमध्ये असलेल्या निष्क्रिय चुंबकीय रेषांमुळे त्याला दृढता प्राप्त होते ही महत्त्वाची संकल्पना त्यांनी मांडली. ही संकल्पना चुंबकांवर (पृथ्वीभोवतीच्या ज्या भागात भूचुंबकत्व क्रियाशील आहे असा भाग), ताऱ्यांचे वातावरण व आंतरतारकीय द्रव्य यांतील प्रक्रियांचे स्पष्टीकरण करण्यासाठी उपयुक्त ठरली आहे. या संकल्पनेच्या आधारे आल्फव्हेन यांनी, सौरकुलाच्या कोनीय संवेगाचा (निरूढी परिबल × कोनीय वेग, निरूढी परिबल हे वस्तूने कोनीय वेगातील बदलास केलेल्या विरोधाचे परिमाण आहे) बराचसा भाग सूर्यात नसून तो ग्रहांमध्ये का एकवटलेला आहे, याचे स्पष्टीकरण मांडले. तसेच सौर डागांचे द्रव्य आजूबाजूच्या भागापेक्षा थंड व त्यामुळे जास्त दाट असूनही स्वतःच्या वजनामुळे खाली का बुडत नाही. याचेही त्यांनी स्पष्टीकरण या संकल्पनेद्वारे दिले.

चुंबकीय वादळे व ध्रुवीय प्रकाश (ध्रुवीय प्रदेशात आढळणारा विविधरंगी प्रकाशीय आविष्कार) यांविषयी १९३९ मध्ये त्यांनी एक सिद्धांत मांडला. त्यातूनच पुढे त्यांनी सूर्यापासून येणाऱ्या आयनीभूत वायूंच्या झोतात, त्याच्या उद्गमापासून आलेल्या निष्क्रिय चुंबकीय रेषाही असल्या पाहिजेत असा विचार मांडला व पुढे अवकास उड्डाणात १९५६ मध्ये या विचाराला भरपूर पुरावाही मिळाला. उष्मीय-अणुकेंद्रीय ऊर्जेच्या निर्मितीमध्ये कित्येक दशलक्ष अंश तपमान असलेला अत्युष्ण आयनद्रायू उपकरणांच्या भिंतींपासून दूर ठेवण्यासाठी चुंबकीय क्षेत्रे वापरावी लागतात व त्यामुळे आयनद्रायूत विविध प्रकारच्या अस्थिरता निर्माण होतात. यासंबंधीच्या स्पष्टीकरणार्थ आल्फव्हेन यांनी चुंबकीय द्रवगतिकीसंबंधी मांडलेल्या तत्त्वांचा उपयोग करण्यात आला.

‘चुंबकीय द्रवगतिकीसंबंधीचे मूलभूत कार्य व त्याचे आयनद्रायू भौतिकीतील उपयुक्त अनुप्रयोग’ या कार्याकरिता आल्फव्हेन यांना ल्वी यूजीन नील यांच्याबरोबर नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. त्यांच्या कार्याचे महत्त्व ओळखून १९५८ मध्ये ‘शांततेसाठी अणुशक्ती’ याविषयी जिनिव्हा येथे भरलेल्या परिषदेच्या उद्‌घाटनाचे भाषण देण्यासाठी त्यांची निवड झाली होती. अनेक स्वीडिश सरकारी समित्यांवर व शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केलेले आहे. लंडनच्या रॉयल अस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे ते फेलो असून १९६७ मध्ये वैश्विक विद्युत् गतिकी या विषयातील मूलभूत कार्यासाठी त्यांना सोसायटीच्या सुवर्णपदकाचा सन्मान मिळाला.

भदे, व. ग.