आलेप्पो : वायव्य सिरियातील व्यापारी शहर. प्राचीन ग्रीक नाव बेरीया अरबी नाव हॅलेब. लोकसंख्या ६,३९,००० (१९७०). हे सिरियातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर इस्तंबूल-बगदाद रेल्वेवर आहे. प्राचीन काळापासून हे दळणवळणाचे केंद्र समजले जाते. इ.स.पू. २००० च्या सुमारास हे हिटाइट संस्कृतीचे केंद्र होते. बायझंटिन साम्राज्यात हे भरभराटलेले होते. त्यांच्याकडून ते अरब व तुर्कांकडे आले. हिंदुस्थानाकडे जाणारे सागरी मार्ग आणि सुएझ कालवा यांमुळे याचे महत्त्व कमी झाले परंतु सिरिया हा फ्रेंच महादिष्ट प्रदेश व पुढे स्वतंत्र झाल्यावर आलेप्पोस महत्त्व आले. भूकंपामुळे शहराचे वारंवार नुकसान झालेले आहे. रेशमी व सुती कापड, गालिचे, वनस्पती तेले, साबण, साखर, सिमेंट यांचे कारखाने येथे असून धान्ये, ऑलिव्ह तेल, सुकी व कवचीची फळे, दुभत्याचे पदार्थ, गुरे, कातडी, लोकर इत्यादींची ही मोठी बाजारपेठ आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर आलेप्पोची अधिकच वाढ झाली. नवीन आधुनिक भागात बॅंका, हॉटेले, रुग्णालये, संग्रहालये, विद्यापीठ व कारखाने आहेत. जुन्या भागात उंचावरील प्राचीन किल्ला नजरेत भरतो. शेकडो वर्षापूर्वीच्या इमारती, मशिदी, वेशी, तटबंदीच्या भिंती अजून उभ्या आहेत. अल् फिर्दोस गाझी ही मशीद सिरियातील मध्ययुगीन उत्कृष्ट वास्तुशिल्पाचा नमुना आहे. बहुतेक जुन्या इमारतीत शाळा किंवा अनाथालये आहेत.
कुमठेकर, ज. ब.
“